कबुतर, कावळा आणि पोपट

Submitted by मिरिंडा on 28 October, 2026 - 00:07

एकदा एक कबुतर उन्हाच्या वेळी एका हिरव्यागार झाडाच्या फांदीवर येऊन विसावलं. आता त्याला खूपच गार वाटत होतं . फांदीवर झोके घेतं ते स्वतःशी म्हणाले, " आपण उगाचच इमारतींच्या वळचणीला राहतो. माणसांसोबत राहून फारसा फायदा होतं नाही. उलट आपण रोगट आहोत म्हणून ते आपल्याला हाकलतात. आपण इथेच घरटं बांधू या. आपल्या भाईबंदांना पण बोलवू. " या विचारात रममाण होत ते बसलं होतं......
तेवढ्यात एक कावळा उडतउडत आला आणि त्याच्या शेजारच्या फांदीवर बसला. कबुतराला पाहून त्याने तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, "वळचण सोडून  तू पण इथेच आलास काय?माणसांभोवती लाळघोटेपणा करणारा तू. पक्षी जातीला लांछन आहेस.आधी अंगावर किडे बघ किती आहेत ते. "
         हे ऐकून कबुतर म्हणाले, " तुझ्या बापाचं झाडं आहे काय रे? "...... कावळा त्वेषाने कर्कश आवाजात काव काव ओरडून म्हणाला," ए, बापबीप कढायच कामं नाही, आधीच सांगतोय. आपली चोच पाहिलीस ना? फाडून काढीन. आख्या दुनियेच डिसेक्शन करतो आपण. तू क्या चीज हैं? "....... त्यावर कबुतर शांतपणे म्हणालं, " अरे ज्या ज्या, सडलेलं मास खाणाऱ्याने ज्ञान पाजळू नये. मी बघ कसे दाणे टिपतो. शाकाहारी आहे" असं म्हणून कबुतराने आपली नसलेली कौलर टाईट केली..... " ए चूप. शाकाहारी म्हणे, बरोबर किडे, पावसाळ्यातली गांडूळ पण, कशी मॅगी सारखी ओढून खातोस की नाहीस?" त्यावर कबुतराने मान दुसरीकडे वळवली. मग कावळा जिंकल्याच्या स्वरात म्हणाला, " काय रे, तोंड शिवलं काय? आता बोल की. आपल्याला बघ परमेश्वरानी खास दृष्टी दिल्ये. आपल्याला माणसाचे सूक्ष्म देह दिसतात आणि माणसाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी श्राद्ध पक्षाला आपल्याला बोलावतात. तुला तर हाकलतात साल्या........ त्यावर कबुतर म्हणालं, " ए, शिवी द्यायची नाय. आपल्याला आपल्याला बापानी पण कधी शिवी दिली नाही. औकातीत राहायचं. " ...... " तुला माणसाचं वारं लागलेलं दिसतंय.फिल्मी डायलॉग मारतो काय? " कावळा मधेच बोलला. ...... " हे बघ आपल्याला माणसाकडून पण इज्जत मिळते. समजला काय? आपल्याला अदृष्य जगातलं पण दिसतं. ".....
      " चल काय पण बोलतो. ती माणसाची अंधश्रद्धा आहे. मेल्यावर काय पण नसतं. आप मेला जग बुडला. अशी माणसाची म्हणच आहे. तुला काय मांसाहार मिळतो. जे तसं जेवण ठेवतात. तिकडे तू धावतोस. खीरपुरी नको असते तुला. मग आम्ही येऊन ती खातो. माणसाला समाधान देतो. तू काय दारुही पीत असशील. ठेवणारे दारू पण ठेवतात. मरणारा बेवडा असेल तर. "
आता मात्र कावळा जोरजोरात ओरडला, " वाट्टेल ते बकतोयस. "...... कबुतर मधेच म्हणाल, " उगाच हिंदी वापरू नको. मराठीत बोल. हा महाराष्ट्र आहे. ".....
" ठीक आहे  ठीक आहे." कावळा त्याला झटकत म्हणाला...... तेवढ्यात उडत उडत एक पोपट आला. आणि तिसऱ्या फांदीवर शीळ घालीत बसला.
       कबुतर आणि कावळ्याला म्हणाला, " हॅलो हाऊ आर यू? ". ते ऐकून कबुतर म्हणालं," फाईन!" त्यासरशी कावळा ओरडला, "काय रे तुम्ही दोघ काय साहेबाच्या पाटलोणीतून पडलात काय? इंग्लिश झाडताय? काय रे हा पण महाराष्ट्रात राहतो ना? मग त्याला का नाही मराठीतून बोलायला सांगत? " त्यावर कबुतर गप्प बसले तरी पोपट कावळ्याला म्हणाला, " तुला फक्त भांडता येतं का रे? आणि तू कोण सांगणार कोणी कोणत्या भाषेत बोलायचं ते? त्याला प्रॉब्लेम नाही तर तुझा का जीव जळतो?. " कावळा काहीच बोलला नाही. तोंडातल्या तोंडात म्हणाला, " दोघेही एकच माळेचे मणी आहेत. "... पोपटाने विचारलं,"काही बोललास वाटतं?, नसेल सांगायचं तर नको सांगुस."  आणि आनंदाने शीळ घालीत बसला.
     कावळ्याने उपहासाने विचारलं," सारख्या शिट्या मारीत असतोस, लाईन मारतोस की काय? इथे तर एकही पोपटीण दिसत नाही, "........ पोपट शिट्ट्या मारीतच राहिला. वातावरण जराही खेळकर असू नये असा दृष्टिकोन असलेल्या कावळ्याने नापसंतीने माना वाकड्या वाकड्या करून काव काव केले. पण एकही कावळा आला नाही. निदान आपली संख्या जास्त झाली तर आपल्या विरोधाची धार वाढेल आणि हा पोरकटपणा थांबेल. पण तसं काहीच झालं नाही. ते पाहून पोपट कबुतराला म्हणाला," काही लोकांना इतरांचं सुख पाहवत नाही.तुला काय वाटतं? "कबुतर त्यावर काहीच बोललं नाही. कारण मागच्याच पावसाळ्यात कावळ्याशी भांडण झालं त्याचा सूड म्हणून कावळ्याने कबुतराची आवडती मादी आणि एक पिलू मारलं होतं.कावळ्याचं कावकाव थांबलं. मग पोपट म्हणाला," मला लाईन मारतो म्हणतोस, तू काय करतोस रे, चिमणीच्या घरट्यावर वॉच ठेवून? ती कधी बाहेर येते आणि मी तिला पळवतो म्हणूनच नाही? अगदी माणसा सारखाच वागतोयस. "

" ए ए मला माणूस म्हणायचं नाही हं! माणूस ही शिवी आपल्याला नाही द्यायची. हं! आपण माणसापेक्षा सुपर आहोत.चोच पाहिलीस ना? "आता मात्र पोपट घाबरला आणि उडाला. कबुतराला सांगायची गरजच पडली नाही.
कसानुसा चेहरा करुन बसलेलं कबुतर ओल्या डोळ्यांनी उडून गेलं. कावळा मात्र कावकाव करीत जोरजोरात हसला. चारपाच कावळे पण जमा झाले. आणि त्या हास्यात सामील झाले. त्त्यांच्या ताब्यात झाडं आलं. मग त्यातल्या एकाने मेलेली घूस आणली. आणि सगळ्यांनी मिळून पार्टी केली.

अरुण कोर्डे
©®
ठाणे पश्चिम.
9004808486

Group content visibility: 
Public - accessible to all site users