प्रतिभा (वाढीव भाग)

Submitted by मिरिंडा on 23 March, 2026 - 04:14

(काही वाचकांच्या आग्रहास्तव ही गोष्ट पुढे वाढवली आहे.कारण शुचिताचं पुढे काय झालं याबद्दल लिहीण्याचा आग्रह होता.त्यामूळे शेवटचा भाग वाढवून लिहीला आहे. आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात ही विनंती *****************************************************

बंगलोरला जेमतेम दोन वर्ष काढली. एक दिवस एक अनोळखी फोन आला.मी दोन चार वेळा वाजूनही घेतला नाही. वेळ रविवार सकाळची दहाची होती. आम्ही सगळेच आरामात उठलो होतो.आज कुठे बाहेर जेवायला जायचं यावर चर्चा चालू होती. शुचीसुद्धा त्यात भाग घेत होती. ती आम्हा दोघांना काका काकूच म्हणत असे.तरीही तिला आमच्या बद्दल फार भरवसा होता असं दिसून आलं.ती आता कॉलेजात ॲडमिशन घेणार होती. त्यावरही चर्चा होतच असे. अजून दहावीचा निकाल लागला नव्हता.य
तिचा ओढा कॉमर्स लाईन कडे जास्त होता. तिला बहुतेक सीए करायचं असावं. मी तसं तिला काहीच विचारलं नव्हतं. असो. चर्चा रंगात असताना परत एकदा फोन वाजला. आता मात्र मी तो घेतलाच पाहिजे असा आग्रह रिताने धरला. शेवटी मी तो घेतला. तो होता, ठाण्याच्या तुरुंगातला. मला उगाचच अस्वस्थ वाटू लागलं.मी धडधडत्या छातीने हॅलो म्हणालो. पलीकडून एक राकट आवाज आला . "राजवाडे साहेब का ?" मी हो म्हंटल्यावर जमेल तेवढं मार्दव आवाजात आणीत ते म्हणाले," मी तुरुंग अधिक्षक ठोसर बोलतोय. आमच्याकडे प्रतिभा नावाच्या एक कैदी आहेत,त्यांना तुमच्याशी बोलायचय " असं म्हणत त्यांनी फोन प्रतिभाला दिला असावा. प्रथम काही वेळ हुंदक्यां शिवाय काहीच ऐकू आलं नाही. मला आवाज ओळखीचा वाटला. म्हणून मी हॅलो म्हंटलं. हुंदके थांबवीत प्रतिभा म्हणाली, " उत्तम,तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. शुचीला तुम्ही मुलीसारखी सांभाळत असालच. एक विनंती आहे. ती तिथे असेल तर तिच्याशी मला बोलता येईल का ?" असं म्हंटल्यावर मी फोनवर हात ठेवीत शुचीला म्हणालो," आईचा फोन आहे, बोल." त्यावर ती तुच्छतेने म्हणाली, " माझी आई जिवंत नाही. आता रिता काकूच माझी आई" मग मी सांगितलं,"अगं झालं गेलं विसरून जा. बोल आईशी. " मग मात्र तिने मोठ्याने ओरडून पण रडत रडतच सांगितलं," मला नाही बोलायचं कोणाशीच" आणि ती तिथून निघून गेली. ते ऐकून प्रतिभा म्हणाली," जाऊ द्या मीच कमनशिबी, म्हणून हे असं. तुम्हाला सांगते अजून पाच वर्षं काढायची आहेत हो. मला तिला एकदा तरी बघायचाय,एकदा जवळ घ्यायचंय आणि माफी मागायच्ये हो. पुन्हा नाही भेटणार मी. तुम्ही घेऊन मला का तिला ? " मला काय उत्तर द्यायचं कळेना. मी रिताकडे पाहिलं.हलक्या आवाजात ती म्हणाली , प्रयत्न करतो म्हणा. मी तसं सांगितलं. तिने फोन ठेवला. आता प्रयत्न कसा करायचा? बोलून तर बसलो.
आधी शुचीची समजूत काढणं, म्हणजे कठीण. मग वकीलाला विचारावं लागेल. असा विचार करून,ते तात्पुरतं पुढे ढकललं. चांगल्या सकाळला अशा रितीने ग्रहण लागलं. तरीही शुचीला समजावण्यासाठी मी आतल्या खोलीत गेलो.तिच्याशी बोलणं तसं कठीणच होतं. मुलं जे धरुन बसतात ते सहसा सोडत नाहीत. फक्त दहापंधरा मिनिटंच प्रयत्न करु शकलो.कारण माझ्याजवळ समजावण्याचं कौशल्य नक्कीच नव्हतं.रडण्या व चिमण्या शिवाय तिने काहीच केलं नाही. कदाचित हे काम रीता करु शकेल असा विचार करून बाहेर आलो. रीताचाही सध्या बोलण्याचा मूड नव्हता.मात्र तिने दोन तीन चांगल्या हॉटेलांची नावं सुचवली. आत्ताच्या समस्येवर तोच एक उपाय होता. पंधरावीस मिनीटात सगळ्यांचाच मूड ठीक झाला. अखेरीस एका चायनीज हॉटेलमध्ये जाण्याचं ठरवलं. शुचीही सगळं विसरून तयार झाली.

हॉटेल एवढं खास नव्हतं,तरी अगदीच टुकार नव्हतं. म्हणजे मुलांसाठी चाललं असतं म्हणून नाही तर ठीकठाक होतं. आता तर आमच्यात तीन तट पडले होते. माझी मुलं, आम्ही दोघं आणि शुची. पण खरंतर शुची बऱ्याचदा आमच्याच पार्टीत असायची. म्हणजे सुरुवातीला दाखवायला तिची पार्टी वेगळ असे,पण नंतर आम्हाला उगाच कशाला त्रास द्यायचा म्हणून ती आमच्याच पार्टीला जॉईन व्हायची.जैवण शांततेत पार पडलं. आम्ही घरी आलो. माझ्या डोक्यात मात्र प्रतिभाला भेटण्याचा किडा होता. शुची विसरली होती किंवा नाही,समजायला मार्ग नव्हता. तिला थेट विचारलं नाही. पुन्हा प्रतिभाचा फोन येईल तेव्हा पाहू.असं म्हणून मी ते मॅटर क्लोज केलं.का कोण जाणे शुचीचा वाढदिवस केव्हा आहे ते मला विचारावासा वाटलं. माझ्या मनात कुठेतरी ही शंका होती की प्रतिभाचा फोन त्या आधी येईल. दिवस चालले होते. आम्ही परत प्रतिभाला विसरलो. नाहीतरी लक्षात ठेवण्याचं काहीच कारण नव्हतं. सहज म्हणून मी एक दिवस शुचिताला तिचा वाढदिवस कधी असतो विचारलं.तर तिने दोन ऑक्टोबरला असतो.असं कळलं. तिने कशाला माहिती हवी असं विचारलं नाही. पण ती लगेचच म्हणाली," त्या आधी मम्मी फोन करील असं वाटतं का तुम्हाला " असं मात्र तिने विचारलं. तिचे विचार माझ्या सारखेच आहेत,हे पाहून आश्चर्य वाटलं. मी त्यावर उत्तर न देता बाहेर पडलो. तिचा वाढदिवस आम्ही सगळेच विसरून गेलो.असेच काही महिने गेले.
१ ऑक्टोबरला तिच्या शाळेत कुठल्याशा स्पर्धेचा बक्षिस समारंभ होता. त्यात तिला दुसरं बक्षीस लागलं हैतं. ती अर्थातच फारशी उत्साही नव्हती.कारण दुसरं बक्षीस काय घ्यायचं असं ती म्हणाली. पण मी तिला, बक्षीस बक्षीस असतं. पहिलं असो की दुसरं. ते घ्यायला आपण सगळेच जाऊ. असं म्हंटल्यावर ती थोडी चिडून म्हणाली," तुम्ही वेडे आहात का ? मीच जाणार नाही,सगळ्यांनी जाण्याची गरजच काय,असं ती म्हणाली. मग मात्र तिला रिताने हरतऱ्हेने समजावून सांगितल्यावर ती तयार झाली. पण तिने कोणतीही पार्टी न करण्याचं सांगितलं. अशा रितीने बक्षिस समारंभाला आम्ही गेलो. रात्री उशिरापर्यंत परत आलो. पण हॉटेलमध्ये गेलो नाही. अजूनही तिचा उद्या वाढदिवस असल्याचं आमच्या लक्षात नव्हतं.अचानक मला सकाळी सुटी असल्याने आणि कसली सुटी आहे पाहिल्याने तिचा वाढदिवस असल्याची आठवण झाली. मी सकाळी सकाळी तिला हॅपी बर्थडे म्हंटलं. तिला बरं वाटलेले दिसलं. पण आज मात्र मी पार्टी देणार असल्याचं सांगितलं,तेव्हा ती पण खूष झाली.
