देवदर्शनाच्या निमित्ताने...

Submitted by पॅडी on 21 March, 2024 - 04:33

स्वत:पासून दू ऽऽ र पळून जाण्याचा
फसावा दुबळा प्रयत्न
अन् अडकून पडावे आयुष्यभर
घाटमाथा; आडवळणी दऱ्याखोऱ्यात
तसा तुझा सर्वव्यापी वावर
सरंजामशाही तोऱ्यात

औसे-पुनवेला येतो तुझ्या भेटीला
हिंदकळत... डुचमळत...
अनवट वळणे; खाचखळगे तुडवत

म्हणशील तर हवापालट
चेंज ऑफ टेस्ट
पूर्वजन्माची कार्मिक लेणदेण,
नसते कशाचीच खात्री -
पण पडलेच पदरात पुण्यबिण्य
तर नॉट अ बॅड बार्गेन..!

- बाबूजी, जल चढवा देंगे
अभिषेक, पूजाअर्चा, शांति से करा देंगे दर्शन
कोई जोरज़बरदस्ती नहीं
ठीक लगे सो दे देना,
लाख हाकलुनही घोटाळतो पायांत
फाटक्या चेहर्‍याचा पंडित
विनवण्या; आर्जव करतो पुन्हा पुन्हा

पूरा जंगली इलाक़ा है, साब
ना खेतीबाड़ी न कामधंदा हैं
मेहरबानी आप जैसे श्रद्धालुओंकी
जो आज तक ज़िंदा है...

माझ्या फटकारण्या झिडकारण्याला
पुरून उरतो त्याचा चिवट आशावाद,
तुझ्या उशापायथ्याशी बसणारांची ही दुरावस्था
तिथे आम्हा उपऱ्यांचे काय?
झिणझिणते मस्तक, कानी मनी
वास्तवाचे भेसूर घंटानाद...

- बाबूजी फ़ुल ले लो ऽऽ फ़ुल
एकदम ताजे हैं – सिर्फ़ पाँच रुपये लेंगे
आगे ग्यारह देने पड़ेंगे !
जूते चप्पल यही छोड़ जाना;
पहले दर्शन कर आइये
पैसे बाद में दे देना...

पोटतिडकीने समजावू पाहते
व्यवहाराचे क्लिष्ट गणित
अंतर्बाह्य सुकलेली शाळकरी पोर,
ओळीने थाटलेल्या पालांमधून
फुटक्या नशीबांचे कलकलाट
स्यूडो भक्तांभोवती धरतात फेर

चालवावा पीढीजात इस्टेटीचा वारसा
तसे; गुळगुळीत पायऱ्या बळकावून
इरसाल मलंग, पीर, फकीर, आवलिये
देतात - ‘ भगवान के नाम ’ चे प्रलोभन
चाराठ आण्यासाठी पिच्छा पुरवतात,
खरंच पोचत नसतील
ह्यांचे चिवट चिरके हाकारे
तुझ्या अंधार्‍या गाभार्‍यापर्यंत?
माझ्या किरट्या डोक्यात
भलतेच विचार खदखदतात

नामघोषाच्या चिरंतन गदारोळात
रांगेतून पुढे पुढे सरकताना
मग लाववत नाही कौल
घालवत नाही साकडे-बिकडे
तुझ्या पायांवर; जडशीळ डोके ठेवायचे
नेमक्या वेळी राहूनच जाते,
अश्राप पोरीच्या काडीमोडाने हवालदिल-
असहाय; अगतिक बापाच्या
पिळवटलेल्या काळजासारखे
मन चोळामोळा होते...
***

Group content visibility: 
Use group defaults

छान!

कवितेचा फॉर्मॅट अतिशय innovative. हिन्दीत चालु असलेली घडामोड आणि मराठीत त्या चाललेल्या घडामोडींवर मराठी विचार मंथन .

आलटून पालटून दृश्य बदलते. लाईव दृश्य हिन्दीत, त्यावर कविता मराठीत

क्या बात है,वा

द सा , आजारी देवाची अगतिकता मनाला भिडली..! आभार ..!!
आणि दोन तपांपूर्वीचा शशांक जी चा अभंगही खूप भावला…