काव्यलेखन

तुझ्या हास्यज्योती

Submitted by चंद्रहास शास्त्री on 14 May, 2024 - 11:19

तुझ्या हास्यज्योती
- चंद्रहास शास्त्री

दाटलेल्या गर्द अंधा-या राती
उजळती तुझ्या हास्यज्योती
भीती काळजी विरून जाती
आशा स्वये पल्लव गीत गाती

सहज तुझे मनोरम हासणे
खुणावते मला पुनश्च जगणे
विसरून तेव्हा मी माझे हारणे
उरते लक्ष्य, एक, हृदय जिंकणे

नभीचे तारांगण तसे सांगते हळुवार
झाडांना, वेलींना, निखिल प्रकृतीला
वसंत पाझरू, बहरू द्या तुम्ही चौफेर
मोहोराचा गंधही असू द्या सोबतीला

शब्दखुणा: 

त्या तरुतळी

Submitted by अनन्त्_यात्री on 14 May, 2024 - 01:59

अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते

शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो

वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे

अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ

नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!

कधीतरी वाटतं आजारी पडावं

Submitted by चैतन्य रासकर on 10 May, 2024 - 05:15

कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं

पालथं झोपून छताकडे बघावं
भिंतीच्या पापुद्रांनी किती ते पडावं

दार उघडं ठेवून शांत झोपावं
स्वप्नात का होईना कोणीतरी गोळी द्यायला यावं

जुनं काही आठवावं स्वतःशी हसावं
असा का वागलो हे स्वतःला विचारावं

मागच्या गोष्टीचं काही दुःख नसावं
आपल्याला काहीही झालेलं नाही हे नव्याने कळावं

कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं..

-चैतन्य रासकर

नभाला नभांची मिळे सावली

Submitted by द्वैत on 10 May, 2024 - 01:04

दिशा धावती दूर क्षितिजापुढे या
दिठीची मिती आज रुंदावली
नभाला नभांची मिळे सावली

दिसू लागता गाव कोठे सुखाचा
मुक्या पैंजणी धून झंकारली
नभाला नभांची मिळे सावली

फुलावे कळीने पहाटे पहाटे
तशी आर्तता अंतरी दाटली
नभाला नभांची मिळे सावली

कुणी छेडता मारवा सांजवेळी
शिडे गलबतांची हलू लागली
नभाला नभांची मिळे सावली

द्वैत

सेवानिवृत्तीची क्षणचित्रे

Submitted by पॅडी on 9 May, 2024 - 01:41

*सेवानिवृत्तीची क्षणचित्रे*

१/ समारोप

सुरकुतल्या शुभेच्छांचा गंधवर्षाव
कोमेजल्या अभिनंदनाचे हार तुरे
इतिहासजमा कालखंडावर
पहिले अन् शेवटचे गौरवपर भाषण,
सर केलेल्या अत्युच्च शिखरावरून
पेशवाई कटागत; सामूहिकरित्या-
अनाम अंधारदरीत ढकलून दिल्यासारखा
तो आत्मक्लेशी सुवर्णक्षण !

२/ दिनचर्या

रस्ता चुकलाच कसा?

Submitted by चंद्रहास शास्त्री on 6 May, 2024 - 12:17

रस्ता चुकलाच कसा?
©️ चन्द्रहास शास्त्री

आज काफिला आला, इथे कळ्यांचा कसा
माझे मलाच उमजेना, रस्ता चुकलाच कसा?

दवांचे लेऊन ते, वसन मनोहर भारी
डोलत डोलत आल्या, रस्ता चुकलाच कसा?

की नवा शिरस्ता हा, धरला ते समजेना
कळ्यांनो सांगा ना, रस्ता चुकलाच कसा?

तिला थांबू द्या जरा, तुम्ही जा सुखे घरां
पण तरी सांगून जा, रस्ता चुकलाच कसा?

सिद्ध मी हा स्वागतां, तरी विद्ध होई ती
म्हणून मी विचारतो, रस्ता चुकलाच कसा?

शब्दखुणा: 

खुशाल आहे.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 6 May, 2024 - 12:15

खुशाल आहे.
©️ चन्द्रहास शास्त्री

वीज दाटल्या नभी, कडाड विशाल आहे
सांग मेघा तू तिला, पण मी खुशाल आहे.

निशिगंधास रेशमी, ओढली शाल आहे
गंध झाकलास तरी, पण मी खुशाल आहे.

अवकाळी वर्षा ही, अजब हे साल आहे
खळे झालेच नाही, पण मी खुशाल आहे.

स्मृतीसारिकेने ही, मधुरली डाल आहे
पंचमाची प्रतीक्षा, पण मी खुशाल आहे.

चंद्र तेथे चांदणी, ख्याती मिसाल आहे
इतुके नसे पुरेसे, पण मी खुशाल आहे.

शब्दखुणा: 

ती

Submitted by शब्दब्रम्ह on 5 May, 2024 - 07:27

आठवतंय...,शेवटच्या भेटीत बुजली होती ती,
स्वतः च्याच अश्रुंमध्ये भिजली होती ती.

आभाळभर दुःखांनी रडली होती ती,
उष्टी हळद लागूनही फिकी पडली होती ती.

कित्येक यातनांशी एकटीच ,जुंपली होती ती,
नियतीला पुरून उरूनसुद्धा जणू आज संपली होती ती.

"ही शेवटचीच भेट आपली." म्हणल्यावर झुरली होती ती,
कंठात अडकलेल्या हुंदक्यात, नकळत विरली होती ती.

हजारो वादळं उरात दाबून चालली होती ती,
निःशब्द राहून सुद्धा,बरच काही बोलली होती ती.

मी जिंकलो वाटते.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 4 May, 2024 - 00:41

मी जिंकलो वाटते.
©️ चन्द्रहास शास्त्री

तू हसताना सजणे, मी जिंकलो वाटते
तू लाजताना सखे, मी जिंकलो वाटते.

मिटती उघडती अशा, कळ्या भासती कशा
बोलताना सखे तू, मी जिंकलो वाटते.

गुणगुणतेस सखे तू, माझी कविता जेव्हा
शब्दच मोती होती, मी जिंकलो वाटते.

तारकांना सकाळी, वाटते जाग आली
सुधांशु तुझ्या भाळी, मी जिंकलो वाटते.

दृष्ट लागू नये तुला, अबीर मीच लावतो
मेंदीत अक्षर दिसता, मी जिंकलो वाटते.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन