प्रेयसी (३/४)

Submitted by आर्त on 7 August, 2026 - 11:10

आमची ओळख एका अ‍ॅपवर झालेली आणि तिथेच तीन-चार वेळा संदेशव्यवहार झालेला. आज पहिल्यांदाच आमची प्रत्यक्षात भेट होणार होती. गेल्या दशकात अपयशी ठरलेल्या प्रेमानुभवांमुळे आपल्याला कधीच योग्य साथीदार मिळणार नाही, या विचाराने मन त्रासलेलं. तरीही आज आशेचा उमाळा जाणवत होता. चालता चालता वाटेत सतत तिचे फोटो डोळ्यासमोर येत होते. तिचं निरागस हास्य मनात ठाम मुक्काम मांडून बसलेलं. कानात संथ झुळूकेची मंद अलगुज वाजावी, तसे ते मला मनातल्या मनात ऐकू येत होतं. आपण ओळखत नसलेल्या व्यक्तीचा फोटो बघून नकळत आपल्या मनात त्या व्यक्तीची प्रतिमा बनते, तिला एक आवाज असतो, तिचे हावभाव असतात आणि तिला एक स्वभाव असतो. जसजशी आमची भेटीची वेळ जवळ येऊ लागली, तसतसं मनात हुरहूर वाढू लागली. आपल्या मनातल्या प्रतिमेपेक्षा किती वेगळी असेल ती, याची.

अकरा मे, संध्याकाळचे सहा वाजून सव्वीस मिनिटं झालेली. क्वचितच कुणाला स्वतःचे आयुष्य बदलणारा क्षण इतका व्यवस्थित आणि मिनिटापर्यंत अचूक लक्षात असेल. स्टुटगार्ट येथील फॉयरबाखच्या ट्रेन स्टेशनला मी पोहोचलो. तिला मी लांबूनच ओळखले. तिने लिहिल्याप्रमाणे तिच्या अंगावर लांब काळा कोट होता. तिच्या काळ्या स्वेटरमधून टीशर्टची हिरवी कॉलर बाहेर आली होती. तिचे मोकळे सोडलेले सोनेरी केस खांद्यापेक्षा जरा लांब होते. तिने वळून माझ्याकडे पाहिलं आणि हसली. जसं लख्ख प्रकाशाने भरलेलं निरभ्र, निळं आकाश पृथ्वीला व्यापून घेतं, तसं त्या हास्याने मला व्यापून घेतले. त्याच्यात लाजरे तारुण्य तर होतेच, पण त्यासोबत निरागस बालपणही तितकेच झळकत होते. तिला रामेन नूडल्स आवडत असल्यामुळे मी तिला माझ्या आवडत्या रामेन रेस्टोरेंट मधे जेवायला घेऊन गेलो. जेवण होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. गप्पा चालू राहाव्यात म्हणून मी जवळच्या बियरगार्डनला जायचा प्रस्ताव मांडला, जो तिने लगेच स्वीकारला.

नदीला आपला उगम माहिती असला तरी, प्रवास माहिती नसतो. कधी उतार लागेल, कधी वळण येईल, कधी ती संथ वाहेल आणि कधी भव्य रूप धारून सागराएवढी पसरेल, हे नदी ठरवत नाही. तिचे कर्म आणि गुणधर्म म्हणजे वाहत राहणे. तेवढं ती करते. अशीच काही आमची संध्याकाळ वाहत गेली. एक विषय संपत आहे ही जाणीव व्हायची, आणि त्या वळणानंतर आमची संध्याकाळ काय रूप घेईल, या विचाराने मी व्याकुळ व्हायचो. दोन साधारण व्यक्तींच्या परिचयाला जशी सुरुवात होते, तशीच काही आमच्या गप्पांना सुरुवात झाली होती. आवडी निवडी काय, आवडते खाद्य कुठले, कुठल्या प्रकारचे संगीत आवडते, शिक्षण काय, कुठे भटकंती झाली इत्यादी. माझीच बडबड जास्त चालली होती. तिने थोडे प्रश्न विचारले, आणि थोडक्यात उत्तरे दिली. तिचा बाकी वेळ लाजण्यातच गेला.

बियरगार्डनमधून आम्ही बाहेर निघालो तेव्हा साडेनऊ वाजलेले. सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे, ही जाणीव माझ्या पावलांना घराच्या वाटेवर खेचत होती. पण तिच्या सान्निध्याची जादू इतकी तीव्र होती की, संपूर्ण आयुष्याला याच क्षणात घालवावे, अशी मनाची इच्छा होती. तिचीही पाऊले माझ्यासोबत रेंगाळत असल्याचे बघून, तिला माझी आवडती बाग बघायची आहे का, मी विचारलं. साधारण साडेतीनशे पायऱ्या चढून जावे लागे, अशा एका टेकडीवर ती बाग होती. रात्रीची वेळ असल्यामुळे, वाटेत बराच अंधार होता. तेव्हा मला जाणवलं नाही की एका परक्या पुरुषाबरोबर अशा अंधारात एका बागेत येतेस का, हे एक तरुणीला विचारणं हा अल्लड मूर्खपणा होता. पण ती हो म्हणाली. मी दूरच्या देशातून आणि परक्या संस्कृतीतून तिच्या देशात आलेला कोणी साधारण माणूस. तरीही तिला मी एक विश्वासू व्यक्ती वाटलो, हे माझे भाग्यच म्हणायचे.

