हिरोशिमा मेमोरियल म्युझियम आणि इतर स्थळे व्यवस्थित बघायला साधारण ३ तास तरी लागतात. त्यामुळे संध्याकाळ होत आली होती. मग आम्ही तिथेच मोझार्ट कॅफेमध्ये कॉफी आणि काही जर्मन पदार्थ यांचा आस्वाद देऊन मियाजीमा श्राईन बघायला निघालो. हे सुद्धा शिन्तो प्रकाराचे आहे आणि युनेस्को हेरिटेज जागा आहे. तिथे जाण्यासाठी आधी बसने हिरोशिमा स्टेशनला यावे लागले, मग ट्रेन पकडून साधारण ३० मिनिटांनी मियाजीमा-गुची स्टेशनवर यावे लागले आणि मग स्टेशनजवळच फेरीबोट घेऊन १० मिनिटात मियाजीमा बेटावर जाता येते. काहीजण रात्री या बेटावरच राहतात, पण आम्ही हिरोशिमा स्टेशनजवळ राहायचे ठरवले होते कारण सामान घेऊन इतक्या दूर रहाणे कठीण होते. पण त्यामुळे रात्री १०:१५ ची शेवटची फेरीबोट आम्हाला चुकवणे शक्य नव्हते. आम्ही मग तिथेच संध्याकाळचे जेवण करायचे ठरवले. एका Mom-and-Pop रेस्टॉरंटमध्ये गेलो. जपानमध्ये चेन-रेस्टॉरंट खूपच कमी आहेत. बहुतेक सगळी रेस्टॉरंट एकेका फॅमिलीची आणि छोटी छोटी दिसली, म्हणजे आत जेमतेम ८-१० जण बसू शकतील. बहुतेक पर्यटक दिवसा या बेटावर येतात आणि संध्याकाळपर्यंत परत जातात, त्यामुळे अजिबात गर्दी न्हवती. पण दिवसा येण्याचा एक गैरफायदा म्हणजे तेव्हा समुद्राला ओहोटी असल्याने Torii gate तरंगताना दिसत नाही, पण Torii gate पर्यंत चालत जाता येते. या रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा भाज्या घालून नूडल्स मिळाल्या. नाही तर जिकडे तिकडे भात आणि फिश किंवा फिश आणि भात/नूडल्स. इथे मियाजीमाची लोकल बियर मिळाली आणि आश्चर्य म्हणजे हापूस आंब्याची कुल्फी. आंबा खरोखर हापूस होता, पण नेमका कुल्फीचा फोटो काढायला विसरलो. जेवण झाल्यावर आरामात श्राईन बघता आले. बऱ्याच छोटी छोटी बैठी घरे आहेत. बेटाच्या कडेकडेने फिरून आलो. मग भरती पूर्ण आल्यावर Torii gate खूपच छान दिसले. रिस्क नको म्हणून आम्ही ९:३० ची फेरी घेऊन साधारण १०:१५ पर्यंत आम्ही हॉटेलवर परतलो.
दुसऱ्या दिवशी क्योटोला राहणार होतो, त्यामुळे वाटेत हिमेजी कॅसल (Himeji Castle) बघायचा प्लॅन केला होता. आरामात उठलो, आटपून मग कॉफी/ब्रेकफास्ट करून हॉटेल सोडले आणि शिनकान्सेन घेऊन Himeji ला साधारण तासाभरात पोहोचलो. सोबत सामान होते, पण स्टेशनवर बरेच लॉकर्स मिळतात त्यात बॅग आणि इतर सामान ठेवता येते. आम्ही मोठ्या आकाराचा लॉकर घेतला त्याला ७०० येन लागले. याशिवाय जपानमध्ये सामान एका हॉटेलमधून थेट पुढच्या हॉटेलमध्ये पाठवायची सोय पण उपलब्ध आहे. (काय म्हणतात ते नाव विसरलो). कालच दोन्ही ठिकाणे बघितल्याने आज निवांत होतो.
अपूर्ण...