मागे मायबोली गणेशोत्सव उपक्रमात माझ्या बकेटलिस्ट बद्दल लिहिलं होतं. खूप लोकांनी ते आवडल्याचं आवर्जून सांगितलं होतं आणि त्यात शेवटी लिहिलेल्या माझ्या फ्रान्सभेट या इच्छेची लवकर पूर्तता व्हावी असा आशीर्वादही दिला होता. हा भाग दोन वाचण्यापूर्वी पहिला भाग नक्की वाचा. मागच्यावेळी करोना सुरू असताना गोव्यात राहात होते असा बकेटलिस्टचा शेवट होता. आता तिथून पुढे -
शिक्षण झाल्यानंतर मी जी नोकरीत चिकटले ती अक्षरशः चिकटूनच राहीले. लहानपणी व्हॉलीबॉल आणि मल्लखांबाचा सराव आणि स्पर्धा, गिर्यारोहण शिबीरे यांमधून कसाबसा अभ्यास सांभाळणारी मी, घाण्याच्या बैलासारखी नुसतं काम नी काम करत होते. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन रात्री उशीरा परत यायचं, आठवड्याची राहिलेली झोप शनिवारी पूर्ण करायची आणि रविवारी घरातली कामं आवरायची, बस इतकच चाललं होतं. आणि मग एक दिवस चण्डिगढच्या ऑफिसला नेमणूक झाली. दुपारी २ ते रात्री ११ च फक्त काम असल्याने रोज झोप पूर्ण होत होती आणि शनिवार जागेपणात जात होता. ऑफीसने दिलेल्या गेस्टहाऊस मधे राहत असल्याने घरची कामं करायचा राविवारही मोकळाच.