सोनूची बकेटलिस्ट - फ्रान्स

Submitted by सोनू. on 18 May, 2025 - 09:19

मागे मायबोली गणेशोत्सव उपक्रमात माझ्या बकेटलिस्ट बद्दल लिहिलं होतं. खूप लोकांनी ते आवडल्याचं आवर्जून सांगितलं होतं आणि त्यात शेवटी लिहिलेल्या माझ्या फ्रान्सभेट या इच्छेची लवकर पूर्तता व्हावी असा आशीर्वादही दिला होता. हा भाग दोन वाचण्यापूर्वी पहिला भाग नक्की वाचा. मागच्यावेळी करोना सुरू असताना गोव्यात राहात होते असा बकेटलिस्टचा शेवट होता. आता तिथून पुढे -

करोना पूर्ण गेला नव्हता. घरच्यांना करोना झाला तेव्हा दोन तीन वेळा गोव्यातून घरी यावं लागलं होतं. नंतर मात्र माझे पॉंडिचेरीचे लाडके मित्र, गुरु, ज्यांच्यामुळे मी पूर्णपणे बदलले होते, ते पिचया करोना मुळे हॉस्पिटलमधे ॲडमिट झाले. जाणं शक्य नव्हतं आणि उपयोगही नव्हता. फक्त व्हॉट्सॲप किंवा फेसबुक मेसेंजर वर गप्पा मारणं शक्य होतं. एकदा त्यांनी नर्सला मला फोन करून त्यांची तब्येत ठीक आहे असं सांगायला सांगितलं. ऑक्सिजन मास्क मधून बोलणं जमत नसतानाही "हाय सोनिया" अशी नेहमीची हाक त्यांनी मारली होती. एका रात्री जवळ जवळ १२ वाजेपर्यंत आम्ही काही फालतू जोक करत चॅट करत होतो आणि दुसऱ्या दिवशी ते गेल्याची बातमी आली. ते जायच्या दोन तास आधी पर्यंत गप्पा मारत होतो आम्ही! माझ्या मृत्यूपश्चात स्मशानात येऊन ती फुलं वगैरे वाहू नकोस असं त्यांनी खूप आधीच सांगितलं होतं, पण माझ्या लाडक्या फ्रान्स ला जायचं म्हणजे जायचच याचं वचन घेतलं होतं. खरं तर मीच तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन असं सांगितलं होतं पण ते राहीलच.

आता फ्रान्स ची ट्रीप अजूनच महत्वाची झाली होती. पण बऱ्यापैकी अवसान गळालं होतं. कशी बशी दोन वर्षं नोकरी करून आता परत कंटाळा आला होता. गोव्याचं बस्तान हलवायचं होतं कारण सलग राहून मजा येतेय असं होतच नव्हतं. उन्हाळा सुरू झाला होता आणि चिकचिक व्हायला लागली होती. घरी परत राहायला जाण्याआधी म्हटलं महिनाभर कुठेतरी थंड ठिकाणी राहू. मग कुन्नूर ला, उटीजवळ एक घर महिन्यासाठी घेतलं आणि तिथून वर्क फ्रॉम होम केलं. माझी फ्रान्सची मैत्रीण - सिसील तेव्हा काही दिवसांसाठी भारतात आली होती. ती पण एक आठवडा तिथे राहायला आली होती.

तिथून घरी आल्यावर काही महिने वर्क फ्रॉम होम केलं. बागेत आणि शेतात थोडं लक्ष घालायला लागले. शेतात काम करणं आवडायला लागलं. एक नवीन छंद मिळाला. असले वेगवेगळे छंदं हातपाय ठीक आहेत तोपर्यंतच करू शकतो ना, नंतर कधी करणार. पण दुपारच्या मिटिंग साठी शेतातून दमून येऊन बसायचं जीवावर यायचं. मग परत एकदा राजीनामा दिला. आता खरं तर काम तसं कमी असायचं, जिकिरीचं पण नव्हतं, पण का ओढाताण करायची ना! काम असं असावं की करताना मजा आली पाहिजे. मला तितकीशी मजा येत नव्हती. त्यापेक्षा हे असले छंदं मला जास्त आवडतात म्हणून सोडली. पाच एकर शेतात बागकाम, हो, शेतासारखी शेती नाही, छंदासारखं बागकाम सुरू केलं.

पण या सगळ्यात फ्रान्सला जायची इच्छा तशीच होती. Duolingo वर फ्रेंच शिकत होतेच, बऱ्यापैकी समजत होतं, बोलायलाही थोडंफार जमायला लागलं होतं. शेवटी एकदा कंबर कसली, म्हटलं उगाच वेळ का घालवा! सिसील पुन्हा एकदा भारतात आली तेव्हा पॉंडिचेरीला घर घेऊन राहात होती. मी तिच्याकडे दहा दिवस राहायला गेले होते. तेव्हा तिला म्हटलं होतं की महिनाभर मला फ्रान्सला येऊन राहायला आवडेल. त्यादृष्टीने आम्ही कार्यक्रम आखायला लागलो.

पासपोर्ट रिन्यू करण्यापासून सुरुवात होती. पत्ता बदलला होता, अगदी राज्यही. त्यात ही आधारकार्ड नावाची भानगड नवीन झाली होती. पासपोर्ट वर नाव - मधले नाव - आडनाव असं होतं तर आधार कार्ड वर नाव - आडनाव फक्त होतं. एका बँकेत एक तर दुसऱ्या बँकेत दुसरं नाव. आता बँकेची शाखा बदलणं, आधार कार्ड वर नाव बदलणं वगैरे केलं. परत त्या नावात दाक्षिणात्य पद्धतीने "त" चं स्पेलिंग th केलं म्हणून पुन्हा एकदा बदललं. शेवटी एकदाचं सगळं एकसारखं झाल्यावर जुना पासपोर्ट संपायच्या पंधरा दिवस अगोदर नवीन पासपोर्ट मिळाला.

फ्रेंच लोक खूप शिष्ट असतात, मदत करत नाहीत, खडूस असतात वगैरे ऐकलं होतं पण माझा अनुभव अगदी उलट होता. ज्या ज्या फ्रांसच्या लोकांनी घरी येच असं सांगितलं होतं त्यातल्या कोणाकडे किती दिवस जायला मिळेल याचा आढावा घेतला. पण बऱ्याच लोकांना भेटायचं, लगे हाथ आजूबाजूचे देश पहायचे म्हणून चांगला ५० दिवसांचा कार्यक्रम ठरवला. सिसीलकडे बेयॉन ला १५ दिवस, तिथून बोर्दोमधल्या लोकांना भेटायचं आणि बाजूलाच असलेला स्पेन बघायचा, पॅरिसला मार्टीन कडे ८ दिवस आणि पॅरिसच्या पाचसहा लोकांना भेटायचं, मग वर नेदरलँड आणि बेल्जियम फियायचं, पूर्वेकडे सेतला रॉबर्ट कडे आणि तिथून पुढे इटली आणि व्हॅटिकन बघायचं असा मोठा दौरा ठरवला. पण विजासाठी पूर्ण ५० दिवस सिसीलकडे जातेय असच दाखवायचं ठरलं.

सगळ्यांशी बोलणं झालं. अजून काही मित्रमैत्रिणींबरोबर बोलणं झालं आणि त्यांनीही काही दिवसांसाठी येणार सांगितलं. एक मैत्रीण भारतातून १० दिवसांसाठी, एक इंग्लंडहून ४ दिवसांसाठी आणि एक अमेरिकेतून ४ दिवसांसाठी येणार होती. माझा विजा आला की मग त्या सगळ्या त्यांच्या विजाचं काम सुरू करणार होत्या कारण त्यांना कमी दिवसांसाठी काही प्रॉब्लेम येणार नव्हता. माझ्याकडे नोकरी, घर, जागा, पती/पत्नी, मुलं वगैरे काहीही भारतात नाही तर आपल्या देशात येऊन ही मुलगी परत भारतात गेलीच नाही तर अशी भिती वाटून हे लोक मला विजा देतील का असं मला वाटत होतं. तिन्ही मैत्रिणी मात्र लग्न झालेल्या, मुलं, जॉब, घर वगैरे सगळं त्यांच्या देशात असलेल्या आहेत त्यामुळे त्या परत आपापल्या देशात जातील याच्या खात्रीमुळे विजा मिळणं तसं सोपं होतं. ऑफिसातल्या एका पंजाबी मुलाला हे सगळं असूनही अमेरिकेचा विजा का मिळाला नव्हता हे नक्की माहीत नाही पण तेव्हापासून विजाची भिती मनात बसली होती. तरी माझ्याकडे अमेरिकेचा १० वर्षांचा विजा आहे आणि अजूनपर्यंत दोनदा फिरायला जाऊन भारतात परत आलेय हे कव्हर लेटरमधे नक्की घाल असं एकाने सांगितलं होतं. बाकीच्या देशांच्या भेटीबद्दलही लिही सांगितलं कारण नवीन पासपोर्ट नवा कोरा, एकही शिक्का नसलेला होता. ऑफिसच्या कामासाठी विजा काढून देणाऱ्या कंपनीतील ट्रॅव्हल डेस्कच्या एजंट ची सर्व्हिस घेतली. त्यांनी लागणारे सगळ्या कागदपत्रांचे नमुने दिले. माझे कागद बघून टूरिस्ट विजा सहज मिळेल असं सांगितलं. सिसील ने आमंत्रणपत्र आणि तिची कागदपत्रं दिली. मी तिकीट काढलं आणि इन्शुरन्स घेतला. चॅटजिपिटीकडून कव्हर लेटर करून घेतलं. माझं बँक स्टेटमेंट, इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं घेऊन मी विजा इंटरव्ह्यू ला गेले. पण त्यांनी सांगितलं की विजा मिळणार नाही. उगाच सगळं भरून नकार मिळवण्यापेक्षा नंतर परत अपॉइंटमेंट घेऊन या सांगतो ते सर्टिफिकेट घेऊन.

इतके दिवस परदेशात राहण्यासाठी एवढं पुरेसं नाहीय, टूरिस्ट विजा साठी राहायचे बुकिंग दाखवावे लागते. तुम्ही मैत्रिणीकडे राहणार असाल तर त्यासाठी टूरिस्ट मधेच वेगळा रकाना भरावा लागतो. मैत्रिणीला सांगा तिथल्या म्युनिसिपालिटीत जाऊन आमंत्रणाचा फॉर्म भर आणि त्यावर सही शिक्का घेऊन इकडे पाठव. त्यांनी त्यांच्या फोनवर फॉर्म कसा दिसतो ते दाखवलं. झालं, खूप कमी दिवस राहिले होते. त्या एजंटला भरपूर शिव्या घातल्या की हे तू मला का नाही सांगितलस, माझे अपॉइंटमेंटचे आणि तुला दिलेले पैसे फुकट गेले ना, मनस्ताप झाला तो वेगळा. जाऊदे, उगाच डोकं खराब करून घेण्याऐवजी सोडून दिलं त्याला. सिसील बिचारी गेली तिथल्या ऑफिसात. ते सर्टिफिकेट - सर्फा म्हणजे तिच्याकडे तिचं घर आहे, घरात मला रहाण्यासाठी जागा आहे, मी माझा सगळा खर्च करणार असले तरी काही झालच तर तिच्याकडेही माझा खर्च उचलण्याची ऐपत आहे, ती तिची बिलं भरते वगैरे बऱ्याच गोष्टी त्यात होत्या. तिने सगळं भरून दिलं. पण पुन्हा एक पण आलाच. तिचं एक बिल वर्षाला एकदा येणारं होतं आणि खूप महिन्यांपूर्वी आलेलं होतं. त्यांना या सहा महिन्यांत भरलेलं बिल हवं होतं. आता बिलच तसं आहे तर काय करणार. मग दुसऱ्या गोष्टीचं बिल आणायला सांगितलं. ते घेऊन येईपर्यंत यांची जेवणाची वेळ झाली म्हणून नंतर या सांगितलं. कामावरून अर्धा दिवस रजा घेऊन आलेली, आता परत येणं शक्य नव्हतं. परत दुसऱ्या दिवशी गेली. सगळी पूर्तता झालीय याची खात्री केल्यावर ते म्हणाले आता दोन तीन आठवड्यात देऊ सर्फा. तिने सांगून पाहिलं की मैत्रिणीचं तिकीट आहे एक महिन्यानंतरचं आणि हा कागद मला कुरियर करायचाय, त्यांनंतर विजा इंटरव्ह्यू आणि मग विजा मिळायला काही दिवस. तोपर्यंत येण्याची वेळ निघून जाईल. बघू कसं होतं ते असं म्हणून त्यांनी तिला जायला सांगितलं. शेवटी पाच दिवसांनी सही आणि शिक्का असलेला कागद मिळाला. मग सिसीलने तो कुरियर करून मला फ्रान्सहून भारतात पाठवला.

ज्या दिवशी कागद हातात आला त्या दिवशी परत विजा इंटरव्ह्यूसाठी नवीन तारीख घेतली, चारच दिवसांनंतरची मिळाली. परत फॉर्म भरून टुरिस्ट विजा मधे "मिटिंग फ्रेंड ऑर रिलेटिव" हा रकाना भरला. या वेळी सगळी कागदपत्रं नीट असल्याचा शेरा मिळाला आणि बायोमेट्रिक्स वगैरे सोपस्कार होऊन घरी येऊन पासपोर्ट कधी मिळेल याची मी वाट बघत बसले. विजा मिळाला की नाही ते हातात पासपोर्ट येईपर्यंत कळत नाही, आता तुमचं अप्लिकेशन इथे आलय, इथून पुढे गेलय वगैरे एसेमेस येत रहातात. सिसील पोलीस ऑफिसर असल्याने ती मला नक्की परत पाठवेल असं त्यांना वाटायला हवं. तरीही काँसुलेटच्या लोकांनी सिसीलला फोन केला, आम्ही एकमेकींना कसे व कधीपासून ओळखतो विचारलं. परत अप्लिकेशन इथून तिथे, पासपोर्ट कुरियर केलाय वगैरेचे एसेमेस.

शेवटी एकदाचा सात दिवसांनी पासपोर्ट घरी आला. मल्टी एन्ट्री सह सहा महिन्यांचा विजा मिळाला होता. बरोबर तो सर्फाही शिक्का मारून दिला होता. चला, म्हणजे आता मी नक्की नक्की फ्रान्सला जाणार होते.

निघायची तारीख अगदीच जवळ होती. विजाचं नक्की नसल्याने बॅग भरायला घेतली नव्हती. सगळ्यांसाठी भेटवस्तू घ्यायच्या आणि काही बनवायच्याही होत्या. एका मैत्रिणीच्या मुलीने क्रोशाच्या काही वस्तू बनवायला मदत केली. आधी बॅकपॅक ट्रीप केल्याने आत्ताही तशीच बॅकपॅक घ्यायची ठरवलं. सगळं सामान भरलं पण ती इतकी जड झेपेल का असं वाटलं. त्यात भारतातून गेलेल्या एकाला थोडं सामान हवं होतं त्याने अर्ध्याहून जास्त बॅग भरली. तिथे थंडी असल्याने स्वेटर, कोट आणि इतर थंडीच्या गोष्टींना जागाच नाही राहिली. शेवटच्या क्षणी सुटकेसमधे सगळं भरलं. बॅगेचं वजन ३० किलो चालणार होतं, २७ किलो झालं. हातातली बॅग ६ किलोची आणि स्वेटर नि कोट अंगात घालून मी निघाले मुंबईहून पॅरिसला.

इमिग्रेशन ला तो सर्फ़ा दाखवला इथे राहायला जातेय म्हणून. बाकी त्यांनी काही विचारलं नाही. कमीत कमी खर्च करायचा म्हणून सर्वात स्वस्त इंडिगो आणि पुढे टर्किश असं बुकिंग होतं. इंडिगोवाल्यांनी स्पेशल जेवण वेगळे पैसे देऊन ऑर्डर करा सांगितलं होतं, म्हणजे हे जेवण देणार नाही तर! जातानाच लाऊंजमधे जाऊन भरपूर खाऊन घेतलं होतं. विमान डोमेस्टिक असतं तसच होतं फक्त मोठं, तीन रांगा बसायच्या. माझी उंची कमी असूनही ढोपरं पुढच्या खुर्चीला आपटतील इतक्या जवळ जवळ खुर्च्या, स्क्रीन नाही, उशी नाही, खाणंपिणं नाही, काहीच नाही. आणि मग ब्रेकफास्ट देतोय अशी उद्घोषणा झाली. माझ्या बाजूच्याने स्पेशल जेवण घेतलं होतं, त्याला पालक भरलेला एक चपातीच्या रोल सदृश्य काहीतरी दिलं. मला बटाट्याची टिक्की, पराठा आणि भाजी दिली. नंतर चहा कॉफी पण देत होते. भयाण खाणं होतं. पण मिळणार नाही असं वाटत असताना मिळालं. नंतर इस्तंबूल ला 3 तास वाट बघून टर्किश एअरवेजचं विमान मिळालं. यात बरीच बरी व्यवस्था होती.

उतरल्यावर जीवात जीव आला. फ्रान्स, आले एकदाची या देशात. अगदी खालून कुठूनतरी बोगद्यातून वरवर येतोय असं वाटत होतं. तिथे या रांगेत जा, इथे थांबा वगैरे फ्रेंचमधे सांगत होते ते मला कळत होतं. उडत उडतच आले. कुठे जातात - मैत्रिणीकडे, बास, एवढच बोलणं झालं आणि फ्रान्सचा शिक्का पासपोर्टवर विराजमान झाला. सहा वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली. पूर्वी मी सगळ्यांना सांगायचे की आयुष्यात कोणतीही इच्छा अपूर्ण आहे असं वाटत नाहीय. आत्ता मरण आलं तर काहीतरी राहिलं असं वाटणार नाही पण फ्रान्सला जायची इच्छा राहिली अशी चुटपूट राहू शकते इतपत ही इच्छा मनात घर करायला लागली होती. आता ती ही पूर्ण झाली. आता मी परत इच्छारहीत झाले असं वाटून हसायला आलं. पिचया असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.

पंचाहत्तरीला पोहोचलेली मार्टिन मला न्यायला विमानतळावर आली होती. इंटरनॅशनल रोमिंग एका वर्षासाठी करून घेतलं होतं, शिवाय विमानतळावरचं वायफाय होतच. मार्टिन नक्की कुठे आहे ते शोधून तिच्याबरोबर कारमधे बसले. तिच्याशी बोलताना मी अगदी एका एका शब्दावर जोर देत सावकाश इंग्रजी बोलते कारण ती पक्की फ्रेंच आहे, इंग्रजी - ईईई असं म्हणणारी. "आम्ही नाही हो बोलत ती भाषा" असं ठसक्यात सांगणारी Happy

खिडकीतून पॅरिस दिसत होतं, लांब लांब रस्ते, हिरवळ, मधेच काही घरं. फोटोत नि व्हिडीओत पाहिलेलं हे पॅरिस नव्हतं. शहर वेगळं असावं बहुदा. मार्टिन परिसहून थोडं लांब राहते, तिचं गाव आणि पॅरिस शहर यामधे एक छोटं जंगल आहे. तो हिरवागार रस्ता खूपच आवडला त्यामुळे ती म्हणाली उद्या जंगलात जाऊ फिरायला. घरी येऊन सामान ठेऊन आम्ही बाहेर जेवायला गेलो. मागे एकदा पिचया मार्टिनकडे राहायला गेले होते तेव्हा मार्टिनकडे आलीस तर पास्ता नक्की खा असं त्यांनी सांगितलं होतं. मग आम्ही पास्ताच खाल्ला बाहेर. तेव्हा मार्टिनने सांगितलं की खरं तर पास्तावरून त्यांचं काही भांडण झालं होतं. मार्टिनने केलेला पास्ता पिचयांना आवडला नव्हता आणि तिने सांगितलं की आमच्याकडे असाच बनवतात, माझे आजीआजोबा इटलीतल्या नापोलीचे आहेत त्यामुळे मी बनवते तोच ओथेन्टिक पास्ता आहे, खायचा तर खा नाहीतर स्वतः बनवा. तेव्हा पिचया काही कारणाने बनवू शकत नव्हते आणि तो न आवडलेला पास्ता खाण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नव्हता.

अजून दोन दिवस पॅरिसला राहणार होते. मार्टिनला म्हटलं मला पर्यटकासारखं पॅरिस फिरायचं नाहीय, तुम्ही इथले रहिवासी कुठे जाता, काय करता ते पहायचय. मैत्रिणी आल्या की त्यांच्याबरोबर पर्यटकासारखं फिरीन. तिने मला जंगलात फिरायला नेलं, तिच्या आवडत्या इंडियन, श्रीलंकन, अरेबियन, आफ्रिकन, लॅटिन रहिवासीबहूल वस्तीत नेलं, ती ज्या ज्या ठिकाणी राहिली होती त्या इमारती दाखवल्या. इथे व्हिडीओत बघितलेलं पॅरिस दिसलं. शॅतले स्टेशनजवळ एका इमारतीत ती राहात असताना समोर भाजी आणि फळांची मंडई होती. १९६९ ला मंडई तिथून दुसरीकडे हलवली. पूर्ण पॅरिस दुःखी होतं, तो ओकाबोका परिसर बघवत नव्हता म्हणून त्यावेळी तिने घर बदललं. तिथे जवळच असलेल्या चर्चमधे आम्ही गेलो तर तिथे त्या प्रसंगाची आठवण म्हणून एक प्रतिकृती बनवली होती. मार्टिन कधी चर्च च्या त्या बाजूला आली नव्हती. ती प्रतिकृती बघून तिला भरून आलं. ती राहात असलेली इमारतही त्यात दिसत होती. हे चर्च पाहिल्यावर तिने नोत्र दाम चर्चच्या आगीविषयी सांगितलं. ती घटनाही तितकीच दुःखद होती पॅरिसच्या लोकांसाठी. पुढे मग नोत्र दाम चर्च पण पाहायला गेलो, गर्दी असल्याने फक्त बाहेरूनच. जाताना लांबवर आयफेल टॉवर दिसला. नाही म्हणता म्हणता पॅरिसच्या दोन पर्यटकप्रिय इमारती दिसल्याच!

दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी ती मला सेन नदीच्या किनारी एका ठिकाणी घेऊन गेली. ही खास पॅरिसच्या लोकांची डान्स करायची जागा. दर रविवारी इथले आजूबाजूला राहणारे लोक स्पीकर आणि आपापली वाद्य घेऊन येतात आणि वाजवत नाचतात. काही लोक खास नाचण्यासाठी येतात. मार्टिनही नेहमी नाचायला जाते. करोना सुरू असतानाही हे लोक इथे नाचत होते आणि तेव्हा पोलिसांनी मार्टिनला जमिनीवर ओढत तिथून हाकललं होतं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा पाँडीचेरीमधे मार्टिनच्या मणक्यांना फ्रॅक्चर झालं होतं तेव्हा डॉक्टरला तिने "मला आता नाचता येईल ना" असं तिने विचारलं होतं.

दोन दिवसात मार्टिनने पॅरिसच्या मेट्रो, बस आणि RER यातून प्रवास कसा करायचा हे शिकवलं. इतकं सहज सोपं होतं सगळं की आता परत इथे येईन तेव्हा एकटी आरामात येऊ शकते याची खात्री झाली.

Eiffel Tower.gif

त्यानंतर पूर्व किनारा, इटली, व्हॅटिकन, पश्चिम किनारा, स्पेन बघून परत पॅरिसला आले तेव्हा चार पाच दिवस एकटी पॅरिसला फिरत होते. मित्रमैत्रिणींना भेटून रात्री साडेबारा - एकला घरी परत येत होते. ट्रेन स्टेशनहून मार्टिनचं घर १५ मिनिटं लांब होतं चालत जायला किंवा ५ मिनिटं बसने पण मी चालतच जात-येत होते कितीही वाजले तरीही. पर्यटकांना भिती वाटेल अशा निर्वासितांच्या वस्त्यामधून आरामात फिरत होते. पॅरिस अगदी ओळखीचं झालं होतं. कोणी माझ्याघरी ये सांगितलं तर कुठली मेट्रो घ्यायची, कुठे बदलायची, पुढे कसं जायचं हे आपलं आपलं शोधून त्यांनी सांगितलेल्या वेळेवर त्यांच्या दारात पोहोचत होते. मैत्रीण आल्यानंतर कुठे कसं फिरायचं ते ठरवण्यासाठी एकटीच पॅरिसभर भटकून सगळ्या जागा बघून घेतल्या आणि जेव्हा ती आली तेव्हा मी कित्येक वर्षं पॅरिसमधे राहातेय आणि ती पाहुणी आलीय असं तिला फिरवलं. चार दिवस नेदरलँडला पर्यटक म्हणून राहिले पण बेल्जियमला आल्यावर फ्रेंच ऐकून परत ओळखीच्या ठिकाणी आल्यासारखं वाटलं. परत पॅरिसला आल्यावर रेल्वेचं ते ओळखीचं संगीत ऐकलं आणि अक्षरशः हायसं वाटलं, घरी आल्यासारखं वाटलं. खरच, पाँडीचेरी नंतर पॅरिस इज होम.

इतक्या दिवसात एकदा श्रीलंकन हॉटेलात मार्टिनला हवं होतं म्हणून, एकदा एका मित्राकडे त्याने बनवलेलं आणि एकदा मी स्वतः सिसीलच्या बॉयफ्रेंडच्या घरी बनवलेलं भारतीय जेवण जेवले. बाकी सगळ्यावेळी तिथलं जेवण जेवले पण भारतीय जेवणाची अजिबात आठवण आली नाही. सिसील तर मला हवं म्हणून नेटवर शोधून शोधून फ्रेंच जेवण बनवत होती. समुद्रातल्या, जमिनीवरच्या आणि हवेतल्या जीवांचा समावेश असलेले खाद्यपदार्थ खाल्ले. कधी न पाहिलेल्या भाज्या खाल्ल्या. सर्वच मित्रमैत्रिणींचं "तुझे पैसे वापरायचे नाहीत" असं मत होतं पण बरेचदा त्यांचे हात धरून ठेऊन, प्रसंगी ब्लॅकमेल करून मी पैसे देत होते. राहायला तर त्यांची घरं होतीच. सिसीलने तर १५ दिवस मी रहाणार म्हणून पूर्ण १५ दिवस सुट्टी घेतली होती. तिचा बॉयफ्रेंडही जेव्हा जमेल तेव्हा आमच्याबरोबर फिरायला येत होता. रॉबर्टनी त्यांचा अठ्याहत्तरावा वाढदिवस साजरा करताना मला विशेष पाहुणी म्हणून विशेष मान दिला. सगळ्यांनी अक्षरशः प्रिन्सेस सारखे लाड केले, काही तर प्रिन्सेस अशीच हाक मारत होते. अमेरिकेची मैत्रीण येऊ शकली नाही पण लंडन आणि मुंबईच्या मैत्रिणींनीही खूप लाड केले. सगळ्यांनी भरभरून भेटवस्तूही दिल्या. अगदी तृप्त तृप्त म्हणतात तशी सहल झाली माझी. सगळ्यांना निरोप देताना भेटू लवकरच असं सांगून आलेय. आता होईलच लवकर जाणं!

सीफूड पास्ता
Pasta.jpg

सीअर्चिन तापास
Sea Urchin.jpg

जॅम्बॉ म्हणजे हॅम - डुकराची मागची तंगडी मीठ आणि मिरचीपूड लावून सुकवलेली.
Jambon East coast.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फारच थोडक्यात लिहिलं आहेस तू.
तुझ्या शेतीच्या प्रयोगांचा एकेका होईल. सिसिलच्या घरच्या अनुभवांचा एक, मार्टिनेकडचा अजून एक. बाकी ट्रिपचा अजून एक किंवा जास्त. 50 दिवसांची ट्रिप + त्या आधीचे शेततळे प्रयोग एकाच लेखात कडे काय आटोपता येतील?
फोटो पण खूप कमी आहेत. अजून लिही.
तुझे सगळे अनुभव वाचायला नेहेमी आवडतं.

Such a delightful read. Nothing like the “touristy” stuff.

Very engaging.

Bravo.

नवीन प्रतिसाद लिहा