भस्मबीज - भाग २७

Submitted by नितनवे on 18 October, 2026 - 14:30

भस्मबीज - भाग २६
पूर्वभाग
अनन्या दुष्ट शक्तीच्या प्रभावाखाली विहिरीत उडी मारते, पण आजोबा स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवतात; त्या वेळी त्यांना अनाकलनीय अदृश्य बळाचीही मदत मिळते. यानात देवप्पा अभिजितला अनन्याच्या जीवाला धोका नसल्याचे सांगतो, मात्र त्यामागचे कारण उघड करत नाही. स्वाती बारा स्त्रियांचे बळी, भस्मबीजाचा धोका आणि त्यांच्या कुळाचे रक्षक म्हणून असलेले कर्तव्य यांची माहिती आजोबांना सांगते. आपल्या पूर्वजांचा आणि वीरशास्ता कुळदैवताचा विस्मृतीत गेलेला इतिहास समजल्यावर आजोबा अभिजितच्या लढाईत त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार करतात. दुपारी अनन्या शुद्धीवर येते, पण रात्रीच्या घटनांची तिला आठवण नसते; तरी विहिरीकडे पाहताना तिच्या मनात काहीतरी भयाण अजूनही जागे असल्याची चाहूल मिळते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २७ - संशयाचे बीज

काळ्या पोकळीतून बाहेर पडलेला कल्लेश्वर पडक्या देवळात गेला नाही. आपली ही अवस्था हांडी जोग्यांना दाखवली, तर त्यांचा बाबावरचा विश्वास ढळेल, हे त्याला ठाऊक होतं. तो धडपडत थेट मल्लीच्या गुहेच्या तोंडाशी पोहोचला. बाहेर रक्षक नेहमीसारखे उभे होते; अंधारात त्यांच्या पिवळ्या डोळ्यांच्या जोड्या मिणमिणत्या दिव्यांसारख्या भासत होत्या. त्यांनी कल्लेश्वराला आत येऊ दिलं. आत शिरताच तो धडपडून खाली कोसळला.

मल्लीने त्याला अशा अवस्थेत यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं.
"बाबा."
त्याने कल्लेश्वरला दोन्ही हातांनी धरून चटईवर बसवले. कल्लेश्वरच्या छातीवर, पाठीवर, खांद्यावर, काळेनिळे वळ दिसले. त्याच्या दातातून रक्त येत होतं.
"कुणी केलं हे बाबा?"
"राहू दे."
"बाबा, तुम्हाला किती लागलंय..."
"राहू दे, मल्ली," कल्लेश्वर घोगऱ्या आवाजात म्हणाला. "पाणी दे."

मल्लीने दिलेलं पाणी तो घटाघटा प्यायला, मग तांब्या बाजूला ठेवून बराच वेळ डोकं खाली घालून बसला.

मल्लीने तेलाची वाटी घेतली आणि बाबांच्या पाठीवरच्या वळांवर हळुवारपणे तेल लावू लागला. त्याला आठवलं, यानाच्या जंगलात अर्धमेला पडलेला असताना याच बाबांनी त्याची सुश्रुषा केली होती. त्या उपकाराचं ओझं त्याला आजही जाणवत होतं. पण हल्ली काही दिवसांपासून बाबांविषयी एक वेगळाच संशय त्याच्या मनात घर करू लागला होता. का, ते त्याला स्वतःलाही सांगता येत नव्हतं.

"माझी एकवीस दिवसांची साधना मोडली आणि स्वतःची साधना मात्र पूर्ण केली. म्हातारा एवढा धूर्त असेल असं वाटलं नव्हतं." कल्लेश्वर पुटपुटत होता.
"पण त्यांच्या हातात आता फक्त दोन महिने उरलेत, आणि तो इनामदार अजून तयारीच करतोय. भस्मबीजाच्या शक्तीची त्यांना कल्पनाच नाही."

"कोण म्हातारा, बाबा?"

"तू समजणार नाहीस."

हे बाबांनी याआधीही अनेकदा ऐकवलं होतं. पण आजचा सूर वेगळा होता. त्यात चीड होती, आणि त्या चिडीमागे थकवा.

मल्लीला काही समजले नाही पण असे खूप प्रश्न होते जे विचारायची उर्मी त्याने इतक्या वर्षात दाबून टाकली होती. त्याला भीती होती की कदाचित त्यामुळे चंद्रिका मिळण्याची शक्यता दुरावेल. तिच्यासाठी त्याने बारा वेळा आपलं शरीर, आपला आत्मा गहाण टाकला होता. आता तेरावी वेळ जवळ आली होती. आता इतक्या जवळ येऊन त्याला ही संधी गमवायची नव्हती.

कल्लेश्वरने डोळे मिटले आणि मल्लीच्या केसांवरून हात फिरवत म्हटलं, "आणखी थोडं, मल्ली. आपण आता खूप जवळ आलोय."
तोच जुना, मायाळू स्पर्श. तोच आश्वासक आवाज.

अति ताणाने आणि थकव्याने कल्लेश्वर तिथेच चटईवर आडवा होऊन घोरू लागला. मल्ली बराच वेळ तसाच बसून राहिला. मग तो उठला आणि गुहेबाहेर आला. पिवळ्या डोळ्यांचे रक्षक तसेच निःशब्द उभे होते.

समोरच्या वडाच्या फांदीवर त्याच्या नजरेला काहीतरी पडलं... एक मोठा पक्षी. गरुड. तो तिथे कधीपासून बसला होता, कुणास ठाऊक. तो एकटक मल्लीकडे बघत होता, पण त्याच्या नजरेत धाक नव्हता, राग नव्हता. त्यात काहीतरी वेगळं होतं, जे मल्लीला शब्दांत सांगता आलं नसतं. करुणेसारखं. मल्लीने नजर फिरवली, आजवर त्याने बाबांना रागावलेलं पाहिलं होतं, त्यांचं क्रूर रूप पाहिलं होतं, त्यांना धुंद अवस्थेत पाहिलं होतं पण असं भ्यालेलं कधीच नाही.

काही अंतरावर झाडांच्या फटीतून पडक्या देवळाची धुनी दिसत होती. बाकीचे जोगी तिथे बसले होते, जे त्यांच्या बाबाला अजिंक्य मानत होते.
************************************************************************************************************************
रात्री वाड्यात सामसूम झाली तरी आजोबा झोपले नव्हते. ओसरीच्या खांबाला टेकून ते बसले होते. शेजारी कंदील मंद करून ठेवलेला, मांडीवर एक जुनी जाड काठी. नजर अंगणाच्या कोपऱ्यातल्या विहिरीवर. दिवसभर त्यांनी कुणाला काही सांगितलं नव्हतं, आणि कुणाला काही विचारलंही नव्हतं. पण स्वातीने पाहिलं होतं, त्यांनी दिवसभरात एकही घास धड खाल्ला नव्हता.
अथर्व आला तेव्हा त्याच्या पावलांचा आवाज ऐकूनही आजोबांनी मान वळवली नाही.

"झोप येत न्हाई का, बाळा?"

"आजोबा, तुम्ही इथे का बसलात?"

"वाड्याची राखण." ते हसले. "तुझ्या आजीला वाटतंय मी म्हातारपणी खुळ्यागत वागतुय."

अथर्व त्यांच्या शेजारी पायरीवर बसला. बराच वेळ तो काही बोलला नाही. मग हळूच विचारलं, "आजोबा, दीदीला काही होणार नाही ना?"

आजोबांनी काठीवरचा हात थोडा घट्ट केला. "तुला काय वाटतं?"

"मला माहीत नाही." अथर्वने गुडघे छातीशी धरले. "मुंबईत एकदा संध्याकाळी जेव्हा मी घरी एकटाच होतो ... तेव्हा मला एका बाईचा आवाज आला होता. 'मी तिला न्यायला आले, असं म्हणत होती.' बाबा म्हणाले घाबरू नकोस, पण मला खूप भीती वाटते."

"भ्या वाटणं चांगलं आसतं." आजोबा म्हणाले. "भ्यालं तरच माणूस जागं र्‍हातं."

"आजोबा, तुम्हाला भीती वाटत नाही?"

कंदिलाची ज्योत फडफडली आणि शांत झाली. "वाटती की," ते म्हणाले. "आज सकाळी मी पाण्यात उतारलो, तवा मला भ्यायला येळ न्हवता. आता येळ हाय, म्हणून भ्या वाटतंय." ते त्याच्या डोक्यावर हात ठेवून पुढे म्हणाले. "ऐक, बाबू. कुणी तिला न्यायला आलं, तर आधी त्याला मला घिऊन जावं लागंल. आन ती काय इतकं सोपं न्हाई. कळलं?"

अथर्वने मान हलवली. त्याला हसूही आलं आणि रडूही. तो आजोबांना बिलगला. दोघं कंदिलाच्या मंद उजेडात तसेच बसून राहिले.
************************************************************************************************************************
यानात संध्याकाळ उतरली होती. यल्लाप्पा दुपारीच गावात जाऊन आला होता. त्याने दोन खादीच्या पिशव्या ओसरीवर ठेवल्या. "काळी आणि निळी वस्त्रं, व्रतासाठी." तो कानडीत पुटपुटला. अभिजीतला आता थोड्याप्रमाणात कानडी समजू लागली होती.

अभिजितने पिशवी उघडली. आत काळी धोतरं, निळे अंगरखे, नीट घड्या घातलेले. त्याने एक कापड बोटांनी चोळून पाहिलं. जाड, खरबरीत.

"अमावास्या उलटली की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून व्रत सुरू करायचं," देवप्पा म्हणाला. "तुझ्याकडे तीन दिवस आहेत. व्रताच्या सगळ्यात कठीण टप्प्याचा, म्हणजे ब्रह्मचर्याचा, सराव आजपासूनच सुरू कर. मनाला लगाम घालणं सगळ्यात कठीण असतं. आणि हा लगाम उलटं काम करतो."

"म्हणजे?" अभिजितने आश्चर्याने विचारलं.

"म्हणजे, लगाम घट्ट ओढलास तर मन आणखीनच भरकटतं. नको ते विचार गर्दी करतात. उलट, थोडा सैल सोडलास, मनाशी झगडणं थांबवलंस, तर ते हळूहळू स्थिर होतं. पण किती ओढायचा आणि किती सोडायचा, हे सरावानेच कळतं."

अभिजितने मान हलवली. रात्री तो जप करता करता चटईवरच झोपी गेला.

देवप्पा अंगणाच्या कडेला बसला होता. समोर गरुड. देवप्पाने त्याच्या डोक्यावर बोटं फिरवली, आणि डोळे मिटले.

भस्मबीजाला जागृत करण्याचा विधी ज्या निषिद्ध ग्रंथात सांगितला होता, तो संपूर्ण विधी कल्लेश्वराला माहीत होता, हे देवप्पा जाणत होता. पण त्या ग्रंथाचं शेवटचं पान गहाळ होतं. त्या पानावर काय लिहिलं होतं, हे कल्लेश्वराला ठाऊक नव्हतं, आणि त्याला त्याची फिकीरही नव्हती. त्याचा उद्देश एकच होता: भस्मबीजाला दास करायचं, आणि त्याच्या बळावर अमर्याद सत्ता व इतर सुखांचा उपभोग घ्यायचा.

काळाच्या ओघात ते पान नष्ट झालं होतं, पण त्यातला सगळा मजकूर रक्षक कुळाने परंपरेने जतन केला होता. त्याची कुठेही वाच्यता होऊ दिली नव्हती, कारण गुप्तता हाच त्याच्या रक्षणाचा एकमेव उपाय होता. म्हणूनच देवप्पा कल्लेश्वराचा प्रत्येक डाव सांभाळून खेळत होता. कल्लेश्वरची माहिती कुठपर्यंत आहे, याचा देवप्पाला अचूक अंदाज होता. पण देवप्पाला काय काय माहीत आहे, याची कल्लेश्वरला काहीच कल्पना नव्हती.

थोड्या वेळाने देवप्पा अंगणाच्या मध्यभागी गेला. गरुड त्याच्या मागोमाग उतरला. त्याने यंत्राच्या मध्यभागी मांडी घातली आणि दिव्यांच्या ज्योतींकडे पाहत हळू आवाजात बोलू लागला. "आज रात्री तरी तुझ्या डोळ्यांवरची पट्टी थोडी सैल होईल का, मल्ली?"
************************************************************************************************************************
ऑफिसच्या खिडकीजवळ उभी असलेली नेहा तिसऱ्यांदा तोच नंबर पाहत होती. शेवटी तिने कॉल लावला.
"सर?"
"नेहा." अभिजितचा आवाज थकलेला होता. "बोला, काय म्हणताय?"
"तुम्ही कसे आहात?"
"ठीक आहे. तुम्ही? ऑफिसमध्ये सगळं ठीक चाललंय ना?"
"हो सर, इथे सगळं ठीक आहे. आज सकाळी स्वातीशी बोलले, आणि अनन्याशीही." बोलता बोलता नेहाचा आवाज थोडा सावध झाला.

पलीकडे अभिजित क्षणभर गप्प राहिला. मग बिचकत बिचकत त्याने तो प्रश्न विचारला, जो गेले कित्येक दिवस त्याच्या मनात सलत होता. "नेहा, त्या दिवशी देवप्पांनी तुम्हाला असं काय सांगितलं, की तुम्ही इतक्या हादरलात?"

लाइनवर शांतता पसरली.

"निदान ते अनन्याबद्दल होतं का, एवढं तरी सांगू शकाल?"

नेहा उत्तर द्यायला तोंड उघडणार, तेवढ्यात पलीकडून पावलांचा आवाज आला. देवप्पा आला होता. "फोनवर कोण आहे?" त्याने विचारलं. "नेहा" असं ऐकताच त्याने अभिजितच्या हातातून फोन घेतला, आणि दोघांचं पुढचं बोलणं कन्नडमध्ये सुरू झालं. अभिजितच्या कानावर 'कल्लेश्वर' आणि 'पिशाच्च' एवढेच शब्द पडले.

थोड्या वेळाने देवप्पाने फोन परत त्याच्या हातात दिला.
"हॅलो, सर." नेहाचा आवाज काळजीने भरला होता. "एवढं सगळं घडलं, आणि तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही? तुम्ही बरे आहात ना? कुठे जास्त लागलं नाही ना?"
"मला नाही, पण कल्लेश्वरला चांगलाच मार बसलाय," अभिजित हसत म्हणाला.

नेहा काही क्षण गप्प राहिली. आणि मग अचानक, जणू तिच्या मनात एखादा तुटलेला धागा जुळला, ती म्हणाली, "सर, त्या पडक्या देवळाबाहेर, गुहेच्या डावीकडे, तुम्हाला कुठे एक मोठा खडक दिसला का? विचित्र चिरा पडलेला?"
अभिजित थांबला. "खडक?"
"माझ्या स्वप्नात बळी गेलेल्यांपैकी एकीने तो खडक दाखवला होता." नेहाचा आवाज आता वेगाने धावू लागला. "मी तेव्हा इतकी घाबरले होते की त्या तपशिलाकडे लक्षच गेलं नाही. पण आता आठवतंय. मला वाटतं, सर, मामीची आणि बाकीच्या सगळ्या बायकांची हाडं तिथेच असतील."

अभिजितने डोळे मिटून त्या रात्रीचं चित्र आठवण्याचा प्रयत्न केला. थंड दगडी जमीन. कल्लेश्वराची लांब सावली.
"पडक्या देवळाबाहेर तर असा खडक नव्हता," तो म्हणाला. "पण वेताळाच्या मूर्तीच्या आसपास माझं लक्षच नव्हतं, नेहा. मला आठवत नाही."

नेहाने खोल श्वास घेतला. "ठीक आहे, सर. पण आपल्याला शोधायला हवं. तो खडक तिथेच कुठे ना कुठे असेल."

फोन बंद झाला. अभिजित बराच वेळ तसाच उभा राहिला. कदाचित त्या रात्री तो बारा बायकांच्या अस्थींच्या अगदी जवळ पडला होता, आणि त्याला त्याचा मागमूसही लागला नव्हता.

अभिजितशी बोलणं संपताच नेहाने एकही क्षण वाया घालवला नाही. देवप्पांचे शब्द अजून तिच्या कानांत घुमत होते. तिने कुमठ्याला मामांचा नंबर लावला.

"मामा, मी बोलतेय. नेहा."
"बोल गं. सगळं ठीक आहे ना?" पलीकडून मामांचा आवाज आला.
"मामा, मी जे सांगते ते नीट ऐका. मध्ये बोलू नका. शेवटपर्यंत ऐका." ती बोलत राहिली, आणि मामा गंभीर होऊन ऐकत होते. तिचं बोलणं संपलं, तरी फोनवर बराच वेळ फक्त श्वासाचा आवाज येत होता.
मग मामांनी हळू विचारलं, "तुला खात्री आहे?"
"मला स्वतःला खात्री नसती, तर मी तुम्हाला फोन केला नसता."
"ठीक आहे. मी बघतो."
"मामा..."
"तू काळजी करू नकोस. आता नाही तर कधीच नाही." एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला.
************************************************************************************************************************
दुपार कलत चालली होती. दिवस मावळायला अजून वेळ होता, देवप्पा अभिजितला झोपडीच्या मागच्या अंगणात घेऊन गेला.
"सूर्य मावळायच्या आत केस आणि नखं कापून घे," तो म्हणाला. "उद्यापासून ४१ दिवस कात्री लागणार नाही. आणि सांजेनंतर केस-नखं कापत नाहीत."

यल्लाप्पा हसत हसत कात्री घेऊन आला. "अभिजित , मी कापू का? मुंबईत कापतात तसे स्टाईलमध्ये नाही जमणार. पण निदान वाकडे-तिकडे तरी नाही कापणार"

अभिजित हसला, आणि चटईवर बसला. केसांच्या बटा मांडीवर पडत गेल्या. मग नखं. त्याला जाणवलं की उद्यापासून ४१ दिवस आपलं रूप आरशात बदलत जाणार आहे, आणि त्या बदलाबरोबर तोही. कात्री खाली ठेवली गेली तेव्हा सूर्य डोंगराआड जात होता
************************************************************************************************************************
अमावास्येची रात्र होती, जंगलातली हवा असह्य गार झाली होती. कल्लेश्वर ओढ्याकाठच्या एका जुन्या झाडाखाली आला. दोन दिवसांपूर्वी त्याने याच झाडाच्या बुंध्याशी एका वनस्पतीचं मूळ खणून काढलं होतं.

त्याने उत्तरेकडे तोंड करून बसकण घेतली. बसताना पाठीची कळ सणसणत वर आली पण त्याने दात आवळून ती दाबली. समोर लाल कापड पसरलं. त्यावर ते मूळ ठेवलं. त्याच्या आजूबाजूला तांदळाची छोटी रास केली. तुपाचा दिवा पेटवला, आणि मग धूप. धुराची बारीक रेघ वर चढली आणि अंधारात विरली.

त्याने माळ हातात घेतली. उजव्या हाताच्या भाजलेल्या दंडावरून शिरशिरी गेली, पण बोटं स्थिर राहिली.

"ॐ नमो आदेश गुरुवरगे,
वनदेविगे, वनशक्तिगे।
इदु मूलिके सिद्धमागु,
नन्न भक्तिगे गुरुविन शक्तियु।
फुरवागु मंत्र, इच्छे वाचे,
इच्छेय मन्त्र फलिसलि, सत्य पिण्डवक्क,
गुरु गोरक्षनाथर मन्त्र सत्य॥"

फार पूर्वी त्याच्या साधनेच्या सुरुवातीच्या दिवसांत हा मंत्र त्याच्या गुरूने त्याला शिकवला होता.

१०८ वेळा या मंत्राचे आवर्तन झाले. धुराचा वास बदलला. आधीच्या तीव्रपणावर आता मातीचा, ओल्या पानांचा वास पसरला. कल्लेश्वराने डोळे उघडले. त्याच्या मानेवरून घाम ओघळत होता. त्याने मूळ दिव्याच्या वर धरलं, धूप दाखवला, आणि नमस्कार केला.

मग त्याने मूळ लाल कापडात घट्ट गुंडाळलं. त्याने दिवा विझवला, तांदळाची रास पायाने विखुरली, आणि गुहेच्या दिशेने चालू लागला.

पहाट व्हायच्या आधी कल्लेश्वर गुहेत परतला. मल्ली जागाच होता, ""बाबा."

कल्लेश्वराने लाल कापडाचं गाठोडं मल्लीच्या हातात ठेवलं. "हे औषध आहे. ताजं आणि सिद्ध केलेलं. जाड दगडावर थोड्या पाण्यात उगाळ, आणि लेप करून माझ्या जखमांवर लाव. असंच रोज रात्री झोपायच्या आधी लावायचं."

मल्लीने मान हलवली. दिव्याच्या उजेडात त्याने पुन्हा त्या जखमा नीट पाहिल्या. पाठीवर काळेनिळे वळ. उजव्या दंडावर आणि छातीवर कुठल्यातरी अनोळखी ज्वाळेने भाजल्यासारखे सोनेरी-तांबूस व्रण. त्याने मूळ उगाळलं, आणि लेप सावकाश लावायला सुरुवात केली.

कल्लेश्वराने दात आवळले. त्याच्या कपाळाला घाम फुटला. मल्लीने न बोलता ओल्या कापडाने तो पुसला.
************************************************************************************************************************
कपाटाच्या तळाशी, जुन्या साड्यांच्या घडीखाली एक पिवळसर, कोपरे दुमडलेली फाईल होती. त्यावर कुणीतरी निळ्या शाईत "भागवत, लीला, बेपत्ता" असं लिहिलं होतं. आत त्या काळची तक्रार, तीन-चार कागद, आणि एक फिकट होत चाललेला फोटो. मामांनी ती बाहेर काढली.

कुमठा पोलीस स्टेशन त्यांच्यासाठी नवं नव्हतं. पहिल्या दोन-तीन वर्षांत ते इथे कितीतरी वेळा आले होते. नंतर येणं थांबलं, कारण तिथली उत्तरं बदलत नव्हती आणि त्यांच्या प्रश्नांनी तिथल्या माणसांना फक्त कंटाळा येऊ लागला होता. आज तीस वर्षांनी ते त्याच पायऱ्या चढत होते.
आत ओळखीचा चेहरा एकही नव्हता. भिंतीवर नवीन कॅलेंडर, कोपऱ्यात चहाचे ग्लास, टेबलावर फायलींचे गठ्ठे. हवालदाराने डोळे वर करून विचारलं, "काय काम?"

"मला सिनियर इन्स्पेक्टरना भेटायचंय," मामा म्हणाले आणि कुणाची तरी ओळख सांगितली.

"बसा तिकडे."

बाकड्यावर मामा फाईल मांडीवर धरून बसले. त्यांना माहीत होतं, आत जो अधिकारी बसला आहे तो त्यांना ओळखत नाही. इन्स्पेक्टर गुरुनाथ हेगडे नुकतेच सिरसीच्या स्टेशनातून पदोन्नती घेऊन कुमठ्याच्या तालुक्याच्या मुख्य स्टेशनमध्ये रुजू झाले होते. या खुर्चीवर बसून त्यांना जेमतेम आठवडा झाला होता.

पाच मिनिटांनी हवालदार केबिनमध्ये गेला आणि थोड्या वेळाने बाहेर येऊन म्हणाला, "साहेबांनी आत बोलावलंय."

मामा उठले. फाईल छातीशी घट्ट धरली, दारावर दोन टकटक केली आणि आत शिरले.

केबिन लहान होती. पंख्याचा आवाज, टेबलावर नेमप्लेट, आणि खुर्चीत चाळिशीतले, भारदस्त बांध्याचे, बारीक मिशीचे इन्स्पेक्टर हेगडे. त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा सरळ केला आणि मामांकडे एकदा वरून खालपर्यंत पाहिलं.

"बसा," ते म्हणाले. "बोला, काय महत्त्वाचं सांगायचंय, ज्यासाठी तुम्हाला सिनियर इन्स्पेक्टरची गरज पडली?"

मामा खुर्चीवर बसले नाहीत. त्यांनी फाईल टेबलावर ठेवली आणि दोन्ही तळहात तिच्या कडेवर टेकवले. तीस वर्षं मनात साचलेलं एका वाक्यात सांगायचं होतं. शब्द जुळवण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा गिळले जातील, हे त्यांना माहीत होतं.

"मला तीस वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या माझ्या बायकोची केस परत उघडायची आहे. माझी खात्री झालीय की माझ्या बायकोचा खून झालाय, आणि त्याच परिसरात गेल्या ३३ वर्षांत आणखी ११ महिलांचा बळी दिला गेला आहे."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट निव्वळ अफाट!!!!! क्लायमॅक्स जवळ येतोय! सगळे धागे एकत्र येत आहेत. विलक्षण लिहीता तुम्ही! Happy

अफाट...
आता कथेने जोर घेतला आहे.
उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

मस्त !!!
उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

नवीन प्रतिसाद लिहा