३
मागच्या भागाकडे जाण्यासाठी इथे टिचकी मारा.
लोकेंद्रनाथांची लगबग सुरू होती.
अभिरूपाची आई त्यांच्यावर चिडली होती. पाहुणे शाकाहारी कि मांसाहारी हेच विचारलेलं नव्हतं नवरोबांनी.
ही काही पहिली वेळ नव्हती धांदरटपणाची. अशा वेळी काय करावं हे पण सांगत नाही हा माणूस.
आणि सांगूनही फायदा नाही.
ऐन वेळेला काय करणार ?
आणि त्यातच घाईघाईत स्वैंपाकघरात येऊन ते विचारत होते,
"तुमी कि करते जाछो ?"
" एता तोमीके कि करते हाबे ताओ हमे बोले ना . जिग्गाशा कि करार कि हालो ? "
( " काय काय करताय तुम्ही ?"
- काय करू ते पण सांगत नाही . विचारायला काय झालं होतं ?" )
यावर दोघांचा नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला.
" नाही विचारलं चारू, अरे पण काही तरी करा ना ?"
" काय करू ? एक तर माहिती नाही ते व्हेज आहेत कि नॉन व्हेज ? व्हेज करावं आणि ते पट्टीचे नॉन व्हेज असले तर म्हणतील, बंगाल मधे पाहुण्यांना घासपूस खायला घालतात. स्वत: चांगलं खातात. आणि व्हेज असले आणि नॉन व्हेज बनवलं कि म्हणणार "
"काय म्हणणार ?"
" तुम्हीच बघा ना. दोन्हीकडून बदनामी कुणाची ? माझी ना ?"
लोकेंद्रनाथ मग बाहेर निघून गेले.
एव्हढ्यात ठाकूमा आल्या.
"चारूलता, दोन्ही बनव "
" मा. दोन्ही ? किती वेळ लागेल ?"
"होईल गं. सुरूवात तर कर "
"पण बनवायचं काय ?"
अभिरूपा ऐकतच होती.
"मां, आमिकि तोमाके बोलबो ? शोनो .
माशेर झोल. मिश्टी दोई, आलुर दोम, कोशा मांगशो, मिश्टी पोलाव
मिश्ती संदेश "
" अॅ हॅ हॅ हॅ , कोशा मंगशो ? तुमी कि मजा करछो ? तुमी कि जानो कतखन लागबे ?"
(" आई मी सांगू का ? मटन कोशा, मच्छी, दही , दम आलू आणि गोड पुलाव आणि मिठाई "
" अॅ हॅ हॅ ! मटन कोशा ? चेष्टा करतेस का गं ? किती वेळ लागतो माहितीय ना ?"
आई ला खूपच ताण आला होता.
अभिरूपा हसत म्हणाली " कोशा मांगशो मी करते, तू बाकीचं बघ "
" राहू दे, महत्वाचे पाहुणे आहेत "
"अगं मां, विश्वास नाही का माझ्यावर ? मला येत नाही का ?"
" येतं ना , पण ते लिंबू टिंबू जेवायला असतात तेव्हां ठीक. एव्हढ्या लोकांचा स्वयंपाक वेगळा, त्याचा अंदाज येणार आहे का ?"
" मां, करते गं, तसं पण मच्छी आहेच ना ? तुला पाहीजे तसं नाही झालं तर नको वाढूस "
"अगं पण दोन वाजता येणार आहेत ते"
"मां आत्ताशी आठ वाजलेत "
एव्हढं बोलून ती बाहेर पण पडली आणि तासात आली पण.
आईने आश्चर्याने तिच्याकडं पाहीलं.
"मिळालं पण इतक्या सकाळी ?"
" हो मंग, तुझ्या लेकीला काय समजलीस ?"
" अगं पण कुणी दिलं ?"
" कोण देणार ? रस्त्याच्या पलिकडं बाबू दोखन बंद करून झोपलेला होता. त्याला उठवलं. बाबाचं नाव सांगितल्यावर त्याची झोपच उडाली. घाईघाईत त्याने सगळा कार्यक्रम उरकला आणि दिलं . तरी तास लागला "
" बाबाचं नाव सांगितलं ?"
