माझा "पहिला" विमानप्रवास शाळेत असताना मुंबई सहल होती तेव्हा झाला. त्या सहलीचे प्रमुख आकर्षणच त्यात एकदा विमानाने प्रवास हे होते. जाताना ट्रेनने व येताना विमानाने आलो. मुंबईत दादरला "बालमोहन" मधे राहिलो, मुंबई विमानतळावर कपिल देव दिसला आणि प्रवासात चॉकोलेट्स खाल्ली, इतकेच लक्षात आहे. विमानप्रवासाचे अप्रूप होते म्हणून, नाहीतर मला जातानाच्या ट्रेनचे काही कमी आकर्षण नव्हते. लेख लिहीण्याइतके फारसे काही आठवत नव्हते. समुद्रसपाटीच्या लेव्हलला ज्या शहराला "मुंबई" म्हणतात त्याची दहा हजार फुटांवर गेल्यावर झालेली "मुंबापुरी" वगैरे इमोशन लक्षात नाही. प्रवास भर दिवसा असल्याने ते लुकलुकते दिवे वगैरेही दिसले नाहीत. एकतर अशी वर्णने बहुतांश घरापासून, देशापासून लांब जाताना लिहीलेली असतात. मी पुण्याला घरी येत होतो, तो ही एक फरक होता.
पण यावेळच्या गणेशोत्सवात "माझा पहिला विमानप्रवास" या विषयावर लेख आले तेव्हा हा एक जुना लिहून ठेवलेला पण प्रकाशित न केलेला लेख आठवला. तो सेव्ह करून ठेवलेला होताच. तो पहिला विमानप्रवास नसल्याने किंवा अमितसारखा किमान पहिला "आठवणारा" नसल्याने या स्पर्धेच्या उपक्रमात बसला नसता. वाचनीय वाटला तर नंतर पोस्ट करून म्हणून काल उघडून पाहिला तर लक्षात आले की तो विमानप्रवासापेक्षा भारतातील निरीक्षणांवर जास्त आहे. तरी एक नक्की. "मोहब्बतें" मधे जवळजवळ सगळी कथा शाळेत घडत असूनही त्यात जितके वर्ग व त्यात शिकणारे लोक दाखवलेत त्यापेक्षा या लेखात विमानप्रवासाचे वर्णन नक्कीच जास्त आहे.
वीस बावीस वर्षांपूर्वीच्या एका ट्रिपमधली ही निरीक्षणे आहेत. गेल्या अनेक वर्षांत दर थोड्या काळाने काहीना काही बदलत होते. त्यातल्या काळाच्या एका तुकड्यातील निरीक्षणे म्हणता येतील. खाली 'चालू वर्तमानकाळात' लिहीलेली वाक्ये ही तेव्हाची आहेत, आत्ताची नाहीत.
-----
मुंबईच्या विमानतळावर आमाचे 'कोरियन' चे विमान लॅंड झाले आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा मला आश्चर्य वाटले, पण बाहेर आल्यावर देशात आल्याची पहिली खूण जाणवली ती म्हणजे पार्किंग मधून बाहेर पडताना एका चालणार्या माणसावर आमच्या बस ड्रायव्हर ने जोरात हॉर्न मारला. तो ही असा की जणू काही हॉर्न मारला नसता तर तो चालणारा रात्रभर तेथेच उभा राहणार होता. नंतर पाच मिनीटात आणखी एक - 'हवाई अड्डा' मधून बाहेर पडताना एका ठिकाणी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. हळुहळू पुढे जाताना लक्षात आले की रस्त्याच्या एका भागात शेतासारखे वाफ़े बनवून एक टॅंकर त्यात पाणी भरत होता. मागे एवढी वाहने खोळंबली तरी शांतपणे ते पाणी भरण्याचे काम चालले होते. आश्चर्य म्हणजे बाकी लोक अस्वस्थ झाले असताना गाडीतील एकमेव गोर्याने it's okay, it will be only a few minutes म्हणून सर्व देशी लोकांची समजूत काढली. डिसेंबर महिना होता, आणि तो नॉर्वेहून आल्याने चोवीस तासांत केव्हातरी उजाडणार आहे यावरच तो खूश असावा. त्याला हायवे वरच्या फूड कोर्ट मधल्या वड्याचीही आठवण येत होती, तो आधी येउन गेला होता तेव्हाची.
