माझा पहिला विमानप्रवास- Abuva

Submitted by Abuva on 26 September, 2026 - 01:02

बावचळलेला मी, ही एकच प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते, माझ्या पहिल्या विमान प्रवासाची. पहिलाच प्रवास आणि तोही परदेश प्रवास. त्यापूर्वी अखंड खानदानात कुणी परदेशात गेलं नव्हतं. त्यामुळे अप्रूप होतंच. पण नशिबाचे फासे सुलटे पडल्यानं आज विमानतळावर उभा तर होतो.

या गोष्टीची सुरुवात होते खूप आधी, सुमारे आठ वर्षं आधी. का हो? पंच्याण्णव साली मुंबई विमानतळावर (सहार) उभा असलेला मी, वडिलांच्या एका सूचनेखातर आज इथे उभा राहू शकलो होतो. बारावीत बरे मार्क पडले होते. बरे म्हंजे किती? तर पुण्यात सीओईपीला ॲडमिशन मिळण्याइतके! पण अस्मादिकांना जिओलॉजिस्ट व्हायचं होतं. का? ती एक वेगळी कथा! म्हणून एका प्रख्यात (पुण्यातल्या!) कॉलेजात ॲडमिशन बी. एस्सीला घेतली, आणि चार लेक्चर्स अटेंडली सुद्धा होती. पण बाबांना उपरती झाली म्हणा आणि त्यांनी सांगितलं, नाही इंजिनिअर हो. खरं सांगू का? मी तेंव्हा एअरफोर्समध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो. एनडीएची परीक्षा एकदा पास होऊन एसएसबीला टप्पा खाऊन आलो होतो. आणि दुसऱ्यांदा लेखी परीक्षा पास झालो होतो (किंवा झालो असतोच - बारावीच्या निकालाच्या वेळी तो रिझल्ट लागला होता की नाही आठवत ते आता आठवत नाही). त्यामुळे कशाला हवयं इंजिनिअरींग, असा ॲप्रोच. पण बाबा त्यांच्या कंपनीत बघत होते. मग ते म्हणाले जा. जा तर जातो. मग एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजचा फॉर्मही भरला. सीओईपीत सिव्हिल तर इकडे मेक मिळाली. आणि चार दिवसांनी कॉम्प्युटर! बाबा कंपनीत सॅलरी डिपार्टमेंटमध्ये होते. त्यांची या कॉम्प्युटरायझेशन मुळे नोकरी जाणार होती. नाही गेली तो भाग वेगळा. पण सत्त्याऐंशी साली त्यांना पुढच्या युगाची जवळून चाहूल लागली होती! बाबांना म्हटलं वर्षाला आठ हजार रुपये फी... ते म्हणाले बघू आपण! (त्या नंतर आईबाबा चार वर्षं आमच्या गावी एकदाही जाऊ शकले नाहीत हां! तिकिटाचे पैसै उरत नव्हते) मग तो प्रवास सुरू झाला.

सॉरी हो, माणसाचा धुंडीराज कधी होईल सांगता येत नाही! आणि पाल्हाळ लावायची मक्तेदारी.. असो!

