तुकाराम हे कोडे अवघड
तुकाराम हे कोडे अवघड
तुकाराम हे कोडे अवघड
कधी कुणाच्या ठायी
भाग्यविधाता विठू एकला
पिसे सर्वथा देई
अभंगातली कधि एखादी
ओळ खुणावत नेई
थेट डोही त्या इंद्रायणीच्या
जळात निर्मळदायी
निश्चळ सारा डोंगर परिसर
भंडाराचे माथी
वृक्ष वेलीही अजून झुलती
विठ्ठलनामावरती
आर्त सुरातील एक विराणी
काळिज विंधत जाई
थरथरणारी ज्योत दिव्याची
विठूस चमकून पाही
कंठ रुंधला झुके पापणी
देह पालखी भोई
अंतरातली वीट थरारे
निळे निरामय न्हाई