काव्यलेखन

सुगंधित श्रावण

Submitted by पुरंदरे शशांक on 25 August, 2025 - 02:26

सुगंधित श्रावण

टपटपणारी पहाटवेळी देठीची पोवळी
झिरमिळ भाळी शुभ्र पाकळी गंधखुळी कोवळी

शुभ्रतुर्‍यांनी लगडून गेली पाचूची पैठणी
सजली कुंती दरवळणारी धुंदगंध देखणी

जुळ्या सावळ्या जाईजुईही रोमांचित साजणी
रातराणी ती सांडून देई भुईवरती चांदणी

शुभ्र तलम पाकळी लवलवे हिरव्या पानातूनी
गुच्छ अवतरे सोनटक्याचा करांजुळी उघडुनि

अवखळ श्रावण घेई गिरकी रेशिमसा न्हाऊनि
चमकून खाली उन्हे पहाती मेघ बाजू सारुनी

अबोली

Submitted by तो मी नव्हेच on 14 August, 2025 - 08:59

कधी तरी पावसानं स्वच्छ रिमझिम यावं
मनातलं तिच्या मला खरंच कळावं
खरं कळूनही मी तिला उगीच छळावं
अन् अंगणातील अबोलीनं हळूच फुलावं

अंगणातील अबोलीनं हळूच फुलावं
नाजूक, हिरवं रूप तिचं गुलाबी खुलावं
मनी माझ्या मोगर्याने टपोरं हसावं
अन् मनातलं हसू तिला डोळ्यांत दिसावं

मनातलं हसू तिला डोळ्यांत दिसावं
अन् गुलाबी रंगास तिच्या उधाणच यावं
रंगांमध्ये मोगर्याने तिच्या रंगून जावं
तिच्या मनातलं गुज माझ्या ओठांवर यावं

शब्दखुणा: 

"मी रडत राहिलो, ते हसत निघून गेले"

Submitted by निमिष_सोनार on 14 August, 2025 - 00:10

मी रडत राहिलो,
ते हसत निघून गेले,
मी त्यांचं ओझं घेतलं,
ते मोकळ्या पायाने गेले.

मी त्यांच्या दुःखात रडलो,
ते माझ्या अश्रूंना चुकवून गेले,
मी त्यांचं जग सांभाळलं,
ते माझं अस्तित्व विसरून गेले.

मी त्यांच्या ‘हो’ मध्ये,
माझं ‘नाही’ गमावलं,
मी त्यांच्या ‘ठीक आहे’ मध्ये,
माझं ‘ठीक नाही’ दडपलं.

मी त्यांच्या सुखासाठी,
स्वतःला हरवून बसलो,
हरवलेल्या मला ते,
शोधायलाही आले नाहीत.

लोकांना खुश करत करत,
मी स्वतःचं मन दुखावत गेलो.
त्यांना हसवताना,
मी स्वतःचं हास्य हरवत गेलो.

श्रावण पक्षी

Submitted by पुरंदरे शशांक on 13 August, 2025 - 01:30

श्रावण पक्षी

हलके हलके पानांवरती
थेंबांची ती नाजुक नक्षी
सर सर सर झाडांवरती
बरसत येतो श्रावण पक्षी

घन घन घन निळ्या आकाशी
अवचित येता मेघ अंबरी
झळझळणार्‍या रवी करांनी
पात उजळते मस्त बिलोरी

सळसळणारे शिवार थबके
क्षणात वाजे झरा खळाळी
भिरभिरणारी रंगबिरंगी
फुलपाखरे सोनझळाळी

खुळावणारा निसर्ग सारा
फिटे निराशा उदासवाणी
लवलवणारे मानस डोले
मिटूनी डोळे अंतर्यामी

कोसळत्या धारा,पाऊस वारा

Submitted by Meghvalli on 10 August, 2025 - 03:03

कोसळत्या धारा,पाऊस वारा,
घाली थैमान मनात,
भिजुन साऱ्या,आठवणी आल्या,
घेऊन झोका मनात.

इंद्रधनुचे रंग,अंबराचा संग,
नाचला मोर बनात,
थेंब थेंब मोती,भिजवती माती,
टीप टीप लकेर कानात.

दरवळला मंद, मातीचा गंध,
सळसळले रोमांच अंगणात,
खळखळते झरे, नागमोडी सारे,
वाहती डोंगरदऱ्यात.

