प्रिया घरासमोर उभी होती. आज जवळजवळ दोन महिन्यांनी ती पुन्हा आपल्या गावच्या घरी परतत होती. शेवटी किती काळ दूर राहणार होती ती. इथे तिच्या वडलांसोबतच्या कित्येक गोड आठवणी होत्या. त्या आठवणींनीच तिला इकडे खेचून आणलं होतं. तिने ठरवलं होतं की आता जेव्हा शक्य असेल तेव्हा थोड्या दिवसांची सुट्टी घ्यायची आणि गावी यायचं.
समोरच्या बंद घरावर खिळलेली नजर तिने उजव्या बाजूला असलेल्या बागेकडे वळवली. तिच्या वडिलांना फुलांची फार आवड. आपल्या बागेत त्यांनी निरनिराळी, सुंदर फुलझाडे लावली होती. खूप सायास करून वाढवली होती. ' आता सगळी फुले सुकून गेली असतील.' तिच्या मनात विचार आला. खिन्न मनाने ती पायऱ्या चढून ती वर गेली. पर्समधून किल्ली काढून तिने दरवाजा उघडला. आत लोटलं जाताना दरवाजा जरा करकरला. आजूबाजूच्या शांततेत तो आवाज खूप मोठा वाटला. त्यात आत काळाशार अंधार दाटलेला. क्षणभर ती तशीच स्तब्ध उभी राहिली. पण मग तिने स्वतःला सावरलं. इतके दिवस घर बंदच असल्यामुळे दरवाजा करकरणं, आणि घरात अंधार असणं साहजिकच नव्हतं का ? एक निःश्वास सोडून तिने आत पाऊल टाकलं. दरवाजा जवळच बटणांचं पॅनेल होतं. हॉलमध्ये याक्षणी अगदी गुडूप अंधार होता. तरी लाईट लावण्यासाठी प्रिया वळत असताना समोर तिला काहीतरी हालचाल झाल्यासारखं वाटलं. ती वळता वळता थबकली. समोरच्या अंधारात तिने बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला ; पण लगेच या सगळ्यातली निरर्थकता तिच्या लक्षात आली. स्वतःशीच मान हलवून तिने लाईट ऑन केली. आपल्यामागे दरवाजा बंद केला. हॉलवरून तिने एक नजर फिरवली. संथ पावलं टाकत ती पुढे भिंतीपाशी जाऊन उभी राहिली. आपल्या बॅगमधून वडलांची फोटोफ्रेम काढली. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहताना तिचं मन भरून आलं. तो फोटो तिने छातीशी कवटाळला. मग भिंतीवर लावला. फोटोला नमस्कार करून ती आपल्या बेडरूममध्ये गेली. बॅग, पर्स एका कोपऱ्यात ठेवून बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन बाहेर आल्यावर तिने पर्समधून मोबाईल काढला. आणि बेडवर आडवी झाली. मोबाईलवर असंच काहीतरी बघत असतानाच तिला कॉल आला. त्यावरचं नाव पाहून तिच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. तो तिचा नेबर श्री होता. तिने चटकन कॉल रिसीव्ह केला.
" हाय श्री."
" हाय प्रिया. कशी आहेस ? "
" मी छान. तू कसा आहेस."
" मी पण मजेत आहे. तुझ्या घराची लाईट ऑन दिसली. तू पोहोचली असणार हे ओळखलं. म्हणून कॉल केला."
" अरे यायला फारच उशीर झाला. नाहीतर तुला भेटायला येणारच होते. बाय द वे. थॅंक्यू. तू घरातली साफसफाई करवून घेतलीस. नाहीतर प्रवासातून इतकं दमून आल्यावर परत साफसफाई करावी लागली असती." ती म्हणाली. जरावेळ समोरून काहीच उत्तर आलं नाही. तशी ती म्हणाली - " हॅलो. श्री. काय झालं ? कसला विचार करतोयस ? "
" अं... नाही, काही नाही. अगं त्यात आभार काय मानायचे..."
थोडावेळ त्याच्याशी बोलून झाल्यावर तिने मोबाईल बाजूला ठेवला. उठून लाईट ऑफ केला, आणि पुन्हा ती बेडवर पहुडली. प्रवासामुळे थकवा आला होता खरा ; पण लगेच झोप येईल असं वाटत नव्हतं. तिच्या मनात श्रीचाच विचार सुरू होता. श्री त्यांचा कित्येक वर्षांपासूनचा शेजारी. दोघे जवळ जवळ सारख्याच वयाचे असल्याने त्यांची खूप छान मैत्री झाली होती ; पण तो नक्की काय करतो, हे तिला नीट समजलं नव्हतं. तो व्यवसायासाठी म्हणून कधी बाहेर पडत नसे. उलट त्याच्याच घरी रोज लोकांची कामानिमित्त रांग लागलेली असायची. सर्व स्तरांवरची अनेक लोकं त्याच्याकडे यायची.
महिमाला एक गोष्ट मात्र त्याच्याबद्दल माहीत होती. श्री ला काही वेगळ्या गोष्टी, विद्या अवगत होत्या. त्यासंबंधीच अनेक लोकं आपल्या अगम्य, विलक्षण प्रकारच्या ' केसेस ' घेऊन त्याच्याकडे साहाय्य मागण्यासाठी यायची. बाहेरून या गोष्टी पाहणारा, आणि श्रीला न ओळखणारा त्याला मांत्रिक वैगेरे ठरवून मोकळा झाला असता ; पण तिला ठाऊक होतं. तो मांत्रिक नाही, एक साधक होता. प्रभू श्रीरामांचा श्रद्धाळू भक्त होता तो. आणि या भक्तीचा आधार घेऊनच तो लोकांना मदत करायचा. त्याच्याकडे मदतीसाठी येणारे अनेकजण पुन्हा आभार मानायला त्याच्याकडे आलेले तिने पाहिले होते. ग्रेटच होता तो.
त्याच्यावरून प्रियाचे विचार तिच्या वडिलांवर गेले. त्यांच्यासोबत कित्येक गोड, सुखद आठवणी होत्या. त्या आठवणींमध्ये हरवली असतानाच कधी तिच्या पापण्या जडावल्या, आणि तिला गाढ झोप लागली तिलाच समजलं नाही.
रात्री गाढ झोपेत असताना तिला एकदम छातीवर, गळ्यावर कसलासा भार जाणवू लागला. श्वास घेणं अवघड झालं. जीव गुदमरून जावू लागला.
आता काय घडलं होतं ? एकच प्रश्न तिच्या मनात आला. ती अशी विचारात असतानाच तो आवाज तिच्या कानावर पडला. तिच्या खोलीच्या बरोबर वर असलेल्या खोलीतून. दाणादाण पाय आपटत चालण्याचा आवाज होता तो. पाठोपाठ दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मग तो पावलांचा आवाज खोलीबाहेरच्या भागात आला. तिथून जिन्यावर. हळूहळू तो आवाज मोठा जवळ आल्यासारखं वाटू लागलं. ती पावलं जिना उतरत होती. चालत चालत ती पावलं जिना उतरून तिच्या खोलीसमोर आल तिचा श्वास घशातच अडकला. शरीर बधीर झाल्यासारखं वाटलं. तिच्याही नकळत ती बाहेरची चाहूल घेत होती, तोच दरवाजावर " थप्प " असा आवाज आला. ती दचकली. सारं शरीर थरथरलं. तोंडून किंचाळी निघणार होती ; पण तिच्या सुदैवाने तसं झालं नाही.
तिच्या खोलीसमोरून ती पावलं पुढे हॉलकडे गेली. मग, इतका वेळ रोखला गेलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला. आतापर्यंत मनाला विचाराला वेळच मिळाला नव्हता ; पण आता मनात विचारांची गर्दी होऊ लागली. हे काय चाललं होतं ? हा काय प्रकार आहे ? तिने अमानवी अस्तित्व, भुतंखेतं अशा गोष्टींवर कधी फारसा विचार केला नव्हता. या गोष्टी नसतातच असं मात्र ती ठामपणे म्हणाली नसती. मात्र तसंच, कुणी अशी काही गोष्ट सांगितली असती तर तिनं विश्वास ठेवला असता की नाही, हे तिला सांगता आलं नसतं ; पण आता ती पुर्णपणे, व्यवस्थित शुद्धीवर असताना तिला हा भयानक अनुभव येत होता. त्यामुळे आपोआप या गोष्टींच्या विचारांनी मनात शिरकाव केला. आपल्या घरात काहीतरी... कोणीतरी... ? पण कोण ? या प्रश्नापाशी विचार थबकले. आणि जणू तिच्या मनानेच उत्तर दिलं. पपा तर... ?
क्रमशः
@ प्रथमेश काटे
छान सुरुवात
छान सुरुवात
उत्कंठावर्धक! पुभाप्र
उत्कंठावर्धक!
पुभाप्र
छान सुरुवात, लवकर येऊ दे
छान सुरुवात, लवकर येऊ दे पुढचे भाग.
श्वास स्फोटासारखा बाहेर आला म्हणजे तुम्हीही आमच्याप्रमाणेच धारप फॅन असणार.
श्वास स्फोटासारखा बाहेर आला
@किल्ली, @mrunali.samad - धन्यवाद.
श्वास स्फोटासारखा बाहेर आला म्हणजे तुम्हीही
आमच्याप्रमाणेच धारप फॅन असणार. >> हो अगदीच ; पण शक्यतो त्यांची कॉपी न करण्याची इच्छा आणि प्रयत्न आहे. पण या वाक्य रचनेवरून तुम्ही हा अंदाज लावलात म्हणजे कुठेतरी त्यांचंच अनुकरण होते आहे असे दिसते. पुढे काळजी घेईन. थॅंक्यू
त्याच्यावरून प्रियाचे विचार
त्याच्यावरून प्रियाचे विचार तिच्या वडिलांवर गेले>>> महिमा की प्रिया?
वडलांची फोटोफ्रेम काढली.>>
सॉरी चुका काढल्या बद्दल..
त्याच्यावरून प्रियाचे विचार
त्याच्यावरून प्रियाचे विचार तिच्या वडिलांवर
गेले>>> महिमा की प्रिया? - हो खरंतर आधी तिचं नाव महिमा ठेवले होते ; मध्येच बदलल्यामुळे हा गोंधळ झाला.
वडलांची फोटोफ्रेम काढली.>> फोटोफ्रेम तिने आपल्या सोबत ठेवली होती.
सॉरी चुका काढल्या बद्दल.. >> नाही. यात माफी मागण्यासारखे काही नाही. चुका असल्या तर दुरूस्त करता येतात. किंवा वाचकांचा त्या बाबतीत काही गैरसमज होत असेल तर दूर करता येतो.
अनुकरण केलं या अर्थाने नाही
अनुकरण केलं या अर्थाने नाही म्हटलं हो, आताच किंडल अनलिमिटेड मध्ये बरीच धारप पुस्तकं नुकतीच परत वाचल्याने एकदम लक्ष गेलं इतकंच.आवडत्या लेखकाच्या शैली ची छाप असणं नव्या कथेत, यात गैर काहीच नाही.
छान सुरुवात आहे. पुढच्या
छान सुरुवात आहे. पुढच्या भागाची वाट बघत आहे.
आवडत्या
आवडत्या
लेखकाच्या शैली ची छाप असणं नव्या कथेत, यात गैर
काहीच नाही. >> right. thank you
@मी चिन्मयी - थॅंक्यू