"मग ! "
"दही लावलंय का ?"
" हो हो. "
" बघ आंबट आहे का ? नाहीतर मटण पण खराब होईल. "
" अगं बरोब्बर लागलंय. मी एकीकडे कोशाची तयारी करते आणि तुला मदतीला येते "
तिने पटकन दोन किलो मटण मोठ्या परातीत घालून धुवायला घेतलं.
आणताना मांस, हड्डी आणि चरबी सगळं योग्य प्रमाणात आणलंय हे आईनं बघून घेतलं. बाबाचं नाव घेतल्यावर बाबूची काय टाप चरबी जास्त द्यायची ?
भराभरा कांदा सोलायला घेतला. आईलाही कांदा , लसूण आणि आल्याची पेस्ट हवीच होती. मग थोडा जादाचा घेतला.
कांदा लाकडी पोळपाटावर चिरताना डोळ्यातून पाणी येऊ लागलं. पण पातळ चकत्या अगदी निगुतीने कापून झाल्या. कांदा कापून मग हाताने ते काप ढवळले आणि एका भांड्यात कांदा टाकून त्यावर घट्टं दही टाकलं. आता ते मिश्रण ढवळून घ्यायला सुरूवात केली. अंदाज घेऊन मीठ, हळद टाकलं. पुन्हा एका मोठ्या रवीसारख्या उपकरणाने ते फिरवून घेतलं. हे सगळं हाताने ढवळून एकजीव व्हायला चांगलेच कष्ट पडणार होते.
आई का चिडत होती ते कळत होतं.
आजीने बनवून घेतलेला नबाबी गरम मसाला घेतला. त्यावर टाकला. हा मसाला शाही मसाला म्हणून आताशा दुकानात मिळू लागला होता. ब्रिटीश जाताना त्यांना या मसाल्याची सवय झाल्याने हावडा इथे एक मसाल्याचा कारखाना सुरू झालेला होता. तिथून इंग्लंडला पाकीटं आणि बरण्या जात. पण आजीला तयार मसाला आणणे कधीच आवडले नसते. आजी कशाला आईला सुद्धा चालणार नव्हतं ते.
मग खाली बसून हे थोडं थोडं पाट्यावर वरवंट्याने वाटायचं, पाणी घालायचं आणि पातेल्यात टाकायचं असं बराच काळ चाललं. ब्रिटीशांकडून एक यंत्रं गुप्तांनी घेतलं होतं. ते अभिरूपाने पाहिलं होतं. त्याला मिक्सर नाव होतं. खूप मोठं होतं ते. असं छोटंसं असतं तर ? तिला नेहमी वाटायचं.
आता पाटा वरवंट्याचं काम करताना हात भरून आले.
मग सगळं सारखं झाल्याची खात्री झाल्यावर काहीही न सांडता तिने ते एका काचेच्या भांड्यात भरून घेतलं.
मोठ्या पातेल्यात धुऊन घेतलेलं मटण ठेवलेलं होतं. त्यावर हे रसायन तिने अलगद सोडलं. मग हाताने छान पैकी मिसळून घेतलं.
आई मागे येऊन उभी राहिली होती .
"काय गं आई ?"
"मग नको बघायला ?"
"अगं तू तुझ्या वाटेच्या कामात लक्ष दे ना "
आईने एकही सूचना केली नाही म्हणजे सगळं कसं बरोबर झालेलं.
मग त्या बाऊलला फडक्याने घट्ट झाकून घेतलं आणि ते सगळं प्रकरण एका मोठ्या पातेल्यात ठेवलं. त्यात आधीच खडे मीठ घातलेलं होतं.
या पातेल्यालाही फडकं बांधून मग ते एका मडक्यात ठेवलं आणि मडकं रांजणात ठेवलं. त्याच्या भोवती पुन्हा थोडं मीठ आणि बर्फाचा चुरा टाकला. मच्छीमार्केट मुळं बर्फाची फॅक्टरी जवळच होती.