यावेळेस पहिल्या ४-५ दिवसांतच मी एक प्रायव्हेट बस, लाल डब्बा एसटी, 'एशियाड', सुमो, रेल्वे, सिटी बस, रिक्शा आणि पॅक्ड कसारा लोकल अशा विविध वाहनांतून प्रवास केला. नाशिक ला ही गेलो होतो. पूर्वी एकदम साधे वाटणारे हे शहर बरेच बदलले आहे - मॉल्स, मल्टिप्लेक्सेस वगैरे. पुण्या एवढेच रूंद रस्ते पण पुण्यापेक्षा कितीतरी कमी ट्रॅफिक! पण एकूण सगळीकडेच चांगले रस्ते होत आहेत असे दिसते. सगळे अगदी येथील फ्रीवे सारखे नाहीत तरी एक्सप्रेसवे सारखे तरी. अशाच एका रोड वरून सोलापूर जवळ अक्कलकोट ला गेलो होतो. सोलापूर च्या आसपास लोक एखादे वाहन किती लोक नेउ शकते याबद्दल एक स्वत:चा फॅक्टर लावतात असे दिसते. म्हणजे दुचाकी वर सधारण ५ लोक असत आणि जीप्स वगैरे मुंबईच्या लोकल सारख्या 'गर्दीने गोलाकार' झालेल्या असे चित्र दिसत होते.
भारतात हे असेच आहे पण इकडून तिकडे गेल्यावर आपल्याला जाणवते ते - दर २-३ तासांच्या प्रवासानंतर सर्व वातावरण बदलते - घरांची ठेवण, दुकाने, हॉटेल्स मधे मिळणारे पदार्थ (सोलापूर कडे जाताना एकदम सगळीकडे दाण्याची चटणी, धपाटे दिसू लागतात). इकडे आठ आठ तास ड्राईव्ह केल्यावरही तेच फास्ट फूड असलेल्या एक्झिट्स बघितल्यावर हे एकदम बरे वाटते. पुण्यात पोस्टर्सवर 'आमचे स्फुर्तिस्थान' मधे एकच क्लोजप असतो आणि बाकी उपस्फूर्तिस्थाने काही पिक्चर्सच्या पोस्टर्स वर सहकलाकरांचे लहान फोटो खाली असायचे तसे छोट्या फोटोत दिसतात. असा वरती प्रमुख नेत्याचा फक्त मोठा क्लोजअप कोणीही लावेल. पण सोलापूर् साइडला ते मुख्य स्फुर्तीस्थान म्हणजे एखाद्या नेत्याचा टग्या 'विक्रम (व्हिकी. हे ही कंसात)' हातात सोन्याचे घड्याळ आणि डोळ्याला रेबॅन लावून लग्नमंडपातल्यासारख्या एखाद्या सिंहासनावर बसलेला दिसतो
प्रत्येक वेळेस देशात गेल्यावर काहीतरी नवीन बदल जणवतो. रेल्वे फारशी बदलली नाही, एक्सप्रेसवे होऊनसुद्धा पुणे-मुंबई गाड्यांच्या गर्दीत फारसा फरक नाही. पूर्वी रिझर्वेशन सेन्टर्समधे रांगेत उभे राहावे लागायचे. आता एक नंबर देतात, त्यामुळे आपला नं येइपर्यंत आरामशीर बसता येते. ऑनलाईन सुद्धा करता येते असे ऐकले. पूर्वी आमच्या कंपनीतील काही 'मॅड्रास' ला जाउ इच्छिणारे लोक ३० का ४५ दिवस आधी मोजून त्या दिवशी 'आरक्षण केन्द्रात' जाउन उभे राहात. आता ते कसे चालते माहीत नाही. गाडीतील चहाची किंमत वाढली व कप छोटे झालेत. कल्याण स्टेशन कितीही घाण असले तरी तेथे इतर स्टेशन पेक्षा काहीतरी कल्पकतेने केलेल्या सोयी बघितल्या आहेत. यावेळेस रेल्वे खात्यात कोणाच्या तरी डोक्यात आलेले दिसते की गाडी येण्यापूर्वी तिचा कोणता डबा कोठे येइल ही माहिती 'गोपनीय' मधून बाहेर काढून प्रवाशांना द्यायला हरकत नाही. त्यामुळे प्लॅटफॉर्म वर डिब्बा नं अमुक अमुक च्या जागी इंडिकेटर वर हा डबा SC-1 आहे वगैरे ही येते. नाहीतर पूर्वी प्रचंड गर्दीत प्लॅटफॉर्मच्या मध्यावर एका फलकावर लावलेल्या बर्याच गाड्यांच्या लिस्ट मधून "इंद्रायणी-पुणे" शोधून आपला डबा किती नंबरला आहे हे बघावे लागे.
पुण्यातही बदल दिसतायत. चितळ्यांना शेवटी आपला धंदा वाढवण्यापासून स्वत:ला रोखणे अशक्य झालेले दिसते, त्यामुळे पुण्यात इतरत्र त्यांचे पदार्थ विकणारी दुकाने आली आहेत. कर्वे रस्त्यावर देसाई बंधूंचे एक नवीन दुकान बघितले. एकदम स्वच्छ आहे. आत जाताना चपला काढून जावे लागते की काय अशी भीती वाटली, पण तसे काही नव्हते. पण स्टाफ बराच दिसतो, कारण कोठेही आपण दोन मिनीटे रेंगाळलो तरी काही (शोधायला) मदत हवी का म्हणून कोठून तरी कोणीतरी विचारतो.
पुण्याचा ट्रॅफिक कितीतरी पटीने वाढलाय. आता प्रदुषण खरेच जास्त आहे किंवा आता जास्त जाणवते इकडून गेल्यावर, कल्पना नाही. वाहने चालवणारे तेवढेच आक्रमक आहेत. त्याबाबतीत पुणेकर वाचनचालकाचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट खेळाडूंसारखे आहे. मैदानावरचा ऑसी आणि बाहेरचा ऑसी मधे जसा प्रचंड फरक असतो, तसा एरव्हीचा पुणेकर निवांत असतो, पण तो गाडीवर बसला की प्रचंड घाईत. मग तो कोणाचा मित्र बित्र नाही. मधेमधे ऐकू येणारे 'स्लेजिंग' हे ही एक ऑसीज ची आठवण करून देणारे
. पुण्यातील हॉटेल (रेस्टॉ) कल्चर आणखीनच वाढत चालले आहे. नवीन बरीच हॉटेले उघडली आहेत आणि सगळी कायम फुल असतात. पण ती श्रेयस, पुना बोर्डिंग हाउस, श्याल्मली, सुवर्णरेखा वगैरेंची मराठी 'थाळी' जेवणाची मजा गेली असे वाटते. ही नवीन सगळी बहुधा गुजराती-मारवाडी मालकांची असावीत. एखाद्या छोट्या खोलीत जेवढी टेबल्स बसवता येतील तेवढी कोंबतात. १०-१५ वाट्या असलेल्या ताटात मग चना-जोर पासून ते जलजीरा पर्यंत काहीपण येते. सुरूवातीलाच डाळ आणि तेल प्रचंड खायला घालून अर्धी भूक तेथेच मारून टाकतात. नंतर बराचसा वेळ सतत येत राहणार्या वेटर्स ना नाही म्हणण्यात जातो. दारात आणखी १०० लोक टेबल्स रिकामी होण्याची वाट बघत उभे असतात.
मराठी नाटके आणि चित्रपट यांना मात्र चांगले दिवस आलेत. खूप चांगले चित्रपट येत आहेत, चक्क कॉमेडी सुद्धा! बर्याच दिवसांनंतर सर्वांना आवडणारा आणि तरीही पाचकळ नसलेला चित्रपट हाउसफ़ुल पब्लिक, शिट्ट्या वगैरेंमधे बघितला ('अगं बाई अरेच्चा'). नाटके कायमच चांगली असतात मराठीत, तशी आताही आहेत. टीव्हीवर सं ७:३०-८ पासूनच 'अवंतिका', 'वादळवाट' वगैरे मराठी सिरीयल्स चालू होतात. पॅटर्न साधारण हिन्दी सिरीयल्सचाच. प्रत्येक एपिसोड च्या सुरूवातीला एक स्त्री आवजातील कष्टी, दु:खी गाणे. नीट ऐकले नाहीतर कोणती सिरीयल आहे तेच कळत नाही.
मराठी पेपर्स खूप वाचले. आम्ही होतो त्याच वेळी 'प्रवासी भारतीय दिवस' होता. 'स्वदेस' ही त्याच वेळेस लागला. त्यामुळे सर्व पेपर्स मधे NRI लोकांबद्दल पुलंच्या भाषेत सांगायचे तर परदेशात गेलेल्या आणि बर्याच न गेलेल्या लोकांनी लिहीलेले विचार वाचायला मिळाले. काहींनी स्वत:च्या अनुभवांवर किंवा व्यवस्थित अभ्यास करून लिहेलेले काही लेख खरच छान होते. पण बाकी काही लेख वाचून आपले म्हणणे कोणी खोडून काढणार नसेल तर मनात येइल ते ठोकावे हा प्रकारही दिसला. "NRI लोक मॅकडोनाल्ड्स आणि पिझा हट च्या जवळ घरे घेतात", "त्यांना ना भारतात इंटरेस्ट आहे ना अमेरिकेत, त्यांना फक्त वॉल स्ट्रीट मधे इंटरेस्ट आहे", "तेथे एवढा अपमान होतो तरी तेथेच राहतात" आणि काय काय. पण सगळ्यात आश्चर्य वाटले ते अशा काही लोकांचे ज्यांनी परदेशांत आपल्या ओळखीच्यांचा/ नातेवाईकांचा पाहुणचार झोडला (त्यांच्याच वर्णनात होते) आणि मग परतल्यावर त्यांच्या अमेरिकन सवयींवर टीका करत होते.
यावेळेस नेमका मी होतो तेव्हा फारसे लाइव्ह क्रिकेट नव्हते, पण जुन्या मॅचेस भरपूर पाहायला मिळाल्या. क्रॉसवर्ड, वेस्टसाईड सारखी नवीन दुकाने आवडली. आणखी एक म्हणजे मराठी चित्रपटांच्या व्हीसीडीज बर्याच दुकानात मिळू लागल्या आहेत. मी काही घेतल्या.
२६ जाने. निमित्त जास्त बंदोबस्त असल्याने परतताना विमानतळावर फक्त प्रवाशांनाच सोडत होते. उत्प्रवास जाँच (ज्याला मराठीत आपण इमिग्रेशन म्हणतो) झाल्यावर एक मजला खाली जायचे होते. आमच्याकडे स्ट्रोलर असल्याने सरकत्या जिन्यावरून जाता येत नव्हते. मग एका बाईने आमच्या पैकी एकाने तो स्ट्रोलर घेउन लिफ्ट ने जा सांगितले आणि दुसर्याने सरकत्या जिन्यावरून, कारण लिफ़्ट जवळचा हवालदार 'जाऊ देणार नाही'. म्हणजे मुळात ३-४ तास प्रवास करून आल्यावर आणि पुढे २०-२५ तासाचा प्रवास करायचा असताना आम्ही उगाचच लिफ्टने वर खाली-वर करत बसणार होतो की काय? बाकी प्रवास न करणारे पब्लिक तिथपर्यंत येतच नव्हते. मग लिफ्टला हवालदार कशाला.
पण 'कोरियन' एकदम फास्ट असल्याने (सॅन फ्रान्सिस्को ला वीस तास म्हणजे फास्टच) परतीचा प्रवास तुलनेने पटकन होतो.
दुसर्या दिवशी सोमवारी फळे आणायला इथल्या फार्म प्रोड्यूसवाल्या दुकानात जाताना आज सोमवार दुकान बंद असेल का हा विचार डोक्यात आला आणि आपण मनाने अजून पुण्यातून बाहेर आलो नाही हे लक्षात आले 
-----
ता.क.
- कल्याण स्टेशन घाण म्हणजे कसे होते हे प्लॅटफॉर्म्सवर उभे राहिलेल्यांना माहीत असेल. पण आता रेल्वेने टॉयलेट्सची व्यवस्था बदलली आहे. त्याने फरक पडला असावा. कोणता डबा कोठे आहे हे आता सर्रास सगळीकडे डिजिटल बोर्डवर दिसते असे यावेळेस जाणवले. पूर्वी हे सहज उपलब्ध नसल्याने गाडी आली की लोक रानोमाळ धावत.
- सोलापूर "अर्धग्रामीण" या हिशेबाने नाशिकला बापट बहुधा "पावग्रामीण अर्थव्यवस्था असलेले शहर" म्हणतील.
- मला ते सिंहासनावरील स्फुर्तिस्थान वगैरे वरून आता गॉट मधले "Any man who must say 'I am the king' is no true king' आठवले. किंवा "म्हणती हे वेडे पीर, तरी आम्ही राजे'
- या प्रवासापूर्वी विमानतळावर सोडायला आलेल्यांना एका रेलिंगपर्यत जाऊ द्यायचे. ते नंतर बंद झाले.
- सॅन फ्रान्सिस्कोहून जाताना कोरियन व सिंगापूर यात त्या त्या वेळेस जे "डील" मिळेल त्याने जायचो. सिंगापूर बेस्ट पण त्याने ३०-३२ तास लागत. कोरियन २०-२१ तासांत नेई. नंतर तीही सिंगापूरच्या तोडीची झाली. पण पूर्वी त्यात सीटबॅक टीव्ही नव्हते. प्रत्येक सेक्शनमधे एक असे. त्यात आलटून पालटून इंग्रजी व कोरियन पिक्चर लागत. त्यातल्या कोरियन पिक्चर मधे किमान एक "सू यंग" नक्की असे. प्रत्यक्षात तो/ती म्हातारे असले तरी.
मस्त वाटलं लेख वाचून! पहिल्या
मस्त वाटलं लेख वाचून! पहिल्या विमानप्रवासात कपिलदेव दिसला हे एकदम भारी!
नॉर्वेजियन माणसावरचा विनोद हा खास 'फारएण्ड' टच! तसाच ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि पुणेकरांवरचा.
'थाळी' मिळणारी नवीन हॉटेल्स म्हणजे दुर्वांकुर वगैरे असावीत. मलाही ती कधी फारशी आवडली नाहीत. 'सुवर्णरेखा'त कधी जेवले नाही, पण पूना बोर्डिंग आणि श्रेयस दोन्ही ऑटाफे. त्यातही पूना बोर्डिंग थोडं जास्त आवडतं.
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.
सू यंग, ऑसीज
सुवर्णरेखा, न्यू पूना बोर्डंग, बादशाही आणि श्रेयस आणि डेक्कनला चितळ्यांच्या वरचे जनसेवा आणि आपटे रोडचे आशा डायनिंग. ह्यात आलटुन पालटून खूपवेळा जेवलो आहे.
पंचवटी गौरव आणि आणि एक डेक्कनला चार पायर्या उतरुन राजस्थानीच होतं ती मला ही नाही आवडायची.
बाकी वातावरण आणि मिळणार्या जेवणातला फरक बद्दल अगदी अगदी झालं. सगळी तेच तेच बघुन कंफर्ट सोडून तोच तोच पणा फार वाटतो. बाकी निरीक्षणे वाचुन पण मजा आली
मस्त लिहिलंय, ओघवत्या शैलीत,
मस्त लिहिलंय, ओघवत्या शैलीत, वाचनीय.
फा..:खोखो:
फा..

किती मस्त प्रवासवर्णन !
अगदी नावालाच प्रवासाचे वर्णन. ..मोहब्बते ची तुलना मस्तच !
सोलापूर च्या आसपास लोक एखादे वाहन किती लोक नेउ शकते याबद्दल एक स्वत:चा फॅक्टर लावतात..
गर्दीने गोलाकार झालेली वाहने, NRI लोकांचा घर घेण्याचा क्रायटेरिया....
सगळे मस्त.
(देसाईंचे दुकान आता अगदी जुने झालेले आहे. बरेचदा expired माल असतो. कुणीही 'काय पाहिजे ' असे विचारायला येत नाही; आणि काउंटर वर असलेल्या निर्विकार मुली काहीही सहकार्य करत नाहीत. सबब मी पलीकडच्या जयश्री मधे जाते!)
>>>>>>चितळ्यांना शेवटी आपला
>>>>>>चितळ्यांना शेवटी आपला धंदा वाढवण्यापासून स्वत:ला रोखणे अशक्य झालेले दिसते

>>>>>>आज सोमवार दुकान बंद असेल का हा विचार डोक्यात आला आणि आपण मनाने अजून पुण्यातून बाहेर आलो नाही हे लक्षात आले Happy
हाहाहा
>>>>>पण सगळ्यात आश्चर्य वाटले ते अशा काही लोकांचे ज्यांनी परदेशांत आपल्या ओळखीच्यांचा/ नातेवाईकांचा पाहुणचार झोडला (त्यांच्याच वर्णनात होते) आणि मग परतल्यावर त्यांच्या अमेरिकन सवयींवर टीका करत होते.
