काव्यलेखन

रमणीय रमणी

Submitted by Meghvalli on 5 August, 2025 - 12:55

रमणीय रमणी अवतरली स्वप्नात,
उठला कल्लोळ माझ्या भवस्वप्नात.

ही कोण कुठली,ओळख नाही मजला,
कशी कुठून आली ही अप्सरा स्वप्नात.

नजरेत तिच्या लपलेली अगणिक कोडी,
ती सोडविण्यास झालो मी आतुर स्वप्नात.

ओठांवरी हास्य आणि चंद्रकिरणांचे गाणे,
उमलले मन माझे जणु कुसुम स्वप्नात.

स्पर्शात तिच्या होता मंद वाऱ्याचा गोडवा,
जाईचा सुगंध सर्वत्र दरवळला स्वप्नात.

जपले विलक्षण क्षण ते मनाच्या गाभाऱ्यात,
तिच्या गाण्याची लकेर अजुनी माझ्या स्वप्नात.

मंगळवार, ५/८/२५ , ४:१४ PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 

आले आभाळ भरून

Submitted by द्वैत on 5 August, 2025 - 05:56

आले आभाळ भरून
उन्हे कलली जराशी
ओल्या मातीचा सुगंध
नाते सांगतो नभाशी

थेंब टपोरे टपोरे
निळ्या पाण्यात वाजती
गवताची गर्द पाती
एका लयीत डोलती

नदी वाहता वाहता
मागे वळून पहाते
डोळे मिटून कधीचे
कोण काठाशी भिजते

पंख झाडून पाखरु
डोकावते डोलीतून
ओसरती सर पुन्हा
जोर धरते कुठुन

शोधे झाडाचा आडोसा
मागे राहिले वासरू
दूर पिंपळाच्या मागे
नभ लागले उतरू

रान हिरवे हिरवे
थिरकते ओलेचिंब
झाले पुसट किनारे
निवळते प्रतिबिंब

आभाळ

Submitted by सुखदा ८ on 28 July, 2025 - 13:55

भरून आलेलं आभाळ कधीच एकटं नसतं;
दाटलेल्या ढगांना उराशी घेऊन
ते बोलायला आलेलं असतं !
त्याच्याही मनात असतं खुप काही सांगण्या सारखं !
पण फुटणाऱ्या ढगां सारखं
त्याला उतावीळ व्हायचं नसतं !
कडाडणार्या विजा ,भणाणणारं वारं,
पावसा सह वाहुन नेतं
हसरं जग सारं !
डोक्यावर च्या आकाशाला याचाच बहुतेक त्रास होतो ,
त्याच्या पोरांचे प्रताप पाहुन, त्याच्यातला बाप उदास होतो !
गडगडणार्या मेघांना तोच मग आवरत बसतो ,
वार्याच्या मदतीनं हळूच दुर नेत असतो ,
पावसानं विस्कटलेलं जग, त्यालाही वरून बघवत नसतं !
पण तो तरी काय करणार?

तुझ्यापाशी..

Submitted by निखिल मोडक on 28 July, 2025 - 08:39

तुझ्यापाशी आल्यावर
चार क्षण थांबतोच मी
आपसुक

तुझ्या उदासीन प्रवाहात
सोडतो मी माझ्या वेदनांचे
जळते दिवे

नकळत पडलेल्या पानासारखे
तरंगत राहते माझे मन
तुझ्या लहरींवर

किती शांतपणे वाहत राहतेस
आखून दिलेल्या मार्गावर
शिस्तशीर

पण भरून आल्यावर
तूही ऐकत नाहीस कोणाचे
माझ्यासारखे

बखरीच्या पानाआड

Submitted by अनन्त्_यात्री on 26 July, 2025 - 09:12

बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर

प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून

जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी

बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
मला भुलवी गारूड

कविता

Submitted by Santosh zond on 25 July, 2025 - 01:28

चिखलाच्या वलयात फुलते,चिखल कधी होत नाही
काट्यांच्या विळख्यात खिळते,निखळ कधी होत नाही
कमळ फुलाच्या पाकळ्यांवर
चंद्र होऊन साचते कविता,
पानवेलीच्या धुंद कळ्यांवर
पाऊस होऊन नाचते कविता,
आयुष्य देही कुरुक्षेत्रावर
कर्ण् होऊन गाजते कविता,
निरागस जिवाला लागल्यावरती
आई होऊन याचते कविता,
चिखलाच्या वलयात फुलुन,काट्यांच्या विळख्यात खिळुन कधीही संपत नाही कविता,
माती होऊन मातीत रुजते,पुन्हा पहाटे फुलते कविता.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