अर्थात रात्रीच लावलं असतं तरी मॅरीनेशनला पूर्ण रात्र आणि अजून काही वेळ लागणार होता. पण मीठ आणि रांजणात मडकं ठेवण्यामुळे आता ते लवकर होणार होतं. तरी चार तास लागणारच होते.
बाबा किती तरी वेळा गोदरेजचा फ्रीज आणू का विचारायचा, पण आजी त्याच्या विरोधात होती.
"आयुष्य कमी होतं त्यानं" ती म्हणायची.
ब्रिटीशांनी बनवलेल्या यंत्रांवर तिचा जराही विश्वास नव्हता.
हे मॅरीनेट ठेवून दिल्यावर तेज पत्ता, लाल मिर्च्या घेतल्या.
"आई लाल मिर्ची कुठून येते गं ?"
" कोल्हापूर वरून "
"म्हणजे महाराष्ट्रातून ना ?"
" हो, का गं ?"
" अगं म्हणजे बाबाचे पाहुणे तिखट खात असतील ना ?"
"असं थोडीच आहे ? लाल मिर्ची तिथे होते म्हणून सगळे तिखटजाळ खात असतील असा काही नियम नाही "
"तू बघच "
"बरं "
वाळलेल्या मिर्च्या आणि दालचिनी काढून ठेवत ती आईकडे बघत हसली.
वेलची , काळे मिरं , हिरव्या मिर्च्या काढून ठेवल्या. लसूण आणि आल्याची पेस्ट बनवली. आईला दिली. थोड्या मोर्च्या आणि लसूण बाजूला ठेवला.
धनेपूड चुलीवरच्या भांड्यात टाकली. त्यात थोडी जिरेपूड टाकली. त्यात काश्मिरी लाल मिर्चपूड टाकली. कपाने अंदाजे पाणी घातलं.
तूप आईला दाखवून मग घ्यावं लागणार होतं. आईने तूपाची बरणी काढली. चमच्यावर घेतलं. त्याचा वास घेतला.
मग मान हलवून बरणी तिला दिली. तिने चमच्याने थोडं तूप घेतलं.
आता घट्टं लावलेलं दही एका वाटीत घेतलं. साखर आणि मीठ काढून ठेवलं. मघाशी चिरलेला शिल्लक कांदा घेतला, या चकत्या बोटाने कुस्करून घेतल्या कि रश्शाचं टेक्श्चर भारी होणार होतं. हिरवी मिर्ची आणि लसूण बारीक कापून घेतला.
हा सगळा मसाला दगडी खलबत्त्यात कुटून घेतला.
आता ती आईला मच्छी बनवायला मदत करू लागली. एकीकडे आजीने पुलावाची तयारी सुरू केली होती.
पण आताच पुलाव नको असं आई म्हणाली.
एकीकडे दम आलू शिजत होताच.
मटणाला वेळ होता तोपर्यंत मिठाई बनवायला घेतली. मच्छीच्या मधे कुणी आलेलं आईला चालत नव्हतं.
आता तिने मोहरीच्या तेलात लसूण आलं पेस्ट , कडीपत्ता हे मिश्रण टाकायला घेतलंच होतं इतक्यात बाबा आले.
"अरे काय करेतस ? त्यांना मोहरीचं तेल नाही चालत "
तरी या वेळी बाबांनी लवकर सांगितलं !
मग मोहरी तेल बाजूला ठेवून तिने करडईचं तेल घेऊन कांदा मसाला गरम करायला सुरूवात केली. त्यात सहा लाल मिर्च्या टाकल्या.
खरं तर बंगाल्यांमधे मटण कोशा म्हणजे खूपच खास डिश होती.
राजे रजवाडे, नबाबांच्या काळात हरणाचं मांस आणून बनवली जाई. त्याला लागणारी मेहनत बघता कुणी आचारीच ते करू जाणे.
ज्या बायकांना बनवायला यायचं त्या सांगायला आढेवेढे घ्यायच्या.
