संतकृपा

आगळे दैवत

Submitted by पुरंदरे शशांक on 26 July, 2018 - 00:39

आगळे दैवत

सगुण निर्गुण । मिळोनी सावळे । साच आकारले । विटेवरी ।।

संत गाती नित्य । जयाची महती । तोचि तो सांगाती । अनाथांचा ।।

न चलेचि मात । लौकिक संपत्ती । भक्तीप्रेमासाठी । लोभावला ।।

यज्ञयागादिकी । नकोच सायास । विचित्र नवस । पावावया ।।

भाव भक्ती शुद्ध । वर्म एकुलते । लाभले गोमटे । संतकृपे ।।

मन बुद्धी चित्त । ठेविता पायांशी । जोडे अविनाशी । समाधान ।।

आगळे दैवत । लाभे संतकृपे । सहज सोहोपे । सर्वांलागी ।।

होऊ पूर्ण लीन । पांडुरंगा पायी । भक्तीसुख देई । सर्वकाळ ।।

.........................................................

संतकृपादीपक

Submitted by पुरंदरे शशांक on 5 April, 2016 - 02:12

संतकृपादीपक

नित्य समाधान | संतांची संपत्ती | स्वस्थ चित्त वृत्ती | सर्व काळ ||

अहर्निश वृत्ती | वसे भगवंती | कसलीच खंती | उरेचिना ||

वैराग्य विवेक | बाणतो नेमक | सहजचि एक | योग घडे ||

असोनी संसारी | विरक्त अंतरी | नित्य सदाचारी | धन्य जगी ||

संत सहवास | घडता सहज | जीवनाचे काज | कळो येई ||

शांति लाभतसे | भाविका अपूर्व | वासना त्या सर्व | नष्ट होती ||

प्रेम जडतसे | सहज साधनी | अलिप्त राहूनी | करी कर्मे ||

उद्धरुन ऐसे | जाताच साधक | विशेष हरिख | संता वाटे ||

संतकृपा ऐशी | भाग्याने लाभता | येतसे पूर्तता | जीवनाते ||

Subscribe to RSS - संतकृपा