काव्यलेखन

कवीस काय हवं?

Submitted by Meghvalli on 26 February, 2026 - 10:45

कवीस काय हवं?
एक सुचलेली ओळ,
नको शब्दांचा घोळ।

कवीस काय हवं?
पाठीवर कौतुकाची थाप,
सुचाव्या कविता अमाप।

कवीस काय हवं?
एक लिहिण्याची प्रतिभा,
मनात असंख्य प्रतिमा।

कवीस काय हवं?
एक कल्पनांचा गाव,
आणि हृदयाचा ठाव।

कवीस काय हवं?
एक फसलेलं प्रेम,
समोर तिची फ्रेम।

कवीस काय हवं?
एक संवेदनशील मन,
लिहिण्यास साधंसं पेन।

गुरुवार, २६/०२/२६ — ९:०० PM
अजय सरदेसाई ‘मेघ’

अस्तित्व

Submitted by Meghvalli on 26 February, 2026 - 08:03

हे दृश्य-अदृश्य अस्तित्व फक्त माझ्यासाठी आहे,
माझंच अस्तित्व नसेल तर तेही कुठे आहे?
अस्तित्वातून जाणीव उठते, जाणीवेतून हे सगळं जग,
उरतो तो फक्त आभास — जरा डोळे मिटून बघ.
शरीर मिथ्या, जगत मिथ्या — उरतो फक्त ‘मी’,
‘मी’ कोण आहे? अस्तित्व हे उकलून बघ.
उकलता उकलता शेवटी, ‘मी’ही विरघळून जाईल,
उरेल फक्त अस्तित्वाची जाणीव… बघ.
ही जाणीवही शेवटी विरून जाईल,
उरेल ते फक्त अस्तित्व — ते कुणाचं, कुणास ठाऊक… बघ!

गुरुवार, २६/२/२६ , ६:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 

निवृत्ती

Submitted by Meghvalli on 26 February, 2026 - 04:34

दुःखाच्या सागरात सांज आयुष्याची होती,
चांदण्यांची चमचम, चंद्राची शीतलता होती।

झोपेच्या बिछान्याची जरी पोत काटेरी होती,
न कसलीच टोच होती, मनात शांतता होती।

सुखदुःखाची काहीच न चिंता होती,
संवेदना बोथट झाल्या, एक विरक्ती होती।

मला उधळण्यास जरी वादळांची दाटी होती,
डोक्यात तरीही एक निर्बीड शून्यता होती।

डोळे बंद होते, फक्त स्पंदनाची धडधड होती,
आयुष्याच्या क्षणांची गोळाबेरीज चालली होती।

बाहेरून मला किती स्वप्न खुणावत होती,
मी बधलो नाही त्यांना, जगण्यात निवृत्ती होती।

गुरुवार, २६/२/२६ , ३:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 

स्वप्न

Submitted by Meghvalli on 26 February, 2026 - 02:12

कधीतरी मीही तरुण होतो
तिच्या डोळ्यांत अरुण होतो

आयुष्य एक उत्सव होता
मी जगण्यात रमून होतो

जीवन होते तरल गाणे
गाण्यात मी रंगून होतो

स्वप्ने सारी साकारत होती
स्वप्नांच्या दुनियेत गुंतून होतो

आयुष्य छान सरकत होते
मी आकंठ स्वतःत बुडून होतो

अचानक मला ती भेटली होती
ते क्षण अलवार जपून होतो

तिच्या लाघवी सहवासात
स्वतःलाही मी विसरून होतो

अचानक कशी न जाणे जाग आली
कळले ते स्वप्न होते, मी स्वप्न जगून होतो

उरले उरात काही आभास चांदण्यांचे
ते चांदणे अजुनही मनात जपून होतो

निखळून एक तारा....

Submitted by Meghvalli on 25 February, 2026 - 10:25

निखळून एक तारा पडला खाली,
पडताना आकाश उजळून गेला।
वारा सुसाट सुटला होता खिडकीबाहेर,
सहज आत डोकावून गेला।
दोघांची चुकामूक झाली, भेट न झाली;
तो आत्ताच आला नि हा आत्ताच गेला।
मनातले शब्द काही ओठांवर आलेच नाहीत;
हुंदका हलकेच अश्रूत बदलून गेला।
काही न बोलता तिने फक्त एकदाच पाहिले,
तो कटाक्ष आयुष्याचा अर्थच बदलून गेला ।
अंधार सावल्यांचा खुप गडद झाला,
प्रकाश बघता बघता विरुन गेला।
राखेतला निखारा पुन्हा पेटला,

तू-अन-मी

Submitted by Meghvalli on 24 February, 2026 - 23:29

तू नदी होऊन आलीस, मी सागर — माझ्यात तूच आहेस,
प्रत्येक श्वासात माझ्या अंतरी तूच आहेस।