प्रत्येक घटनेचा काही उद्देश असतो, असं मला मानायला आवडतं. साडेतीनशे पायऱ्या चढून आम्ही त्या बागेत पोहोचलो. आता त्या अंधारात मलाही थोडी भीती वाटू लागली. एका परस्त्रीची जबाबदारी आपल्यावर आहे, ही जाणीव झाली. चालता चालता एक पाटी दिसली - आक्रमक कलहंसांपासून सावधान. आम्हाला गंमत वाटली. त्या फलकाकडे दुर्लक्ष करून आम्ही दोन पाऊले पुढे चाललो आणि तितक्यात एक कलहंस कर्कश आवाज काढत आमच्या दिशेने वेगाने येऊ लागला. आम्हाला प्रचंड भीती वाटली. मी नकळत तिचा हात धरला आणि आम्ही तिथून पळ काढला. पहिला स्पर्श! समुद्राच्या सैराट वाऱ्यात नावेचे शीड जसे खुळ्यासारखे फडफडते, तसे आवडत्या मैत्रिणीच्या सान्निध्यात पंधराव्या वर्षी अंतरंग कापरे व्हायचे, मला आठवते. वयाच्या तिसाव्या वर्षीही असेच झाले, याचे मला आश्चर्य वाटले. माझ्या हृदयाची वाढलेली गती फक्त मलाच नाही, तर तिलाही जाणवली असावी. या संथ वाहत्या संध्याकाळी एक आक्रमक हंस आमच्या पहिल्या स्पर्शाचे कारण ठरेल याची मी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.

आम्ही वेगळी वाट धरून किलेसबेर्ग टॉवरला पोहोचलो. संध्याकाळ झाली की त्या टॉवरच्या जिन्यांसमोर शटर ओढून प्रवेश बंद केला जातो. हे मी असंख्य वेळा बघितले होते. पण आज जणू कोणी ठरवलेलं की आपण दोन तरुण मनांची संध्याकाळ रोमांटिक करावी आणि ते दार उघडे सोडलेले. ही सुवर्ण संधी साधून मी तिला एक अप्रतिम दृश्य दाखवायचे वचन दिले आणि वर घेऊन गेलो. दूरदूरपर्यंत कुणाचीही चाहूल नव्हती. दरीत स्टुटगार्ट शहर दिसत होते. क्षणाक्षणाला हजारो दिव्यांखाली लाखो किस्से काळाच्या असीम पुस्तकात लिहिले जात होते. त्या सर्वांपासून दूर, आता फक्त चंद्राच्या चंदेरी प्रकाशात आमची सुवर्ण संध्याकाळ काही मुके किस्से टिपत होती.

मला लहानपणापासून रात्रीची भीती वाटते पण ती अंधारामुळे नाही. अंधारात दडलेल्या अज्ञातामुळे. आपल्या आजूबाजूला काय आहे, कोण आहे, आपल्या समोर दार आहे का दरी, इत्यादी. प्रकाशाची उणीव जाणवली, की कधी पहाट होते याची मी वाट बघतो. रात्र भरभर सरावी, अशी सहसा माझी इच्छा असते. पण आज माझे मन कळकळून प्रार्थना करत होते - या रात्रीची गती थोडी कमी व्हावी. बघता बघता साडेअकरा झाले. मी तिला जवळच्या ट्राम स्टेशनपाशी घेऊन आलो. ट्राममध्ये शिरण्याआधी मी तिला माझा मोबाईल क्रमांक दिला. धरणाच्या तोंडाशी नदी जशी भरून येते, तसे काही मला वाटत होते. ट्रामचे दार जसे बंद झाले, माझ्या भावनांची नदी बांध तोडून सर्वत्र पसरली आणि अनावर तीव्रतेने वाहू लागली. मला काय होत आहे, हे मलाच समजेना. तितक्यात माझ्या लक्षात आलं की तिने मला तिचा मोबाईल क्रमांक दिलाच नव्हता. हे आमच्या प्रवाहातले फक्त एक वळण होते का तो प्रवाह अपूर्ण गोष्टींच्या अनंत सागरात मिसळून लुप्त होणार होता, हे आता काळच सांगणार होता.

-----------------------------
टीप: एकूण चार लेखांची ही मालिका असणार आहे. हे लेख पूर्णतः माझ्या अनुभवांवर आधारित असून काल्पनिक नाहीत. तुमचे विचार, मत आणि सुधारणा जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद.

(१/४) प्रदोष https://www.maayboli.com/node/88535
(२/४) प्रवास https://www.maayboli.com/node/88596

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

@सामो, रेव्यु, वावे आणि शर्मिला... तुम्हा सर्वांचे खूप आभार. मला एक मैत्रीण म्हणाली की आदल्या दोन लेखांच्या तुलनेत, हा लेख खूप वेगळा आहे. माझी लेखनाची तर्हा बदलली आहे म्हणे. तुमच्यातल्या थोड्यांनी आदले लेख वाचले आहेत. तुम्हालाही असं काही जाणवलं का?
अभिप्रायाबद्दल आत्ताच आभार मानत आहे! धन्यवाद!