"Sleepless In Seattle"
सॅम बाल्डविन (टॉम हँक्स) हा एक मध्यमवयीन पुरुष आपल्या पत्नीला गमावल्यानंतर आपल्या ७–८ वर्षांचा मुलगा जोनाहसोबत सिएटलला स्थलांतर करतो. पत्नीच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असतानाही सॅम अजूनही तिच्या आठवणीत हरवलेला असतो. आपल्या वडिलांसाठी नवी पत्नी आणि स्वतःसाठी नवी आई शोधण्याच्या उद्देशाने जोनाह एका रेडिओ शोला फोन करतो. त्या शोचं नाव असतं “Sleepless in Seattle”.
जोनाह रेडिओवर बोलत असतानाच तो शो बाल्टिमोरमध्ये राहणारी रिपोर्टर अॅनी रीड ऐकत असते. (अॅनीचं वॉल्टर नावाच्या व्यक्तीसोबत नातं सुरू असतं.) सॅमच्या आवाजातली वेदना आणि त्याचं आपल्या दिवंगत पत्नीसाठीचं खोल प्रेम अॅनीला आतून हेलावून टाकतं.
याच दरम्यान अॅनी आणि तिचा प्रियकर वॉल्टर यांनी आपला साखरपुडा कुटुंबासमोर जाहीर केलेला असतो. हे नातं वरवर पाहता अतिशय सुरक्षित आणि समाजमान्य असलं, तरी त्यात काहीतरी कमी आहे, हे अॅनीच्या स्क्रीन प्रेझेन्समधून आपल्याला सतत जाणवत राहतं. पण ती, ही भावना कधीही थेट शब्दांत किंवा संवादांतून व्यक्त करत नाही.
रेडिओ शो ऐकल्यानंतर आणि An Affair to Remember हा सिनेमा पाहिल्यानंतर भावनेच्या भरात अॅनी सॅमसाठी एक पत्र लिहिते. त्या पत्रात ती व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या टेरेसवर भेटण्याची इच्छा व्यक्त करते; परंतु ते पत्र ती स्वतः कधीच पोस्ट करत नाही. मात्र सॅम आणि त्या शोबद्दल अॅनी आपली रिपोर्टर मैत्रीण बेकीसोबत वारंवार चर्चा करत असते. त्यामुळे बेकी ते पत्र परस्पर सॅमला पाठवते. (त्याच वेळी ती अॅनीला न्यू यॉर्कमध्ये एखाद्या असाइनमेंटसाठी पाठवण्याचंही ठरवते.)
इकडे सॅम आपली सहकारी व्हिक्टोरियाला डेट करायला लागतो. पण सॅमचा मुलगा जोनाहला ती अजिबात पसंत नसते, विशेषतः तिचं हसणं. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच सॅमचे मित्र त्याला दुसरं लग्न करण्याबाबत किंवा किमान डेटिंग सुरू करण्याबाबत सतत सुचवत असतात. कदाचित त्याच सामाजिक दबावाखाली सॅम व्हिक्टोरियाला डेट करायला लागतो; मात्र त्यात त्याचं मन अजिबात गुंतलेलं नसतं.
जेव्हा जोनाहला अॅनीचं न्यू यॉर्कमध्ये एम्पायर स्टेट बिल्डिंगवर भेटण्याबाबतचं पत्र मिळतं, तेव्हा तो सॅमला (आपल्या वडिलांना) एकदा तरी भेटायला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण सॅम या विषयावर फारसा उत्सुक किंवा सकारात्मक नसतो. जोनाहची छोटी मैत्रीण जेसिका जिची आई ट्रॅव्हल एजंट असते ती जोनाहला सांगते की तू अॅनीच्या पत्राला उत्तर दे आणि तिला सांग की आपण न्यू यॉर्कमध्ये भेटू.
दरम्यान, एकदा व्हिक्टोरियाला एअरपोर्टवर सोडायला गेलेला सॅम, चुकून एअरपोर्टमधून बाहेर पडत असलेल्या अॅनीला पाहतो. (अॅनी सॅम आणि जोनाहचा माग काढत सिएटलला पोहोचलेली असते.) तिला पाहताच सॅमला एक विचित्र ‘sixth sense’ जाणवतो आणि तो क्षणभर मंत्रमुग्ध होतो. नंतर अॅनी लपून सॅम, त्याची बहीण सुझी आणि जोनाहला बीचवर खेळताना पाहते. सुझीच त्याची गर्लफ्रेंड असावी असा गैरसमज करून ती स्वतःची ही ट्रिप वाया गेली असं स्वतःला समजते.
हे सगळं बघणारी रस्त्याच्या पलीकडे उभी असलेली अॅनी एक मोठा ट्रक हॉर्न वाजवत येताना जवळजवळ धडकण्याच्या बेतात असते. तेव्हा सॅम तिला पाहतो आणि ओळखतो की एअरपोर्टवर पाहिलेली स्त्री हीच आहे.
दरम्यान, योगायोगाने अॅनीचा प्रियकर वॉल्टरदेखील काही कामानिमित्त व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी न्यू यॉर्कमध्ये असतो. आपल्याला जाणवलेलं सगळं ‘वेगळेपण’ बाजूला ठेवून आणि “वॉल्टरपेक्षा योग्य आपल्यासाठी कोणी नाही” असं स्वतःला समजावत अॅनी न्यू यॉर्कला त्याला भेटायला जाते.
इकडे जोनाहने त्याची छोटी मैत्रीण जेसिकाच्या मदतीने न्यू यॉर्कची तिकिटं बुक केलेली असतात आणि तो तिथे पोहोचतो. जेव्हा सॅमला लक्षात येतं की जोनाह घरी नाही, तेव्हा तो व्हिक्टोरियासोबतची व्हॅलेन्टाईन डेची डेट रद्द करतो आणि थेट न्यू यॉर्कला निघतो.
त्याच वेळी अॅनी वॉल्टरसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी भेटलेली असते आणि ती त्याला आपल्या मनातलं सगळं स्पष्टपणे सांगते. वॉल्टर मोठ्या मनाने त्यांचा साखरपुडा ही चूक होती हे मान्य करतो आणि ते दोघं तिथेच आपलं नातं संपवतात.
अॅनी धावत एम्पायर स्टेट बिल्डिंगकडे जाते. त्याआधी जोनाह तिथे पोहोचलेला असतो, पण अॅनी न आल्यामुळे तो उदास होतो आणि आपली बॅग तिथेच विसरून निघून जातो. तोपर्यंत सॅम तिथे येऊन जोनाहला आधीच घेऊन गेलेला असतो. उशिरा सिक्युरिटीसोबत टेरेसवर पोहोचलेली अॅनी तिथे कोणीच नाही हे पाहून प्रचंड निराश होते. मात्र तिला जोनाहची बॅग दिसते आणि ती ओळखते की ही कदाचित त्याचीच असावी.
त्याच क्षणी सॅम आणि जोनाह ती विसरलेली बॅग घ्यायला तिथे परत येतात. अखेर तिघांची एकमेकांशी भेट होते आणि चित्रपट संपतो.
**************************************************************
या चित्रपटात अॅनीचं पात्र विशेष आहे कारण ती आधीच एका सुरक्षित पण भावनाशून्य नात्यात अडकलेली आहे. सॅमचा आवाज, त्यातील प्रामाणिकपणा आणि वेदना तिच्या मनात प्रश्न निर्माण करतात “आपण आयुष्यात जे आहे त्यात खरंच समाधानी आहोत का?” या प्रश्नाचं उत्तर शोधताना ती स्वतःच्या भावना, भीती आणि सामाजिक अपेक्षांशी झुंज देते. या सिनेमात प्रेम प्रत्यक्ष भेटीपेक्षा कल्पनेत, संवादात आणि प्रतीक्षेत अधिक खोल होत जातं. सॅम आणि अॅनी एकमेकांना कधीच भेटत नाहीत, पण तरीही प्रेक्षकांना त्यांचं नातं खरं वाटतं.
हा सिनेमा आपल्याला सांगतो की प्रेम नेहमीच तार्किक नसतं. कधी कधी ते धाडस मागतं, सुरक्षिततेतून बाहेर पडण्याचं, स्वतःच्या मनावर विश्वास ठेवण्याचं धाडस. समाजाच्या दृष्टिकोनातून परफेक्ट असलेल्या पार्टनर पेक्षा मनाचे कनेक्शन किती महत्वाचं आहे हे सांगतो .
नॅरा एफ्रॉनची पटकथा आणि दिग्दर्शन हि प्रेमकथा गोडसर वाटत नाही; ती आपल्याला मानव्यसुलभ आणि रिलेटिव्ह वाटते.
मी खूप पूर्वी कदाचित २००४-५ मध्ये हा सिनेमा पहिला तेव्हाही या सिनेमाने मनात घर केले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा हा सिनेमा पहिला तेव्हाही भावना काही वेगळ्या नव्हत्या.
आपण फिल गुड सिनेमांचा राजा म्हणून या सिनेमाकडे बघू शकतो . रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणताही ताण न घेता, कामाचा दिवसभराचा व्याप आटोपल्यावर रात्री छान आणि सुखांत झोप यावी , गोड़ स्वप्न पडावीत अशी इच्छा असेल तर हा सिनेमा नक्की बघा .
*****************************************************************
