काश्मीर सफरनामा - पूर्वतयारी

Submitted by pratidnya on 12 August, 2025 - 13:24

काश्मीर सफरनामा - पूर्वतयारी

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच हे प्रवासवर्णन मायबोलीवर टाकायचे होते पण पहिला भाग लिहिला त्याच दिवशी संध्याकाळी पहलगाम हल्ल्याची बातमी आली. अगदी एक आठवडा आधी आपण त्याच गावात होतो ह्या विचाराने अजूनही मनात धडकी भरते. हल्ल्यात बळी पडलेले तीनजण तर आपल्या डोंबिवलीतलेच होते हा आम्हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता.

माझ्यासाठी फिरायला जायच्या ठिकाणांच्या यादीत काश्मीर तसं कधी वरच्या स्थानावर नव्हतं. कधीतरी जाऊन येऊ असं वाटायचं. ईशान्य भारत आणि पश्चिम घाट जिथे फुलपाखरं आणि चतुर जास्त आढळतात तिथे आधी फिरून यायचं असं मी आणि प्रसादने ठरवलं होतं. तरी २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात साऊथ एशिया ड्रॅगनफ्लाय मीट श्रीनगर मध्ये करायचं ठरवलं गेलं. आम्ही नऊ दिवस चतुर फोटोग्राफी आणि साईटसीईंग करायचं असं ठरवून मुंबई- श्रीनगर तिकिटं काढली. प्रवासाच्या काही दिवसांपूर्वीच कलम ३७० हटवण्यात आले आणि सुरक्षेच्या दृष्टीने आमचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर पुढच्या कुठल्याही सहलींसाठी आम्ही काश्मीरचा पर्याय विचारात घेतलाच नव्हता.

फेब्रुवारी २०२४ ला माझ्या मुलीचा शांभवीचा जन्म झाला आणि काही महिन्यांसाठी का होईना माझ्या भटकण्यावर निर्बंध आले. अगदी जवळ जरी कुठे जायचे झाले तरी तिच्या खाण्याच्या, झोपेच्या वेळा सांभाळून सर्व करावं लागायचं. या वर्षी प्रसादची ऑल इंडिया कम्युनिटी मेडिकल कॉन्फरन्स २०२५ श्रीनगरला होणार असं जाहीर झालं. या निमित्ताने का होईना जरा फिरून येऊया असं आम्ही ठरवलं. प्रसादची आई एरवी प्रवासाला जायला नको नको असं म्हणणाऱ्या. त्या आणि सासरेबुवा दोघेही SBI मध्ये कामाला होते. कामानिमित्त होणारा प्रवास सोडला तर ते दोघेही खास पर्यटनासाठी असे कधीही बाहेर गेले नव्हते. पण गेल्या वर्षी सासूबाई रिटायर झाल्यावर अचानक मैत्रिणीसोबत दुबई फिरून आल्या. त्या प्रवासामुळे आलेल्या आत्मविश्वासामुळेच की काय त्यांनी काश्मीरसाठी लगेच हो म्हटलं. मावशीलासुद्धा घेऊन जाऊया असं म्हणाल्या. तर अशा प्रकारे प्रसाद, मी, प्रसादची आई, मावशी आणि शांभवी असे पाचजण काश्मीरला जायला तयार झालो.

फिरायला जाताना आम्ही गर्दीची ठिकाणे टाळतो. यावेळी तर छोटी शांभवी सोबत होती. कॉन्फरन्स नेमकी एप्रिलच्या महिन्याच्या मध्यात होती. हा कालावधी म्हणजे ट्युलिप फेस्टिव्हल आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा त्यामुळे काश्मीरमध्ये सर्वत्र गर्दी ओसंडून वाहत असते. कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीसोबत जायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. सर्वात आधी दोन ज्येष्ठ नागरिक आणि सव्वा वर्षाचं पिल्लू सांभाळून काय काय पाहता येईल याची माहिती गोळा केली. यापूर्वीच्या आमच्या बऱ्याचशा ट्रिप्स या फुलपाखरं आणि चतुर फोटोग्राफीसाठी असत. यावेळी काश्मीरचे एंडेमिक ड्रॅगनफ्लाय आणि टाचण्या पाहता येणार नाही म्हणून प्रसादचा जीव अगदी हळहळत होता. एक दिवस मी ताहिरसोबत फिरायला जातो. (ताहीर म्हणजे काश्मीरचा स्टेट एंटॉमॉलॉजिस्ट आहे आणि चतुरांवर संशोधन करतो. २०१९ ची ड्रॅगनफ्लाय मीट त्याच्या पुढाकारानेच होणार होती. ) त्या दिवशी तुम्ही चौघेजण काय ते मुघल गार्डन्स बघून घ्या असा सल्ला त्याने दिला. मला ते फारसं पटलं नाही. पर्यटकांवर हल्ले होत नसले तरी उगाच आडवळणाच्या जागी एकटे का जा. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण धुसफूस चालूच होती. शेवटी आर्मी मधून रिटायर झालेल्या आमच्या एका परिचितांना कॉल केला. ते म्हणाले तसा पर्यटकांना तिथे धोका नसला तरी उगाच फार माहीत नसलेल्या जागी जाऊन का स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्या. ड्रॅगनफ्लाय मीटची गोष्ट वेगळी होती. त्यांनी सांगितल्यावर अगदी नाईलाज झाल्यासारखं का होईना पण प्रसादने तो प्लॅन रद्द केला. पण तो वैतागला आणि म्हणाला. "असं असेल तर तिथे कुठेही हल्ला होऊ शकेल अगदी पर्यटकांची खूप गर्दी असेल अशा जागीही होऊ शकेल.”
तो जे बोलला ते अगदी खरं होईल असं त्यावेळेला वाटलं नव्हतं.

सहलीसाठी तयारी सुरु केली. या बाबतीत मी नव्या ट्रेन्डला धरून चालत नाही. म्हणजे रील्स पाहून काय काय बघायचं असं ठरवत नाही. तर सर्वात आधी मायबोली आणि मिसळपाववरची प्रवासवर्णने वाचते. जवळपास सर्वानीच काश्मीर सहलीसाठी प्रवासी कंपन्यांचा आधार घेतला होता. मला ट्रिप स्वतः आखायची होती. इथल्या वाचनालयात मला काश्मीर पर्यटनावर (लेखकाचे नाव आता आठवत नाही) एक सुंदर पुस्तक मिळाले. त्यांनी काश्मीरच्या काही जुन्या मंदिरांबद्दल आणि काही वेगळ्या ठिकाणांबद्दल जी माहिती दिली होती ती इथे आंतरजालावरसुद्धा सापडत नव्हती.

