आजही

हातात नाही आजही...........

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 21 July, 2019 - 02:16

हातात नाही आजही...........
- महेश मोरे (स्वच्छंदी)

बघ हात माझा अन् तुझा हातात नाही आजही
मज दु:ख आहे मी तुझ्या नावात नाही आजही

त्या ज्याकुणाबद्दल जगाशी बोलते आहेस तू
ते नाव माझे पण तुझ्या ओठात नाही आजही

स्वप्नातल्या स्वप्नात 'ती' ताटात आली यारहो,
पण भाकरी आली खरी पोटात नाही आजही

घोटामध्ये एकाच जी मज लाविते झिंगायला
ती बाटलीमधली नशा पाण्यात नाही आजही

अख्खी पटावर जिंदगी लावून खेळावे अशी
ती सोंगटी लाखातली डावात नाही आजही

तुझा शोधतो चेहरा आजही

Submitted by आनंदयात्री on 18 April, 2013 - 00:08

नको वाटतो उंबरा आजही
हवासा तरी आसरा आजही

जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही

तुझ्या आठवांचे धुके दाटते
इथे जीव मग घाबरा आजही

कुठे वेस नाहीच गगनास या
अडवतो मला पिंजरा आजही

अशाने नदी पार होणार का?
दिसे कालचा भोवरा आजही

सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!

तुझी मोहमायाच छळते अशी -
तुझा शोधतो चेहरा आजही

आजही

Submitted by वैभव फाटक on 9 May, 2012 - 07:39

तू फुलात तू कळ्यांत तू दवात आजही
तू धरेत अंतरात तू नभात आजही

साद घालतो तुला सये जरा निघून ये
संगती न तू कधी परी मनात आजही

रोज गोड स्वप्न पाहतो तुझ्याच दर्शना
रोजचा उशीर थांबली प्रभात आजही

आर्त दाह जाळतो उरास आठवांसवे
धाडशील पावसास ? मी उन्हात आजही

एकदा तरी पहा कवाड खोलुनी जरा
वादळे किती समावली उरात आजही

----- वैभव फाटक ( ८-४-२०१२ ) -----

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आजही