मी शरण तुला आली

Submitted by Meghvalli on 23 July, 2025 - 10:15

चांदण्यात चिंब भिजून, मिलनाची रात्र आली,
बाहुपाशात तुझ्या सजणा, मी गलित गात्र झाली।

ओठांचा स्पर्श मुलायम, अधरांस झाला जेव्हा,
ज्वाळांच्या उठल्या लाटा, एक विज कडाडून गेली।

कानांत तुझं गुणगुणणं, थेट हृदयास भिडलं,
शब्दार्थ लागताच, मला गोड लाज आली।

विकल्प कोणता उरला होता माझ्याकडे रे,
ती गोड मागणी अनामीक, रंध्रारंध्रांने केली।

श्वासा-श्वासातून उसळली, अग्नीची उत्क्रांती,
मी विसरून गेली मजला... मी शरण तुला आली।

बुधवार, २३/७/२५, ६:५४ PM
✍ अजय सरदेसाई – ‘मेघ’

आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी

Submitted by Meghvalli on 23 July, 2025 - 06:28

हृदयीच्या भावना या गुंफू कशा शब्दांत,
हृदयीची स्पंदने विरली पुन्हा हृदयात.
दुःख हृदयीचं गाते मुक गाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

हे चांदणे कुणाचं पसरलं नभात,
जणू पुंजके आठवणींचे पसरले मनात.
ओघळलं डोळ्यात एका चांदण्याचं पाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

हुळुवार भावना या जणू पाकळ्या फुलांच्या,
ठेवल्या सर्व जपून पुस्तकात आठवणींच्या.
सांगू कुणास मी ही हळवी जुनी गार्‍हाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

शब्द जमवुनि

Submitted by पुरंदरे शशांक on 22 July, 2025 - 00:57

शब्द जमवुनि

शब्द जमवुनि दोन चार ते
अर्थालागी शोधत राही
काय करावे कधी जमेना
काव्य त्यामधे उतरत नाही

निसर्ग सारा नभा मिसळुनि
द्विजगण तेथे देतो सोडून
इंद्रधनुचे उसने तोरण
जराजरासे देतो घुसडून

तरी जमेना काय करावे
ह्रदयस्पर्शी शब्दी योजून
भाव भावना शुष्क तरीही
एकामागून एक समर्पून

नैसर्गिक ते काव्य उमटते
एक कळी ती येता उमलून
स्तब्ध जरासा चकीत होउन
काव्य देखणे घेतो निरखून

---------------------------------------
नभा.... नभ, आकाश
द्विजगण.... पक्षीगण

अजून एक कोवळा तुरा उभा मनामधे

Submitted by हर्षल वैद्य on 21 July, 2025 - 13:44

अजून एक कोवळा
तुरा उभा मनामधे
अजून एक पालवी
निळाइची खुणावते

अजून वाट वाकडी
हळूच साद घालते
प्रवास एकटा मुका
जमेल, भूल घालते

अबोध सांजवेळही
करीत गुप्त खल्बते
निळावल्या निशेसही
छुप्या कटात ओढते

पहाटस्वप्न होउनी
मनातली निळी परी
जुन्या उजाड भूवरी
नवीन बीज पेरते

असेन मी कसा जुना
उरात ओल आजही
जमेलही रुजायला
नवीन अंकुरासही

ऋतूमती निळी धरा
अबोल वाट पाहते
अकथ्यबीजगर्भिणी
निमूट भार साहते

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन