मायबोली मास्टरशेफ -- मनीमोहोर -- पॅनकेक सँडविच

Submitted by मनीमोहोर on 8 September, 2016 - 03:19

मंडळी, ह्या वर्षीची पा़कृ स्पर्धा डोक्याला खूपच चालना देणारी आहे. म य ब ल ह्या मायबोलीच्याच आद्याक्षरांपासुन सुरु होणारे कमीत कमी तीन घटक पदार्थ वापरुन पदार्थ करायचा आहे. संयोजकांच्या ह्या कल्पनेचे खूप खूप कौतुक . मी खूप विचार करुन पॅनकेक सँडविच हा पदार्थ तयार केला आहे. बघा वाचुन आवडतो का ते

मुख्य घटक: बीट, लाल भोपळा आणि मैदा

साहित्य : पॅनकेक साठी

एक वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, लोणी, चिमुट भर मीठ , एक चमचा साखर आणि एक वाटी होल दुध

स्टफिंग साठी :

एक एक वाटी बीट आणि लाल भोपळ्याचा कीस, लोणी, मावा अर्धी वाटी, क्रंच साठी दाम नुके , वेलची पावडर, साखर.

प्रथम लोण्यावर बीटचा किस परतुन घ्या तो थोडा मऊ झाला की त्यात लाल भोपळयाचा कीस घालुन दोन्ही मऊ शिजवून घ्या . नंतर त्यात साखर घालुन पुन्हा परतुन घ्या. शेवटी मावा घालुन दोनच मिनीटं परतुन घ्या. त्यात मनुका आणि बदामाचे काप घाला आणि गॅस बंद करुन वेलची पावडर घाला. स्टफिंग साठी बीट, लाल भोपळा हलवा तयार आहे.

पॅन केक साठी

मैदा आणि बेकिंग पावडर दोन तीन वेळा चाळुन घ्या म्हणजे चांगल मिक्स होईल . नंतर त्यात थोडसं मीठ, एक चमचा साखर, थोडसं लोणी घाला . साधारण एक वाटी दूध अंदाजाने घालुन मिश्र्ण हलक्या हाताने एक जीव करा . मिश्रण साधारण भ़ज्यांच्या पीठा इतके घट्ट ठेवा. तुम्ही जो तवा वापराता नेहमी डोसे- घावन करायला, तो गॅस वर तापत ठेवा. तव्याला थोडे लोण्याचे ग्रीसिंग करुन घ्या. तवा तापला की त्यावर हे मिश्रण ओता . गॅस बारीक करा. मिश्रणाला भोकं पडु लागली की झाकण ठेवा. दोन मिनीटांनी उलटा आणि दुसर्‍या बाजुने भाजून घ्या घ्या. असे दोन पॅन केक करुन त्यामधे वर लिहीलेला हलवा पसरवा आणि चार भागांमध्ये कट करा. वरुन ध किंवा मेपल सिरप घालुन खायला द्या आणि तुम्ही पण खा.

हा फोटो

IMG_20160908_113726961.jpg

१) पॅन केक हा पाश्चात्य देशात ब्रेकफास्ट साठीचा लोकप्रिय पदार्थ आहे. त्याच हे फ्यूजन चवीला खूपच छान लागत होते, पॅन केक वरुन थोडे क्रिस्पी, आतुन मऊ लुसलुशीत, आत बीट- लाल भोपळा हलवा, मध्येच लागणारा बदामाचा क्रंच, वरुन मधाचा गोडवा आणि स्वाद.... अहाहा .... मला तर पॅनकेक म्हणजे आपले घावनच वाटत होते पण चवीत खूपच फरक आहे. करुन बघा. नक्की आवडतील तुम्हाला.

२) ह्यात तुम्ही अंड ही घालु शकता आवडत असेल तर . मी खात नाही आणि इथे चालणार ही नव्हतं . तसेच यात मैद्या ऐवजी कणीक वापरली तर जास्त हेल्दी होईल

३) बीट - लालभोपळा हलवा नुसता ही चवीला अप्रतिम लागत होता. हे दोन्ही पदार्थ मुलचं काय मोठी ही खात नाहीत आवडीने . एकदा त्यांना कशाचा आहे ते न सांगता वाढाच. कळणार ही नाही कशाचा बनवलाय ते.

४) हलव्यात साखर बेतानी घाला कारण बीट आणि लाल भोपळा ह्यांना नैसर्गिक गोडी आहे.

४) ह्यात हलव्या ऐवजी सफरचंद, पेअर, केळ, अननस ह्याचे बारिक तुकडे मधात कॅरमलाईज करुन घालु शकता. ते ही छान लागतील.

५) हा एक ब्रेकफास्ट्चा अतिशय हेल्दी ऑप्शन आहे

६) बीट आणि लाल भोपळ्याच्या फुलांची सजावट केली आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी खूप खूप आभार झंपी.

मला पण वाटल होत खूप खटपट होईल पण काहीच नाहीये खटपट. हलवा काल इतर स्वयंपाक करताना केला आणि पॅन केक अक्षरशः दहा मिनीटात झाले.

लावला का पयला लंबर .. ममो, तुझ्या पाकृची वाट बघतच होते. मस्त ! हीच, गाजराची फुले मस्त सजवलीये... सोप्पी ! नक्की करून पाण्यात येईल...

मानव, मंजू, केश्वे खूप खूप धन्यवाद प्रतिसादासाठी

गाजराची फुले मस्त सजवलीये >> मंजू , ती लाल भोपळ्याची फुल आहेत. बीट आणि लाल भोपळा मुख्य घटक पदार्थ आहेत म्हणून

Pages

Back to top