सुगंधित श्रावण

Submitted by पुरंदरे शशांक on 25 August, 2025 - 02:26

सुगंधित श्रावण

टपटपणारी पहाटवेळी देठीची पोवळी
झिरमिळ भाळी शुभ्र पाकळी गंधखुळी कोवळी

शुभ्रतुर्‍यांनी लगडून गेली पाचूची पैठणी
सजली कुंती दरवळणारी धुंदगंध देखणी

जुळ्या सावळ्या जाईजुईही रोमांचित साजणी
रातराणी ती सांडून देई भुईवरती चांदणी

शुभ्र तलम पाकळी लवलवे हिरव्या पानातूनी
गुच्छ अवतरे सोनटक्याचा करांजुळी उघडुनि

अवखळ श्रावण घेई गिरकी रेशिमसा न्हाऊनि
चमकून खाली उन्हे पहाती मेघ बाजू सारुनी

Group content visibility: 
Public - accessible to all site users
नवीन प्रतिसाद लिहा