सफर ग्रँड कॅनियनची: Part 3 – West Rim – The Western Wonder!

Submitted by AD75 on 7 October, 2026 - 00:52

सफर ग्रँड कॅनियनची: भाग 2: The Thrilling Tuweep! https://www.maayboli.com/node/89061
Pictures: https://photos.app.goo.gl/qFEXeMLcbibqYMb99

(टिप: हे लिखाण वाचताना वर दिलेल्या फोटो लिंक वर टिचकी मारा, फोटो बाओबर तुम्हाला हा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि त्याचा आनंद द्विगुणित होईल. हे प्रवासवर्णन फोटोंना अनुसरूनच लिहिले आहे, ज्यामुळे प्रत्येक ओळीतील प्रसंग तुम्हाला थेट फोटोशी जोडता येईल.)

ग्रँड कॅनियन दर्शनाचा दुसरा दिवस उजाडला. एका काळ्या रंगाची भलीमोठी बस मला न्यायला आली होती. आज माझा ग्रँड कॅनियनच्या वेस्ट रिमचा टुर होता. आजचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं हेलिकॉप्टर राईड. आणखी तीन-चार हॉटेल्समधून काही मंडळी बसली. चालकाने आधीच सांगितले की थोड्याच वेळेत आपण दुसऱ्या बसमध्ये बसणार आहोत. थोड्याच वेळात एका कॉम्प्लेक्समध्ये बस शिरली, उतरून एका हॉलमध्ये जमा झालो. इतक्यात एक सुटा-बुटातला चकाचक असा माणूस बाहेर आला. त्याच्या कमरेला किल्लीचा भला मोठा झुपका लागला होता, त्या झुपक्यानी माझं लक्ष वेधलं. त्यांनी मोठ्यानी वेलकम करून सगळ्यांना आकृष्ट केलं. त्याच्या संभाषणकलेबद्दल मी काहीच बोलत नाही कारण ते उत्कृष्ट होते व हे अमेरिकेत नवीन नाही. आमचं साऊथ रिम व वेस्ट रिम असे वर्गीकरण झाले. सुरवातीला बस बदलणार म्हणजे गडबड-गोधळ-भांडण असं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहील पण यापैकी काहीच झालं नाही उलट यांच्या नियोजन व व्यवस्थापन कौशल्या बद्दल कौतुक करावंसं वाटलं!
वेस्ट रिमच्या रांगेत मी सर्वप्रथम उभा होतो. माझ्या मागे एक साठीकडे झुकलेलं अमेरिकन जोडपं. मिळालेल्या सूचनांप्रमाणे मी माझं ई-तिकीट घेऊन त्या काउंटरवर गेलो. ई-तिकीट व १० डॉलर दिले मला इथेच हेलिकॉप्टरचे, बसचे आणि जेवणाचे कुपन्स मिळाले शिवाय लाल व नारंगी असे दोन स्टीकर टी-शर्टवर लावायला सांगितले. साऊथ रिमचा बस स्टॉप वेगळा व वेस्ट रिमचा वेगळा. इथेच चहा-नाश्त्याची सोय होती, केक व ज्युस पितांना माझ्या शेजारी अमेरिकन जोडप आलं. बुवांनी माझ्या टी-शर्टवर नारंगी स्टीकर बघितलं (नारंगी म्हणजे हेलिकॉप्टर राईड व लाल म्हणजे वेस्ट रिम) आणि मला विचारलं की तू हेलिकॉप्टर राईड करतो आहे का? मी पण आपलं अमेरिकन स्टाईल मध्ये "Oh yeah" असं म्हटलं. इतक्यात बस तयार आहे असं सांगण्यात आलं. मी बसकडे निघालो जोडपं कुठेतरी भलतीकडेच गेलं. पुन्हा थोड्यावेळाने बसमध्ये अमेरिकन जोडप माझ्या शेजारच्या सीटवर आलं. म्हातारा मला हाताने हेलिकॉप्टर वाले स्टीकर दाखवू लागला आणि म्हणाला "We are with you" मी पण "Oh I see, my pleasure, I will enjoy your company" करत हंसलो. म्हातारा-म्हातारी चांगले होते. आमचा डबलडेकर A/C कोच होता. तो अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त होता हे वेगळं सांगायला नको. माणसांची गिनती झाली, ok झालं व बस निघाली.
जाता जाता बस हुव्हर डॅमवरून जाणार होती. कोलोरेडो नदीवर बांधलेले हे एक मोठे धरण आहे, Engineering marvel!. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये हा बघायला मिळतो.
रोज नवनवीन देशोदेशीचे लोक मला शेजारी म्हणून लाभत होते. आज फिलिपिन्समधील कॅलिफोर्नियात सेटल झालेली बाई शेजारी होती. याच बाईंनी मला “तू सिडोना पाहिलं आहेसं का? “ असा प्रश्न केला होता आणि मी नकारार्थी मान डोलवल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव अरे ये PSPO नही जानता सारखे होते. या प्रसंगामुळे सिडोना काय भानगड आहे? असा किडा माझ्या डोक्यात शिरला व रोड आयलँडला घरी गेल्यावर मी प्रथम सिडोना शोधून काढले. पुढे 2018 ला या सीडोनाचे दर्शन घेत बाबांना Grand Canyon दाखवायला घेऊन गेलो. असो! पुन्हा खुरटं जंगल, निर्जन-ओसाड माळरान, दूरवर दिसणारे डोंगर असं करत आम्ही एका छोट्या रेस्तरामधे पोहोचलो इथे परत बस बदलायची होती. कारण पुढचा रस्ता कच्चा होता त्यावर हा डबलडेकर कोच जाणार नाही. इथे आम्हाला परत सूचना मिळाल्या की ज्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसहायचे आहे त्यांनी प्रथम ते उरकून घ्यावे. सगळ्या सूचना इतक्या उत्तम होत्या की गडबड-घोटाळ्याला काही वावच नव्हता. इथून निघालो ते बस थेट जंगलातच घुसली. आमच्या नागपूर जवळच्या नागझिरा जंगलाची आठवण झाली. करता करता वेस्ट रिम व्हिझीटर सेंटरला पोहोचलो. हेलिकॉप्टरच्या खिडकीवर जाऊन नाव सांगितले. हेलिकॉप्टरचा नंबर देण्यात आला. मग एक जण आम्हाला हेलिकॉप्टरच्या दिशेने घेऊन गेला. इथेच माझी एका फ्रेंच माणसाशी ओळख झाली. एका वेळी ५-६ चाॅपर वेगवेगळ्या तळांवरून उडत होती. करता करता आमचीही वेळ आली….

Pictures: https://photos.app.goo.gl/qFEXeMLcbibqYMb99

“मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो आहे. हळूहळू ते तळाला वळसा मारून वर भरारी घेतं आहे. अख्खी कॅनियन दिवाळीच्या फराळाच्या ताटलीसारखी माझ्या पुढ्यात आहे, वाटलं दांडेकर पुख्खा झोडून घ्या! हेलिकॉप्टरची सावली दरीत पडली आहे. डोळ्यांसमोर कॅनियनचा पाच-सात कि.मी. चा विस्तीर्ण परिसर आहे. डोंगरांचे सुळके आभाळाला भिडले आहे.
लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. नाही,
लिंगोबाचे डोंगरं आभाळी गेले
काही डोंगर पिरामिड सारखे भासतात आहेत, कुठे पिवळट, कुठे मातकट तर कुठे लाल रंग. त्या डोंगरांच्या विशाल कड्यांना वळसे घालत हळूहळू हेलिकॉप्टर खाली येतं. जगातले हे आश्चर्य बघायला मिळाल्यामुळे धन्यता मानतो, Thank you Baba! काही कडे तर अक्षरशः रायगड परिसरासारखे दिसतात आहे. मग खाली उतरलो. आकाशाकडे मान वर करून बघतो कॅनियनच्या असंख्य कपाऱ्या दिसतात, नेढं दिसतात. छाताडावर येणारे ते उंच डोंगर पाहिले तर छातीत धस्स झाल्याशिवाय राहात नाही. मग माझ्या सकट सगळी मंडळी बोटीकडे धाव घेतात. कोलोरॅडो माईचे जवळून दर्शन होतं. पाचशे फुटाचे रुंद पात्र आहे, रंग मातकट-हिरवा, पाण्याला प्रवाह आहे, चांगली गती आहे. कालचा उथळ वाटत होता. कालही ट्युवीपला कोलोरेडोमाई बघितली. कालची वेगळी, आजची वेगळी आहे. तसेच कालची कॅनियन पण वेगळी. समोरचा डोंगर चांगलाच उंच आहे, पाच हजार फूट, उंचीची तर स्पर्धाच लागली आहे सगळे च डोंगर मी-मी म्हणतात आहे. डावं कोण, उजवं कोण? ठरवणं कठीण.

नायगारात प्रचंड पाण्याचं वैभव बघीतलं, Vermont, न्यू हॅम्पशायर मध्ये फॉल सिझनमध्ये रंगांची उधळण बघीतली, वॉशिंग्टन शहरात लोकशाहीचे वैभव पाहीलं, बॉस्टन शहर इतिहासाच्या प्रवाहांनी भरलं आहे. काल-आज हे तांबडं -लाल पण कोरड वैभव बघतो आहे. पण हे अतुल्य आहे. Just Incredible!”

आजूबाजूचा परिसर न्याहाळताना असं लक्षात आलं की इथल्या दगड-धोंड्यांचं इथल्या वातावरणामुळे एक विशेष प्रकारची झीज झाली (weathering) त्यांच्या फरश्या पडल्या आहेत. थेट अंबाझरी तलाव आठवला, अंबाझरीला आणि आजूबाजूच्या परिसरातल्या दगडांकडे पहिलं तर त्यांचीही झीज झाल्याचं लक्षात येतं, त्या प्रकारची झीज Spheroidal Weathering प्रकारात मोडते. Geology Gyaan! आमच्या देशात असं काही असतं तर, परिसराचे निसर्ग सौंदर्य गेलं चुलीत पहिले फरश्यांचे कारखाने निघाले असते. मग निसर्गाचा -हास झाला म्हणून २०-२० वर्ष कोर्टात फुकाच्या केसेस झाल्या असत्या आणि निष्पन्न 'शून्य'. नदी किनाऱ्याला Good Buy केलं.
“पुन्हा हेलिकॉप्टरच्या खिडकीतून डोकवतो आहे, आध्यास्यासारखा! काय करू समाधानच होत नाही. उंची प्रचंड, कडे महाकाय. या सगळ्यामध्ये पावसाच्या पाण्यानी स्वतःतः साठी केलेल्या वाटा लक्ष वेधून घेतात. थोड्याच वेळेत हेलिकॉप्टर सकट मी सर्वदृष्टिनी परत जमिनीवर येतो. आयुष्याच्या पडद्यावर गेल्या ४० मिनिटांपासून सुरू असलेला Grand Canyon - West Rim - The Western Wonder!” चित्रपट संपतो.”

मग फ्रेंच माणसाबरोबर रॅंच या ठिकाणी गेलो. रॅंच म्हणजे Good, Bad, Ugly किंवा For a Few Dollars More याची आठवण करून देणारे Cow Boy चे छोटे पण दुमदार गाव. इथे जेवणाची सोय होती (Indian style म्हणजे Native American स्टाइलचे जेवण). टॅमॅटो सूप, उकडलेले बिन्स, एक पाव, एक मफिन (केक). बिन्स म्हणजे श्रावण घेवडा, खरतर हा प्रकार माझ्या घश्याखाली उतरत नाही पण कॅनियनची जादु आणि भूक ते मी चविन खाल्लं. मग दोन ग्लास ज्युस पिऊन मी तृप्त झालो. फ्रेंच माणसाशी बोलताना कामाचा विषय निघाला. मी त्याला सांगितले की मी 'टाटा' कंपनीत काम करतो तर तो चटकन म्हणाला अरे तीच कंपनी जीन ती छोटी कार बनवली आहे, मी म्हटलं 'नॅनो'? तो म्हणाला “हो”. मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आपल्या देशाची ही ओळख किती छान आहे!
मग बसने आम्ही Eagle Point कडे निघालो. बस ड्रायव्हर चक्क बाई होती. तीनं इगल पॉइंट दाखवला. समोरचा भला थोरला डोंगर अजब पसरला आहे, या अंगाकडून त्या अंगापर्यंत त्याच्या मधोमध गरुडाचं शरीर दिसतं, डोकं दिसतं आणि ते दोन्ही डावे-उजवे डोंगर म्हणजे त्याचे पंख!
या इगल पॉइंट समोर Sky Walk बांधला आहे. इंग्रजी 'U' आकाराचा पूल बांधला आहे. त्याची जमीन म्हणजे कांच, त्यातून आरपार दिसत, पार 2000-3000 फूट खोल. याचं तिकीट आहे ते वेगळं मनगटाला बांधायला सकाळीच मिळालं होतं. माझ्या प्रवास खर्चात हे समाविष्ट होतं. या कड्यावर चालायचा काही वेगळाच अनुभव आहे. उंची मुळे थोडी भीती वाटते, आपण उगाचच हळू चालतो, किंवा रंगतो. समोरच दृश्य फारच लोभसवाणं आहे.
“नजरेच्या समोर ते क्षितिजापर्यंत कॅनियनच्या एका पाठोपाठ एक अशा रांगा आहेत. निसर्गाची जादू, थोडं आभाळ आहे त्यामुळे सुळक्यावरच प्रकाश पडला आहे बाकीच्या भागावर सावली आहे हे दृश्य काही वेगळं आहे. आजूबाजूच्या लोकांना त्या डोंगर कपारीत कुठे हरीण तर कुठे मोर तर कुठे कुत्र्याचा आकार दिसतो आहे. पण मला केवळ ग्रँड कॅनियन दिसते आहे.”
पुढचा गियानो पॉइंट उरकला. पण कॅनियन पाहताना मी वेळेचं भान विसरलो, थोडा उशिरा पोहोचलो, सगळी बस खोळंबली होती. बसमध्ये शिरताच मी सगळ्यांना म्हटलं "Ooh, the whole bus is waiting for me? I am very sorry." सगळी मंडळी हसली. ड्रायव्हरनी ही हसून स्वागत केलं, त्यालाही sorry म्हटलं "Oh, its ok!" करत तोही बस हाकू लागला.

Coming Up Next & concluding
The Spectacular South Rim – The Beginning!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ AD75

वाचतोय. छान लिहिताय तुम्ही. पुढचेही सर्व भाग वाचणार.

फोटो डकवले तर जास्त चांगले. निसर्गाचा चमत्कार आणि भव्यता नीट समजेल वाचकांना.

पु भा प्र

Thank you!
फोटोची लिंक दिली आहे. Inserting photo is very undeveloped on this site.
I could not figure it out.