श्रावण पक्षी
श्रावण पक्षी
हलके हलके पानांवरती
थेंबांची ती नाजुक नक्षी
सर सर सर झाडांवरती
बरसत येतो श्रावण पक्षी
घन घन घन निळ्या आकाशी
अवचित येता मेघ अंबरी
झळझळणार्या रवी करांनी
पात उजळते मस्त बिलोरी
सळसळणारे शिवार थबके
क्षणात वाजे झरा खळाळी
भिरभिरणारी रंगबिरंगी
फुलपाखरे सोनझळाळी
खुळावणारा निसर्ग सारा
फिटे निराशा उदासवाणी
लवलवणारे मानस डोले
मिटूनी डोळे अंतर्यामी