याला ते लोक परखडपणा म्हणतील पण तो कृतघ्नपणा आहे.
>>>डिसेंबर महिना होता, आणि तो नॉर्वेहून आल्याने चोवीस तासांत केव्हातरी उजाडणार आहे यावरच तो खूश असावा.
हाहाहा हे भारी आहे.
मस्त खुसखुशीत झालाय लेख
मस्त खुसखुशीत झालाय लेख
पहिले वाक्य वाचले आणि हेवा
पहिले वाक्य वाचले आणि हेवा वाटू लागला.
बाकी सगळा लेख, संदर्भ अगदी फारएण्ड शैलीत वाचायला मजा आली.
खास फा style लेख आहे.
खास फा style लेख आहे.
भरपूर विनोदी पखरण.
अगबाई अरेच्या पाहिला, म्हणजे तसा फार जुनाच अनुभव.
काही गोष्टी अजून बिघडत गेल्यात हे जाणवतंय.
ट्रॅफिक, प्रदूषण, ऑसी पुणेकर सोबत आता रोजगारामुळे स्थलांतरीत झालेले MH 14 आणि 12 सोबत दिसतात ते इतर शहरातले पासिंग असलेले इंच इंच लढवणारे दुचाकी स्वार.
मस्त आहेत निरीक्षणे
मस्त आहेत निरीक्षणे
पुढच्या वेळी लेखन उपक्रमाला चांगला विषय आहे. पुणे, मुंबई, आपले शहर, पहिल्यासारखे नाही राहिले..
त्या काळी प्रवासात सेलिब्रिटी दिसायचे प्रमाण जास्त असायचे कारण सामान्य लोकांना सहज परवडत नसल्याने एकूण प्रवाशांत त्यांचा टक्का आताच्या तुलनेत जास्त असावा.
तरीही कपिल देव दिसणे भारीच!
खूप मस्त निरिक्षण, माझे काही
खूप मस्त निरिक्षण, माझे काही अनुभव तत्सम आहेत, विशेषतः मुंबई- तोक्यो प्रवासातील... एअर इंडियाने... जेव्हा ती अत्युत्तम पैकी होती
एकदम फा टच लेख
एकदम फा टच लेख
भारीच लिहिलेय फारेंडराव,
भारीच लिहिलेय फारेंडराव,
इस्पेशली आमच्या सोलापूरबद्दल. म्हणजे अर्धग्रामीण सोलापूरबद्दल.
बरे सोलापूरकर इतके कूल आहेत की त्यांना अर्धग्रामीण म्हणले तरी "अब्बा, म्हणजे निम्मे लोक शहरी आहेत की, लैच झाले की बघता बघता" असे म्हणतील. वरुन "ओ बापटाण्णा तुम्ही निम्मे कसले ? " असे विचारायला कमी करणार नाहीत.
बाकी गाड्यांच्या पॅसेंजर कपॅसिटीची अराई सोलापूर जिल्ह्यात वेगळी आहे. मला एकदा माझी टू व्हीलर ३-४ महिने सोलापूरात ठेवायची होती. एकाला म्हणले तुला लागणार असेल बाईक तर वापर फक्त ट्रीपलसीट वापरायची नाही. भावड्या म्हणाला राहू दे तुझ्याकडेच, मला नको. हा बाणेदारपणा ठाईठाई आहे. स्प्लेंडर ला ३, बुलेटला ५ महिन्द्रा कमांडरमध्ये २० आणि ट्रॅक्स मध्ये ३० हि नोर्मल मिनिमम कॅपेसिटी आहे. सोलापूर विजापूर आणि सोलापूर अक्कलकोट हे खास रेसिंग ट्रॅक्स आहेत त्यांच्यासाठी.
स्फूर्तीस्थान स्पेशल पोस्टर मात्र सोलापूरच्या अलिकडे ३० कीमीवर (जेथून चटण्या भाकर्या धाबे सुरु होतात) मोहोळजवळ पाहिले असावेत. त्या गावाची खासियत आहे. एका गावात सगळी दुकाने दोनच स्फूर्ती भावंडाच्या नावाने (म्हण्ण्जे मालकी नव्हे, दुकानाचे नाव फक्त) हाही चमत्कार मी पाहिलेला आहे. ह्या भावंडांचे शारिरिक वजन रेबॅन आणि रॅडो वजा करुन ग्राममध्ये मोजावे इतपत होते.