तेलात आधी मिर्ची टाकायची कि आणखी काय टाकायचं याचा क्रम तरी चुकवतील किंवा एखादा जिन्नस सांगायचं विसरतील. तसं मच्छीच्या बाबतीत नव्हतं. अगदी जवळची किंवा उपयोगी पडू शकेल अशी असेलच तर मग साग्रंसंगीत सगळं सांगायचं. जसं मुस्लीम बायका त्या वेळी दालचाची पाककृती सांगताना आढेवेढे घेत तसंच.
आता कढईत कांद्याला चांगला रंग आला होता. मंद सुवास दरवळत होता.
चार तास होत आले होते.
आता पाहुणे यायची वेळ झालीच होती.
तिने रांजणातून मडके काढले. मडक्यातून पातेलं काढलं...
मटण अगदी व्यवस्थित मॅरीनेट झालं होतं. तिने सुस्कारा टाकला.
आता हे शिजायला कमीत कमी दोन तास !
आता वेळेची लढाई होती.
घड्याळात एक वाजला होता. तिने मटण कढईत टाकलं.
कुठल्याही क्षणी पाहुणे येणार होते.
एका कपात गरम पाणी घेऊन तिने सगळं चमच्याने हलवून घ्यायला सुरूवात केली. पंधरा मिनिटं झाली.
अर्धा तास झाला. रंग यायला सुरूवात झाली.
एक तास झाला. खमंग वास सुटायला लागला होता.
दोन वाजले !
बाहेर मोटारीचा आवाज आला !
"बाप रे "
तिने तिलोत्तमेला हाक मारली. एक तास मिळायला हवा होता.
दोन वाजले म्हणजे भूकेची वेळ झालीच होती.
ती वर गेली आणि खिडकीचा पडदा बाजूला करून बघू लागली.
गाडीतून एक तरूण वयाचा इसम उतरत होता.
ती उत्सुकतेने बघत राहिली.
उंचापुरा, रूंद खांदे, व्ही शेप असलेला तो तरूण पाठमोरा उभा होता.
त्याने ढगळ पांढरा शर्ट आणि तशीच ढगळ पॅंट नेसली होती. इन केल्यामुळे रूबाबदार दिसत होता.
तो हळूच वळला. त्याचा गहूवर्णी चेहरा तिच्या नजरेला पडला. त्याने अचानक वर खिडकीकडे बघितलं आणि तिने झटकन पडदा बंद करून घेत छातीवर हात ठेवला. हृदय चांगलंच धडधडत होतं. त्याने बघितलं का आपल्याला ?
ती खाली धावतच सुटली.
तिलोत्तमेला काम दिलं होतं. तिला हाताने ओढत ती म्हणाली
"तुला माहितीय का पाहुणा कसा दिसतो ते ?"
"मला काय माहीत ?"
"अगं अगदी देव आनंद आहे "
" काय ? तुला कसं माहिती दिदी ?"
या प्रश्नावर ती गप्प बसली. मग दोघी हसू लागल्या.
"ए तिलोत्तमे सांगायचं नाही काय कुणाला "
" मग मला एक आणा द्यायचा रोज "
" अगं माझ्याकडे कुठून येणार पैसे ?"
" ते मला नाही माहिती "
"बरं बाई, आता ऐक. एक तासभर काही ना काही कारण काढून जेवायला उशीर कर, काय ?"
" बरं समजलं "
काय नाव सांगितलं होतं ?
महात्मा कि काही तरी . महात्मा गांधी का ?
तिचं तिलाच हसू आलं. काहीही काय.
पातेल्यात मोठ्या लाकडी उलथण्याने सगळं हलवून घेताना तिची घालमेल चालू होती.
इतक्यात बाबाची हाक आली.
" रूपा , बेटा ये इकडं "
तिला काहीच सुचेना. अजून थोडा वेळ जाऊ द्या ना बाबा.
शिवाय त्या देखण्या तरूणाच्या पुढ्यात जायची भीती पण वाटत होती. जर चोरटे भाव त्याने पकडले तर ?
शब्दच फुटले नाहीत तर ? त्याच्य़ाकडे न राहवून सारखी सारखी नजर गेली तर ?
आई ने तिला हलवलं "अगं बाबा काय म्हणतात ? जा ना !"
" आई तू बघशील का "
"तरी म्हटलेलं कि कोशाला वेळ लागतो"
म्हणत आईने मटण कोशाचा तबा घेतला.
ती स्वयंपाकघरातून व्हरांड्यात आली.
चौकातून पुढच्या व्हरांड्यात . बाबाच्या खोलीवरून पुढेच दिवाणखाना होता.
तिने थरथरता पावलाने तिथं प्रवेश केला.
" रूपा, हे माहिती आहेत ना कोण ते "
ती मान खाली घालून उभी राहिली.
"अगं नाव सांगितलेलं ना तुला ?"
"अं हं हं, महात्मा. महात्मा गांधी "
यावर त्याने मान उचलून तिच्याकडे पाहीलं.
तिला आता घामच फुटायचा राहिला होता.
"अगं महात्मा गांधी काय ? हे हर्षवर्धन !
हर्षवर्धन महात्मे !"
तिने चोरट्या नजरेने हर्षवर्धन कडे पाहीलं.
पण तो तिला हसत नव्हता. ना तिला पाहून इतरांप्रमाणे घायाळ झालेला होता.
बस तो खूप शांत होता.
आणि त्याच्या किती तरी पटीने देखणा !!
**************************************************
मग बाबांनी तिला समजावून सांगितलं.
हर्षवर्धनला बंगाली येत नाही.
ती मनात म्हणाली "म्हणजे या ठोंब्याला काही समजलेलं नाही तर "
आता याला न समजणार्या भाषेत तिला याच्याबद्दल काहीही बोलता येणार होतं. त्याला काही ते समजणार नव्हतं.
ठोंब्याने तिला पाहून ना डोळे विस्फारले, ना कसले भाव दाखवले.
"हे बघ बेटा, यांना महत्वाचं काही असेल तेव्हां हिंदीत समजावून सांगायचं. तुला माझ्याबरोबर जीएमकडे यावं लागेल आणि अजून काही लोकं आहेत. "
" कोण बाबा ?"
" सांगेन ना. जेवणाचं कुठपर्यंत आलंय ?"
"तयार आहे बाबा "
"भालो ! चला मग वाढायला घ्या सगळे . त्यांना सांग हात पाय धुवून घ्यायला "
तिला काय करावं समजेना. बाबाला प्लॅन मधे सामील करून घेणं शक्यच नव्हतं.
तिने मग हिंदीत हर्षवर्धन ला सांगितलं हात पाय धुवून घ्यायला.
मागच्या अंगणात मोरी होती ती दाखवली.
"थॅंक यू" म्हणताना तो हसला.
"चला हसू तर येतंय" ती मनात म्हणाली.
"मुझे सिर्फ हर्ष कहो , हर्षवर्धन नही "
तिने फक्त मान हलवली.
" आ हा हा हा, मुझे सिर्फ हर्ष कहो, हर्षवर्धन नही, आणि बाकीचे काय म्हणतील मला ? वा रे वा । चांगला फास्ट निघाला कि हा "
अर्थातच हे ही मनातच.
"आपको भूख लगी होगी ना ?"
"अरे नही, मैने कंपनी मे नाश्ता किया था, उसके बाद आराम. तो अभी भूख नही है "
"तो फिर ?"
" जी नही, खाना तो खाऊंगा , बस एक बिनती है, थोडी देरी से लाया जाये तो बडी मेहरबानी होगी "
" मै कैसे देर कर सकती हूं ? बाबा को पसंद नही आयेगा . आपही कह दो ना बाबा से"
" अच्छा ! कोशीश करता हू "
तिने मग त्याचा निरोप घेतला. वळण घेऊन व्हरांड्यात आली आणि स्वत:भोवती गिरकी घेत आनंदाने चित्कारली.
************************************************************
जेवणं चालू असताना अभिरूपा डायनिंग रूमच्या बाहेर कान देऊन होती.
आई सांगत होती " माछ ?"
