चल पुन्हा नव्याने लिहू....
जगण्याचे पुस्तक इतके सुंदर झाले
शब्दा शब्दाने जणू चांदणे ल्याले
मन व्याकूळ हो अंताशी येता येता
चल पुन्हा नव्याने लिहू आपली गाथा
चल पुन्हा नव्याने भेटू एकामेकां
पोटात पाखरे मनात कातर हाका
चल त्याच पथांवर पुन्हा नव्याने हिंडू
पण जरा वेगळ्या मुद्द्यांवरती भांडू
चल सोबत शोधू नव्या जिण्याच्या वाटा
चल पुन्हा नव्याने लिहू आपली गाथा
हा किती निराळा प्रवास झाला सारा
कधी कंपित स्वर कधी रंगित मोरपिसारा
ही कितीक पाने उलटत गेलो आपण
गोष्टीत पेरले कितीक जगण्याचे सण