.........या वेळेला मी पार्टी दिली ती एका डान्स फ्लोअर असलेल्या हॉटेलात .आम्ही सगळेच नाचलो.रात्री दमून भागून आम्ही घरी आलो आता माझ्या कडे कार असल्याने काहीच प्रॉब्लेम नव्हता.अतिशय चांगल्या मूडमध्ये घरी आलो आता शिरल्या शिरल्या फोन वाजला. तो तुरुंग अधिकाऱ्याचा होता. त्याने तो प्रतिभा कडे दिला. "सध्या मला चार पाच दिवसांसाठी पॅरोल मिळतोय. मला वाटतं तुमच्या कडे येऊन शुचीला माझे सोन्याचे दागिने द्यावेत.किंवा तसं जर होत ‌‌नसेल तर तुम्ही येऊन घेऊन जाल का ? " खरंतर मला तिला नाराज करायचं नव्हतं. पण शुचीला विचारुन सांगतो असं मी सांगितलं,आणि फोन बंद केला. कोणाचा फोन होता हे शुचीने ओळखलं होतं. ती काहीच बोलली नाही. मीही रात्र झाल्याने विषय ताणला नाही. पण एक गोष्ट मात्र ठरवली, की शुचीला एकटीला बाहेर घेऊन जाऊन बोलावं असं मी ठरवलं. तशी संधी मला लवकरच मिळाली.....अर्धा दिवसांची रजा घेऊन मी घरी आलो. शुचीपण प्रॅक्टिकल रद्द झाल्याने घरी आली. मी घरी असेन यांची तिला कल्पना नव्हती. रीता मैत्रिणीकडे गेली होती. मुलं शाळेत गेलेली. त्यामुळे मी शुचीला बाहेर घेऊन जाण्याचा प्लान रद्द केला. आमची दोघांची जेवणं
झाल्यावर तिला माझ्या समोर बसवून समजाऊन सांगू लागलो. सगळं ऐकून घेतल्यावर ती म्हणाली " तुम्हाला माझा कंटाळा आलाय का ? " त्यावर तिच्या डोक्यावर हात फिरवत मी म्हंटलं " अगं अगं कसं होईल बाळ ? माझं एवढंच म्हणणं आहे .एकदा तिचं ऐकून तर घे. फारतर तू एक अक्षरही बोलू नकोस. आणि मी आहेच की तुझ्या बाजूने. परत तिला भेट असं मी तुला कधीच सांगणार नाही.त्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागेल. ते अजिबात टेन्शन घेऊ नकोस." यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही.
मी असाच वेळ काढायचा प्रयत्न केला. पण दोनच दिवसात प्रतिभाचा फोन आला. शेवटी मी तिला " शुचीला तुला भेटण्याची अजिबात इच्छा नाही असं सांगितलं. पण मी तिला मुंबईला शेवटचं भेटायला आणणार आहे" हे सुध्दा मी तुरुंगाधिकाऱ्यांनी जेव्हा, प्रतिभाने जेवण सोडलं आहे असं सांगितलं तेव्हाच बोललो. आता मला प्लेनचं तिकीट बुक करणं भाग होतं कारण राहण्याचा प्रश्न होताच. शिवाय शुचीचा मूड किती खराब होईल ,यांचा अंदाज नव्हता. शेवटी शनिवारी सकाळी मी फ्लाईटने मुंबईला निघालो.निघताना फार काही बोलली नाही,पण रिताच्या गळ्यात पडून मात्र रडली. सकाळी अकरा साडे अकराला तुरुंगाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर झालो. अधिकाऱ्याने अजून शिक्षेची साडेतीन वर्ष बाकी असल्याचं सांगितलं. तेवढ्यात एका महिला वॉर्डनने प्रतिभाला कार्यालयात आणलं. तिचा चेहरा एरवी जरा तरी बरा होता,तो पाहण्याच्या लायकीचा राहीला नव्हता. हातापायांच्या काड्या आणि डोळे खोल गेलेला, निराशेने काळवंडलेला चेहरा समोर होता. मी हसलो तरी तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिने फक्त तिचे दागिने टेबलावर ठेवले आणि शुचीला म्हणाली," आयुष्यात कधी जमलं तर मला माफ कर आणि लक्षात ठेवता आलं तर पाहा. माझं वागणं ही तसंच होतं. यापुढे मी कधीही भेटणार नाही,असं मी वचन देतै" असं डबडबलेल्या डोळ्यांनी ती ,मागे न पाहता आपल्या कोठडीकडे निघून गेली. मलाही थोडंसं गदगदल्या सारखं झालं. आज प्रथमच मला शुचीचा राग आला. तिनेही एवढं ताणण्याची गरज नव्हती. आम्ही तुरुंगाधिकाऱ्यांचा निरोप घेतला
मनाच्या विचित्र अवस्थेत आम्ही बाहेर पडलो. जेमतेमच जेवलो.आणि परतीच्या प्रवासा साठी जड अंतःकरणाने एअरपोर्ट कडे निघालो. रियाला सांगण्या सारखं काही नव्हतंच. उलट ती घरी गेल्यावर काय दोषारोपण करील ही भीती होतीच.
शुचिताला आम्ही दोघांनी काहीच बोलायचं नाही किंवा पुन्हा प्रतिभाला भेटण्याचा आग्रह करायचा नाही.असं ठरवलं.नंतर काही महिने प्रतिभाचा फोन आलाच नाही.मी माझ्या कामात मश्गूल होतो. एकदोन वेळा कामानिमित्त मुंबईला जाण्याचीही वेळ आली. एकदा तर दोनतीन दिवस राहावं पण लागलं. परंतू कंपनीने ती सोय केल्याने मला कसलीच अडचण आली नाही. मी प्रतिभाला जवळजवळ विसरलोच होतो. परंतू प्रतिभा माझ्या मनात जळमटा सारखी चिकटून बसली होती,हेच खरं.रिताही मला तिची आठवण करून देत नव्हती. असो काही दिवस गेले.शुचीचा दहावीचा निकाल लागला. तिला ८५ टक्के मार्क मिळाले होते. तरीही तिचा कॉमर्सला जाण्याचा हट्ट ती सोडत नव्हती. शेवटी मी तिला सांगितलं," हे बघ चांगले मार्क मिळाले आहेत,तुला सायन्सला सहज प्रवेश मिळेल .तुला पाहिजे तर तू मेडिकल किंवा इंजिनिअरींगलाही जाऊ शकतेस. मेडिकल बद्दल तर तिने नाकच मुरडलं. पण तिने तिला वकील होऊन न्यायाधीश होण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
त्यावरही तिला समजावून सांगितले ‌ पण तिचा न्यायाधीश होण्याचा हट्ट कायम होता. असो तिने लवकरच एका चांगल्या कॉलेज मधे प्रवेश मिळवला. आम्हाला बरं वाटलं. एक दिवस परत तुरुंगाधिकाऱ्यांचा फोन आला.मी विचारलं," आता कोणाला भेटायचंय ? " त्यावर त्यांनी प्रकाशाचं नाव घेतलं. मला प्रकाश अजिबात आवडत नसे. खुनी वृत्ती असलेला हा माणूस मला माझ्या आयुष्यात परत यायला नको होता. मी नकार दिला. फोन बंद झाला. शुचीला सांगितल्यावर ती म्हणाली," कोण, प्रकाश मामा ? " ती मामा म्हणाल्याने मला वाटलं तिला मामा बद्दल प्रेम आहे की काय? पण तिने तर स्पष्टच सांगितलं," मला तर त्याची भीती वाटते.त्याला नाही भेटणार मी. " माझं काम प्ररस्पर झालं. ती रागाने म्हणाली," सगळं संपलं ना ? मग हे लोक आपल्याला जगू का देत नाहीत ? " तिला कशीतरी शांत केली.नंतर सात आठ महिन्यांनी फोन आला तेव्हा कळलं की प्रतिभाला वेडाचे झटके येत असल्याने तिला कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाईल भेटायचं असल तर येऊन जा.अर्थातच तिला भेटण्याची इच्छा घरात कोणालाही नव्हती.तरीपण मी एकट्यानेच जाण्याचं ठरवलं.फक्त रिताला सांगितलं. ती म्हणाली," अगदी भेटायची गरजच आहे का ? " त्यावर मी म्हटलं,"थोडा माग
ठेवलेला बरा..उद्या काही अघटीत घडून शुचीचे विचार बदलले तर निष्कारण आपल्यावर दोषारोपण होईल."
मी कोणालाही न सांगता रजा घेऊन गेलो. प्रतिभा तिच्या कोठडीत विमनस्क स्थितीत बसली होती. तिला मी आल्याचं वॉर्डनने सांगितल्यावर माझ्याकडे दृष्टीहीनतेने पाहून ती म्हणाली," आत्ता आलास मला पाहायला? उघडी नागडी बघायचं मनात होतं ना ? मग बघ की .... .....? "असं म्हणून ती अंगावरचे कपडे टराटरा फाडू लागली. माझी घाबरगुंडी उडाली. मी झटकन वळलो. आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन बसलो. मागून तिचा ओरडण्याचा आवाज येत होता. "......अरे ये की मेल्या बघ मला , घे मला, ...हा, हा हा हा हा " मग मी अधिकाऱ्याला सांगितले," मला पुन्हा फोनही करु नका आणि बोलवूही नका. " असं म्हणून मी ,मुख्य दरवाजातून मागे न पाहता निघालो सुद्धा. अधिकाऱ्याचा आवाज येत होता," अहो थांबा, काही फॉर्म्यालिटटीज पुऱ्या करायच्येत. " पण मी थांबलो नाही. एअरपोर्ट साठी टॅक्सी पकडून निघालो.आता मात्र प्रतिभा आणि तिच्या सगळ्या संबंधीत माणसांना मी मनातूनच नाही तरी आयुष्यातूनही हद्दपार करण्याचं ठरवलं. माणसाच्या चांगुलपणालाही मर्यादा असतात. मनाच्या उद्विग्न अवस्थेत मी घरी आलो. कोणाच्याच प्रश्नांची मी धड उत्तरं दिली नाहीत. विचारणारी अर्थातच फक्त रिता होती. शुचीला तर मी प्रतिभाला भेटायला गेलो होतो हे माहितही नव्हतं. रिता काहीच बोलली नाही. कारण तिला माझ्या अशा विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष करण्याची संवय होती. असो. आमचं रुटीन परत चालू झालं. वर्ष संपलं.या घटनेला आता दोन वर्ष होत आली. आणि एक दिवस एक निनावी फोन आला. फोन एका स्त्रीचा होता. मी अननोन नंबर म्हणून फोन कट केला. मात्र परत दोनतीन तासांनी फोन वाजला.
तरीही मी घेतला नाही. आता मात्र रिता वैतागून ओरडली, " अहो घ्या तो फोन आणि रॉंग नंबर म्हणून तरी कट करा, म्हणजे परत तरी येणार नाही . ". मग मात्र झोपण्यापूर्वी आलेला फोन मी घेतला. फोन वर बोलणारी स्त्री म्हणाली," मी कल्याणी मुजुमदार. फोन ठेवून नका आधी एका. हे पाहा, मी प्रतिभाताईंची कोर्टाने ॲपॉइंट केलेली केअरटेकर आहे .त्या तुमची आणि त्यांच्या मुलीची आठवण काढतात. सध्या त्या अंथरुणाला खिळून आहेत. आणि अतिशय गंभीर अवस्थेत आहेत.येऊन भेटलात तर त्यांची इच्छा पूर्ण होईल.".
आता काय उत्तर द्यावं मला कळेना. तरीही मी म्हटलं," त्यांच्या मुलीचं मी सांगू शकत नाही,पण जमेल तसा मी येऊन जाईन. त्यावर त्या म्हणाल्या," लवकरात लवकर आलात तर बरं होईल, तुम्हाला भेटल्याचा त्यांना समाधान तरी वाटेल." फोन तिनेच बंद केला. आता हा नवीन पेच कसा सोडवायचा मला कळेना. मी शुचीशी बोलायचं ठरवलं. ती स्वतःहून तर जाणार नाही. नाहीतर आजपर्यंत तिने एवढा विरोध केलाच नसता. पण मी तिला कसं पाठवणार होतो. मला माहीत नव्हतं. तिचं जाणं अशक्यच होतं. तरीही तिच्याशी मी भीतभीतच विषय काढला. तिचं आता बी.कॉमचं तिसरं वर्ष होतं. तिचा अभ्यास आता फुल स्विंग मधे चालू होता. वाटलं होतं त्याहीपेक्षा ती जास्तच टॅलेंटेड निघाली. मला याचं कौतुक होतं. पण अशा‌ प्रसंगांनी ती डिस्टर्ब होऊ नये व उगाचच अडचणी येऊ नयेत असं मला वाटत होतं.अर्थातच ती आली नाही. आम्ही दोघे मात्र गेलो. रिता तिला प्रथमच पाहणार होती. पूर्वीची रुबाबदार प्रतिभा आता जाऊन तिच्या जागी हतबल आणि लाचार झालेली प्रतिभा तिला बघावी लागणार होती.
त्या दिवशी आम्ही लवकरचं फ्लाईट पकडून निघालो. ठाणा मेंटल हॉस्पिटल फारच मोठं असेल याची मला कल्पना नव्हती. आम्हाला एका स्त्री नर्सने प्रथम डॉक्टरांच्या केबीन मधे नेलं. तत्पूर्वी आमचं बरचसं चेकींग सिक्युरिटी गार्डकडून झालं. डॉक्टर प्रीतम जैन बोलायला खूपच मृदू आणि थंड होते.

डॉक्टर जैन यांना माझं कोणतंही नातं प्रतिभाशी नसल्याचं मी सांगितलं. आणि थोडक्यात सगळ्याच घटना सांगितल्या. तेव्हा ते म्हणाले," तुमचा संबंध नाही हे खरं. पण तिची मुलगी तुमच्या सोबत राहते आणि उद्या आम्ही मुलगी असूनही काहीच काळजी घेतली नाही,असं व्हायला नको, म्हणून तर तुम्हाला बोलावूना घेतलं. भले त्या मुलीला तिची आई आवडत नसेल. नाहीतर आमच्यावर कायदेशीर ठपका येईल " मी, त्यांना मुलीला आईला भेटण्याची इच्छाच नाही तर आम्ही तरी काय करणार असं सांगितलं. त्यावर ते म्हणाले," तरीही तिला एकदा घेऊन या म्हणजे माझ्यासमोर तिचं स्टेटमेंट होऊन जाईल. मी आणि कल्याणी मॅडम, ज्या सध्या केअरटेकर म्हणून ॲपॉइंट केलेल्या आहेत,त्यांच्या समोरच सगळं होईल. म्हणजे तुम्हाला भविष्यात कोणत्याही कायदेशीर क्लिष्टतेला सामोरं जावं लागणार नाही " असं म्हणून त्यांनी कल्याणी मॅडमना बोलवून आमची ओळख करून दिली. मग शुचीला एकदा घेऊन येण्याचं आश्वासन दिलं. पण तिला वारंवार बोलावू नये हेही सुचवलं. नंतर आम्हाला कल्याणी मॅडम प्रतिभाच्या खोली कडे घेऊन गेल्या.

..... ती खोली म्हणण्यापेक्षा कोठडी म्हंटलं असतं तर जास्त बरं झालं असतं. एका लांबलचक अंधारलेल्या कॉरिडॉर मधून आम्ही जात होतो. जाताना आम्ही मॅडमशी एकही अक्षर बोललो नाही, किंवा कोणतंही मतप्रदर्शन केलं नाही. प्रतिभाची केस बरंच काही शििकवून गेली होती.एका जुनाट निळसर रंगाच्या, बाहेरुन सेफ्टी ग्रिल असलेल्या दरवाज्या समोर आम्ही आलो.रिता बाहेरच थांबलो.तिला आतलं दृश्य सहन झालं नसतं. सिक्युरिटी गार्डने डबल लॉक असलेला दरवाज्या खडखडाट करीत उघडला.तरीही आत एक सेफ्टी ग्रिल होतं. पिवळ्या रंगाचा पण पॉवरफुल बल्ब त्याने लावला.प्रतिभा बैडवर पाठमोरी बसली होती. तिला मॅडमने मृदू आवाजात हाक मारली. " प्रतिभा,अहो मीच आहे.तुमची मैत्रिण कल्याणी. इकडे वळून तर पाहा,कोण आलंय तुम्हाला भेटायला . " त्यावर बऱ्याच वेळाने प्रतिभा ने मान वळवली. तिचा पूर्णपणे काळवंडलेला चेहरा दिसला. तिचा खप्पड चेहरा, खोल गेलेले डोळे, तिच्यावर तुरुंगवासाचा झालेला खोल परिणाम सांगत होते.