बाबा म्हणाले " माछ म्हणजे तुमच्याकडे मच्छी "
आणि त्याने मटण कोशाची चव घेतली. त्याचा चेहरा बघूनच आईने ओळखलं.
ती बाबाकडे वळून म्हणाली
"याला सांगा ना आपल्या अभिरूपाने बनवलंय "
बाबाचं लक्ष नव्हतं.
आईने ढोसल्यावर मग तिने पुन्हा सांगितलं
" हा हा. अरे हर्ष , तुला माहितीय का, हे मटण कोशा माझ्या मुलीने बनवलंय "
"अप्रतिम बनवलंय "
"घ्या ना अजून " आई बंगालीत बोलली.
मग आईने बनवलेली मच्छी बाजूलाच राहिली.
मटण कोशा फस्तही झालं.
जी डिश नाही चांगली झाली तर आपण खाऊ म्हणून ठरलेलं तीच एक नंबर ठरली होती.
आई बाहेर यायच्य़ा आत अभिरूपा धावत स्वयंपाक घरात आली.
तिकडे जेवणं झाल्यावर बाबा आणि हर्षवर्धन काही तरी गंभीर बोलत होते.
जणू काही कसलं तरी गुपीत असावं.
खांबाआडून दोघांच्या चेहर्यावरचे भाव दिसत होते.
बाबा अशा प्रकारे फक्त काहीच लोकांशी बोलायचे..
कोण बरं ?
ते चंदनेश्वरच्या देवळात राहणारे संन्यासी.
हर्षवर्धन तर कंपनीच्या कामाला आलेत ना ?
बाबा असं का बोलत असतील ?
ती विचार करत बाहेर पडली. जाताना ओसरीवर ठेवलेली हर्षवर्धनची सूटकेस तिने पाहिली.
त्याच्या बाजूला एक सीलबंद लखोटा होता.
आणि त्यावर...
शंकाच नको.
ते चिन्ह आझाद हिंद सेनेचं होतं !
पुढच्या भागाकडे जाण्यासाठी इथे टिचकी मारा.
अरे वा. आज सगळे भाग वाचून
अरे वा. आज सगळे भाग वाचून काढेन.
अजून पूर्ण नाही झाली
अजून पूर्ण नाही झाली
किती बारकावे आहेत
किती बारकावे आहेत स्वयंपाकाचे.. जणू समोर बनतेय सगळे असे वाटले.
>>>>अजून पूर्ण नाही झाली
>>>>अजून पूर्ण नाही झाली Happy
ओके ओके.
किती बारकावे आहेत स्वयंपाकाचे
किती बारकावे आहेत स्वयंपाकाचे.. जणू समोर बनतेय सगळे असे वाटले. +१
पाकृच्या वर्णनानेच पोट भरले.
फटाफट भाग येत आहेत ही ह्या कथेची अजुन एक छान जमेची बाजू.
खूप सुंदर आहे लिखाण. पुढच्या
खूप सुंदर आहे लिखाण. पुढच्या भागाची वाट पाहते आहे.
स्वतंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी
स्वतंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी किती छान वाटतेय.
खुप छान लिखाण... पुभाप्र!
खुप छान लिखाण... पुभाप्र!
पाककृती वर्णन अफाट डिटेलिंग
पाककृती वर्णन अफाट डिटेलिंग सहित
सोबत तो गोड बंगाली भाषा
मजा येतेय
खूब भालो..
खूब भालो..
धनवन्ती, सामो, अनि, स्नेहा,
धनवन्ती, सामो, अनि, स्नेहा, सामो, आबा , झकासराव, अनिरुद्ध धन्यवाद आपले सर्वांचे.
खरंच ! तुमच्या प्रोत्साहनामुळे पुढे लिहीण्याचा उत्साह टिकून राहतो.
कोशा मांगशो ची पाकृ पोस्ट करायच्या आधी एडीट केली. भावनेच्या भरात पूर्णच दिली होती.
मी स्वतः व्हेज आहे पण ही पाकृ (माबोवर आधीपासून नसेल तर) पोस्ट करीन.