मंगळवार, ५/८/२५ , ५:२७ PM
अजय सरदेसाई -मेघ

फक्त साक्षीभाव उरला

Submitted by Meghvalli on 10 August, 2025 - 02:35

शब्दांच्या भावविश्वात मी सजग फिरून आलो,
सापडले अनेक मोती, कवितेत विखरून आलो.

प्रत्येक ओळ माझी,स्फुरतीने तुझ्या फुलते,
तुझ्या धुंद आठवांनी,माझी कविता खुलते.

हे स्वप्न असे की हे सत्य,शोधणे सोडून आलो,
विमुक्त या क्षणांत,मी आयुष्य जगून झालो.

हा थंड मंद वारा, तुझा गंध घेऊन आला,
कवितेतून माझ्या, मी तुला स्पर्श केला.

दोन्ही विश्वांतून त्या, मी सहज प्रवास करतो,
सत्य नि मिथ्य जोडणारा,मी एक दुवा ठरतो

प्रवाह आयुष्याचा, क्षणातून काळात फिरला,
उरलो न मी देहात — फक्त साक्षीभाव उरला.

रमणीय रमणी

Submitted by Meghvalli on 5 August, 2025 - 12:55

रमणीय रमणी अवतरली स्वप्नात,
उठला कल्लोळ माझ्या भवस्वप्नात.

ही कोण कुठली,ओळख नाही मजला,
कशी कुठून आली ही अप्सरा स्वप्नात.

नजरेत तिच्या लपलेली अगणिक कोडी,
ती सोडविण्यास झालो मी आतुर स्वप्नात.

ओठांवरी हास्य आणि चंद्रकिरणांचे गाणे,
उमलले मन माझे जणु कुसुम स्वप्नात.

स्पर्शात तिच्या होता मंद वाऱ्याचा गोडवा,
जाईचा सुगंध सर्वत्र दरवळला स्वप्नात.

जपले विलक्षण क्षण ते मनाच्या गाभाऱ्यात,
तिच्या गाण्याची लकेर अजुनी माझ्या स्वप्नात.

मंगळवार, ५/८/२५ , ४:१४ PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 

आले आभाळ भरून

Submitted by द्वैत on 5 August, 2025 - 05:56

आले आभाळ भरून
उन्हे कलली जराशी
ओल्या मातीचा सुगंध
नाते सांगतो नभाशी

थेंब टपोरे टपोरे
निळ्या पाण्यात वाजती
गवताची गर्द पाती
एका लयीत डोलती

नदी वाहता वाहता
मागे वळून पहाते
डोळे मिटून कधीचे
कोण काठाशी भिजते

पंख झाडून पाखरु
डोकावते डोलीतून
ओसरती सर पुन्हा
जोर धरते कुठुन

शोधे झाडाचा आडोसा
मागे राहिले वासरू
दूर पिंपळाच्या मागे
नभ लागले उतरू

रान हिरवे हिरवे
थिरकते ओलेचिंब
झाले पुसट किनारे
निवळते प्रतिबिंब

आभाळ

Submitted by सुखदा ८ on 28 July, 2025 - 13:55

भरून आलेलं आभाळ कधीच एकटं नसतं;
दाटलेल्या ढगांना उराशी घेऊन
ते बोलायला आलेलं असतं !
त्याच्याही मनात असतं खुप काही सांगण्या सारखं !
पण फुटणाऱ्या ढगां सारखं
त्याला उतावीळ व्हायचं नसतं !
कडाडणार्या विजा ,भणाणणारं वारं,
पावसा सह वाहुन नेतं
हसरं जग सारं !
डोक्यावर च्या आकाशाला याचाच बहुतेक त्रास होतो ,
त्याच्या पोरांचे प्रताप पाहुन, त्याच्यातला बाप उदास होतो !
गडगडणार्या मेघांना तोच मग आवरत बसतो ,
वार्याच्या मदतीनं हळूच दुर नेत असतो ,
पावसानं विस्कटलेलं जग, त्यालाही वरून बघवत नसतं !
पण तो तरी काय करणार?

तुझ्यापाशी..

Submitted by निखिल मोडक on 28 July, 2025 - 08:39

तुझ्यापाशी आल्यावर
चार क्षण थांबतोच मी
आपसुक

तुझ्या उदासीन प्रवाहात
सोडतो मी माझ्या वेदनांचे
जळते दिवे

नकळत पडलेल्या पानासारखे
तरंगत राहते माझे मन
तुझ्या लहरींवर

किती शांतपणे वाहत राहतेस
आखून दिलेल्या मार्गावर
शिस्तशीर

पण भरून आल्यावर
तूही ऐकत नाहीस कोणाचे
माझ्यासारखे

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन