द्वेष : एक भय गूढकथा, भाग ५

Submitted by प्रथमेश काटे on 15 February, 2024 - 12:47

श्री आणि राजाभाऊ थेट रात्री उशिरा घरी परतले. प्रियाला त्याचं काय सुरू आहे तेच समजत नव्हतं. तो आपल्या घरी जाऊन त्याचे काहीतरी विधी करेल, असा तिने मनाशी तर्क केला होता ; पण तो तर तिकडे फिरकलाही नव्हता. मात्र तो जे काही करीन ते योग्यच करीन असाही तिला विश्वास होता. आला तेव्हा श्रीच्या चेहऱ्यावर जरासं समाधान दिसत होतं. प्रियाच्या मनात खूप उत्सुकता होती ; पण त्याच्या तपासाची दिशाच निराळी असल्याने कसं आणि काय विचारावं अशा संभ्रमात ती पडली होती. ते ओळखून श्री स्वतःहून तिला म्हणाला -

" प्रिया मला ठाऊक आहे तुझ्या मनात खूप उत्सुकता असणार. पण बिलीव्ह मी. तुला फार वाट पहावी लागणार नाही. एवढ्यातच सगळा खुलासा होईल."

सोनालीने सकाळी त्यांच्या सोबत घडलेला प्रकार त्याच्या कानावर घातला. मात्र त्याला त्याचं काही फारसं आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं नाही.

•••••••

प्रियाचा काही आज डोळा लागत नव्हता. आज रूममधला एसी काहीतरी बिघाड झाल्यामुळे चालत नव्हता. त्यामुळे जरा उकडत होतं. आणि झोपही येत नव्हती. म्हणून ती नाईलाजाने उठून बसली. शेजारी सोनाली शांत झोपली होती. प्रिया सावकाश बेडवरून उतरली, आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. एकदा मागे सोनाली कडे बघून तिने हळूच खिडकी थोsडीशी उघडली. हिवाळ्याची रात्र. हवेत चांगलाच गारवा होता. त्या गारव्याच्या स्पर्शाने तिच्या नाजुक शरीरावर गोड शिरशिरी उमटली.
समोरचं असलेल्या तिच्या घराचा अर्धा भाग इथून स्पष्ट दिसत होता. सगळं घर अर्थात अंधारातच होतं ; पण वरच्या मजल्यावर असलेल्या रूमची लाईट मात्र ऑन होती. रूममधली खिडकीही उघडी होती. आणि... आणि खिडकीत कुणीतरी उभं होतं. रूमच्या आतली लाईट जरी ऑन असली तरी ती व्यक्ती खिडकीपाशी उभी असल्याने अंधारातच होती. त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. दिसत होती फक्त आकृती. आणि तेवढीच पुरेशी होती. तो गोलाकार चेहरा, ते रूंद खांदे, जेमतेम उंची. तिला ओळखायला वेळ लागला नाही. ते पपा होते तिचे ! तिचे लाडके पपा ! तिच्या काळजाला एक हिसका बसला. डोळे त्या आकृतीवर खिळले. ज्या तिच्या वडलांना जाऊन सहा सात महिने उलटले होते. जे आता परत कधीच दिसणार नाहीत या विचाराने तिच्या मनाला बराच काळ असह्य वेदना दिल्या होत्या, ते तिचे वडील‌ तिला समोर, स्पष्ट दिसत होते. तिचे वडील नेहमीसारखे ताठ उभे होते. चेहरा दिसत नसूनही ते अगदी समोर तिच्याकडेच बघत आहेत की काय, असा तिला भास झाला. आणि तिचा अंदाज खरा ठरला. त्या आकृतीचे हात वर आले. आणि त्याने आपल्या दोन्ही कानांच्या पाळ्या पकडल्या. तिचे पपा तिची माफी मागत होते. तिचं हृदय कळवळलं. हात आपसूक पुढे झाला ; पण ती त्यांच्यापासून ती दूर होती. " पपांना माझ्यावर रागावल्याचं वाईट वाटतंय. याक्षणी मी त्यांच्या जवळ असलं पाहिजे. मला त्यांच्याकडे जायला हवं." एकीकडे तिच्या मनात भरभर विचार येऊ लागले असतानाच त्या आकृतीने आपले बाहू पसरले. जणू तिच्यासाठीच. उत्तरादाखल आपोआप तिने होकारार्थी मान हलवली. ओठांवर हसू उमटलं. आणि झटकन ती मागे वळली. मात्र झोपलेल्या सोनालीवर नजर पडताच ती क्षणभर थांबली. मग आपल्या एक्साईटमेंट वर ताबा ठेवत अगदी हळूवारपणे, दबक्या पावलांनी ती रूमच्या बाहेर पडली. खिडकी बंद करायचही तिला भान राहिलं नव्हतं. आता खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्याला त्या समोरच्या घरातील खोलीच्या खिडकीत उभी ती आकृती थरथरताना, हलताना दिसली असती. स्वतःशीच खदखदून हसत असल्यासारखी.

