भस्मबीज - भाग २५

Submitted by नितनवे on 8 October, 2026 - 13:24

भस्मबीज - भाग २४
एकवीस रात्रींची साधना फसल्यामुळे कल्लेश्वर थेट हल्ल्याऐवजी गुप्त डावपेच आखतो आणि कावळ्यांच्या माध्यमातून देवप्पा व अभिजितच्या हालचालींवर नजर ठेवतो. दरम्यान, अभिजितच्या साधनेत मोठा टप्पा गाठला जातो आणि भस्मशैलवर वीरशास्ताचा पूर्ण मंत्र प्रकट होऊन त्याची दीक्षा पूर्णत्वाकडे जाते; त्यानंतर देवप्पा त्याला कठोर ४१ दिवसांच्या शास्तव्रताची तयारी सांगतो. कल्लेश्वरला देवप्पाच्या मोहिनी साधनेच्या वेळी अभिजित एकटा पडतो हे समजताच तो पिशाच्चबंधनाचा मार्ग निवडतो. एकादशीच्या रात्री देवप्पा साधनेत मग्न असताना पिशाच्च यल्लाप्पा आणि रक्षकांना स्तंभित करून अभिजितला झोपेतून उचलून नेतात. शुद्धीवर आलेल्या अभिजितला आपण एका भग्न देवळात असून समोर कल्लेश्वर उभा आहे, हे भयावह सत्य दिसते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २५ - सावट
डोळ्यांसमोर अंधारी येत होती. पाठीखालची दगडी जमीन अंगाला टोचत होती. अभिजितने हात हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हात आणि पाय पाठीमागे कसल्यातरी गार, ओलसर बंधनाने जखडले होते. काळ्या धुरासारखे, बर्फासारखे गार पिशाच्चपाश, जे हालचाल करताच त्वचेला आतून कापत असल्यासारखी कळ उमटवत होते.

समोर कल्लेश्वर उभा होता. गळ्यात मुंडमाळा, अंगाला स्मशानाची ओली राख आणि चेहऱ्यावर एक अघोरी, पिसाट समाधान. त्याने हातातली ती लहान त्रिशूळवजा काठी जमिनीवर आपटली. त्या आवाजाने त्या पडक्या मंदिराच्या घुमटात वटवाघळांची फडफड झाली.
"जागा झालास, इनामदार?" कल्लेश्वरचा कर्कश आवाज घुमला. "म्हाताऱ्याच्या सावलीत फार दिवस राहिलास. तुला काय वाटलं होतं कवच पांघरून तू अमर झालास? आज तुला कोण वाचवेल?"

अभिजितने श्वास ओढून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. "तू मला मारू शकत नाहीस, कल्लेश्वर," अभिजितचा आवाज किंचित थरथरला, पण त्याने नजर खाली झुकवली नाही. "तुझी एकवीस रात्रींची साधना स्मशानात कशी मातीमोल झाली, हे मला ठाऊक आहे."

या शब्दांनी कल्लेश्वरच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणात विरले. कल्लेश्वरचे डोळे क्रोधाने लाल झाले. "गप्प बस!" तो ओरडला. त्याचा आवाज देवळाच्या भिंतींवर आदळला. "तो म्हातारा कपटी निघाला. त्याने कपटाने माझा विधी तोडला. पण आता तो नाही, त्याचा तो गरुड नाही आणि तुझे ते भस्मशैलही नाही. ही जागा माझी आहे. आज रात्री तू नग्न वेताळाच्या पायाशी बळी पडशील."
"याला नग्न वेताळाच्या पायाशी टाका" कल्लेश्वरने पिशाच्चाना आज्ञा केली.

त्या चार अंधुक, काळपट सावल्यांनी कल्लेश्वरच्या शब्दासरशी एकदम वेग धरला. गारठलेला वारा अभिजितच्या अंगाला सुऱ्यांसारखा कापत सुटला. कल्लेश्वर त्यांच्या मागोमाग चालू लागला.

देवळाच्या डाव्या बाजूला पसरलेल्या दाट झाडीत जवळ जवळ दीड-दोन मैल आत आकाशाला भिडणाऱ्या झाडांच्या घनगर्द सावलीत ती मूर्ती उभी होती. काळ्या, खडबडीत पाषाणात कोरलेला नग्न वेताळ. गळ्यात नरमुंडांची माळ, उग्र, विस्फारलेले डोळे आणि पायाखाली चिरडलेले मानवी शरीर. त्या मूर्तीच्या अंगावर पिढ्यान्पिढ्या चढवलेल्या तेलाचा काळपट थर अजूनही चिकटून होता.

पिशाच्चांनी हवेतल्या हवेत अभिजितचे शरीर उचलले आणि त्या वेताळाच्या चरणांपाशी फेकले. दगडी जमिनीवर आदळताच अभिजितच्या पाठीतून कळ निघाली. तो आघात इतका जबर होता की काही क्षणांसाठी अभिजितचा श्वासच कोंडला.

वेताळाच्या मूर्तीच्या पाषाणातून जणू एक सुन्न करणारी कंपने उमटत होती. पायाखालची जमीन बर्फासारखी थंड पडली होती. त्या मूर्तीच्या पायाशी साचलेली जुनी, वाळलेली राख अभिजितच्या हातापायांना चिकटू लागली.

"तिथेच! त्या वेताळाच्या पायाशी पडून राहू दे या इनामदाराला. ज्या जागेने शेकडो बळी पचवले, त्या जागेला आज या रक्षककुळाच्या रक्ताची चव मिळू दे!"

पिशाच्चांनी अभिजितभोवती पुन्हा एक गोल कडे केले. ती मान वेळावून, दात विचकत खाली बघत राहिली.

कल्लेश्वरने जवळच्या पाषाणावर ठेवलेली कवटी उचलली. आतले काळपट रक्त थेंब थेंब खाली पडत होते. त्याने जमिनीवर आधीच काढलेल्या एका मोठ्या चक्राभोवती ते रक्त शिंपडायला सुरुवात केली. आजूबाजूला उभी असलेली ती चार पिशाच्चे मान वेळावून त्या रक्ताकडे बुभुक्षित नजरेने बघत होती.

अभिजितने डोळे मिटले. देवप्पाचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. 'मंत्र माहीत असणं आणि सिद्ध असणं यात फरक आहे... हे व्रत तुझ्या मनाला तयार करायचं साधन आहे... स्वतःवर विश्वास ठेव.'

त्याला आठवली ती संध्याकाळ. अंगणात दिव्याच्या मंद प्रकाशात त्या पाषाणावर उमटलेली सोन्याच्या रंगाची अक्षरे.

त्याचे ओठ सावकाश हलू लागले. कल्लेश्वर मंत्रोच्चारणात मग्न असताना अभिजितने आपल्या अंतर्मनात श्वास रोखून धरला.

ॐ हं पं रं क्ष्रौं कौं सं खं हरिहरपुत्राय नमः।
ॐ वीरशास्ते महाशक्तये रणरङ्गोद्धुरेशाय नमः॥

पहिल्या आवर्तनाबरोबर त्याच्या शरीरातून सूक्ष्म ऊब बाहेर पडली. गारठलेल्या रक्ताला पुन्हा गती मिळाली. त्याच्या मनगटाला आवळलेले ते काळे पाश किंचित सल झाले, जणू त्यांना अग्नीचा चटका बसला होता. एका पिशाच्चाने घाबरून मागे पाऊल टाकले.

कल्लेश्वरचे लक्ष चक्रावरून उडाले. त्याने संशयाने अभिजितकडे पाहिले.

"काय पुटपुटतोयस?" कल्लेश्वर पुढे सरसावला. "इथे तुझा कुठलाही मंत्र चालणार नाही!"

इकडे यानात, देवप्पाच्या अंगणातला दिवा शेवटची फडफड करून विझला.

मध्यरात्रीचा प्रहर उलटला होता. देवप्पाने डोळे उघडले. साधना संपवून जेव्हा त्याने पाठीमागे पाहिले, तेव्हा त्याला हवेत काहीतरी चुकल्याची भयानक जाणीव झाली. रात्रीचा नेहमीचा नैसर्गिक गारवा गायब होता; त्याऐवजी एक सडका, कुबट दर्प अंगणात रेंगाळत होता.

"यल्लाप्पा!" देवप्पाने हाक मारली.

काहीच उत्तर आले नाही.

देवप्पा ताडकन उठला आणि झोपडीच्या दाराकडे धावला. दारात यल्लाप्पा आणि त्याचे दोघे रक्षक पुतळ्यासारखे उभे होते. डोळे सताड उघडे, चेहरे पांढरेफटक पडलेले, हातातील भाले तलवारी हवेतच थिजलेले.

"स्तंभन!" देवप्पा स्वतःशीच पुटपुटला. त्याने पटकन झोळीतून चिमूटभर विभूती काढली आणि यल्लाप्पाच्या कपाळावर चोळत फुंकर मारली.

एका क्षणात तो भार तुटला. यल्लाप्पा धाडकन गुडघ्यांवर कोसळला, श्वास घेण्यासाठी त्याची छाती वर-खाली होऊ लागली.

"देवप्पा... आत... आत काहीतरी शिरलं होतं..." यल्लाप्पा घोगऱ्या आवाजात ओरडला.

देवप्पा आतल्या खोलीत धावला. खोली रिकामी होती. अभिजीतचे अंथरुण रिकामे होते, जमिनीवर काळ्या राखेच्या बारीक रेषा उमटल्या होत्या.

"पिशाच्चबंधन!" देवप्पाचे हात रागाने थरथरले.

यल्लाप्पाने कसाबसा उभा राहत विचारले, "आता काय करायचं, देवप्पा? अभिजित त्या अघोरीच्या हातात सापडलाय."

देवप्पाने भस्मशैल आणि भिंतीवर अडकवलेली काठी हातात घेतली.

"यल्लाप्पा, हातात मशाली घ्या. आज त्या जंगलाची सीमा ओलांडावी लागेल."
************************************************************************************************************************
सुपे गावातील जुना वाडा रात्रीच्या अंधारात निद्रिस्त होता.

पण वाड्याच्या माजघरात झोपलेली अनन्या अचानक जागी झाली.

तिने डोळे उघडले. खोलीत अंधार होता, पण तिची नजर सरळ खिडकीबाहेर लागली होती. स्वाती शेजारीच गाढ झोपली होती. अनन्या हळूच उठली, पावलांचा आवाज न करता ती खिडकीपाशी गेली.

तिचे दोन्ही हात खिडकीच्या लाकडी गजांवर घट्ट आवळले गेले. तिचे डोळे नेहमीसारखे साधे नव्हते; त्यात एक खोल, जागी झालेली जाणीव तरळत होती.

खिडकीबाहेरच्या झाडावर, अंधारात बसलेला एक कावळा मान तिरकी करून तिच्याकडेच पाहत होता. त्याचे डोळे लालसर चमकत होते.

अनन्याने त्या कावळ्याकडे रोखून पाहिले. चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती. उलट तिचे ओठ किंचित हलले, अत्यंत हळू आणि थंड आवाजात ती स्वतःशीच बोलली, "वेळ भरत आलीय."

आणि पुढच्याच क्षणी, झाडावरचा तो कावळा घाबरून फडफडत अंधारात पळून गेला.
************************************************************************************************************************
कल्लेश्वरच्या हातातील त्रिशूळ जमिनीवर पुन्हा एकदा आदळला.

"काय पुटपुटतोयस?" कल्लेश्वरने पुढे सरसावत विचारले. त्याचे डोळे अभिजितच्या ओठांच्या हालचालींवर खिळले होते.

अभिजितने उत्तर दिले नाही. त्याने फक्त डोळे मिटून घेतले. त्याच्या अंतर्मनात तो मंत्र विजेसारखा धावत होता:

ॐ हं पं रं क्ष्रौं कौं सं खं हरिहरपुत्राय नमः।
ॐ वीरशास्ते महाशक्तये रणरङ्गोद्धुरेशाय नमः॥

दुसऱ्या आवर्तनासोबत त्याच्या शरीराची उष्णता अधिक तीव्र झाली. अभिजितच्या शरीराभोवती असलेल्या काळपट धुराच्या पाशांवर परिणाम करू लागली. क्षणात चर्र असा आवाज झाला. जळणाऱ्या मांसासारखा वास हवेत पसरला. कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका पिशाच्चाने डोके धरून किंकाळी फोडली. ते सावलीसारखे रूप मागे सरकले आणि भिंतीत विरून जाण्याचा प्रयत्न करू लागले.

कल्लेश्वरने वेळ न दवडता जमिनीवरची ती कवटी उचलली. आतले काळे, घट्ट रक्त त्याने हातावर ओतले आणि समोरच्या हवेत उधळले.

ॐ ह्रौं वेतालाय उग्ररूपाय नमः।
नग्नदेहाय श्मशानवासिने, भूतप्रेतपिशाचाधिपतये,
हुं फट्! स्वाहा॥”
उधळलेले ते रक्त हवेत तरंगू लागले. उरलेली तीन पिशाच्चे त्या रक्ताच्या वासाने पिसाळल्यासारखी पुढे झेपावली. त्यांचे लांबट, नख्यांसारखे हात अभिजितच्या गळ्याच्या दिशेने सरसावले. थंडगार हवेचा झोत अभिजितच्या श्वासात शिरला. त्याचे फुप्फुस गारठू लागले.

त्याच क्षणी एक काळसर धातूची काठी विजेच्या वेगाने आत फेकली गेली. ती काठी सरळ जमिनीवर आदळली आणि तिच्या टोकातून निळ्या रंगाची ठिणगी उडाली. त्या ठिणगीचा स्पर्श होताच जमिनीवर कल्लेश्वरने आखलेले रक्ताचे चक्र मधोमध दुभंगले.

"कल्लेश्वर!"

प्रवेशद्वारातून एक धीरगंभीर, थरथरणारा पण वज्रासारखा कडक आवाज घुमला.

देवप्पा उभा होता. अंगावर फक्त एक जुने वस्त्र, हातात जळती मशाल आणि डोळ्यांत प्रलयंकारी तेज. त्याच्या मागे यल्लाप्पा आणि दोन्ही रक्षक हातात भाले रोखून उभे होते.

देवाप्पाने भस्मशैल अभिजितकडे फेकले, अभिजितने ते मुश्किलीने झेलले आणि छातीशी कवटाळून धरले.

कल्लेश्वर मागे सरकला. "म्हातारा आलाच अखेर! पण उशीर झालाय, देवप्पा. तुझ्या या शिष्याचा श्वास या पिशाच्चांच्या मुठीत आहे. एक पाऊल पुढे टाकलंस तर त्याचा घास घेतला जाईल."
देवप्पाने शांतपणे पाऊल पुढे टाकले. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता.

"पिशाच्चांना तू बांधले आहेस, कल्लेश्वर. हे स्थान कोणाचे आहे हे विसरलास?" देवप्पाने मशालीचा उजेड बाजूच्या महाकाय पाषाणावर टाकला. त्या पाषाणात उग्र भैरवाची मूर्ती कोरलेली होती.
"हे क्षेत्र सात्विक भैरवाचे आहे," देवप्पा म्हणाला. "तू स्मशानाची घाण इथे आणून या जागेचा अनादर केलास. आता... फळ भोगायला तयार राहा."

देवप्पाने झोळीतून एक पांढरे शंख काढले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या शंखावर ओठ टेकवले. एक खोल, भेदक नाद त्या भग्न देवळात घुमला. तो नाद सामान्य नव्हता. शंखाच्या आवाजाबरोबर अभिजितभोवती घुटमळणाऱ्या त्या पिशाच्चांचे नियंत्रण कल्लेश्वरच्या हातातून सुटले.

पिशाच्चे स्वतःचे कान गच्च धरून किंचाळू लागली. त्यांचे धुरकट आकार विस्कटले. ज्या रक्तावर कल्लेश्वरने त्यांना बोलावले होते, ते रक्त आता त्या शंखाच्या पवित्र कंपनाने जमिनीवर सुकू लागले होते.

"अभिजित!" देवप्पाने शंख बाजूला करत मोठ्याने हाक मारली. "उठ! कवच जागे कर! हाच तो क्षण आहे!"

अभिजितला जणू संजीवनी मिळाली. गारठलेले शरीर ताठ झाले. त्याने छातीवरचा हात सैल केला आणि डोळे उघडून थेट समोर उभा असलेल्या कल्लेश्वरच्या डोळ्यांत पाहिले.

त्याच्या तोंडातून मंत्राचा शेवटचा भाग विजेसारखा कडाडला:

"ॐ वीरशास्ते महाशक्तये रणरङ्गोद्धुरेशाय नमः!"

भस्मशैलातून एक प्रचंड सुवर्ण-तांबूस लाट उसळली. ती लाट इतकी वेगवान होती की तिने अभिजितला जखडून ठेवलेले काळे पाश एका झटक्यात भस्म करून टाकले. तुटलेल्या पाशांचे ठिणग्यांमध्ये रूपांतर झाले.

त्या लाटेचा थेट तडाखा समोर उभ्या असलेल्या कल्लेश्वरच्या छातीवर बसला. कल्लेश्वर हवेत उडाला आणि मागच्या पाषाणावर आदळून खाली कोसळला.

हातातला त्रिशूळ निसटून दूर पडला.

"नाही... हे अशक्य आहे..." कल्लेश्वर जमिनीवर धडपडत मागे सरकू लागला.

"तुझा खेळ संपला, कल्लेश्वर," देवप्पा शांतपणे म्हणाला.

पण जमिनीवर पडलेला कल्लेश्वर अचानक विचित्रपणे हसू लागला. त्याच्या दातातून रक्त वाहत होते, तरीही त्याच्या चेहऱ्यावर पराभवाची खंत नव्हती; एक राक्षसी आनंद होता.

"खेळ संपला?" कल्लेश्वरने मान वर करून देवप्पाकडे पाहिले. "सुपे गाव!" कल्लेश्वर खोकत हसला.

देवप्पाच्या कपाळावर एकदम आठ्या पडल्या. "काय बडबडतोयस?"

"या इनामदाराच्या पोरी मागे मी आधीच काहीतरी पाठवून दिले आहे."

देवप्पाचा चेहरा क्षणात पांढराफटक पडला.

अभिजित ताडकन पुढे झाला. "अनन्या? तू माझ्या मुलीला काय केलंस?"

कल्लेश्वरने डोळे मिटून घेतले आणि मोठ्याने हसायला सुरुवात केली.

कल्लेश्वरच्या तोंडून ते शब्द बाहेर पडताच अभिजितच्या अंगातले रक्त गोठल्यासारखे झाले. त्याच्या डोळ्यांसमोर अनन्याचा तो शांत, निरागस चेहरा तरळला.

"तू खोटं बोलतोयस!" अभिजित संतापाने ओरडला. त्याने पुढे जाऊन कल्लेश्वरची मान पकडण्याचा प्रयत्न केला, पण देवप्पाने त्याचा हात घट्ट पकडून मागे खेचले.

"अभिजित, थांब!" देवप्पाचा आवाज धारदार होता. "त्याच्या जाळ्यात अडकू नकोस. हा तुझा संताप पेटवून तुझ्या मंत्राची ऊर्जा नष्ट करू पाहतोय."

देवप्पाने जमिनीवर निपचित पडलेल्या कल्लेश्वरकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांतील क्रूर हास्य मिटले नव्हते.

"यल्लाप्पा!" देवप्पाने तातडीने हुकूम दिला. "याला झाडाला बांधून ठेवा. भोवती रक्षा-भस्माचे वर्तुळ आखा. जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत याच्या अंगावरचे कपडे किंवा गळ्यातल्या माळांना हात लावू नका."

यल्लाप्पाने तात्काळ दोन्ही रक्षकांना सोबत घेऊन कल्लेश्वरला आवळायला सुरुवात केली. पण अचानक त्यांच्यासमोर एक काळी पोकळी निर्माण झाली आणि त्यातून कल्लेश्वर क्षणात दिसेनासा झाला.

पहाटेची थंड, ओलसर हवा सुटली होती, पण त्या हवेतही यानाच्या जंगलाचा ताण भरून राहिला होता.

"देवप्पा, माझी पोर धोक्यात आहे," अभिजितचा कंठ दाटून आला होता. "मी आताच्या आता सुप्याला निघतो."

शांत हो, अभिजित," देवप्पाच्या चेहऱ्यावर अतिशय गंभीर भाव होते. "सुपे इथून शेकडो मैल दूर आहे. तू गाडी घेऊन निघेपर्यंत संध्याकाळ उलटून जाईल. आणि कल्लेश्वरने जर तांत्रिक बीज पेरले असेल, तर गाडीच्या वेगाने तू त्याला पकडू शकत नाहीस. आधी धोका नेमका काय आहे, हे ओळखावे लागेल."

देवप्पाने त्याला थांबवून समोर बसवले. "मला सांग, सुपे गावात पोहोचण्याआधी अनन्येत काही बदल दिसत होता का?"

अभिजितला स्वातीचे ते शब्द आठवले जे तिने प्रवासाला निघण्यापूर्वी फोनवर सांगितले होते. "स्वाती म्हणाली होती ती अचानक शांत झालीय. कसलीच चिडचिड नाही, खिडकीबाहेर शून्यात बघत बसते. आणि... आणि नेहा म्हणाली होती तिच्या डोळ्यांत कसलीतरी विचित्र चमक दिसते."

देवप्पाच्या कपाळावरच्या आठ्या अधिक गडद झाल्या. "म्हणजे संशय खरा आहे. कल्लेश्वरने यापूर्वी जेव्हा अभिजितच्या कुळाचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याचा काही अंश त्या घराच्या जागेत आणि विशेषतः अनन्याच्या कोवळ्या चेतनेत अडकून पडला होता.

"मग उपाय काय? माझी पोर वाचेल कशी?"
************************************************************************************************************************
पहाटेचे चार वाजले होते. वाड्याच्या माजघरात अजूनही अंधार पसरला होता. खिडकीची तावदाने थंड हवेने हळूच वाजत होती.

स्वातीला अचानक थंडी वाजून जाग आली. तिने अंगावरची चादर नीट ओढून घेतली आणि बाजूला पाहिले.

अथर्व गाढ झोपेत पाय चोळत पडला होता. पण अनन्याच्या जागी फक्त चुरगळलेली चादर होती.

स्वातीच्या काळजात एकदम धडधडले. ती उठून बसली. "अनन्या?" तिने हळू आवाजात हाक मारली. काहीच उत्तर आले नाही.

स्वाती पटकन उठली आणि तिने खोलीचा दिवा लावला. खोली रिकामी होती. दाराची कडी आतून निघालेली होती आणि दार किंचित उघडे होते.

स्वातीचे पाय थरथरू लागले. ती तडक बाहेरच्या पडवीत आली. वाड्याचा जुना लाकडी जिना खाली उतरून ती अंगणात पोहोचली. पहाटेच्या दाट धुक्यात संपूर्ण अंगण पांढरट दिसत होते.

आणि त्या धुक्यात, अंगणाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या जुन्या विहिरीच्या काठावर एक आकृती उभी होती. अनन्या.

अंगात तोच रात्रीचा पांढरा नाईट ड्रेस, केस मोकळे सुटलेले. ती विहिरीच्या काठावर अत्यंत सहजतेने उभी होती, जिथे तोल जाण्याची थोडी जरी चूक झाली असती तरी खोल पाण्याचा तळ गाठला असता.

"अनन्या!" स्वातीच्या घशातून किंकाळी फुटणार होती, पण तिने भीतीने तोंड दाबले. जर पोर दचकली, तर सरळ विहिरीत कोसळेल.

स्वातीने थरथरत्या पावलांनी पुढे सरकायला सुरुवात केली. "बाळा... खाली उतर... आईकडे बघ..."

अनन्याने मान वळवली. धुक्यातून तिचा चेहरा स्पष्ट झाला. तिच्या डोळ्यांत भीती नव्हती, झोपेची सुस्ती नव्हती. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या पूर्णपणे विस्फारल्या होत्या, आणि त्या बाहुल्यांमध्ये समोरच्या काळोखाचे प्रतिबिंब लालसर रंगात चमकत होते.

तिच्या ओठांवर एक अत्यंत थंड, परके हास्य उमटले.

"आई," अनन्याचा आवाज तिच्या नेहमीच्या आवाजासारखा नव्हता. तो आवाज जड, प्रौढ आणि खोल विहिरीतून आल्यासारखा घुमला. "बाबांना सांग... आता धावून काही उपयोग नाही. वेळ संपली आहे."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे...
अभिजीत सुटला तर त्याची लेक अडकली...

अरे बापरे
लेकीला काही झालं नाही पाहिजे
मला तर वाटतंय तीच देवी माता बनून ह्या दुष्टाच्या संहाराला मदत करेल

अरे बापरे...
लेकीला काही झालं नाही पाहिजे
मला तर वाटतंय तीच देवी माता बनून ह्या दुष्टाच्या संहाराला मदत करेल > मलाही तेच वाटतेय ....नितीन जी आता अजून वाट पाहायला लावू नका . उत्सुकता वाढत चालली आहे .

हे बिंज रीडींग करायचेच रहाते.आजकाल अटेन्शन स्पॅन फार नगण्य झालेला आहे. त्यामुळे सलग वाचता येत नाही. मग लिंक तुटते.

प्रत्येक भागात नवीन twist येतोय.
वार - प्रतीवर खेळीचा थरार कायम राखला आहे कथेत.
इतर भयकथा, भूतकथे पेक्षा हि कथा वरचढ वाटते.
पात्र आणि प्रसंगात वाचकाना गुंतवून ठेवण्यात लेखक प्रत्येक भागात यशस्वी होत आहेत.
पुढे काय होणार ह्याची उत्सुकता तर आहेच

नवीन प्रतिसाद लिहा