नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ४

Submitted by साधना on 25 April, 2024 - 09:51

मागचा भाग : https://www.maayboli.com/node/84992

गावी आल्यावर मी लगेच शेतात धाव घेतली. आधी उस पाहिला. काही ठिकाणी ऊसरोपे मरुन गेली होती पण त्या गॅप पडलेल्या जागी नविन ऊसरोपे लावली गेली नव्हती. जवळपास हजारभर उसरोपे तरी ऊरलेली जी मी जाताना सावलीत ठेवली होती. त्यांना १५ दिवस पाणी मारले नव्हते त्यामुळे ती सगळी रोपे सुकून गेली होती. आता ती लावता येणे शक्य नव्हते.

भाजी फारशी ऊगवुन आली नव्हती. चवळी मात्र मस्त उगवली होती. चवळी अगदी लगेच उगवते, नमस्ते करत हात जोडल्यासारखी लांबसडक पाने लगेच चार दिवसात दिसायला लागतात. एका सरीत दाट ओळीत पेरल्यासारखे काहीतरी ऊगवुन आले होते, ते काय असावे हे मला ओळखता येईना. शेवटी मावशीला विचारले, ती म्हणाली मुग. मला धक्काच बसला. मी म्हटले, अगं असे मुठीने कसे पेरलेस? चवळी पेरली तसे दोन दोन दाणे पेरायचे होते. ती म्हणाली, रजनीने पेरले. रजनीला विचारले तर ती म्हणाली, मावशीने पेरले. मला गप्प बसण्याशिवाय गत्यंतर ऊरले नाही. Happy हे असले 'नजर हटी दुर्घटना घटी’ अनुभव कितीतरी घेतलेत. कितीही समजाऊन सांगितले, करुन दाखवले तरी मालक नसताना शेतात चुका केल्या जातात. त्यात मी करत असलेल्या चुका वेगळ्या. एकुण चुकाच चुका.. चुकांची भाजी ऊगवली असती तर खाऊन खाऊन बेजार झालो असतो ईतक्या चुका मी व कामगारांनी मिळुन केलेल्या आहेत. असो.

हळुहळू केलेल्या मेहनतीचे फळ दिसायला लागले. झुडपी चवळी सुंदर वाढली, फुलायला लागली, शेंगा डोलायला लागल्या. शेंगदाणा आधीच विकत घेऊन ठेवलेला, तो पेरुन घेतला. फेब्रुवारीत शेंगदाणा पेरुन उपयोग शुन्य, पण विकत घेतलेला म्हणुन पेरला. हाती शेंगदाणे लागले नाहीत तरी जमिनीला नत्र मिळेल हा विचार करुन मनाचे समाधान केले. भूईमुग वाढला, फुले आली, आऱ्या फुटल्या. मी कधीच आऱ्या बघितल्या नव्हत्या. शेंगदाणे जमिनीखाली लागतात असे आपण सर्रास म्हणतो पण ते मुळांना लागत नाहीत. फुले यायला लागली की त्यांना खालच्या बाजुने दोरे सुटतात. या दोऱ्यांची टोके फुगीर असतात. ही टोके जमिनीत घुसुन त्यांचे शेंगदाणे होतात. हे मला माहित नव्हते. बेलापुरला कुंडीत दाणा पडुन रोप आलेले, त्याची पाने व फुले टाकळ्यासारखी असल्याने जरा दुर्लक्ष केले गेले. ते सुकल्यावर ऊपटले तर खाली भुईमूग लगडलेले. ते मुळांनाच लागले असणार असा तेव्हा समज झाला होता. तर शेतात हे आऱ्या प्रकरण पहिल्यांदा पाहिले. आऱ्या फुटल्यावर जमिनीखाली लोटल्या तर ऊत्पन्न वाढते हे युट्यूबने ज्ञान दिले पण सरी वरंबा अशा रचनेत ते करणे कठीण म्हणुन सोडुन दिले. फक्त दोन्ही बाजुने माती चढवुन घेतली. भाजीमध्ये वांगी, टोमॅटो चांगली लागली. घरी समोर थोडी जागा आहे तिथेसुद्धा वांगी, टोमॅटो, कांदे लावले होते. लाल माठ तर इथे असतोच. तोही मस्त झाला, पांढरे मुळे व मोहरीही खुप लागली. बहुतेक सगळी वांगी गावात विकली. लाल भाजी अशीच देऊन टाकली व घरात खाल्ली. मिरची पण भरपुर झालेली. सांडगी मिरची करायला लोकांनी विकत घेतली. टोमॅटो माकडांनी खाल्ले. Happy बाकी भाजीत गवार, भेंडी, नवलकोल लावलेले. यातले सगळे ऊगवुन आले पण सगळे खुरटलेले राहिले.

चवळीच्या पिकलेल्या शेंगांची खुडणी काही दिवसांत सुरू केली. जवळपास १०-१५ किलो चवळी मिळाली. मी पाव किलो चवळी पेरली होती. शेंगदाणा पिकेपर्यंत पाऊस पडायला लागला. शेंगातुन लगेच नवे कोंब फुटायला लागले. मी बाजारात ओल्या शेंगा विकायचा प्रयत्न केला, पण त्यासाठी शेंगा व्यवस्थित सॉर्ट करुन देणे आवश्यक होते, तितका वेळ नव्हता त्यामुळे ओल्या शेंगा गावातल्या माझ्याकडे कामावर येणार्‍या बायांना व घरात वाटुन संपवल्या. जवळपास पन्नास किलो शेंगा झालेल्या. भुईमुग लावायचा अनुभव मात्र पुढे कामाला आला. अर्ध्यापेक्षा शेंगा मातीत असतानाच किड्यांनी खाऊन टाकलेल्या, त्यांना तिकडे तातड म्हणतात. परत भुईमुग लावायचा तर ह्या प्रश्नावर उत्तर शोधायला हवे हे कळले.

अगदी दाट लावला तरी मुगांनी थोड्या शेंगा दिल्या. मी एक पाहिलेय. प्रतिकुल परिस्थिती असली तरी निसर्ग कधीच थांबत नाही. त्याचा जीवनक्रम तो पार पाडतोच. अनुकुल परिस्थितीत जे रोप एक किलो शेंगा देईल तेच प्रतिकुल परिस्थितीत चारच शेंगा देईल पण परिस्थिती नाही म्हणुन रडत बसत नाही. रुजणे, वाढणे, फुल येणे, फळ धरणे व नंतर परत निसर्गात विलीन होणे हा घटनाक्रम कुठलेही रोप अजिबात चुकवत नाही.

कडधान्य व भाज्यांमध्ये जीवामृत सोडुन बाकी काही मी वापरले नाही. मी दर पाण्याच्या पाळीला जीवामृत देत होते. शेणखत देणे आवश्यक होते पण आणणार कुठुन? गावात धनगरवाडे २-३ आहेत. तिथे विचारुन त्यांच्याकडुन शेणखत घेतले, त्यावर जीवामृत शिंपडुन त्याचे घनजीवामृतात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला.

गावात मिळणार्‍या शेणखताची प्रत अगदीच बेकार होती. वरचे शेणखत उन्हात वाळुन त्यांचा दगड झालेला, फक्त खालचे शेणखत कुजुन भुसभुशीत झाले होते. शेणखत विकत घ्यायचा खर्चही खुप. शेणखत धनगरवाड्यावर असते, तिथुन ते आपल्या शेतात आणायला एकतर डंपर तरी हवा नाहीतर ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या. मालकीची गुरे असलेला धनगर घरासमोर मोठ्ठा खड्डा खणुन त्यात रोजचे शेण टाकत राहतो, घरातला नको असलेला सर्व प्रकारचा सुका व ओला कचराही यात ढकलला जातो. वर्षभर हा खड्डा भरत राहतात आणि वर्षाच्या शेवटी आमच्या सारखा कोणी विकत घेणारा मिळाला की विकुन टाकतात. धनगराला खताचे पैसे पर ट्रॉली द्यावे लागतात, खत खड्ड्यातुन काढुन ट्रॉलीमध्ये भरायचे पैसे वेगळे आणि ट्रॉली ट्रॅक्टरला जोडुन शेतात नेणार्‍याचे पैसे वेगळे, आणलेले शेणखत शेतात पसरवायचा खर्च वेगळा. कृषी विद्यापिठ अमुक एक टन शेणखत शेतात पसरुन टाका असे सांगतात. पण शेणखत किती टन आहे हे कसे मोजायचे हे कोण सांगणार? गावात गाडी सकट मालाचे वजन करायची सोय नसते. त्यामुळे शेणखत वापरताना अंदाजपंचे वापरावे लागते. गावात ज्यांच्याकडे गुरे आहेत तेच शेतात शेणखत घालतात. विकतच्या शेणखताच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाहीत. कृषी विद्यापिठाचा बारिक अक्षरात लिहिलेला 'अमुक एक टन शेणखत घाला' हा सल्ला कोणाला परवडत नाही. त्यापेक्षा युरिया घालणे सोपे आणि स्वस्त. युरियासोबत शेणखत पण हवेच हे ज्ञान अर्थातच मिळालेले नाहीय.

मी पहिल्यांदा खत घेतले तेव्हा धनगर ओळखीचाच होता, तसे गावात सगळे ओळखीचेच असतात म्हणा... तर त्याने माझ्यावर दया करुन पर ट्रॉली ३०० रुपये कमी केले. म्हणजे १३०० रु ट्रॉलीचे मला १००० रु लावले. खत भरायला त्याच्याकडे माणसे नव्हती. म्हणुन मावशीला गावातले दोन धट्टेकट्टे तरुण पकडुन आणायला सांगितले. एका ट्रॅक्टरवाल्याला बोलावले. गावात कोणाला बोलवायचे म्हणजे खुप मोठे काम होऊन बसते. आंबोलीत काही वाड्यांमध्ये अजिबात मोबाईल रेंज नाहीय. तिथल्या माणसाला बोलवायचे म्हणजे त्याचे घरच गाठावे लागते. आणि घरी गेल्यावर तो घरी सापडेलच याचा काही भरोसा नसतो. दोन चार फेर्‍या मारल्याशिवाय काम होत नाही. असे करुन लोक गोळा केले एकदाचे. प्रत्यक्ष शेण भरताना ते धट्टेकट्टे तरुण सकाळचा अर्धा दिवस काम करुन जे गुल झाले ते नंतर आलेच नाहीत. ते थेट दारुच्या दुकानात जाऊन पोचले होते म्हणे. मग आम्हीच कसेबसे शेण भरले आणि एकदाचे शेतात आणले. हे शेण शेतात पसरण्यासाठी शेजारच्या वाडीतल्या बायका बोलावल्या आणि शेण शेतात टाकुन घेतले. गावी दिवसाच्या मजुरीने लोक बोलावले की अगदी हळुहळू कामे होतात तेच एकरकमी पैसे देऊन बोलावले की भराभर कामे संपतात. Happy

ऊस अतिशय हळु वाढत होता. मी जीवामृताचा मारा सुरू ठेवलेला. तणनाशक वापरत नसल्यामुळे तण भराभरा वाढत होते. शेतात आपले पिक कायम हळुहळू वाढते आणि नको असलेले तण भसाभसा वाढते. आदल्या आठवड्यात दोन चार पाने फुटलेले गवत जर मध्ये एक आठवडा आपण गेलो नाही तर पुढच्या भेटीत अचानक अर्धा फुट वाढल्यासारखे वाटायला लागते, त्याच वेळी आपले पिक मात्र आहे तिथेच असते.

माझ्याकडे गडी जोडपे होते पण कुठलेही काम काढले की दोघेही 'ताई, माणसे बोलाव कामाला म्हणजे भराभर होईल' असे टुमणे लावायचे. माझी मावशी शेतात काकाबरोबर असायची पण कामावर आलेल्या मजुर बायांना चहा पाणी करणे एवढेच मर्यादित क्षेत्र तिचे असल्यामुळे तिलाही शेतात बाया घेतल्याशिवाय कामे होणार नाही असे वाटायचे. त्यामुळे माझ्याकडे कायम बाया काम करत असायच्या. आमदनी आठाणेही नाही तरी खर्चा मात्र दस रुपया अशी माझी अवस्था होती. त्यातही गंमत यायची. पहिल्या वर्षी आलेल्या बहुतेक बाया आमच्याच वाडीतल्या होत्या त्यामुळे गप्पांना अगदी ऊत यायचा. हात काम करताहेत सोबत तोंडेही चालताहेत असे असायचे. त्यात मला कामाची भारी हौस. मी जसा वेळ मिळेल तसे खुरपे घेऊन त्यांच्यासोबत तण काढायला लागे. हळूहळू शेतातली बरीचशी कामे मला यायला लागली. पण ऑफिसही चालु असल्याने माझी धावपळ व्हायची. शेतात नेट अजिबात नसे, त्यामुळे मिटींग असली की मला रेंजमध्ये परतावे लागे. थोडे दिवस एअरटेलचे वायफाय शेतात घेतले पण त्याची वायर झाडाझाडांवरुन टाकुन आणलेली, ती दर दोन दिवसांनी तुटायची. ती परत जोडेपर्यंत दोन दिवस जायचे. कंटाळुन शेवटी ते बंदच करुन टाकले. ऑफिसचे दिवसभराचे काम मी रात्री उशिरापर्यंत बसुन करत असे. आई घर सांभाळत असल्याने मला हे शक्य होत होते.

ज्या भागात उस लावलेला ती जमिन चांगली होती त्यात तिच्यावर भर पडली ऊसाच्या वाळलेल्या पानांची. ही पाने मी जमिनीतच जिरवत होते. ऊसाखाली जमिन हळुहळु आच्छादली जात होती. त्या मानाने भाज्या लावलेली जमिन आच्छादली गेली नाही आणि भाजीसाठी म्हणुन मी जो तुकडा ठेवला होता त्यात तळापही होते. माझ्याआधी तिथेही उसच लावायचे पण तो नीट व्हायचा नाही. मी लावलेली भाजी न उगवण्यामागेही हेच कारण होते. मधल्या दोन चार सर्‍या चांगल्या होत्या जिथे चवळी, मुग, भुईमुग इत्यादी नांदत होते.

फेब्रुवारी संपुन मार्च उजाडला तसे आजुबाजुच्या शेतात भरतीचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या वर्षी ऊस सरीत लावतात. तो वाढला की त्याला आधार देण्यासाठी बाजुच्या वरंब्यावरुन नांगराचा फाळ नेला की तिथली माती सरीत पडते आणि उसरोपाला दोन्ही बाजुने मातीचा आधार मिळतो. दुसर्‍या वर्षी खोडवा वाढतो तोवर माती थोडी आजुबाजुला गेलेली असते. बाजुच्या सरीतुन नांगर नेला की परत मातीचा आधार मिळतो. आंबोलीत बहुतेक सगळेजण बैल वापरुन भरती करतात. दोन उसाच्या ओळींमध्ये अडिज ते तिन फुट अंतर ठेवतात त्यामुळे दोन बैल दोन बाजुला चालत व्यवस्थित भरती होते. माझ्या दोन ओळीत साडेचार फुट अंतर असल्यामुळे बैलाने भरती करणे औतवाल्यांना कठिण वाटायला लागले. सगळ्या औतवाल्यांनी नकार दिला. एक दोघे ट्रॅक्टर वापरुन भरती करणारेही होते पण ते भरती खुप लवकर करायचे. मी त्यांना विचारले तोवर त्यांच्यामते माझ्या ऊसाची उंची वाढलेली होती आणि अशा ऊसात छोटा ट्रेक्टर घातला तर ऊस मोडायचा धोका होता. अशा प्रकारे दोन ओळीत अंतर ठेवण्याची माझी पद्धत चुकल्यामुळे मी संकटात पडले. भरती हवीच कशाला, नाही केली तर काय होणार असे प्रश्न मी इतर शेतकर्‍यांना विचारले तर ते म्हणाले भरती केली नाही तर पावसाळ्यात ऊस आडवा होणार, वाहुन जाणार. शेतात पाणी भरत असलेले मी आदल्या वर्षी पाहिले होते त्यामुळे उगीच रिस्क घ्यायला भिती वाटत होती.

शेवटी परत शेजारच्या गावातल्या ट्रेक्टरमालकाला फोन केला. त्यानेच मला सर्‍या पाडुन दिल्या होत्या. त्याने मार्च मध्ये येऊन ऊस पाहिला आणि ऊस अजुन वाढुदे, मी भरती करुन देईन म्हणाला. त्याची पुढची फेरी एप्रिलमध्ये झाली, तेव्हा त्याने ऊस पाहुन हा आता जास्त वाढला, मी ट्रेक्टर घातला तर मोडुन जाईल. माझा चुलत भाऊ पॉवर टिलरने भरती करुन देईल, त्याला सांगतो म्हणाला. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या भावाला फोन करुन बोलावले. तोवर एप्रिलचा मध्य उगवला होता. तो म्हणाला मी येतो दहा दिवसात. ते दहा दिवस गेले तरी त्याचा काही पत्ता लागेना ना त्याचा फोन लागेना. तोवर ऊसात भरपुर तण वाढले होते. मावशीला माझी भरती कशी होणार याचा काहीही अंदाज नसल्यामुळे जुन्या अनुभवावरुन ती भरती करताना तण मातीत गाडले जाणार असे मला सांगत होती. त्यामुळे मी तणाकडे दुर्लक्ष केले. एप्रिल अखेर तण इतके वाढले की काही ठिकाणी ते उसाच्या वर गेले. दोन चार दिवसांनी पावसाची एक सर असा पाऊसही सुरू झालेला. पावसाळ्यात माझा ऊस टिकणार नाही याबद्दल एव्हाना पुर्ण गावाची खात्री झाली होती. Happy शेवटी भरती करणारा एकदाचा अवतरला. तण पाहुन त्याने आधी तण काढा तरच भरती होईल म्हणुन सांगितले. आता मी काय करणार?? पावसाळा तोंडावर आलेला, भरती झालेली नाही आणि त्यात इतके तण.... काढायचे कसे?? ग्रासकटर बाळगणार्‍या शेजार्‍याला विचारले तर तो म्हणाला मला अजिबात वेळ नाही. मग दोन वेगवेगळ्या वाड्यातल्या प्रत्येकी दहा बारा बायका अशा विस-पंचविस बायका गोळा करुन मी त्यांना तण काढायच्या कामावर लावले. हा अनुभव मला भरपुर ताप देणारा व त्याच वेळी प्रचंड विनोदी असा होता.

मुळात आमच्या वाडीतल्या बायांचे नेहमीसारखेच एकमेकांशी पटत नव्हते. माझ्याकडे भाजीतले गवत काढायला यायच्या तेव्हा गवत काढता काढता एकमेकांची उणीदुणीही त्या काढायच्या. त्यात आता दुसर्‍या वाडीतल्या बायांची भर पडली. त्या दुसर्‍या वाडीतल्या बाया कायम ऊसात काम करणार्‍या. त्या ह्या ऊसाचा अनुभव नसलेल्या बायांना तुच्छ लेखुन त्यांची उणीदुणी काढायला लागल्या. माझ्या वाडीतली एखाद दुसरी हळूच येऊन मला कोण काम करत नाहीये त्याचा रिपोर्ट देई. मी त्या रिपोर्ट बरहुकुम अ‍ॅक्शन घेतली नाही तर तिला माझा राग यायचा. तुझ्या भल्यासाठी सांगतेय आणि तुला काही करायलाच नको... मग मी थोड्या थोड्या वेळाने इन जनरल सगळ्याच बायांना 'हात जरा जोरात चालवा गं बायांनो, पाऊस पडेल थोड्या वेळात' वगैरे असेच काही बाही बोलायचे. उगीच जास्त काही बोलले आणि कामाला यायच्या बंद झाल्या तर मीच परत संकटात.... ह्या विळ्या भोपळ्याच्या मोटीने कसेबसे एकदाचे काम संपवले. तण खुपच वाढले होते आणि झुडपांची खोडे जाड झालेली. त्यामुळे बायांचे खुप हाल झाले तण काढताना. तरीही ते कठिण काम संपवुन त्यांनी माझ्यावर खुप मोठे उपकारच केले. त्यानंतर मी परत असा प्रसंग माझ्यावर येऊ दिला नाही. तणाकडे दुर्लक्ष करुन अजिबात चालत नाही, ते वेळच्या वेळी उपटावे लागतेच.

तण काढुन झाले तरी भरती करणार्‍याचा पत्ता नव्हता. पंधरा मे पासुन नियमित पाऊस पडणार असे प्रत्येक वेदर साईट दाखवत होती त्यामुळे माझा जीव टांगणीला लागला होता. अखेरीस तो अवतरला. त्याच्या बहिणीच्या पुर्ण कुटूंबाला करोना झाला होता आणि त्या भानगडीत त्याचे पंधरा दिवस गेले होते म्हणे. त्याने पॉवर टिलरने भरती करायला घेतली खरी पण त्याला मागे खोरे नसल्यामुळे माती उसाच्या दोन्ही बाजुला लागत नव्हती. परत एकदा सगळ्यांनी मी कसे मुर्खासारखे दोन ओळीत नको तितके अंतर ठेवले याबद्दल दुषणे दिली. पण आता काय करणार?? शेवटी परत बायांना बोलावले आणि त्यांनी हाताने माती उसाच्या दोन्ही बाजुला चढवली. तोवर पाऊस थोडाफार सुरू झालेला. त्यामुळे हे काम खुपच किचकट झाले होते. पण तरी बायांनी सहकार्य केले आणि भरती एकदाची पार पडली.

भरती झाली आणि तोक्ते वादळ आले. मी वादळ येण्याच्या बातम्या रोज ऐकत होते पण माझ्यावर वादळाचा काय परिणाम होणार हे माझ्या लक्षात आले नाही. एके दिवशी तुफानी पाऊस पडला आणि नदी किनारी असलेल्या सगळ्या पाण्याच्या मोटारी पाण्याखाली गेल्या. पावसाळ्याच्या सुरवातीला आंबोलीत सगळे मोटारी काढुन ठेवतात, मला हे माहित नव्हते आणि तोवर मोटार काढायची वेळही झाली नव्हती. तरी माझी फक्त मोटारच पाण्याखाली गेली. कित्येकांचा ऊस पाण्याखाली गेला आणि झोपला, वाहुन गेला. माझ्या ऊस नशिबाने वाचला. वादळ नंतर शमले तरी पाऊस रिमझिम सुरूच राहिला.

पावसाळ्यात भात लावायची मला खुप इच्छा होती पण मावशी म्हणाली आपल्याला जमणार नाही म्हणुन मी गप्प बसले. निदान नाचणी तरी लाऊया म्हटल्यावर ती हो म्हणाली आणि आम्ही थोडी जमिन तयार करुन नाचणी पेरली. मेच्या शेवटी मला दातांच्या ट्रिटमेंटसाठी परत मुंबईला जावे लागले.

काही फोटो देतेय. शेंगदाणा व चवळीचे काही फोटो आताचे काढलेले आहे. या वर्षी खुप दुर्लक्ष झालेले आहे, त्यामुळे शेतात पिक कमी आणि तण जास्त असे आहे :

१. सरी व वरंबा : सपाट केलेल्या नरम मातीत काडी ओढली तर मध्ये रेघ पडते ती खोलगट रेघ म्हणजे सरी व त्या खोल रेघेमुळे तिथली माती बाजुने वर सरकते तो वरंबा. रोपे सरीत किंवा वरंब्यात कुठेही लावता येतात. ऊस सरीत लावतात म्हणजे तो थोडा मोठा झाला की बाजुच्या वरंब्यात परत सर पाडली की तिथली माती सरकुन आधीच्या सरीत पडते, तिथे आधीच ऊस असतो, ती उसाच्या दोन्ही बाजुला पडते आणि उसाला आधार देते. (यालाच भरती म्हणतात) .
बहुतेक रोपे वरंब्याच्या दोन्ही बाजुला लागतात म्हणजे त्यांची मुळे पाण्यात थेट न बुडता त्यांना केशाकर्षक पद्धतीने पाण्याचा ओलावा मिळतो व वाफसाही राहतो. पाणी सरीत राहते. पहिल्या वर्षी माझ्या शेतात बायांनी ऊस सोडून बाकीची सगळी रोपेही सरीतच लावली. त्यामुळे पाणी दिल्यावर पाण्यासोबत वाहात आलेल्या पाने इत्यादी केरकचर्‍याने रोपांची वाट लावली.

sari varamba.jpg

पाट व मडया:

पाणी शेतात खेळवण्यासाठी पाट पाडावे लागतात. आडव्या सर्‍यांमध्ये उभे पाट पाडतात. पाणी नियंत्रणात राहावे यासाठी चारसचार सर्‍यांचा एक समुह करतात त्या समुहाला मडया म्हणतात.

madhaya.jpg

सरीत लागलेला ऊसः

ussrope.jpg

थोडा वाढलेला...

uss3.jpg
२.
uss4.jpg

३. शेंगदाण्याची आरी:

shengary.jpg

४. शेंगदाण्याची आरी :

shengary1.jpg

५. जमिनीत घुसायच्या प्रयत्नातली आरी :

insoil.jpg

६. चवळी शेंगा : मी व मामाने मिळुन शेत साफ करायचा उपक्रम हाती घेतला तेव्हा इतकी साफसफाई केली होती.

chavali4.jpg

७. तिन आठवड्यात शेत असे झाले :

chawli.jpg

.

.

.

आंबोलीतील उन्हाळी रानमेवा:

nerli2.jpg

१. नेरडा/नेरली/आंबोळशी म्हणुन ही फळे प्रसिद्ध आहेत. हा महावेल आहे, लियाना. शेतावर आमच्या फणसावर पसरलाय. सुरवात झुडुप म्हणुन होते आणि नंतर आजुबाजुच्या झाडांवर पसरतो. महावेल असल्यामुळे याच्या वेलफांद्या जबरदस्त मजबुत असतात. ज्यांना महावेल परिचयाचा नाही ते याला झाडच समजतील अशा मजबुत फांद्या असतात. याची पाने पांढरट व मागुन चंदेरी असतात त्यावरुन मला बिन मोसमात हा महावेल ओळखता येतो. फळे कच्ची असताना आंबटढोण असतात, पिकल्यावर जबरदस्त गोडवा. बाहेरुन रोझ गोल्डचा मोहक रंग, आत एक वेगळाच केशरी रंग... चव एकदम मस्त. मुले ह्याची पिकलेली फळे गरासकट चुरडुन त्याची पोळी करुन सुकवतात आणि सुकलेली पोळी चॉकलेटसारखी चघळतात.

आंबोलीत २ प्रकार मिळतात. एक इथे फोटोत दिलीत ती. आकाराने बोटाच्या पेराएवढी, पण पिकल्यावर खुप गोडवा भरलेली अशी. दुसरा प्रकार मी हल्ली बघितलेला/खाल्लेला नाही, लहानपणी खाल्लीत. ती आकाराने आपल्या करंगळीसारखी निमुळती व तेवढी लांब असतात, कच्ची असताना हिरवट असतात, जबरदस्त आंबटढोण. पिकल्यावरही थोडा हिरवट रंग व हिरवटपणा टिकवुन ठेवतात. पुढच्या वर्षी शोधायला हवीत आणि बिया शेतात आणुन लावायला हव्यात. वृक्षतोडीचा रोग अख्ख्या जगाला लागलाय तसा आंबोलीलाही लागलाय. हा रानमेवा आपल्या शेतावर तरी जितके दिवस शक्य आहे तितके दिवस जपुन ठेवायचा. उद्याचे कोणी पाहिलेय....

२. एका दुसर्‍या झुडुपावर चढलेला वेल :
nerla.jpg

३. ही तोरणा. ही काही खास लागत नाहीत, पिकलेली तोरणा पिठुळ लागतात आणि अगदी मंद गोडसर चव असते. ह्याचे अगदी जेमतेम फांद्या व पाने असलेले झुडुप असते. पाने दोन्ही बाजुने वळलेली असतात. मला या पानांमुळे हे झुडुप ओळखता येते.

torana.jpg

आंबोलीत जास्त करुन छोट्या जांभळांची झाडे आहेत, फळे आकाराने वर नेरडा दिसताहेत तेवढीच, आपल्या करंगळीच्या टोकाच्या पेरावर दोन जांभळे राहतील इतकी लहान. मुंबईत मिळतात तशी टप्पोरी मोठी जांभळे तुलनेत खुपच कमी आहेत. यंदा काय झाले माहित नाही पण एकाही जांभळाला बहर आला नाही. काही जांभळाची झाडे एप्रिल सरत आला तशी फुलायला लागली. त्या फुलांची जांभळे होणार कधी आणि पिकणार कधी देवच जाणे. त्यामुळे यंदा आंबोलीत धनगरांनी नेरडा आणि तोरणा विक्रीला काढली.

आंबोलीत कोल्हापुर सीमेला लागुन कोणे एके काळी मेमन पिस्टनचे पॅटर्न मेकिंगचे युनिट होते. आंबोलीतल्या तरुणांना तिथे चांगला रोजगार मिळत होता. नंतर काही कारणांमुळे त्यांनी ते युनिट कोल्हापुरला नेले. ऐन भरात असताना कंपनीने दहा एकर जमिनीवर पेरुची बाग फुलवली होतील. त्यांचा काय प्लॅन होता तेच जाणे पण युनिट बंद पडल्यावर पेरुची बाग अनाथ झाली. आंबोलीतल्या जमिनीत शेतकर्‍याला हवे ते काही धड पिकत नसले तरी पेरु मात्र अमाप पिकतात. Happy हिरवे काहीतरी उगवल्यासारखे दिसले आणि जवळ जाऊन पाहिले तर ते हमखास पेरुचे झाड निघते. माझ्या शेतातल्या पडिक खड्ड्यांमध्ये कित्येक पेरुची झाडे नांदत होती जी मला नाईलाजाने तोडुन जमिनीत गाडावी लागली. तरी अजुन भरपुर पेरुची झाडे शेतावर आहेत. जळी स्थळी काष्टी पाषाणी असे पेरु भरभरुन उगवत असताना मुद्दाम लावलेले पेरु किती बहारदार उत्पन्न देतील, नाही??

तर ही अनाथ झालेली पण तरीही बहरलेली पेरुची बाग गेले पाच सात वर्षे गडदुवाडी व नांगरतासवाडीमधल्या लोकांना एप्रिल व मे महिन्यात भरपुर उत्पन्न मिळवुन देतेय. कित्येक वर्षे नांगरतासातल्या धनगरणी तिथले पेरु घेऊन एप्रिल मे मध्ये आंबोली एस्टी स्टँडावर उभ्या राहायच्या. अर्थात तिकडुन एस्टी स्टँड दहा बारा किमी दुर असल्यामुळे खुप कमी बायका स्टँडावर यायच्या. लॉकडाऊन मध्ये सगळे बंद पडल्यावर मे महिन्यात जरा लॉकडाऊन उठल्यावर तिथल्या बायांनी टोपलीत पेरु, जांभळे व करवंदे घेऊन तिकडेच नांगरतास-गडदुवाडीवर हमरस्त्याच्या दोन्ही बाजुंना उभे राहायला सुरवात केली. आम्ही २०२० मध्ये गेलो तेव्हा नुकतीच सुरवात झाली होती. दोन तिन किमीच्या पट्ट्यात दहा बारा बायका मुले उभी असायची. कडेला सावलीत बसुन राहायचे आणि गाडी येताना दिसली की उभे राहुन टोपली पुढे करायची Happy त्यांच्याकडुन मी काही विकत घ्यायचा प्रश्न नव्हता कारण कुठला रानमेवा कुठल्या जागी मिळतो ते मला माहित होते पण तरी गंमत म्हणुन मी विकत घ्यायचे आणि त्यांच्याशी गप्पा मारत रानमेवा खायचे. ही बायका मुलांची संख्या दरवर्षी वाढत जाऊन आता जागोजागी हाकेच्या अंतरावर बायका-मुले उभी राहुन रानमेवा विकतात. यंदा जांभळे नाहीत, करवंदे उशीरा मिळतात त्यामुळे पेरुसोबत नेरडा आणि तोरणा आली. तोरणा मला आधी मोहाच्या फुलांसारखी वाटली. मोहाची फुले विकताहेत की काय हा विचार मनात आला. आंबोलीत मोहाची झाडे दाट जंगलात आहेत, सहजासहजी दिसत नाहीत त्यामुळे मला आश्चर्य वाटले. जवळ जाऊन बघितले तर तोरणा... तोरणाही विकली जातील असे मला कधी वाटले नव्हते Happy विकली जाताहेत हे चांगले आहेच, त्या निमित्ताने ही संपदा सांभाळली तरी जाईल. ही मंडळी दिवसा ६०० ते १००० रुपये कमावतात असे ऐकुन आहे. हेही चांगलेच आहे पण माझ्यासारख्या शेतकर्‍याचा तोटा हाच की शेतावर काम करायला या दिवसांत कोणीही बाया मिळत नाहीत Happy

४. आम्ही जुन २०२० मध्ये आंबोलीत पाय ठेवला तेव्हा हा घरचा रानमेवा आमची वाट पाहात होता. सामान उतरवायच्या आधीच मी तुत्या तोडायला सुरवात केली. पेरु तोडुन कापुन खाल्ले. आंबोलीत शेवटी परत आलो याचे समाधान वाटले.

हे दारचे पेरु. एक पांढर्‍या पेरुचे पण झाड होते पण कुंपण वाढवताना ते छाटले. तेही वाढतेय परत.

gharache peru.jpg

५. आणि हे कापलेले गुलाबी पेरु. आंबोलीत सगळे पेरु गुलाबीच आहेत, पांढरे कमीच आढळतात, जवळपास नाहीच. या गुलाबी पेरुंना खुप सुंदर वास आहे आणि चव देखिल सुरेख आहे. पण यात बिया खुप आहेत.

gharcheperu.jpg

६. तुती उर्फ शहतुत उर्फ मलबेरी. आंबोलीची हवा तुतीला खुपच मानवते. आणि तुतीची पाने रेशिम किड्यांना खुपच आवडतात. आंबोलीत पुर्वापार पासुन रेशिम किडा संवर्धन केंद्र आहे. माझ्या लहानपणी तिथे गोल थाळ्यांसारख्या चप्पट टोपल्यातुन किडे ठेऊन वर तुतीचा पाला पसरुन ठेवत. त्यांचे कोष झाले की त्यांना दुसर्‍या केंद्रात पाठवत. हा पाला सतत मिळावा म्हणुन आजुबाजुला तुतीची चिक्कार झाडे लावुन ठेवलेली होती. आता फक्त तुतीची झाडे आहेत, केंद्र सुळेरानात हलवले. या तुतीच्या लागवडीसाठी व देखभालीसाठी म्हणुन आंबोलीत रोजगार निर्मिती होते. पाला काढता यावा म्हणुन झाडे सतत तोडत राहतात. तुती आंबोलीत सहज उगवते. माझ्याकडे तुतीची दोन झाडे आहेत. याच्या फांद्या नेऊन मी शेतावर लावल्यात. त्यांचीही आता तिकडे झाडे होताहेत. तुतीचा सुकलेला पतेरा शेतात खत म्हणुन कामाला येतो. घरी मी कुंड्या भरायला वापरते.

