विठ्ठल
श्रीतुकयाबंधू - श्रीकान्होबा
श्रीतुकयाबंधू - श्रीकान्होबा
दिसेचिना बंधुराज
कान्हो विचारीत जना
दिसला का तुम्हा कोठे
बंधु तुकोबा सांगाना !
पिंपुरणी वृक्षातळी
पाहे तुळशीची माळ
वीणा सतत जवळी
तुका हातीचे ते टाळ
तारा वीणेच्या झुकल्या
टाळ पडे अस्ताव्यस्त
माळ तुळशीची पडे
धुळीमाजी ती अस्वस्थ
पाही कान्होबा निश्चळ
गाली कोरडा ओघळ
काय केलेसी विठ्ठला
डोई नुरले आभाळ
डोह इंद्रायणी स्थिर
नुठे एकही तरंग
पान उडूनी एकुटे
कान्हा पुढ्यात अभंग
गाथा गारुड
गाथा गारुड
ठसे नितळ शब्दांचे
मनावर अलगद
त्याचे गारुड आगळे
आत आत सावळत
इंद्रायणी डोहावाणी
शब्द गंभीर सखोल
लाटा हलके उठत
नाम बोलत विठ्ठल
पिंपुरणी रुखातळी
गार साऊली संतत
ओढ वाटते जीवाला
सुख ह्रदी सामावत
भाव शब्दींचा ह्रदयी
क्षणी जरा उतरत
विटेवरी जो ठाकला
बाहू येई पसरीत....
बाप आहेच अंतरी
बाप आहेच अंतरी
आठवावे काय रुप
चाले विठ्ठलाचे नाम
असोनिया तो अरुप
श्वासी विठ्ठल विठ्ठल
रोमरोमी तोचि एक
देहाबाहेर अंतरी
नित्य वैकुंठनायक
नेत्र पाहती विठ्ठल
कर्णी विठ्ठलाचे नाम
मुखी जप नसे तरी
तोच घेई त्याचे नाम
हाती लिहवितो तोचि
अभंगात ठाकलासे
किर्तनात रंगूनिया
नाम थोर गर्जतसे
कळेचिना जनलोका
तुका समोर तो दिसे
क्षणामाजी पालटून
वैकुंठात भासलासे
देह दिसेना तरीही
ह्रदी बैसला अढळ
भाविकासी निश्चयाने
त्याच्या विश्वासाचे बळ
पंढरीची वारी
निघे पंढरीची वारी, सज्ज सारे वारकरी
अद्भुत तो सोहळा, विठ्ठल विठ्ठल गजरी
आळंदीची ग माउली, पालखीत विराजित
तुकोबाची पालखी, देहूमधून निघत
विठू दर्शनाची हाव, मनी भक्तीचा तो भाव
सद् वृत्तीचा स्वभाव , वारकरी त्याचे नाव
गळा तुळसीची माळ, तुळशीवृंदावन डोई
टाळ वाजवीत चाले, नाम विठोबाचे घेई
अनवाणी तो चालत, ऊन अन पावसात
भाव भोळा तो भक्तीत , ठेवे हरी स्मरणात
हाती पताका भगवी, रिंगणात तो नाचवी
‘ज्ञानोबा तुकाराम’, मुखे गजर करवी
अश्व दौडे रिंगणात, विठ्ठलाच्या भजनात
मृदुंगाच्या गजरात, वारी पंढरीस जात
देव पावला!
(एक छोटुकली गोष्ट)
"अहो ऐकताय न लवकर तयारी करायला हवी. आता सगळे येऊ लागतील. कोणाला काय द्यायचय सगळा हिशोब चोख करायला हवा. सगळी दमून भागून येतील. सगळ्यांचे समाधान करायला हवं. ऐयकताय ना?" तिने वळून बाजुला बघितले "ती" मोकळीच!
तो कधीच बाहेर पडलेला. रात्रीच गार वारा सुटलेला. मग तसाच तो निघाला. तो जसजसा पुढे जाऊ लागला; आकाशातल्या ढगांना आपला रंग चढवू लागला. गहिरा गडद भरीव...
वाटेत भामाबाईची झोपडी लागली. नातवाला झोपवत होती ती. मग त्याने आपले हात लांब करून झोपडीवर अंधार केला. उद्या लवकर उठून निघायचय तिला. थोडी झोप हवीच तिला.
अशाच मग कितीतरी भामा...
तू तो आमुचा सांगात
तू तो आमुचा सांगात
भंडार्याच्या माथ्यावर
नाम घेत बैसे तुका
त्याचे एकतानपण
विठू निरखे कौतुका
नाम घेता तुकयाची
मावळली देहबुद्धी
नाम, विठू आणि तुका
एकरुप हो त्रिशुद्धी
विठ्ठलासी मोठा घोर
कैसे सांभाळावे यासी
स्वये बैसोनी दुकानी
चालवितो संसारासी
आवलीसी कळेना हे
बैसे दुकानी हे कोण
विक्री बहु होत तेथ
सारे वाटे विलक्षण
बुवा येती सांजच्याला
पुसे आवली तयाला
कोण गडी हो ठेविला
काही कळेना मजला
शब्द आणि भाव
शब्द आणि भाव
शब्दरत्ने घरी त्याच्या
शब्द थोर देव होय
परी भाव वेगळाचि
शब्द केवळ तो सोय
त्याला ठाऊक पुरते
भाव जाणतसे हरी
शब्द ऐलिकडे राहे
भाव नेई पैलतीरी
शब्दाकाशी ही मावेना
त्याचा भाव तो अफाट
भावे विठ्ठल भेटला
भाव ब्रह्मांड व्यापत
उरी धरुन ठेविती
जन त्याचे शब्दधन
कोणी विरळाचि जाणे
भाव शब्दातील प्राण
भाव दाटता चित्तात
फोलपट शब्द होत
एक हरी अंतर्यामी
भावे स्वये प्रकटत
.....................................
शब्दाकाशी.... शब्दांच्या आकाशात
तुकाराम शूर भला
तुकाराम शूर भला
अर्पि सर्वस्व विठूला । तुकाराम शूर भला ।
संग जडता विठूशी । देवभक्त एक काला ।।
गुजगोष्टी करी प्रेमे । कधी रुसवे फुगवे ।
देव ओढितो जवळी । भक्तरायाते बुझावे ।।
आनंदाची परिसीमा । सख्यप्रेमा ये भरती ।
देव अचंबित होती । ऋषि मौन धरीताती ।।
नाकळेचि भक्तीसुख । योगी शिणले बहुत ।
ज्ञानमार्गी वंदिताती । निर्गुणचि गुणा येत ।।
..........................................................
बुझावणी करणे... समजूत काढणे
.................................
भक्तपराधीन
भक्तपराधीन
नाही भुलत स्तुतीला
ना ते बाह्य दिखाव्याला
शुद्ध भाव उमजोनी
विठू येई चाकरीला
काय कुंभार तो गोरा
जाणे काय स्तुती मोठी
शुद्ध भाव घाली धाक
देव मळतसे माती
नसे जनाबाईपाशी
पंचपक्वान्न जेवण
रानी तिच्यासंगे हरी
पायी फिरे वणवण
माळी सावता महान
आवडीने नाम घेई
मळा राखण्यास काठी
सर्सावून देव जाई
एकनाथा घरी देव
पाणी भरी कावडीने
शेले कबिराचे विणी
फेडी दामाजीचे देणे
Pages