......तिने मान एवढ्या सावकाश वळवली की ,काही वेळा करिता मला वाटतं,हिला मान वळवायला कष्ट पडत असतील.माझ्याकडे पाहिल्यावर तिच्या डोळ्यात ओळख दिसली. ती लाचारपणे म्हणाली, " उत्तम, मी तुम्हाला जर काही चुकीचं बोलले असेन तर मला माफ करा.शुचीताला तुम्ही फार छान सांभाळता आहात, फक्त तिला पटवून सांगा, आईने तिच्यासाठी बरंचस सहन केलंय. तिला माफ कर, आणि एकदा भेटायला ये. मग माझा जीव गेला तरी चालेल. आता जगण्यात काहीच अर्थ नाही.‌सांगाल ना ? " तिने आर्जवी स्वरात बोलून माझ्याकडे पाण्हेरलेल्या डोळ्यांनी पाहिले. मी फक्त तसं करण्याचं आश्वासन दिलं. रुची कशी रिॲक्ट होणार हे मला माहीत होतं. मग मी पाठ वळवली डोळ्यातलं पाणी मागे स्वारीत बाहेर पडलो. डॉक्टर जैन त्यांच्या केबीवमधे आमची वाट पाहतच होते. ते म्हणाले," मला वाटतं शुचीची आई आता फार थोड्या दिवसांची मेहमान आहे. लवकर काय ते करा. " मी होकार दिला आणि बाहेर आलो. मनाच्या विचलित अवस्थेत मी बाहेर आलो. हॉस्पिटलच्या बाहेर पडून रिक्षा पाहत होतो.तेवढ्यात तिथे एक पोलिस कार येऊन उभी राहिली. आतून दोनतीन हवालदार आणि इन्स्पेक्टर बाहेर पडले. ते कोणाला तरी बेड्या घातलेल्या अवस्थेत खाली उतरवीत होते. आतून काळसर मुलगा उतरला. त्याने माझ
याकडे पाहिले आणि डोळ्यात ओळख आणीत तो ओरडला, " नमस्कार, राजवाडे साहेब. मी पण ताईलाच भेटायला आलोय." मी चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करीत असतानाच तो म्हणाला," मी प्रकाश, प्रतिभाचा भाऊ. " मला तो " चांगलाच " आठवला आणि आवाजात फारशी उत्सुकता न आणता म्हणालो ," ओळखलं मी. " आणि त्याच्याकडे पाठ वळवून चालू लागलो. तो विचित्र नजरेने माझ्याकडे पा तर असणार,पण मला त्याची पर्वा नव्हती. रिक्षा मिळाली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.मला तो सुरुवातीला ही आवडला नाही आणि आता तर मुळीच नाही.
मी आता सगळंच मागे टाकायला पाहत होतो. तो तो भूतकाळ पुन्हा पुन्हा पुढे यैऊन उभा राहत होता.घरी पोहोचलो, पण शुचीताशी कसं बोलायचं कळेना. माझं गप्प गप्प राहणं रिताला आणि शुचीलाही परवडेना. जेवणं फारच शांततेत झाली. बिछान्यावर पडल्यावर रिछाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला,पण तिने हात झटकून टाकला आणि गुश्शातच म्हणाली," एवढं अगदी काय मनाविरुद्ध घडलंय सांगायचं पण नाही.तुम्ही मी बरोबर असूनही काहीच सांगितलं नाही. मी नसते आले बरोबर तरी चाललं असतं." मग मी तिला अथपासून ईतिपर्यंत सांगून टाकलं.थोडावेळ जाऊन देऊन म्हणालो," तूच शुचीला समजावं म्हणजे प्रॉब्लेम एकदाचा संपेल. दुसरी कामं तरी होतील. " लवकरच आम्ही झोपी गेलो. चार दिवस उलटले.अजूनही शुचीला सांगणं जमलं नाही
एक दिवस मीच तिला कॉलेज यधून आणायला म्हणून गेलो आणि मधेच कॉफी पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो. मग मी तिला सगळं सांगून टाकलं. तिचा पारा चढेल असं मला वाटलं होतं. पण ती शांतपणे आपण प्रतिभाला भेटायला जाऊ असं म्हणाली. आणि फायनल करून येऊ. माझा ताण उतरला होता.. रिताला सांगितल्यावर तिने समाधानाचा सुस्कारा सोडला.