इंजिनिअरिंग संपवून जो प्रवास सुरू झाला तो सरधोपट मार्गानिराळा होता. (एअरफोर्स मागे राहिलं ते ओघानं आलंच. ती आणखी एक कथा -गेले करायचे राहून! नाही तर माझा पहिला विमानप्रवास... वेगळा ठरला असता नै?!) पण त्यात तोंड आपटून घेतल्यावर लागलो सर्वमान्य वाटेला. नवी कंपनी त्या तिकडे कॅरिबियन बेटांमध्ये प्रोजेक्ट करायची. नव्या युगाचे पाईक असल्याने क्षितिजं नव्हतीच म्हणा ना! चारसहा महिन्यांतच अचानक प्रवास ठरला. आमच्या नेहमीच्या टेलरनं अक्षरशः दोन दिवसांत सूट शिऊन दिला हो. (तो आजवर शिवलेला एकुलता एक सूट!) सरांनी तासभर बसून परदेशवारीची 'सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' अशी शिकवणी घेतली. निघायचा दिवस आला तरी हातात तिकिटं नाही! असं ठरलं की कंपनीचा ट्रॅव्हल एजंट सकाळीच जाऊन ठिय्या मारून बसेल. आम्ही विमानाच्या वेळेला निघू. इकडे आईच्या डोळ्यांतलं पाणी खिळत नव्हतं. तिकडे गाडी येऊन उभी. मला मुंबईला सोडायला बाबा बरोबर होते. सॅंडीज नं वा केकेनं पहिला प्रवास केलेले कोण आहेत इथे?!
पोहोचलो. तो ट्रॅव्हल एजंट अजून रूजवात घालत होता. मग ब्रिटिश एअरवेजचं ऑफिस शोधलं. भारदस्त नाव आणि काय तो झुळझुळीत प्रकार (हाय-लो!). पण त्यांनी चार जिने चढून कुठल्याशा खबदाडीत पाठवलं. ते सगळं सामन वागवत निघालेली वरात चांगलीच घामट ठरली. हातात बुकलेटसारखं तिकीट पडलं तेव्हा विमानाच्या प्रयाणाला मोजकाच वेळ राहिला होता.
बाबा माझ्याबरोबर आत आले. समोर सिक्युरीटी चेक होता. आता पुढची मार्गक्रमणा माझी मलाच करायची होती. एका पिढीच्या खांद्यावर उभं राहून पण त्यांच्या कक्षेपलीकडे, आकांक्षापुढे, अनुभवांपार पुढची पिढी निघाली होती. धावपळीचा आणि उत्कंठेचा शारिरीक आणि मानसिक थकवा दोघांनाही होता. वाकून नमस्कार केला. त्यांनी पाकिटात हात घातला. रांजणगावच्या गणपतीचा एक छोटासा, जुना झालेला एक फोटो काढला. माझ्या हातात ठेवला. असू दे म्हणाले. माझे डोळे ओले होते. पण वडील शांत होते. आजही तो फोटो माझ्या पाकिटात आहे!
टप्प्याटप्प्यानं त्या भल्या मोठ्या सेव्हन फोर सेव्हन नामक ब्रिटिश एअरवेजची पताका फडकवणाऱ्या विमानाच्या पोटात शिरलो. आणि शिरताक्षणी एक समूळ हादरवणारा साक्षात्कार झाला. एअर होस्टेस! एक गोरी बाई आपल्याला सर्व्ह करणार आहे?! आता या क्षणावर मी पानंच्या पानं लिहू शकतो. पण ती ही जागा नाही. नथिंग इन माय माईंड हॅड प्रिपेअर्ड मी फॉर धिस मूमेंट. एवढंच म्हणून मी सोडून देतो.

सीट सापडली. उपरवाले कक्षमें हॅंडबॅग ठेवली. कुर्सीकी पेटी बांधायला शेजारच्या सीटवरच्या माणसानं मदत केली. मधली सीट मिळाली होती. आणि हा मर्चंट मरीन, मल्याळी शेजारी कुठल्याशा अनोळखी पोर्टावर त्याची बोट पकडायला निघाला होता.
सप्टेबरचा महिना होता. बाहेर पाऊस पडत होता. विमानच्या खिडकीच्या काचेवरून पाऊसधारा ओघळत होत्या. यथावकाश विमान हलू लागलं. सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स चालू झाल्या. आणि दुसरा झटका बसला. एक कादंबरी वाचली होती नेव्हिल शुटे नावाच्या लेखकाची. त्यात मेटल फटिगमुळे विमान अपघात असा विषय होता! त्याची आठवण झाली! (मग पुढे एअरफ्रेम वाचलं आणि मेटल फटिगची जागा स्लॅट डिप्लॉयमेंटनं घेतली!) मनात थरथराट...

विमानाने वेग पकडला. जेट इंजिन रोअर कानात पडत होता. बाहेरचे दिवे वेगानं मागे सरत होते. आणि सरळ पडणाऱ्या पावसाच्या रेघा तिरक्या होत होत आडव्या झाल्या. जसं ते भलं थोरलं विमान आकाशात झेपावलं तसं पावसाच्या रेषा उलट्या वाहू लागल्या होत्या! खाली‌ मुंबापुरीचे दिवे दिसत होते. बघे बघेस्तोवर विमान समुद्रावर गेलं आणि मध्यरात्रीच्या अंधारानं बाहेरचं जग गिळंकृत केलं. देश, देव, धर्म भूमीशी भौतिक संपर्क तुटला.

पुढचा प्रसंग त्या एअर होस्टेस बाईशी बोलण्याचा होता. तिचं इंग्लिश आणि आमचं प्राज्ञ इंग्रजी जमणार कसं? पण व्हेज व्हेज सांगून मी वेळ मारून नेली. आता पिणे. शेजाऱ्यानं वाईन घेतली. ती कोक विचारत होती. आम्हा भटांना कोकाकोला माहिती, आणि आम्हास ठावे तो कोक निराळाच. पण शेजाऱ्याच्या मदतीनं कोक आला. पुढचं धर्मसंकट! तो कॅनमध्ये होता! बोंबलायला कॅन कधी कोणी पायला होता?! आता त्या गोऱ्या मावशीला विचारायचं तर इज्जतका फालुदा! (मावशी या वरून एअर होस्टेसचं वय लक्षात आलं असेल ना) ती बाई बरी होती. पण इथे इगो आडवा आला. मग काही काळानं शेजाऱ्याला माझी अडचण लक्षात आली. आज आश्चर्य वाटतं की त्यालाही कॅन कसा उघडतात याची कल्पना नव्हती. तो हूक ओढायचा प्रयत्न करून बघितला पण ते फसफसतं पेय अंगावर पडून ऑलरेडी गेलेल्या इज्जत का कचरा करून घ्यायची नौबत नकोशी होती. त्यानं खिशातून किल्ली काढली आणि ती ठोकून कॅनला भोक पाडण्याचा प्रयत्न करू लागला! जय हो! आमच्या दोघांच्या सुदैवानं एअर होस्टेस बाई तिथून जात होती. तिनं प्रसंगाचा कात्रज केला. कुठलाही गवगवा न करता तिनं सफाईदारपणे तो कॅन उघडून माझ्या समोर ठेवला. विषय संपला. अहो, पण त्या सफाईनं कॅन कसा उघडवा या बाबतीत मी अज्ञानीच रायलो. त्या मुळे पुढच्या सर्व प्रवासात मी फक्त पाण्यावर र्‍हायलो - सेफ ऑप्शन!
एक विचित्र परिस्थिती होती. मी काही लहान नव्हतो. त्यामुळे आलेलं स्वभान हे जे सगळे नवीन अनुभव येत होते त्यांच्या ग्रहणात आडवं जात होतं. असो.
पुढे यथावकाश हीथ्रोला आगमन झालं. पहाट फुटत होती. आकाशातून लंडनचं दर्शन लोभस होतं. पण माझं गंतव्य वेगळं होतं. इमिग्रेशनच्या भानगडीतून सुटून मी गॅटविकला ट्रान्सफरच्या बसच्या दिशेने निघालो. हातात योग्य तिकीटं कागदपत्रं होती. ते दिवस 9/11 पूर्वीचे होते म्हणून कदाचित थोडी मोकळीक होती. गॅटविकची बस सुटायला थोडा अवकाश होता. मी हिथ्रोच्या बाहेर, ब्रिटिश भूमीवर पाऊल ठेवले. पुस्तकां-पिक्चरांतून, शेरलॉक होम्स सारख्य मालिकांतून दिसलेलं इंग्लंडचं वातावरण प्रत्यक्षात जाणवलं. थोडी थंडी होती. कुणा लांबच्या मावसभावानं दिलेलं जॅकेट अंगात होतं. ओव्हरकास्ट स्काईज, थोडी भुरभूर, थंडी... छातीभरून स्वच्छ हवा शोषली आणि, बशीत बसलो. फार मंडळी नव्हती. डायवर आपलाच गुज्जू भाई निघाला! त्यानं हिंदीत वास्तपुस्त केली. बरं वाटलं आणि विचित्रही हो! आता पुसटसं आठवतं पण इंग्लंडच्या कंट्रीसाईडचं दर्शन झालं. हिरवी गार शेतं, हिरव्या गवताच्या उतारावर चरणाऱ्या गाई, नीट रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक...
हिथ्रोचा तोरा असेल तर गॅटविकचा नखरा होता. माझ्या कनेक्टिंग फ्लाईटला वेळ होता. त्या झगमगाटानं अगदी‌ दिपून गेलो होतो. माझी परदेशातली पहिली खरेदी एक चॉकलेटचा बार होता. आता ब्रॅन्ड वगैरे आठवत नाही. पण फाईव्ह स्टारची जरा दुरूनच ओळख असेल्यांची ही पुढची पायरी लक्षणीय होती. ती कॅडबरी चोखत मी फिरत होतो. एका ठिकाणी शुभ्र पार्श्वभूमीवर एक शिसवी काळा ग्रॅंड पियानो होता. दोन पायऱ्या उंच तख्तपोशीवर विराजमान होता. आजूबाजूचे दिवे त्यात प्रतिबिंबित होते. त्यामुळे रत्नजडित झळाळी त्याला लाभली होती. घट्ट केस बांधलेली (तेंव्हा मला तोकड्या कपड्यांत वाटलेली) काळा पायघोळ झगा घातलेली एक नवयौवना गौरांगना आपल्या लांबसडक सडपातळ बोटांनी नाजूक आघात करत स्वरांची वलयं निर्माण करत होती. आजही ते चित्र माझ्यानजरे समोर आहे. एक चुरगळलेल्या कपड्यातला, खांद्यावर भद्रंग बॅग लटकवलेला, येडबागळाही त्या चित्रात आहे.
प्रवासाचा दुसरा हप्ता त्यामानानं सुरळीत पार पडला. पण या वेळी नव्या ज्या देशात चाललो होतो, त्यांची जनता होती. खाणं बदललं. वागणं बदललं. रंग-रूप-ठेवण सगळंच बदललं होतं. गंमत याची वाटली की विमान लॅंडल्यावर, जमिनीला चाकं टेकताच सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला! पण दुसऱ्या क्षणी जाणवलं, अरे, कुठेही जा माणूस तोच आहे. पण व्यक्त होण्याचे मार्ग, त्याची पद्धत एवढंच वेगळं आहे.
पहिला विमानप्रवास संपला खरा, पण अजून एक शिकवण बाकी होती. एक कलीग गाडी घेऊन घ्यायला आला होता. टोयोटा हे फक्त नाव माहिती असलेली गाडी समोर उभी होती. त्याला दरवाजा उघडायला हॅंडलच नव्हतं! एक खाच होती. त्यात खुडबूड करून बघितलं पण हाती काहीच लागलं नाही. शेवटी आतनं ड्रायव्हरनं दार उघडलं. हे उघडलेलं दार एका नव्या जगाचं प्रवेशद्वार ठरलं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलंय! एकदम चित्रदर्शी. पावसाचे थेंब मागे मागे जातात ते दृश्य एकदम आठवलं हे वाचल्यावर.
एक विचित्र परिस्थिती होती. मी काही लहान नव्हतो. त्यामुळे आलेलं स्वभान हे जे सगळे नवीन अनुभव येत होते त्यांच्या ग्रहणात आडवं जात होतं. हेही एकदम पटलं. मोठं होण्यातले हे काही तोटे असतात Happy माझ्या नणंदेची मुलगी तीनचार वर्षांची असताना पहिल्यांदा विमानात बसून आमच्याकडे बंगलोरला आली होती. तेव्हा तिला अर्थात खूप एक्साईटमेंट होती. सकाळी विमानतळावर जाण्यासाठी त्यांनी रिक्षा बोलावली होती (स्थळ पुणे) तेव्हा रिक्षा बघून तिने 'विमानाने जायचं होतं ना? मग रिक्षा कशी काय आली विमान कुठाय?' असा प्रश्न विचारला होता Lol विमानाने आकाशात झेप घेतली तेव्हा 'उडालं, उडालं!' असा चीत्कार केला होता Lol

चित्रदर्शी लिखाण.

सहा सात वर्षांची असेन. बस चा संबंध फक्त वर्षातून एकदा गावी जातानाच यायचा.
एकदा होणाऱ्या नवीन घरातील नवीन शेजाऱ्यांकडे बसलो होतो. त्यांच्या मुली रोज बसने (लाल डब्बाच) शाळेत जायच्या. शाळा लांब होती आणि मला पण त्याच शाळेत पाठवणार होते पुढे.
तर ते काका सांगत होते, बसचा महिन्याचा पास काढलाय मुलींचा. म्हणजे बरं पडतं. रोज तिकीट काढायला नको..
मला कळेना, महिन्यातून एकदा का असेना... पैसे तर द्यावेच लागतात न... पासचा फायदा काय मग?

मी विचारलं, " पास काढला तर कंडक्टर घरी बोलवायला येतो का? "

पुढे बरेच दिवस त्या शेजाऱ्यांना माझ्याकडे बघितल्यावर हसू यायचं.

वाह सरजी Happy आसू आणि हसू आणणाऱ्या आठवणी...
शेवटचं वाक्य तर कमाल!

>> सॅंडीज नं वा केकेनं पहिला

सेम! केके Happy

>> त्यांनी पाकिटात हात घातला. रांजणगावच्या गणपतीचा एक छोटासा, जुना झालेला एक फोटो काढला. माझ्या हातात ठेवला. असू दे म्हणाले. माझे डोळे ओले होते. पण वडील शांत होते. आजही तो फोटो माझ्या पाकिटात आहे!

ओहह! भिडलं हे...

>> शेजाऱ्याच्या मदतीनं कोक आला. पुढचं धर्मसंकट! तो कॅनमध्ये होता! बोंबलायला कॅन कधी कोणी पायला होता?! ............खिशातून किल्ली काढली आणि ती ठोकून कॅनला भोक पाडण्याचा प्रयत्न करू लागला!

हहपूवा अक्षरशः Rofl पण हा काळ होताच तसा