अचानक थंडी वाजू लागल्याने सोनालीला जाग आली. पाहते तर प्रिया शेजारी नव्हती. साहाजिकच ती घाबरली. तिने प्रियाला दोन तीन वेळा हाका मारून पाहिलं ; पण प्रतिसाद मिळाला नाही. तसं बेडवरून उठून तिने लाईट ऑन केला. प्रिया खोलीत नव्हती. टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजाही बाहेरून बंद होता. आणि रूमचा दरवाजा मात्र उघडा होता. थंडीही वाजतच होती. तेव्हा तिच्या लक्षात आलं की खिडकीही उघडीच होती. ती प्रियानेच उघडली असणार. मग प्रिया गेली कुठे...?

•••••••

साडे अकरा वाजून गेले होते ; पण श्री आणि राजाभाऊ जागेच होते. राजाभाऊंना आता या गोष्टीची सवय झाली होती. ते ज्या रात्री श्रीसोबत त्याच्या घरी थांबायचे तेव्हा काहीतरी महत्वाची गोष्ट घडायची किंवा निदान काहीतरी घडण्याची दाट शक्यता असायचीच. त्यामुळे एकतर त्यांना ' ती ' वेळ येई पर्यंत जागे राहावे लागे, किंवा अगदी मध्यरात्री नाहीतर भल्या पहाटे उठून बाहेर पडावं लागे.

" श्री.. आजही तुम्ही मला थांबायला सांगितलंत. म्हणजे आजही काही घडेल असं तुम्हाला वाटतं का ? " बेडवर बसलेल्या राजाभाऊंनी उत्सुकतेने विचारलं.

श्री त्याच्या सवयी प्रमाणे खिडकीजवळ पाठीमागे हात बांधून उभा होता. आपल्या शांत धीरगंभीर आवाजात तो म्हणाला -

" घटनाक्रमांना सुरुवात झाली आहे. आता केव्हा कोणतं वळण येईल सांगता येत नाही. त्यासाठी सावध राहायला हवं."

" हो ना. आज सकाळीच अगदी दिवसाढवळ्या तो भयानक प्रकार घडला ! " राजाभाऊंच्या आवाजात किंचित कंप होता.
" श्री तुम्ही प्रियाला तुमचं ' संरक्षण बंधक ' का बांधत नाहीत.

" त्यालाही दोन कारणं आहेत राजाभाऊ. पहिलं म्हणजे ती आता आपल्या घरीच आहे. सोनाली कायम तिच्या सोबत आहे. त्यामुळे तशी प्रिया आता सुरक्षित आहे. म्हणून तिला संरक्षण बंधकाची गरज नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काही घडायचच असेल तर या बंधकाचा काही उपयोग होईल का याबाबत मला शंकाच आहे‌."

" काय ?? " राजाभाऊ चकित होऊन म्हणाले.

" हो. म्हणजे बघा, संरक्षण बंधकांचा अशावेळी काही उपयोगच नाही असं मी म्हणत नाहीये. तसं असतं तर मी ती मंत्रून, प्रयत्नपूर्वक सिद्ध करून तयार केलीच नसती‌. त्यांचा उपयोग नक्कीच आहे ; पण काही विशिष्ट व्यक्तींसाठीच. मी एखाद्याला संरक्षण बंधक बांधताना आवर्जून एक सूचना देत असतो हे तुम्ही बऱ्याचदा पाहिलं आहे. जरी प्रियाला संरक्षण बंधक बांधलं तर कुठलीही दुष्ट शक्ती तिला थेट शारीरिक अपाय करू शकणार नाही हे खरं ; पण तिच्या मनाचं दार तर त्याही वेळी अशा शक्तींसाठी खुलं असणारंच. मानवी मन नेहमीच खुलं असतं. त्याच्यावर कुठलंही बंधन ठेवता येत नाही.''

" म्हणजे ? " राजाभाऊंच्या या प्रश्नात आश्चर्याबरोबर किंचित भीतीही उमटली होती.

श्रीने त्यांच्याकडे मान वळवून पाहिलं. त्याच्या नजरेत, कधी सहसा न दिसणारी चिंता होती. तो काहीतरी बोलणार होता तोच दरवाजावर घाईघाईने थापा पडू लागल्या. मागोमाग सोनालीच्या हाका ऐकू आल्या. श्रीने घाईघाईनं पुढे जाऊन दरवाजा उघडला. मागे राजाभाऊ होतेच. सोनालीच्या चेहऱ्यावर काळजी, भीती, गोंधळ दिसत होता.

" सोनाली काय झालं ? " श्रीने विचारलं.

" अरे... प्रिया रूममध्ये नाहीये."

" काय ?? अगं वॉशरूमला वैगेरे गेली असेल."

" नाही रे. "

" बरं. आधी शांत हो, आणि नीट सांग काय झालं ते."

मला एकदम थंडी वाजून आल्यामुळे जाग आली. बघते तर ती रूममध्ये कुठेच नव्हती. बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा बाहेरून बंद होता ; पण रूमचा दरवाजा उघडा होता. आणि..."

" आणि ? आणि काय ?? " श्रीने उत्सुकतेने विचारलं.

" जाऊ दे. ते महत्त्वाचं नाही."

" सांग तर खरं."

" रूममधली खिडकीसुद्धा उघडी होती."

श्री क्षणभर स्वतःशी विचार करू लागला, मग एकदम चमकून म्हणाला -

" याचा अर्थ..." वाक्य अर्धवट सोडून श्री पटकन खोलीतून बाहेर पडत म्हणाला. " लवकर चला."

क्रमशः
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults