#गझल
कृष्णार्पण
अपमान शांततेने साहतो कृष्ण आहे
अपराध शेकड्यांनी मोजतो कृष्ण आहे
मार्गात बांध घाला, टाका कितीक धोंडे
त्यातून पारदर्शी वाहतो कृष्ण आहे
टीका, प्रलोभने वा, शंका, खुशामतीही
गोंगाट ऐकुनी हा हासतो कृष्ण आहे
ईर्ष्या, अहं, असूया, मद, मोह, मत्सरादी
वैर्यांस आज सार्या मारतो कृष्ण आहे
हरवेल वाट आता, संपेल सर्व वाटे
हाकेस तोच माझ्या धावतो कृष्ण आहे
अपुल्याच माणसांनी विश्वासघात केला
हाती धनुष्य घ्याया सांगतो कृष्ण आहे
घनगर्द संकटांचे आभाळ दाटलेले
त्यांना कडा रुप्याच्या लावतो कृष्ण आहे
घेते दळून कविता...
घेते दळून कविता...
मजला हवीहवीशी, येते जुळून कविता
ओठी तुझ्या कशी अन् , जाते रुळून कविता
लोंढे निघून जाती, मी एकलाच उरतो
पाहून खिन्न मजला, येते वळून कविता
साऱ्या तरुण चिंता, बसती उशास माझ्या
शाईत मिसळुनी त्या, घेते गिळून कविता
मूर्च्छित भावनांना, घेते कवेत आणि
देऊन श्वास त्यांना, जाते जळून कविता
तो का सदैव हसरा?, तो का सदैव कष्टी?
पडतात प्रश्न त्यांना, येते कळून कविता
घेतो तुला लिहाया, जातो वसंत वाया
फाडून कल्पनेला, जाते छळून कविता
आहेस कुठे तू?
डाव अर्धा राहून गेला, आहेस कुठे तू?
चहा थंड होऊन गेला, आहेस कुठे तू?
काडी तुझी, विडी माझी पेटत होती
मस्कापाव वाळून गेला, आहेस कुठे तू?
गाडी माझी, इंधन तू भरणार होतास
गोवा बेत राहून गेला, आहेस कुठे तू?
तुझ्या शकील साहिरचा मी तलत रफ़ी
तप्त स्वर विरून गेला, आहेस कुठे तू?
भेगांमधून हिरवे कोंब फुटू पाहत होते
'अमलताश' गळून गेला, आहेस कुठे तू?
- मंदार.
आहे पण अन् नाही पण ..!
जरा तुझ्याशी भांडायाचे आहे पण अन् नाही पण
जरा स्वत:शी बोलायाचे आहे पण अन् नाही पण
कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो अफवाही
मनातले सल सांगायाचे आहे पण अन् नाही पण
किती ऐकले पोक्त इशारे, टोले, सल्ले प्रेमाचे
फक्त स्वत:चे ऐकायाचे आहे पण अन् नाही पण
करायचे ते केले नाही दिवसा स्वप्ने बहुरंगी
मारुन-मुटकुन सजवायाचे आहे पण अन् नाही पण
जादूच्या ह्या मंचापुढती तर्काचे हे सोंग फुके
जरा-जरासे लपवायाचे आहे पण अन् नाही पण
भाळावरच्या रेषांबद्दल धन्यवाद अन् गार्हाणे
आपण अपुले रेखायाचे आहे पण अन् नाही पण
- मंदार.
संक्रमण
मी छाटल्या ठिकाणी उमलून आज आलो
ग्रीष्मातला बहावा होऊन आज आलो
चांभारचौकश्यांना चकवून आज आलो
कुप्रश्न धाडसाचे उठवून आज आलो
वेड्यांमुखी प्रशंसा वदवून आज आलो
हेटाळणीस त्यांच्या टाळून आज आलो
जे लागले जिव्हारी लपवून आज आलो
मौनात संयमाला सजवून आज आलो
चिंता - नव्हे - चितांना फसवून आज आलो
माया अशाश्वताची सोडून आज आलो
- मंदार.
मराठी गझलकार आणि शायरांना त्यांच्या गझल सादर करण्याचे सप्रेम आमंत्रण.
मराठी गझलकार आणि शायरांना त्यांच्या गझल सादर करण्याचे सप्रेम आमंत्रण.
कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण : गझलकार पुलस्ती चौधरी
तारीख : २६ एप्रिल , २०२५
वेळ : ७ ते ९ संध्याकाळी
भोजन: ६ ते ७ संध्याकाळी
स्थळ : ब्लू बेल , पेनसिल्वानिया , १९४२२, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
तुम्हाला यायला आवडेल आणि जमेल का? कृपया उत्तर पाठवणे : choudhary.poorva@gmail.com
कथा
कथा इतिहास सांगे शासकाची
कुठे आहे कहाणी मावळ्याची?
असंख्य एकलव्य येती जाती
पण इकडे जाण फक्त अर्जुनाची
नका ठेऊ यशानंतर कधीही
जराशीही अपेक्षा कौतुकाची
बदलता काळ घेऊन येत असतो
नवी ओळख जवळच्या माणसाची
जसे असतो तसे दिसतो तरीही
आपण करतो दुरुस्ती आरशाची
झलक दिसली मला सुंदर गुलाबात
.........तुझ्या आनंददायक चेहऱ्याची
हारणारा मीच!
घातल्या शपथा किती मी या मनाला
सांज ढळता शुष्क डोळे राखण्याला
आठवांचा पूर येऊ दे तिथेही
पाहिले सांगून हळव्या पावसाला
भूक मिटते ना मनाची माणसांनी
का कळेना आतमधल्या श्वापदाला!
आज का ताऱ्यांत मजला तू दिसावी
भावनांशी चांदणे खेळी कशाला!
कोणते हे रंग आले आसमंती
चुंबले का तू नभाच्या कुंचल्याला?
भावनांचे खेळ खेळावे किती मी
हारणारा मीच रे हे उमगण्याला!
व्यथा
गेले निघून सारे, का मीच थांबलो होतो?
आशेत पावसाच्या, उन्हात पोळलो होतो
आताच का सुखांनी, हा डाव खेळला ऐसा
आताच आसवांना, हरवून बैसलो होतो
स्वप्नात कोणता जो, आलाप लावला होता
जागेपणी तयाला, गोंगाट बोललो होतो
इतकेच आरशाला, माझे ग सांगणे होते
पाणावताच दाखव, जे काल हासलो होतो
आले तसेच गेले, वस्तूंत साठले हासू
जगणे सुधारताना, जगणेच विसरलो होतो
गाडून टाकली मी, प्रेते जुनाट नात्यांची
जे मोक्षले कधी ना, त्यांनी झपाटलो होतो
Pages
