उगवत्या सूर्याचा देश - जपान १

Submitted by उपाशी बोका on 14 October, 2026 - 20:20

निवृत्त झाल्यापासून नेहमी कुठेनाकुठे भटकायचा विचार चालूच असतो. त्यामुळे जमेल तेव्हा जपानला जायचे होते. एकदा अचानक तिकिटाचे डील समोर आले आणि मी लगेच तिकिट काढून टाकले. आम्ही साधारणतः १२-१४ दिवसांसाठी प्रवास करतो, कारण २ आठवड्याच्यावर वेळ गेला की बायकोला कंटाळा येऊ लागतो आणि घराचे वेध लागतात. सुरुवातीला केसरी, वीणा वर्ल्ड यांच्याकडे चौकशी केली, पण त्यांचा कार्यक्रम मला तितकासा पसंत पडला नाही कारण आम्हाला संपूर्ण जपानी पद्धतीच्या घरात म्हणजे Ryokan मध्ये रहायचे होते, जे टूर कंपनीत शक्य न्हवते. शिवाय जमले तर मला सप्टेंबरमध्ये टोक्योत होणारी सुमो रेसलिंगची टुर्नांमेंट (Honbasho) बघायची होती आणि माझ्या पत्रमैत्रिणीला (penfriend) भेटायचे होते. म्हणून मी स्वतःच १६ दिवसांची ट्रीप आखली. पण ह्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत कारण Honbasho ची तिकिटे मिळणे जवळपास अशक्य आहे. पत्रमैत्रिणीने प्रत्यक्ष जपानमधून प्रयत्न केला तरीही, अगदी दबा धरून प्रयत्न केला तरीही शेवटच्या २-३ दिवसांची तिकिटे काही मिनिटातच विकली जातात. आम्ही ज्या काळात जपानमध्ये असणार होतो, नेमके तेव्हाच माझ्या पत्रमैत्रिणीची अचानक सर्जरी ठरली, त्यामुळे तिलापण भेटता आले नाही. पण विमानाची तिकिटे non-refundable असल्याने आम्ही जायचे ठरवले.

विमान निघताना जरी अर्धा तास उशीरा सुटले, तरी ते टोक्योला अगदी वेळेवर पोहोचले. बाहेर पडल्यापडल्या जाणवले म्हणजे एकदम स्मशान शांतता. जणू काही विमान तळ बंद आहे की काय असेच वाटले. पण नंतर समजले की अशी शांतता संपूर्ण जपानभर जाणवते. इथे सार्वजनिक ठिकाणी खूप कमी लोक बोलतात आणि जे बोलतात ते अगदी हळूवार बोलतात. (पुण्याच्या विद्यानंद बापटांची आठवणपण ओघाने आलीच. ) सब-वे, ट्रेन, बस, शिन्कानसेन वगैरे सर्व प्रकारे प्रवास केला, तर सगळे काही एकदम शांतपणे. तेव्हा भरपूर जाणवले की आपण स्वतःच किती मोठ्याने बोलतो ते. पूर्ण ट्रिपमध्ये मग मलापण अगदी सॉफ्ट आवाजात बोलायची सवय झाली. Happy

दुसरी अगदी ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे कमालीची स्वच्छता. मी इतके दिवस सिन्गापूरला, आतापर्यंत बघितलेला सर्वात स्वच्छ देश समजत होतो. पण जपान बघितल्यावर वाटले की ह्याचा क्लासच वेगळा आहे, इतकी स्वच्छता. नकळत टोक्यो आणि मुंबईची तुलना झाली. मुंबईकर नेहमी कारण देतात की आमची लोकसंख्या जास्त आहे म्हणून स्वच्छता कमी आहे. त्यांना सर्वांना टोक्योला पाठवले पाहिजे की आपण त्यांच्याकडून कसे शिकू शकतो ते. तसं म्हटलं तर टोक्योची लोकसंख्या ही मुंबईपेक्षा जास्त आहे, पण तरीही शहर एकदम स्वच्छ आणि चकाचक आहे.

जपानमध्ये पाऊल टाकले की २ गोष्टी न विसरता करा.
१. ATM मधून रोख रक्कम काढा. जपानमध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी रोख रक्कम घेतली जाते.
२. Suica किंवा Welcome Suica card न विसरता घ्या. (याबद्दल सविस्तर नंतर लिहितो)

आम्ही ज्या दिवशी टोक्योला पोहोचलो त्या दिवशीच मोठे वादळ तिथे आले होते, त्यामुळे बस आणि ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले होते. मुख्य शहरापासून एअरपोर्ट साधारण १.५ ते २ तासाच्या अंतरावर आहे. आम्ही शिन्जुकु (Shinjuku) भागात राहणार होतो, तिथे थेट जाणारी नरिटा एक्सप्रेस त्या दिवशी बंद होती, त्यामुळे आम्हाला २ स्टॉप घेऊन ऊएनो (Ueno) वरून जावे लागले. आम्हाला ३ तासानंतरच्या ट्रेनची तिकिटे मिळाली कारण गर्दी खूप होती, पण काही इलाज न्हवता. अखेर २ तास प्रवास करून आम्ही हॉटेल वर सुखरूप पोहोचलो.

टोक्योमधील काही दृष्ये
20260925-070213
20260925-070251

पुढील भाग २

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जणू काही विमानतळ बन्द आहे की काय असेच वाटले>>> बरेचसे एअरपोर्टस आता सायलेंट झालेत म्हणजे अनाउन्समेंट होत नाही. (पाश्चिमात्य लोकं बोलताना तशीही सायलेंटच्या नावाखाली अक्षरही खातात म्हणा). आपल्याकडेही काही एअरपोर्ट्स सायलेंट झालीत पण ती वेगळ्या कारणामुळे. लोकांच्या बोलण्याच्या आवाजामुळे अनाउन्समेंट चा तसाही उपयोग होत नसेल म्हणून कदाचित Happy .

माउंट फुजी ची वाट बघतो आहे.

जपानमध्ये इंग्रजी कितपत आहे? तुम्हाला भाषेचा अडथळा जाणवला का? त्यामुळे काय त्रास झाला? काही त्यावर मात करण्याचे पर्याय सापडला का? धन्यवाद.

सायलेंट झालेत म्हणजे अनाउन्समेंट होत नाही. >>
नाही नाही, ही त्या प्रकारची शांतता नाही. हे म्हणजे जणू काही ते सर्वजण एक प्रकारचे मेडिटेशन करत आहेत किंवा बोलण्याऐवजी फक्त लक्ष देऊन ऐकत आहेत, अशा प्रकारची शांतता आहे. हे शब्दात सांगणे कठीण आहे, प्रत्यक्षात अनुभवायलाच पाहिजे. ट्रेनमध्ये सुद्धा इतके हजारो लोक प्रवास करतात, पण अगदी शांतता असते. जपानमध्ये बराच काळ राहिलेले कुणी असेल तर माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे सांगू शकेल.

मोठ्या शहरात उदा. तोक्यो, क्योटोमध्ये थोडेफार इंग्रजी बोलणारे कुणीतरी सापडते, विशेषत: तरुण पिढीला बऱ्यापैकी येते. पण छोट्या ठिकाणी फक्त जॅपनीज बोलले जाते. सर्व ठिकाणी ९०-९५% लोक जॅपनीजच दिसले, पर्यटक खूप कमी दिसले. कदाचित शोल्डर सीजनमुळे असेल. (युरोप सारखे भरमसाठ पर्यटक नाहीत, हे खरं तर मला खूप आवडले.) बाकी उपयुक्त ऍप म्हणजे गूगल ट्रान्सलेट, गूगल मॅप्स आणि गूगल लेन्स. ही app नसतील तर तुमची एकदम पंचाईत होणार, यात शंकाच नाही. बऱ्याच पाट्या, मेन्यू वगैरे फक्त जॅपनीजमध्येच असतात. आपण मात्र कोनीचिवा (Hello) आणि अरिगातो गोझाईमास (Thank you very much) याचा सढळ वापर करायचा. Happy

तुम्हाला भाषेचा अडथळा जाणवला का? >> App मुळे विशेष त्रास झाला नाही. दुकानात किंमत ते कॅल्क्युलेटरवर टाइप करून दाखवायचे कधी कधी, ते मात्र गमतीशीर वाटते. पण बहुतेक ठिकाणी किमती स्पष्ट लिहिलेल्या असतात, जपानमध्ये कधीच आणि कुठेही फसवाफसवी दिसली नाही.

उ बो
माझ्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल आणि आवडत्या देशाबद्दल लिहिलं त्यामुळे अगदी भारी वाटलं.
गेल्यावर्षी कामानिमित्त जपान वारी झाली.
त्या प्रवासवर्णनाची टिपणं काढून ठेवली आहेत पण लिहायचा कंटाळा.
सगळं वाचताना अगदी अगदी असं झालं.
अरिगातो गोझाईमास
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

आभार. मला पण आज लिहू, मग लिहू करत कंटाळा येतो आणि राहून जाते मग. म्हणून मुद्दाम लिहायला घेतले. विशेषत: कुणाला तिथे जायचे असेल तर मदत होईल म्हणून.

माझ्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल आणि आवडत्या देशाबद्दल लिहिलं त्यामुळे अगदी भारी वाटलं. +१०८
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
पुभाप्र

सुरुवात तर झकास झाली आहे.

ही सिरीज पूर्ण वाचणार 👍

बैजवार- बयानवार लिहा तुम्ही. भरपूर फोटो टाका. काही non-touristy जागांना भेट दिली असेल तर त्याबद्दल डीटेलमंदी लिहा प्लीज.

Japan has so much to tell and teach us.

पु भा प्र.

जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन!
नशीबाने जपानमध्ये तोक्योला २ वर्ष राहण्याची संधी मिळाली २००८-२०१०. त्याआधि २००३ मध्ये ४-५ महिन्यांसाठी गेलो होतो तेव्हाच त्या देशाच्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा परत आल्यावर जपानी भाषा शिकून २००८ मध्ये परत जाण्याची संधी मिळाली होती. त्यांची भाषा शिकून गेल्यामुळे त्या २ वर्षांत त्यांच्या खास गोटात जाण्याच्या अनेक संधी मिळाल्याने, सोशल लाइफ फारच जबरदस्त झाले होते. आता काळाच्या ओघात भाषा विसरून गेलो ह्याचे फार दु:ख होते.

माझे तिथले काही अनुभव...

- (जपानप्रेमी) सोकाजी