आमच्या कंपनीतले CSR प्रमुख नेवे सर जेव्हा काश्मीर फिरायला गेले होते तेव्हा त्यांच्या तिथल्या गाडीवाल्याबद्दल खूप चांगलं बोलत असत. ते लक्षात होते म्हणून त्यांच्याकडून यासिनचा नंबर घेतला. यासिनचं श्रीनगरमध्ये स्पोर्ट शूजचं दुकान आहे. त्या व्यतिरिक्त तो पर्यटकांसाठी गाडीची सोयसुद्धा करतो. त्याला कॉल करून नऊ दिवसांसाठी गाडी बुक केली. बाकी हवामान आणि राहायची सोय या बाबतीत त्याचा सल्ला विचारला. त्याने सांगितलं कि शक्यतो दाल लेक जवळ राहू नका. त्या महिन्यात फार गर्दी असणार आहे. तुम्ही बाहेर फिरायला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकाल. राहण्यासाठी राजबाग एरिया अगदी योग्य आहे. त्या भागातील हॉटेल्स जेव्हा शोधायला लागले तेव्हा कळलं की माझ्या बजेटमध्ये असणारी साऱ्या हॉटेल्सची बुकिंग्स आधीच फुल होती. एखाद्या चांगल्या होम स्टे मध्ये राहू असा विचार केला आणि यासिनला विचारलं तर त्याचं होमस्टेबद्दल मत फारसं अनुकूल नव्हतं. “मॅडम होमस्टे क्यू बुक कर रहे हो. वहा पे ना ठिकसे रास्ता होगा ना आपको अच्छी सर्विस मिलेगी. ये लोग बस एक कमरा उपर चढाके होमस्टे बना देते हैं. वहा पे गाडी अंदर तक नही जायेगी और फिर आपको वहा तक सामान कॅरी करना पडेगा”. पण शेवटी कुठलाच पर्याय दिसेना तेव्हा गुगल रिव्ह्यूच्या भरवश्यावर इक्राम इन होमस्टे बुक केला. हा आमचा निर्णय अजिबात चुकला नाही. त्याचे रिव्ह्यू खरं तर खूपच चांगले होते. मालकाने गाडी अगदी आतपर्यंत आणता येईल याची खात्री दिली. बाकी हाउसबोट आणि पहलगाम हॉटेल बुकिंग्स लगेच झाल्या. विमानाचे तिकीट मात्र अव्वाच्या सव्वा होते. सध्या कामानिमित्त आम्ही सिंधुदुर्गमध्ये स्थायिक झालो असल्याने गोव्यावरून प्रवास करायचा ठरवले आणि गोवा-दिल्ली - श्रीनगर अशी जातानाची आणि येताना श्रीनगर- चंदीगड- गोवा अशी तिकिटे बुक करून टाकली. एप्रिल महिना असल्याने रात्र वगळता बाकीच्या वेळी थंडी वाजणार नाही असं यासिन म्हणाला होता. त्यामुळे प्रत्येकी दोन जोड थर्मल आणि एक साधा स्वेटर अशी सर्वासाठी खरेदी आणि छोटीसाठी काही थंडीचे कपडे घेतले. तिची खाण्याची काही आबाळ होऊ नये म्हणून ती खाऊ शकेल असा भरपूर खाऊ सासूबाईंनी बांधून घेतला.

प्रवासवर्णन आणि बाकी कंपन्यांच्या जाहिराती पाहिल्या असता सहली या गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगर आणि पहलगाम अशा चार ठिकाणीच फिरत होत्या. मित्रपरिवारातले जे आधी जाऊन आले होते त्यांना कॉल केला. मयूर वगळता सर्वजण ट्रॅव्हल कंपनीसोबत जाऊन आले होते. सोनमर्ग काही खास नाही असा सल्ला बऱ्याच लोकांकडून मिळाला म्हणून ते कॅन्सल केलं. त्याऐवजी युसमर्ग करायचं असं ठरवलं. गुलमर्गला गोंडोला राईड करायची असं ठरवलं. तुम्हाला ज्या दिवशी गोंडोला राईड करायची आहे त्याच्या बरोबर एक महिना आधी त्याची बुकिंग करता येते म्हणून अगदी एक महिना आधी ती साईट उघडली तर एक आठवड्यापूर्वी त्यांनी असं ठरवलं होतं कि पर्यटकांच्या इच्छेला मान देऊन ते बुकिंग विंडो दोन महिना आधी उघडत आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा तिथे असणार होतो त्या दिवसाची बुकिंग फुल झाली होती. गुलमर्ग कॅन्सल. सोनमर्ग नाय आणि गुलमर्ग नाय मगे तुमी थंय जाऊन बगलात तरी काय असा प्रश्न नवऱ्याच्या मामीने आम्ही काश्मीरला जाऊन आल्याच्या दुसऱ्या दिवशी विचारला होता. पण जाण्याच्या आधी आठवडाभर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर गुलमर्ग गोंडोला राईडचे, तिथल्या तुफान गर्दीचे, धक्काबुक्कीचे विडिओ आदळायला लागले त्यामुळे ती राईड मिळाली नाही हे बरंच झालं. एवढ्या गर्दीत शांभवीला घेऊन तीन तास माझ्याने उभं राहवलं नसतं.