मात्र डॉक्टर जैन यांना संपर्क करावा असं मला वाटेना. का कोण जाणे माझ्यासाठी तरी प्रतिभा हा चॅप्टर बंद झाला होता. आणि आता मला तिच्या आठवणी नकोशा वाटत होत्या. पण बराच वेळ विचार केल्यावर लक्षात आलं की मी तिची जितीजागती निशाणी माझ्या बरोबर ठेवल्याने मी प्रतिभाला झटकून टाकू शकत नव्हतो. भले शुचिताला प्रतिमा आवडत असो का नसो. लवकरच कामाच्या धबडग्यात मी हे सगळं विसरुन ही गेली.
एक दिवस मात्र रिताने मला आठवण दिली आणि मी या बाबतीत मी लवकर काय ते करावं म्हणजे एकदा तुटका कायमचा तोडता येईल. म्हणजे आपण आपलं आयुष्य जगू शकू. त्यांच्या फोनची वाट न बघता आपणच त्यांना येत असल्याचा फोन करावा हे बरं. मलाही ते पटलं.पण मात्र वाटलं आपण फोन न करता गेलो तरी हरकत नाही असं मला वाटलं. आणि मी रितालाही बरोबर येण्याचं सुचवलं. म्हणजे ती शुचिताला सांभाळेल. पण तिने नकार दिला. मग मी आमचं दोघांचं बुकिंग करुन निघालो.

साधारण सकाळी अकरा वाजता आम्ही दोघे ठाणा मेंटल हॉस्पिटल मधे पोहोचलो. डॉक्टर जैन आणि कल्याणी मॅडम त्यांच्या केबिनमध्ये नव्हते.पण पंधरावीस मिनिटांत ते दोघे आले. त्यांचे चेहरे तणावाखाली वाटले. आल्या बरोबर त्यांनी आम्हा दोघांना बोलावलं. थोडा वेळ गेल्यावर ते म्हणाले," मि. राजवाडे , आपल्या मधे टेलीपथी झाली की काय कळत नाही. प्रतिभाची तब्येत तासाभरात पूर्वीच बिघडली. त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्या गेल्या . मी तुम्हालाच फोन करणार होतो. पण तुम्ही आधीच आलात, हे बरं झालं. " मग ते शुचीता कडे‌ वळून म्हणाले ,," बाळ शुची तुझ्या आईला आम्ही वाचवू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ कर." मग ते कल्याणी मॅडम कडे वळून म्हणाले," या दोघांचं स्टेटमेंट तयार करा." मग थोडा विचार करून म्हणाले," शुचिताला आईचं दर्शन घेऊ द्या. मॅडम यांना ओटी मधे घेऊन जा. " मग आम्ही ओटीकडे निघालो. मला जरा काळजी वाटली. शुची कशी रिॲक्ट होईल. कारण तिने माझा हात त घट्ट धरला होता.ती थोडी थरथरत होती. मी तिच्या दुसऱ्या खांद्यावर हात ठेवून मी सांभाळीन तुला, अजिबात घाबरू नकोस.तुला पाहिजे तर तू येणार नाहीस,असं सांगतो मी त्यांना.त्यावर ती म्हणाली," नको मी सहन करीन. फक्त तुम्ही माझ्या जवळ थांबा."
ओटीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत मधे लख्ख प्रकाश होता. आम्ही दरवाजा ढकलून आत शिरलो. ऑपरेशन टेबलवर प्रतिभाचा मृतदेह ठेवला होता. मी शुचीला भीती वाटेल म्हणून थोडी मागे ठेवून पुढे झालो. झगझगीत प्रकाशात प्रतिभाचा आक्रसलेला चेहरा मला बघवेना.कारण मी तिला जिवंत पाहिली होती.तिचे दृष्टिहीन निस्तेज डोळे मृत्यूने आपले काम चोख बजावल्याचे दाखवीत होते.
