कवडसा

Submitted by Meghvalli on 26 September, 2026 - 08:05

तावदानीतून प्रकाशाचा एक तिरपा कवडसा आला,
सकाळी मी भेटलो नाही, म्हणून बहुधा चालून आला।
मी उठलो की नाही, हेच पाहायला आला असेल,
निजल्या सकाळीला हलकेच जागवायला आला असेल।

त्याच्या मागे अगणित त्रसरेणू अनाहूत शिरले घरात,
तोच त्यांना घेऊन आला, कुठल्या वाटेने, कुणास ठाऊक आत!
काय त्याचा धिटपणा, न विचारता आत आला,
उपटसुंभासम शिरला, पाहुणे अनोळखी घेऊन आला।

कवडसा जरा रेंगाळला, भिंतीवरून सरकत गेला,
जणू घरभर फिरून पाहत, कोपरा न् कोपरा धुंडाळत गेला।
कोण कुठे झोपले अजुनी, कुणाची जागायची वेळ,
कुणाच्या पापणीवर अजुनी, स्वप्नांचा रेंगाळे खेळ।

त्रसरेणूंना नव्हती घाई, ते तरंगत राहिले तिथे,
त्याच्या अंगाखांद्यावर, जणू घरच होते त्यांचे तिथे।
जणू त्यांचाच संसार होता, त्यांचीच होती वस्ती,
त्या एका कवडशावर जणू, त्यांचीच अढळ सत्ता होती।

मी म्हणालो मनाशी—ह्याला हाकलावे की करावे स्वागत?
अनोळखी पाहुण्याला शेवटी, आपलेसे करावे कदाचित?
तोवर तो डोकावून गेला, टेबलावरच्या पेल्यात,
चहाची वाफ उठून आली, विसावली त्याच्या अंगात।

आणि मग कवडसा अन् वाफ, दोघे एकरूप झाले,
प्रकाश आणि ऊब क्षणभर, एकमेकांत विरघळले।
आता प्रश्न एवढाच उरला, उत्तर मात्र सापडेना—
चहा आधी गार झाला, की उजाडणे थांबले जरा?

शनिवार, २६/९/२६ , ५:०५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! आवडली.
त्रसरेणू म्हणजे धूलीकण ना? धूळीचे कण?

त्रसरेणु प्राचीन भारतीय (वैदिक और पौराणिक) दर्शन, भौतिकी तथा समय की माप (काल गणना) में उपयोग होने वाला एक अत्यंत सूक्ष्म कण या माप है
हे माहीत नव्हते.