काही ठिकाणी जाताना घोडा करावा लागतो असं ऐकलं होतं. मला ते टाळायचं होतं. कारण आमच्यात एकच व्यक्ती घोड्यावर बसू शकत होता तो म्हणजे माझा नवरा. सासूबाई आणि त्यांची बहीण दोघेही ज्येष्ठ नागरिक. माझा प्रॉब्लेम वेगळाच म्हणजे अगदी जगावेगळाच होता. माझं जे मूळ गाव आहे त्या गावातले लोक घोड्यावर बसू शकत नाहीत. असा काहीतरी नियम आहे. म्हणजे घोड्यावर बसले कि घोडा पुढे जात नाही, थांबून राहतो किंवा मग अगदी उधळतो असं म्हणतात. माझ्या आईने हे मला इतक्यांदा ऐकवलं आहे की मला उगाच हा नियम चुकीचा आहे वगैरे वगैरे सिद्ध करायला जायचं नव्हतं. कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणून का होईना घोडा थांबला तर ठीक पण चुकून उधळला तर हातपाय मोडून घ्यायचे नव्हते आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे नंतर आईची बोलणी ऐकायची नव्हती. त्यामुळे फक्त एकच ठिकाण जिथे जाण्यासाठी घोड्याशिवाय पर्याय नव्हता ते म्हणजे बैसरन व्हॅली हे सुद्धा आम्ही आमच्या यादीतून काढून टाकले.

भाग दुसरा : https://www.maayboli.com/node/87043

(क्रमश:)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!! श्रीनगर मध्ये ड्रॅगनफ्लाय मीट होते माहिती नव्हतं.

काश्मीर हे आवडीचं ठिकाण. पुढच्या लेखांची वाट पाहतेय.

छान लिहिलं आहे.

आम्ही (ह्यात मायबोलीकर साधना व तिची लेक पण होत्या ) पण त्याच सुमारास काश्मीरमध्ये होतो. राजबाग मध्ये राहिलो होतो. आमची ट्रिप उत्तम झाली होती.

Nigeen मधील हाऊसबोटही छान होती. Nigeen अगदी शांत आहे.

आम्ही नेहमीच्या ठिकाणाव्यतिरिक्त दूध पथरी, खीरभवानी व मार्तंड मंदिर, Mattan अनंतनाग ही ठिकाणेही पहिली.

आम्हालाही gondola tickets मिळाली नाहीत. पण आम्ही गुलमर्गला गेलो होतो.

या वर्षी प्रसादची ऑल इंडिया कम्युनिटी मेडिकल कॉन्फरन्स २०२५ श्रीनगरला होणार असं जाहीर झालं >>> अरे वा!... त्या conference साठी जाणे झाले? कॉन्फरन्सबद्दल व तयारीबद्दल थोडी फार माहिती होती. कमिटीमधील दोन डॉक्टर ओळखीचे. त्यातील एक मेडिकल कौन्सिल प्रेसिडेंट. आम्ही परत यायच्या आदल्या संध्याकाळी भेटायला आले होते.

व्वा, छान लिहिले आहे मस्त सुरुवात.
काश्मीर अजूनही बकेटलिस्ट मधे आहे.
हा पूर्वतयारीचा लेख असल्याने फोटो नाहीत पण पुढील लेखात फोटो असतील याची खात्री आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

छान सुरुवात ..

आम्ही २०२३ च्या मे महिन्यात काश्मीर सहल केली होती. तिथून आल्यावर काश्मीर सहलीचे प्रवासवर्णन लिहायला सुरुवात पण मी केलेली.. मात्र माझा आळस नडला आणि प्रवासवर्णन लिहायचे अर्ध्यातच सोडले.

तुमचे लेख वाचायला आवडतील.

पूर्ण काश्मिरमध्ये सर्वांत जास्त मला आवडलेलं ठिकाण असेल तर पहलगाम .. शांत आणि अतिशय निसर्गरम्य स्थळ. रस्त्याला जाताना कुठेही उभे राहून फोटो काढा.. प्रत्येक जागा चित्रमय, आकर्षक आहे. निदान मला तरी तसं वाटलं. रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या शुभ्र पाण्याच्या लहान- सहान नद्या आणि त्यावर फुललेले काश्मिरी लाल गुलाब..! धरतीवरचा स्वर्ग उगाच म्हणत नाहीत काश्मिरला .. हे कळून चुकतं.