शुचीची प्रतिक्रिया काहीच नव्हती.जणू आपण एखाद्या नवख्या माणसाला पाहत आहोत असे भाव तिच्या तोंडावर होते.कल्याणी मॅडमला तिची कोरडी रिॲक्शन पाहून आश्चर्य वाटल्या सारख़े दिसले.पण त्या काहीच बोलल्या नाहीत. आम्ही फार वेळ न रेंगाळता बाहेर पडलो. शुचीचे तळहात मात्र दमट लागत होते. आम्हीं डॉक्टरांच्या केबीन मधे आलो. मॅडमनी आमचं स्टेटमेंट तयार करायला सुरुवात केली. काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली.काही बाबतीत त्या फार खोलात शिरत होत्या. आम्हाला ते आवडलं नाही. पण तसं न दाखवता आम्ही त्या प्रश्नांना बगल दिली.‌कारण प्रतिभा आता जिवंत नव्हती. तसंच शुचीचे वडील राजेश हे ही जिवंत नव्हते. त्यांचे प्रश्न राजेश प्रतिभा आणि प्रतिमा नारायण यांच्या संबंधांबद्दल होते. त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असेलही . पण आता तो आमचा भूतकाळ होता. आणि त्यातून कुठलाही धडा घेण्यासारखा नव्हता. मला शुचीला सरळपणे आणि मुक्त पुणे जगू द्यायचं होतं. भूतकाळातील कोणताही ताण घेऊन तिला फायदा नव्हता. तुम्ही म्हणाल,हे मी कोण ठरवणारा. पण शुचीची पूर्ण जबाबदारी माझी आणि माझ्या बायकोची होती. मॅडमची चूक नव्हती. कारण उगाच पोलिसांचं झंझट नको म्हणून त्या प्रयत्न करीत होत्या. लवकरच पुढच्या औपचारिकता संपल्या तेव्हा डॉक्टरांनी शुचीला बाहेर बसायला सांगितलं. ती बाहेर गेल्यावर मला विचारलं
" यांचे पुढचे संस्कार तुम्ही करणार का ?" असं विचारल्यावर मी थोडा विचारात पडलेला पाहून ते म्हणाले," हे पाहा तुम्ही नाही म्हणालात तरी हरकत नाही, फक्त एकदा शुचिताला आणि तुमच्या मिसेस ना विचारुन घ्या. तसंही हॉस्पिटल
ॲथॉरिटीज बेवारशी म्हणून सगळं करतीलच. "
मी जड अंतःकरणाने बाहेर आलो. आता मात्र शची रडत होती मी तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत तिला समजावलं." आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात बाळ. तुला बरं वाटणार असेल तर आपण तिचे अंत्यसंस्कार करु. माझी तयारी आहे बॉडी ताब्यात घेऊन आपण घरी जाऊ किंवा मी रिटाला इथे बोलावून घेतो आणि आपण ते संस्कार इथेच पूर्ण करुन घरी जाऊ. मला तरी आपण इथेच संस्कार पूर्ण करावेत असं वाटतं. " त्यावर तिने होकार भरला. मी रिटाला फोन केला. तिने थोडी खळखळ केली,पण शुचीच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे ,हे मी समजावल्यावर ती तयार झाली. आम्ही आमचा निर्णय डॉक्टरांना सांगितला. संध्याकाळ होत होती .आम्ही हॉटेल वर परत गेलो. जेवायची कोणाचीच इच्छा नव्हती. रात्री दहाच्या सुमारास रिटा आली. आम्ही लगेचच हॉस्पिटल मधे गेलो. पोलिसांच्या फॉर्म्यालिटीज चालू होत्या. डॉक्टर तिथेच असल्याने त्या अर्ध्या तासात संपल्या.
पुढची सगळी व्यवस्था हॉस्पिटल स्टाफने मनापासून केली.आपण उगाचच त्यांच्या बद्दल गैरसमज धरुन असतो. असं मला वाटतं.जवळच्याच विद्युत दाहिनीत प्रतिभाला अग्नी दिला. शेवटचा नमस्कार करुन आम्ही हॉटेल वर पोहोंचलो.झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता. एक वाजून गेला होता.
सकाळचं दहाचं फ्लाईट पकडून आम्ही बंगलोरला पोहोचलो.
......... अशीच पाचसहा वर्षे लोटली . काहीच घडलं नाही. शुचिताचं शिक्षण पूर्ण झालं. तिला नोकरी लागली. माझ्या मुलांचीही शिक्षणं पूर्ण होते त्यांच्या मार्गावर आली. मध्यंतरी शुचिताला एक मुलगा आवडला होता.म्हणून आम्ही मुलाला घरी बोलावलं. मुलगा दिसायला गोरा वगैरे होता. नोकरी पण चांगली होती . परंतू ख्रिश्चन होता, म्हणून आम्ही नकार दिला. तो भेटला तेंव्हा म्हणाला," माझी आई मराठी आहे. वडील ख्रिस्ती असले तरी सगळ्या हिंदू चालीरातीच आम्ही पाळतो. शुचिताला काहीच त्रास होणार नाही. पण आम्हाला भरंवसा वाटला नाही. शुचिताला समजावून सांगितलं . तुझ्या आईने लव्ह मॅरेज केलं. फारसा चांगला अनुभव आला नाही. तुझ्या समोरच उदाहरण आहे. उगाचच घटनांची पुनरावृत्ती व्हायला नको. ती थोडी नाखूष झाली. पण रिटाने तिला समजावून सांगितले. " आम्ही वाटेल त्याच्या हातात तुझा हात देणार नाही. आमच्या मुलीला त्रास झालेला आम्हाला अजिबात आवडणार नाही. आपण एखाद्या चांगल्या विवाह संस्थेत नाव नोंदवून, म्हणजे सगळं ठीक होईल.
पुढील वर्षातच चांगलं स्थळ मिळालं. त्याचं लग्न लावून दिलं. अशा रितीने या ज्या आयुष्यातला "प्रतिभा" हा चॅप्टर संपला. पुढचं शुचिताचं आणि आमचंही आयुष्य चांगलं जाऊ लागलं.

(संपूर्ण)
अरुण कोर्डे
©®
9004808486

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users