कविता

प्लीज प्लीज प्लीज... नका वाचू !

Submitted by एक लेखक on 30 December, 2025 - 13:01

शरद गेला
वसंतात वाट पाहिली तुझी
कोकिळेच्या नाही गं
सकाळी सकाळी खारीय्य च्या आवाजाने जागा होऊन
बेकरीवाल्या भैय्यांना ओलांडत
दूधवाल्यांची लगबग बघत
फूटपाथवर पेपरच्या पुरवण्या लावत बसलेल्या मुलांकडे बघत
रिक्षावाल्यांना टाळत टाळत
रेल्वे स्टेशनला जाऊन पहिली लोकल पकडत होतो
जम्मूतावी से मुंबई आनेवाली ट्रेन अपने निर्धारीत समय पर चल रही है
हे ऐकत ऐकत कितीदा तरी चहा पिलो असेन
त्याने सिगरेट विचारल्यावर माफ करो भैया म्हणालो
तुझी खूप वाट बघितली
कारण मग उन्हाळा कडक होतो

शब्दखुणा: 

मौनातली गणिते

Submitted by मानसी१४ on 6 December, 2025 - 09:29

मौनातून उगवलेली गणिते
सोडवताना आशेचा हातचा
उत्तराचे नवीन कोडे
सोडवण्याचा प्रयत्न रोजचा

माझे शब्दवेल्हाळ प्रवाह
तुझे मौनाचे किनारे
भिजवण्याची शिकस्त
चिवट अपेक्षांचे सहारे

भविष्यावर काळजीचे ओझे
अंतर्मनात भीतिचे कवडसे
जगण्याच्या दाट धुक्याला
स्वप्नांचे फितूर आडोसे

मानसी

शब्दखुणा: 

फक्त साक्षीभाव उरला

Submitted by Meghvalli on 10 August, 2025 - 02:35

शब्दांच्या भावविश्वात मी सजग फिरून आलो,
सापडले अनेक मोती, कवितेत विखरून आलो.

प्रत्येक ओळ माझी,स्फुरतीने तुझ्या फुलते,
तुझ्या धुंद आठवांनी,माझी कविता खुलते.

हे स्वप्न असे की हे सत्य,शोधणे सोडून आलो,
विमुक्त या क्षणांत,मी आयुष्य जगून झालो.

हा थंड मंद वारा, तुझा गंध घेऊन आला,
कवितेतून माझ्या, मी तुला स्पर्श केला.

दोन्ही विश्वांतून त्या, मी सहज प्रवास करतो,
सत्य नि मिथ्य जोडणारा,मी एक दुवा ठरतो

प्रवाह आयुष्याचा, क्षणातून काळात फिरला,
उरलो न मी देहात — फक्त साक्षीभाव उरला.

तुझ्यापाशी..

Submitted by निखिल मोडक on 28 July, 2025 - 08:39

तुझ्यापाशी आल्यावर
चार क्षण थांबतोच मी
आपसुक

तुझ्या उदासीन प्रवाहात
सोडतो मी माझ्या वेदनांचे
जळते दिवे

नकळत पडलेल्या पानासारखे
तरंगत राहते माझे मन
तुझ्या लहरींवर

किती शांतपणे वाहत राहतेस
आखून दिलेल्या मार्गावर
शिस्तशीर

पण भरून आल्यावर
तूही ऐकत नाहीस कोणाचे
माझ्यासारखे

शतजन्माचे सार

Submitted by यःकश्चित on 4 May, 2025 - 22:04

वर्षामागून वर्षे जातील, आणि नव्याचे येत रहावे ।
रात्र सारुनी गतवर्षाची, नव्या पहाटे स्वागत व्हावे ॥

पुन्हा नव्याने रवीतेज हे, अस्मानाला बिलगून यावे ।
अनंत येतील रात्री तरीही, पुनःश्च त्याने उगवत जावे ॥

नव्या नांदीचे नवीन सरगम, भैरवीतही खुलून यावे ।
सहस्त्र संकटे तार छेडिती, सूर सुखाचे जुळून यावे ॥

जन्म मृत्यूच्या चक्रातूनही, मिळेल तितके जगून घ्यावे ।
नवे जन्म हे अनोळखी परी, आप्तेष्टांचे स्पर्श मिळावे ॥

हो विस्फोट जरी शतजन्माचा, क्षणात सारे संपून जावे
नव्या युगाच्या उंबरठ्यावर शतजन्माचे सार कळावे ॥

- यःकश्चित

शब्दखुणा: 

तू प्राणप्रिये...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:58

मी देह तरी तू प्राण प्रिये
हि बात आता तू जाण प्रिये
जणू एक तपस्वी जाण मला
मी स्मरतो ते तू ध्यान प्रिये

मज सृष्टी चा तू सूर्य जणू
मी दीपक एक लहान प्रिये
महासागर तू ग प्रेमाचा
मी मिथ्या अभिमान प्रिये

तुज ठाईच मन रमते माझे
तू जगण्याला आधार प्रिये
तुज विन अपुरा आहे मी
तुज संगे मी साकार प्रिये

प्रेम तुझे माझे...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:50

देह माझा, देह तुझा
आज आहे, उद्या नाही
परी प्रेम हे तुझे माझे,
कधी संपणार नाही

वृद्ध झालो जरी तू मी
परी प्रेम ते तरुण,
अन वाढत्या वयात
दाट होई ते अजून

जन्म दुसरा कोण पाही ?
तू मज मिळेल की नाही?
आज आहे तुझ्यासवे
उद्या होणार ते होई

जरी नभ कोसळले
जरी भूमी ही फाटली,
तुझ्या माझ्या या प्रेमाची
किरणे अनंत दाटली...

सांग ना...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:47

का स्वप्नी माझ्या येतेस तू?
का डोळ्यात माझ्या भरतेस तू?
का भान मजला राहिना?
काय जादू मजवर करतेस तू ,?सांग ना...

का एकांती तुजला आठवतो ?
का गर्दीत तुजला शोधतो ?
चेहरा तुझा तो पाहता
का लुप्त होई क्रोध तो,? सांग ना...

का तू हवीशी वाटतेस?
का तुलाच पाहावे वाटते?
काही त्रास तुजला होताच
का डोळ्यात पाणी दाटते,? सांग ना...

का मी तुलाच कळतो ?
का तू मलाच कळते ?
का मन तुझे अन माझे
एकमेकांकडे वळते,? सांग ना...

वेडे मन...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 04:38

पुन्हा पुन्हा का तुला आठवते
वेडे मन हे का बावरते..?
हुरहूरते का तुला पाहण्या
परी बोलण्या का घाबरते..?

राती काळ्या स्वप्न रंगीते
स्वप्नातून मग तुला पाहते
दिवसा उघड्या डोळ्यांनी ते
तुझ्याच का स्वप्नात राहते..?

पुन्हा पुन्हा का तुझ्या घराचे
गल्लीतून हा घाली फेरे..?
सदा तुला हृदयात भरण्या
हृदयाची का उघडी दारे..?

स्पर्श नको परी पास हवा तू!
जीव नको परी श्वास हवा तू!
असा कसा भाव आहे हा..?
ध्येय नको परी ध्यास हवा तू....!

Pages

Subscribe to RSS - कविता