जरा वेगळं चिंतन..

Submitted by _आदित्य_ on 1 December, 2025 - 01:33

जरा वेगळं चिंतन..

यमदूता रे येशील तेव्हा आण सोमरस प्याला..
इंद्रलोकीचे मद्य दिवाणे अमृत म्हणती ज्याला !
पूर्वकल्पना देतो आहे सकलांच्या मनी रुजवा..
जय्यत करण्या स्वागत माझे समस्त नगरी सजवा !
भुतापरी अन येऊ नको त्या काळ्या रेड्यावरती..
ऐरावत ठाऊक आहे ना? घेऊन ये तो हत्ती !
सांगा सर्व अप्सरा आणीक सगळ्या गंधर्वांना..
तयार ठेवा संगीत आणीक नृत्य सादरीकरणा!
वस्त्र मखमली, सोनपादुका, किरीट वगैरे आणी..
आठवणीने आण मुग्धकर गंधित अत्तरदाणी!
आकाशातील रस्ते तुमचे स्वच्छ, मोकळे ठेवा..
जेणे करून प्रवास माझा मस्त सुखाचा व्हावा!
कल्पतरुची जागा बदलून महालामधे स्थापा..
रोज बसाव्या मारत कोणी लांब एवढ्या खेपा !?

अश्या सूचना ऐकून वाटे नवल तुला ना मित्रा?
स्वार्थबुद्धीने बाधित माणूस असाच असतो भित्रा!
अहंकार अन गर्व वाटते ज्यास आपुले लेणे..
दुःखी खरंतर आतून तो.. अन त्याचीयाच कर्माने !
मरतानाही जो इच्छांचा दास तो न कधी सुटतो..
जो अर्थाचा त्याग करी तो हसत पापण्या मिटतो!

आदित्य

Group content visibility: 
Use group defaults