शब्द जमवुनि

Submitted by पुरंदरे शशांक on 22 July, 2025 - 00:57

शब्द जमवुनि

शब्द जमवुनि दोन चार ते
अर्थालागी शोधत राही
काय करावे कधी जमेना
काव्य त्यामधे उतरत नाही

निसर्ग सारा नभा मिसळुनि
द्विजगण तेथे देतो सोडून
इंद्रधनुचे उसने तोरण
जराजरासे देतो घुसडून

तरी जमेना काय करावे
ह्रदयस्पर्शी शब्दी योजून
भाव भावना शुष्क तरीही
एकामागून एक समर्पून

नैसर्गिक ते काव्य उमटते
एक कळी ती येता उमलून
स्तब्ध जरासा चकीत होउन
काव्य देखणे घेतो निरखून

---------------------------------------
नभा.... नभ, आकाश
द्विजगण.... पक्षीगण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर....