टोक्योमध्ये सर्वात प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सेन्सोजी (Sensō-ji). हे टोक्योमधील सर्वात प्राचीन, बुद्धाचे देऊळ (temple) आहे. गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सकाळी लवकर, म्हणजे ७-७:३० च्या सुमारास, जायला हवे असे म्हणतात. प्रवास झाल्यामुळे आम्ही दुसर्या दिवशी थोडे उशीरा म्हणजे ८:३० च्या सुमारास पोहोचलो. पण हे ठिकाण इतके प्रसिद्ध आहे की माझ्या मते सकाळीपण बरीच गर्दी असते. (कदाचित नंतर अजून जास्त होत असेल).
या ठिकाणी एक मुख्य हॉल आणि ५ मजली पॅगोडा आहे. सेन्सोजी च्या समोर छोटी गल्ली आहे, ज्यात अनेक छोटी छोटी दुकाने आहेत जिथे souvenirs विकत मिळतात. ह्या मंदिराचे १९४५ साली बाँब हल्ल्यात नुकसान झाले होते, पण १९५० मध्ये ते परत बांधण्यात आले. मंदिराच्या पुढे एका ड्रॅगनच्या तोंडून पाणी पडत असते. ते पाणी तीर्थ म्हणून लोक पितात आणि मंदिरात जाण्या आधी शुद्धीकरणासाठी वापरतात. तिथेच शेजारी एका मोठ्या भांड्यात उदबत्त्या लावतात. जपानी प्रथेनुसार कुणाचाही मृत्यू झाला की उदबत्त्यांचा जुडा उभा रोवतात. त्यामुळे जेवताना तुम्ही कधीही चॉपस्टिक्स भातात उभ्या रोवून ठेवायच्या नसतात.
या मंदिरात इतके लोक आजूबाजूला असूनही, सगळे काही एकदम शांत. समोर छोटी दानपेटी होती, इच्छा असेल तर त्यात पैसे येन टाकायचे. (जपानमध्ये नाणी मिळतात त्यांची किंमत असते १, ५, १०, ५०, १०० आणि ५०० येन. मग नोटा असतात १००० येन, ५००० येन, १०,००० येन वगैरे.). मग मंदिरात दोनदा वाकायचे two bows, दोनदा टाळ्या वाजवायच्या two claps आणि परत एकदा वाकायचे one bow, अशी पद्धत आहे.
सेन्सोजी मध्ये होतो तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला, म्हणून आम्ही त्या souvenir च्या एका दुकानातून २ छत्र्या विकत घेतल्या. (तसं तर पुढे ४-५ दिवस पाऊस पडला, पण जोरात पडत नसे, रिपरीप असा पडत होता ते पण थोडा वेळ.) थोडं पुढे आलो तर एक जण मक्याची कणसे विकत होता ७०० येनला एक. म्हणून मग कणसे खाऊन पुढे निघालो.
सेन्सोजीमध्ये मला बुद्धाची मूर्ती दिसली नाही, पण त्याच्या पुढील आवारात या २ मूर्ती दिसल्या. (मक्याची कणसं विकणारा होता त्याच्या समोरच)
टोक्योमध्ये असे काही वाहन असेल असे वाटले न्हवते, म्हणून संधी मिळताच एक फोटो काढला. वाट्टेल ते फोटो काढतोस, या कॉमेंटकडे दुर्लक्ष करून 

मग आम्ही नदी किनार्याने Sumida River walk करत Tokyo Skytree कडे आलो. हा एक उंच टॉवर आहे, जिथून पूर्ण टोक्यो शहर उंचावरून बघता येते. त्याच्या शेजारीच टोक्यो पोस्टल म्युझिअम आहे. मी फिलाटेलिस्ट असल्याने मला त्यात जास्त रस होता, म्हणून नंतर मग तिथे गेलो. ते शोधायला जरा बराच त्रास झाला, कारण एकतर ती बिल्डिंग सहजासहजी मिळत नाही आणि मग नंतर लिफ्टने ८ व्या मजल्या वर जाऊन दुसरी लिफ्ट घेऊन ९ व्या मजल्या वर जावे लागते. असा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. पण याचा एक फायदा झाला. तो म्हणजे ८ व्या मजल्यावर रोबो कंपनीचे एक दुकान दिसले, त्यात अनेक रोबो विकायला (की जाहिरात करायला) ठेवले होते, ते सर्व बघता आले. Apparently त्या कंपनीची आणि टोक्यो युनिव्हर्सिटीची काही तरी पार्टनरशिप की टाय-अप आहे, असे तिथला सेल्समन म्हणाला. तो पण खूप उत्साही होता आणि त्याला उत्तम इंग्रजी येत होते, त्यामुळे त्याने अगदी उत्साहाने सगळे रोबो दाखवले आणि माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे दिली. (आणि बायकोच्या शब्दात मी त्याला खूप प्रश्न विचारून पकवला.
) तर हे २ रोबो आहेत जे फुटबॉल खेळतात.
टोक्यो पोस्टाचा संस्थापक Hisoka Maejima
जॅपनीज पोस्टाची तिकिटे वापरून केलेले "मोनालिसा" चे चित्र. या व्यतिरिक्त तिथे सर्व देशांचे असंख्य पोस्टल स्टँप्स (उदा. भूतानचे स्टँप्स जे अगदी छोट्याश्या vinyl record वर आहेत आणि ती vinyl record लावली की भूतानचे राष्ट्रगीत वाजते.) आणि सुव्हेनियर शीट्स आहेत, पण त्याचे फोटो काढू देत नाहीत.
संध्याकाळी एके ठिकाणी कॉफी प्यायलो. मी तर बहुतेक ठिकाणी Iced Matcha Latte प्यायलो. नाही तर होईल कसे की जर्मनीत जायचे आणि तिथली बियरच प्यायची नाही तसे. Matcha किंचित कडवट असतो, पण ती acquired taste आहे. तुम्ही नक्की पिऊन बघा, तुम्हाला आवडेल. तिथे एक दुकान दिसले तर त्यात स्ट्रॉबेरीचे विविध प्रकार विकत होते, म्हणून आम्हीपण खाऊन बघितले, छान होते.
आम्ही कुठेही फिरायला गेलो, की स्थानिक (local) गोष्टी ट्राय करतो. म्हणून हे संध्याकाळचे जेवण.
एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही पूर्ण शाकाहारी असाल तर तसे जेवण जपानमध्ये मिळणे जवळपास अशक्य आहे. अश्या वेळी भारतातील टूर कंपनीतर्फेच यावे, सोबत जेवणाची/खाऊची पाकिटे आणावीत, कमीतकमी अंडी तरी खाण्याची तयारी असावी आणि नूडल मधील ब्रॉथ कसले आहे, ते विचारू नये 

( क्रमशः )




तुमच्या मार्फत अनवट जागा /
तुमच्या मार्फत अनवट जागा / ठिकाणं बघायला मिळणार याचा आनंद आहे
पौष्टीकपोस्टल मोनालिसा आवडलीचछान सुरुय लेखमाला
छान सुरुय लेखमाला
Veg माणसाचे कठीणच मग तिकडे
दोन्ही भाग वाचले
जपान प्रवासाचे दोन्ही भाग मस्त..!
फोटोही छान.. मोनालिसाचे चित्र देखील मस्त..!
तुमच्या लेखासोबत आमचाही जपान प्रवास घडेल लेख वाचताना..!