तुतीचे झाड व तुती. इतक्या मधुर तुत्या कुठे मिळणार नाहीत. दिवसभर वेगवेगळे पक्षी व माकडे या झाडावर धुमाकुळ घालत राहतात. या झाडांना दोनदा बहर येतो, एकदा डिसेंबरात आणि एकदा जुनमध्ये. पावसाळ्यात पण झाडावर फळे असतात पण पाणचट होतात. पावसाळ्यात झाड पुर्णपणे ओके बोके होते. परत पाने फुटतात, परत जोरदार पाऊस पडुन सगळी कोवळी पालवी खाऊन टाकतो, परत नवी पालवी येते. हे चक्र पुर्ण पावसाळाभर सुरू असते.

tuti.jpg

६. घरासमोर मी कमळतळे केलेय त्यात मावशीने शेण साठवले होते. त्यात ही आळंबी उगवुन आलेली. खाता येतात, छान लागतात, आम्ही खाल्ली. ताट आळंबी म्हणतात. अगदी ताटाएवढी मोठी असतात.

mashrum.jpg

७. हा एक अजुन फोटो:

mashrum2.jpg

८. मार्च एप्रिल मध्ये आंबोलीत अचानक सगळीकडे खालचे ओर्किड दिसायला लागते. जेवढी फुले दिसताहेत तेवढाच त्याचा जो काय फांदी बिंदी धरुन सगळा अवतार आहे. ह्याची इटुकली फांदी झाडाला किंवा भिंतीला चिकटुन असते, अगदी सहज काढता येते. अर्थात कोण काढणार? आंबोलीतल्या जनतेला ह्यांचे अजिबात कौतुक नाही. हा सिजन संपला की ह्या फांद्या मुळ झाडापासुन अजिबात वेगळ्या ओळखता येत नाहीत.

orkid.jpg

९. खालचा मुळा पहिल्या वर्षी शेतात लागला. तण काढायला आलेल्या बायकांनी मुद्दाम मला दाखवायला ठेवला आणि फोटो काढायला लावला. Happy

mula.jpg

१०. poz.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप पेशन्स चे काम आहे हे
आणि दुरून डोंगर साजरे हे ही कळतंय
किती चिडचिड होईल हवी तशी कामं होत नाहीत तेव्हा.

हे एका आईच्या वर्ग मैत्रिणीकडून ऐकले होते. तिच्या नवऱ्याची नोकरी संपल्यावर गावी त्यांच्या नावाचा तीन एकराच्या तुकडा कसू असं ठरलं होतं. ( जिल्हा सांगली, मिरज आणि सांगली पासून पाच किमी अंतरावर. तीन पिके देणारी जमीन) ते मुंबईत असताना एक भाऊ तो तुकडा पिकवत असे. हा भाऊ आता रिटायर होऊन येणार परत म्हटल्यावर त्या गावाकडच्या भावाच्या पोटात दुखू लागले होतेच.
दुर्दैवाने नवरा रिटायर होताच सहा महिन्यांत वारला. पण बाई धिराची. शेतात उभी राहिली. दोन्ही भावांनी वैर धरलं. शेती शिकवेनात. गावातले इतरही दूरच राहू लागले. पदरात दोन मुली आणि दोन मुलगे. मोठ्या मुलीने तलाठी कार्यालयात तात्पुरती नोकरी मिळवली. त्या नोकरीचा फार उपयोग झाला. गावातले लोक वचकून राहू लागले. या मुलीने प्रतिज्ञा केली की लग्न करणार नाही पण भावंडांना उभं करीन. तिघांची शिक्षणं, नोकऱ्या मार्गी लावलं. इकडे आईने चुकत चुकत सर्व शेती शिकून घेतली. ती या शेतीच्या कहाण्या ऐकायची त्याची आठवण झाली. त्याकाळी सल्ले आणि अनुभव यावरच भिस्त होती. १९७०.

अरे देवा ! काय हे एकामागून एक नष्ट चक्र !
पण तुम्हीच करू जाणे बाई !! खरोखर दंडवत तुम्हाला!!
कामाला माणसे बोलावणे यासारखे महाकर्मकठीण काम दुसरे कुठले नसेल.

व तण ही अशी एक जात आहे ना की काय सांगू ! कितीही काढा पुन्हा नव्या जोमाने उगवतात व आपले मुख्य उत्पनांचे झाड /रोप पार त्याच्यात बुडून जाते व खुरटे होते.

anjali_kool Happy

उ बो, फोटो देते इथे, फोटो देणे जरा किचकट आहे, तरी प्रयत्न करते.

सगळ्या प्रतिसादकांचे मनापासुन आभार. शेतीत काळीज दगडाचे करायचे आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा. कारण आपल्या हाती फक्त कष्ट करणे राहते, बाकी सगळे दैवाधिन. Sad

भारी अनुभव एक-एक !
आत्ता सगळे भाग एकसलग वाचून काढले. कमाल वाटली तुझी... गेल्या वर्षी कधीतरी इंद्राच्या बोलण्यात आलं होतं की तू गावी शेती करते आहेस.
पुढच्या भागाची वाट पाहते.