पाककृती स्पर्धा ३ : फळे वापरून तिखट मिठाचा पदार्थ - पहाडी पेरू चाट

Submitted by जाई. on 29 August, 2025 - 09:29

पहाडी पेरू चाट

एका रिलमधे ही रेसिपी बघितली. मूळ रेसिपित संत्र आहे . पण आता संत्री उपलब्ध नाहीत . त्याला पर्याय म्हणून घरात असलेला पेरू वापरला. संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट, हेल्दी आणि चटपटीत प्रकार आहे .

साहित्य :

एका मोठ्या पेरूच्या सोललेल्या फोडी, ४/५ लसूण पाकळ्या,
१ हिरवी मिरची, १ चमचा जिरे,
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर ,
चवीनुसार लाल तिखट, मीठ , साखर

कृती:

लसूण पाकळ्या, हिरवी मिरची , जिरे, कोथिंबीर या सर्वाच खलबत्त्यात छान वाटण करा. सोललेल्या पेरूच्या फोडींमध्ये वाटण, थोडे लाल तिखट, चवीनुसार मीठ व साखर घालून हलक्या हाताने कालवून घ्या. पहाडी पेरू चाट तयार आहे....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
संत्री पेक्षा पेरू इंटरेस्टिंग वाटले मला

थँक्स अमित, ममोताई, तिता, रुन्मेश

तिता, मी एक मोठा पेरू सोलून बिया काढून घेतला होता . बदल केला आहे वर आता .

संत्री चांगली लागतील पण किचकट काम आहे. पेरू सोपा आणि चवीलाही छान. केळे, हिरवे सफरचंद, pear, पपई पण छान लागतील. उन्हाळ्यात कलिंगड किंवा melon ही आवडेल.

गेल्या गणपतीत अशीच पेरूच्या लोणच्याची, फोडणीवर घालून शिजवलेल्या, बडिशेप घातलेल्या लोणच्याची कॄती आलेली. मी उत्साहात करुन बघितली. पण अगदी पेरूची पार वाट लागली. पहिल्या दिवशी केलंय म्हणून खाल्लं. मग दुसर्‍या दिवशी माझ्या ही घशाखाली उतरेना.
कदाचित बडिशेपेमुळे असेल, पेरुन बिया जास्त असल्याने असेल, किंवा मला जमलं नसेल. पण तो वासच नाही आवडला.
तर लोणचं केलंत तर थोडं करुन आवडतं आहे का बघुन मग परत जास्त करा. हा वैधानिक इशारा देतोय. Happy

जाई
छान आहे पाकृ. करून बघणार.
पेरू आवडता पण माझे त्यात फार नखरे असतात. जराही पिकायला लागला की मी बघत पण नाही.
कच्च्या पेरूचे करून बघीन

सर्वाना धन्यवाद.
संत्र्याचा मोसम आला की संत्रे वापरुन करुन पाहीन.

स्वाती , पुदीनाची आयडीया चांगली आहे. पुढच्या वेळी करुन बघेन. अमित, तुझी पोस्ट वाचून लोणचे नाही करणार Lol

सिमरन , ऋतुराज. , करुन पाहा आणि कळवा.

रच्याकने, धागा ऊघडला तरच फोटो दिसतो. मेन बोर्डावर फोटो दिसत नाही. काय कारण असावे?

हे माझ्या सासरी करतात त्या किम्ब सारखे आहे. त्यात पुदिना घालतात, आणि आमच्या घरी लसून घालत नाहीत. संत्री आणि इडलिंबू यांच्या मधलं फळं आहे किम्ब. हिमाचली लोक त्याला खट्टा म्हणतात. त्याची करतात अशी चाट. त्यात गोडवा नसतो, खूप आंबट असतं म्हणून पंजाबी शक्कर पण घालतात. माझा खूप आवडता पदार्थ आहे.
पेरूचे करता येईल हे कधी सुचलंसुद्धा नाही. करून बघेन.

मी आज करुन बघितलं, कोथिंबीर नव्हती म्हणुन स्किप केली आणि पुदिना चुरुन घातला (चार पाच दिवसांपुर्वी कुंडीतली बरीच पाने काढली होती. काही वापरली काही फ्रीजात ढकलली ती सुकली आणि चुरुन पावडर करायला जमले त्याची) मला आवडले हे पहाडी पेरु चाट

छान पाकृ. पेरू घरात होते त्यावेळी या कृतीचा विसर पडला. ते पेरू नुसतेच खाऊन टाकले. आता पेरू आणून करते.

प्राजक्ता, लसूण उग्र लागत नाही .

कविन, सहेली, मस्तच. रेसिपी आवडली हे बरे झाले

देवकी,नक्कीच करून पहा