नवऱ्याने काश्मीर सहलीचे बुकींग केले तेव्हा मनात भिती होती .. मी म्हटलं देखील तसं .. माझी पहिलीच असली तरी त्याची काश्मिरला जाण्याची ही तिसरी वेळ होती.. त्याने म्हटलं.. पर्यटकांना नाही अतिरेकी लक्ष्य करत आणि सुरक्षाही भक्कम असते, त्यामुळे आम्ही अगदी आपल्या शहरात फिरतो तसे बिनधास्त फिरत होतो तेव्हा काश्मिरमध्ये.. मनात कसलीही भीती किंवा शंका नव्हती.. मात्र या वर्षी अतिरेक्यांनी जेव्हा पहलगामला पर्यटकांवर हल्ला केल्याचं वाचलं तेव्हा खूप सुन्न वाटलं. हादरायला झालं.

आम्ही काश्मीरला गेलेलो तेव्हा ' वसुधैव कुटुंबकम् ' ही संकल्पना असलेले G-20 शिखर संमलेन नुकतेच काश्मिरमधे संपन्न झालेले.. श्रीनगर विमानतळ छान सजवलेले होते... परिषदेचे झेंडे लावलेले होते .. उत्साही वातावरण होते अगदी सगळीकडे.. काश्मिरला येण्याआधी मनात जी भीती होती ती गायब झालेली ..

आम्ही पहलगाम, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि दुधपथरी अशी पाच ठिकाणं केली होती. दुधपथरी हे मला आवडलेलं दुसरं पर्यटनस्थळ .. अतिशय शांत वाटलं मला त्याजागी.. आम्ही पायीच फिरलो होतो तिथे.. जवळचं एका व्हॅलीत ' राझी' चित्रपटाचं शुटींग झालेलं.. असं ड्रायव्हर म्हणालेला..

पहलगामला बैसरन व्हॅली कॅन्सल केली होती कारण तिथे संपूर्ण दिवस जाणार होता .. जाण्या - येण्यात वेळही खूप लागणार होता.. आणि घोड्या वाल्यांचे रेटही खूप जास्त वाटले.. त्या बदल्यात मग बेताब व्हॅली आणि चंदनवारी या ठिकाणी भेट दिली. अरु व्हॅलीत जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली होती असं सांगत होते सगळे ड्रायव्हर पण त्यांचं म्हणणं मला पटले नव्हते.. कमी वेळात जास्त पैसे कमवायचे म्हणून पर्यटकांना मूर्ख बनवायचं काम असावं ते..!

सोनमर्ग मला गुलमर्गपेक्षाही आवडलं.
सोनमर्गला घोड्यावरून प्रवास केला होता.. घोडा डोंगराच्या कडे-कडेने चालायचा .. फार भीती वाटायची .. घोड्याचा पाय सरकला तर..?
' मन चिंती ते वैरी न चिंती..'शेवटी म्हटलं , मी पायीच चालते आपली.. तेच सोयीस्कर पडेल.

गुलमर्गला शंकराचं लाकडी मंदिर होतं. तिथे दर्शन घेऊन छान फोटो काढले होते. मंदिराजवळ ओल्या खोबऱ्याचे तुकडे विकणारे विक्रेते खोबरं घ्या म्हणून मागे लागत होते.. मनात म्हटलं हे नारळ आमच्या इथूनच आले असतील.

गेल्यावर्षी ते शंकराचे मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असं वाचून वाईट वाटलं. तिथेच राजेश खन्ना आणि मुमताजच्या ' जय जय शिवशंकर ... ' ह्या 'आपकी कसम ' ह्या चित्रपटातल्या गाण्याचे शुटिंग झाले होते असं वाचले होते.

गुलमर्गला गंडोलाचे तिकीट मिळाले होते, एक महिना आधी बुक केले होते म्हणून.. गर्दी असते तिथे मात्र तीन तास वगैरे एव्हढे नाही लागले .. गंडोलात बसण्याचा अनुभव छान होता. गंडोला मध्येच तांत्रिक कारणाने थांबला तेव्हा जराशी भीती वाटलेली..!

आम्ही स्वतःच काश्मिरमधल्या पर्यटन कंपनीकडे बुकिंग केले होते सहलीचे..
स्मरणात राहेल अशीच आमची काश्मीर सहल झालेली..!

तुमच्या प्रवासवर्णना सोबत मी सुद्धा आठवणी जाग्या करून घेते आणि जमेल तसं माझ्याही आठवणी लिहित जाते.

ऋतुराज , नक्की भेट द्या..

मी सुद्धा परत एकदा काश्मिरला नक्की जाणार..!

मीही लिहिणार होते पण आम्ही परत आलो आणि दुसस्र्याच दिवशी तो हल्ला झाला. काही लिहावेसेच वाटेना.

तुम्हाला चालेल तर आता वेगळा धागा काढण्यापेक्षा इथेच प्रतिसादात माझे अनुभव लिहिन.

तुम्हाला चालेल तर आता वेगळा धागा काढण्यापेक्षा इथेच प्रतिसादात माझे अनुभव लिहिन.> >नक्कीच. वाचायला आवडेल.

तयारी जोरदार दिसतेय. जाण्याअगोदर खूप माहिती काढली आहे. चतुर प्रकरण वाचायला आवडेल. म्हणजे काय काय दाखवतात.
मला वन्य गुलाब पाहायला आवडेल.( जगात पाच वन्य गुलाब आहेत त्यातील एक काश्मिर/हिमाचल/उत्तराखंडात आहे म्हणतात. )

छान.
शक्य असेल तर यासिन आणि तुम्ही राहिलस्त त्या होम्॑स्टेअचा पत्ता किण्वा नंबर द्याल का?

आम्ही दोन्ही वेळा गेलो( बर्‍याच वर्षापुर्वी) तेव्हा गर्दी अशी नसायची. हॉटेल्स त्यावेळेला आरामात मिळायची पण होमस्टे अनुभवयाचा आहे आत.
अलीकडच्या हल्य्याने घरातील किती तयार होतील माहित नाही पण तुम्हीवापरलेल्या सोयींचा पत्ता दिलात तर बरे होइल.

आम्हीही त्याच लेकमध्ये राहिलो >>> खूप छान अनुभव होता तो. आम्ही बुकिंग करतानाच सांगितलं होतं की दल लेक नको... निगीन मध्येच हवे. हाऊसबोट मधल्या मुलांनी बनवलेले साधेसेच घरगुती जेवण खूप चविष्ट होते. शाकाहारी सुद्धा उत्तम बनवले होते. चक्क पोळ्याही मऊसूत.

काश्मीरमध्ये नाश्त्यातील एक आयटम म्हणून आपले पोहे सगळीकडे होते.

यासिन शफी >>> ok

अजून एक..... सोनमर्गला एका restaurant बाहेर 'येथे मराठी जेवण मिळेल' अशी पाटी बघितली. बालतालहून परत येताना त्या restaurant मध्ये जाऊन मिसळ पाव व वडापाव खाल्ला. अप्रतिम चव. आम्हाला वाटलं मराठी cook असतील. पण नाही. काश्मिरी cooks नी बनवलं होतं. तिकडे लादीपाव ऐवजी सॅन्डविच ब्रेड देतात. हवामानमुळे फर्मेंटेशन नीट होत नाही... त्यामुळे लादीपाव नाही. वडे पण व्यवस्थित साईझचे.

तुम्ही परत काश्मीरला गेलात आणि सोनमर्गला गेलात तर अवश्य खाऊन बघा.

शक्य असेल तर यासिन आणि तुम्ही राहिलस्त त्या होम्॑स्टेअचा पत्ता किण्वा नंबर द्याल का? >>> नक्की. लेखमालेच्या शेवटी सर्व टाकेन.

नवीन प्रतिसाद लिहा