तू स्वरांची गूज हळवी, मी त्या गाण्याचा श्वास,
तालाच्या प्रत्येक ठोक्यात दडलेली तूच आहेस।

तू दीपाच्या ज्योतीसारखी, मी वात तुझ्या साथीत,
काळोख्या रात्रीतला प्रकाश तूच आहेस।

तू मातीची ओल गहिरी, मी बीज तुझ्या कुशीत,
फुलणाऱ्या प्रत्येक फुलांत सुगंधित तूच आहेस।

‘मेघ’ म्हणे, वेगळेपणाचा उरला नाही भास आता,
शोधत फिरलो जिला ती — सखी, तूच आहेस।

मंगळवार, २४/२/२६ , ७:५० PM
अजय सरदेसाई -मेघ

तू लिही

Submitted by Meghvalli on 24 February, 2026 - 23:27

घे हे पान कोरे, काहीतरी लिही,
गद्य असो किंवा पद्य, तू लिही।

शब्दांना जागे कर, उठव आणि लिही,
स्रोतांना वाहू दे कागदावर… लिही।

मनात दडलेले धूसर शब्द बाहेर येऊ दे, लिही,
एखादा थेंब होऊन ओळींतून टपू दे, लिही।

जखमा असतील तर त्यांची खपली काढ, लिही,
आठवणींना जरा मोकळं कर, लिही।

रितेपणाच्या या शांत प्रहरी, लिही,
स्वतःशीच साध संवाद, लिही।

जागव प्रतिभा, कर साकार शब्दप्रतिमा, लिही,
‘मेघ’ समजतोस कवी स्वतःला ना, मग लिही।

कर कविता, कर गझल, एखादा लेख लिही,
किंवा तापल्या शब्दांचे आक्रंदन लिही, पण लिही।

तू हे करूं नकोस

Submitted by Meghvalli on 24 February, 2026 - 12:01

माझ्यावर प्रेम करू नकोस,
माझ्यासाठी झुरूही नकोस,
मी माणूस बेभरवशाचा आहे,
माझ्यावर भरोसा ठेवू नकोस।

इकडे-तिकडे पाहू नकोस,
भलतीकडेच जाऊ नकोस,
आरशाची नजर लागेल तुला,
इतका शृंगार करू नकोस।

कविता माझी वाचू नकोस,
गझल माझी ऐकू नकोस,
उगाच प्रेम बसेल माझ्यावर,
इतकी गाफील राहू नकोस।

स्वप्नांत माझ्या येऊ नकोस,
हळूच माझे नाव घेऊ नकोस,
मन हे वेडं भुलून जाईल,
इतकं जवळ येऊ नकोस।

माझ्यात मन वळवू नकोस,
हृदय तुझे गुंतवू नकोस,
हा ‘मेघ’ आहेच क्षणभंगुर,
याच्यावर आस लावू नकोस।

शब्दखुणा: 

परीक्षा

Submitted by nitu_teen on 24 February, 2026 - 00:52

बाळा माझ्या, थांब जरा —
डोळ्यांतील ताण तुझ्या दिसतोय मला सारा.
पुस्तकांच्या ढिगाऱ्याखाली दडून बसलंय हसणं
परीक्षेच्या भीतीने तुझं म्लान होऊन बसणं.

बोर्डाची ही वेळ मोठी, मान्य आहे मला,
पण गुणांपेक्षा मोठी आहेस तू — लक्षात ठेव बाळा.
नातेवाईक काय म्हणतील, किती टक्के येतील —
विचार करू नकोस जास्त नाहीतर सतत तुला सलतील.

पण एक गोष्ट मात्र प्रेमाने सांगतो —
तुझ्यातली ताकद कधीही कमी लेखू नकोस.
देवाने दिलेली ही बुद्धी, ही जिद्द, ही स्वप्नांची ओढ —
त्यांना न्याय देण्यात तू कमी पडू नकोस

पुरे ते बहाणे

Submitted by Meghvalli on 23 February, 2026 - 21:35

प्राजक्तांची आज बरसात झाली,
आकाशात तारकांच्या उमलल्या चंद्रवेली!

वाहणारा वारा टाकतो उसासे,
न भेटताच आज तू का निघून गेली?

पुळणीवरची पाऊले तुझी लाटेने पुसून नेली,
शोधू कुठे सखे तुला, तू कुठे गेली?

व्याकुळ हृदय माझे, व्याकुळ नजरा,
तुझ्याविना माळू प्रिये कोणास हा गजरा?

तीन्हीसांजा झाल्या, सूर्यही मावळतीस आला,
तुझ्या स्वागतास चंद्र आतुर झाला.

तुझ्याचसाठी गातो मी प्रणय गाणे,
हा रुसवा सोड सखे, पुरे ते बहाणे.

सोमवार, २३/२/२६, ८:२० PM
अजय सरदेसाई – मेघ

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन