माझा पहिला विमान प्रवास
बैलगाडीच्या, अन् तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काटकसर म्हणून पॅसेंजरने प्रवास (तोही वर्षातून एकदाच) करणाऱ्यांच्या काळात जन्मलेल्या मला, विमानप्रवास कधी स्वप्नातही आला नव्हता.
आकाशात उडण्याची स्वप्न पडायची, ती मला पंख फुटले म्हणून! विमानाचा संबंध म्हणजे, त्याचा आवाज आला की धावत अंगणात जाऊन आकाशाकडे बघणं एवढाच होता. पण त्याचं कधी वैषम्यही नव्हतं. आपण पंतप्रधान नाही किंवा आपण कुठले राष्ट्रप्रमुख नाही ह्याचं वैषम्य तरी कुठे असतं! विमान तेवढंच लांब किंवा उंच होतं आमच्याकरता.
बाकी विमानप्रवास बऱ्या....च उशिरा आला आयुष्यात तरी विमानतळ भेट मात्र त्याआधी खूप पूर्वी दोनदा झाली.
‘अमुक-तमुक ह्यांचं परदेशी प्रयाण’ अशा बातम्या तेव्हा वर्तमानपत्रात छापून येत. त्या काळात, माझ्या मोठ्या भावाला काही वर्षांकरता झिम्बाब्वेला जाण्याची संधि अचानक चालून आली. तेव्हा झिम्बाब्वे ह्या देशाचं नाव आणि उच्चारही आम्हा कुणाला माहीत नव्हता. आम्ही आपलं झी-बॉम्बे म्हणायचो.
अगदी आठ-पंधरा दिवसांच्या अवधीत भावाला निघायचं होतं. मग त्याचा पासपोर्ट..(बहुतेक तेव्हा लवकर मिळत होता), सूट शिवणे.., वगैरे कामं अतिवेगाने करून त्याला निरोप द्यायला आम्ही पहिल्यांदाच विमानतळावर गेलो.
तेव्हा विमानतळावर प्लॅटफॉर्म तिकीट असायचे. सूट घालून (विमानात सूट कंम्पलसरी असतो असं कुणीसं सांगितलं होतं म्हणून सूट!) अवघडत चाललेल्या भावाला आम्ही आधी प्रत्यक्ष आणि मग काचेतून टाटा बाय बाय केला. आणि नंतर मग काचेला नाक लावून पलीकडे दिसणाऱ्या विमानांवर नजर लावून बसलो.
तेव्हा विमानात पायऱ्यांनी चढणारी माणसं सिनेमांत बघितली होती. पण इथे कुठल्या विमानाच्या पायऱ्या दिसत नव्हत्या. मला तर तो चुकून दुसऱ्याच विमानात चढेल की काय ह्याची भिती वाटत होती. ‘सगळ्या विमानांवर देशांची नेमप्लेट बरोबर असेल नं..?’ ही काळजी वाटली.
काचेतून विमानं येतांना-जातांना दिसत होती... मग आताच गेलं ते विमान त्याचच असेल असं समजून आम्ही परतीची रेल्वे गाठली. (तेव्हा डिजिटल डिस्प्ले नव्हता बहुतेक! किंवा असला तरी त्या चकचकीत वतावरणात आम्हाला दिसलाही नसेल!)
पुढे वर्षभराने वाहिनी आणि लहानग्या भाचीला सोडायला विमानतळावर गेलो तेव्हा आमची बरीच मोठी फौज होती. ह्यावेळी काचेला नाक नं लावता काचेतून विमानं दिसतील अशा रेस्टोरंट मधे बसलो होतो.
प्रत्येक टेबलवर पांढरा स्वच्छ टेबलक्लॉथ आणि गुलाबाची फुलं! कधीतरी दोन-चार वेळा मसाला डोसा करता हॉटेल बघितलं होतं. इथला शांत.. चकचकीत.. आणि स्वच्छ कारभार लईच भारी आणि दडपण आणणारा होता. ही कृपा बरोबर असलेल्या एका अनुभवी आणि श्रीमंत नातेवाईकाची होती.
त्यांनी मागवलेल्या काळ्या कॉफीचं त्या काळी आलेलं १७५/- बिल बघून आम्हा सर्वांचे चेहरे त्या कॉफीपेक्षा काळे ठिक्कर पडले होते. तरी बरं बिल त्या नातेवाईकाने भरलं होतं. तो बिलाचा किस्सा आम्हाला नंतरही बरीच वर्षे पुरला. (‘एवढे पैसे घेऊन कॉफी तर काळीच दिली!!! शिवाय आपली आपणच ओतून घ्यायची कपात!!!’)
हयानंतर मग बराच काळ लोटला. पण विमानप्रवासाची किंवा विमानतळावर जाण्याची वेळ कधी आलीच नाही. आमचा जो काय थोडाफार प्रवास होता तो रेल्वेनेच होत होता. आता फक्त पॅसेंजर जाऊन रेल्वेच्या एसी सीट वापरायला लागलो होतो.
काही वर्षांपूर्वी मात्र एकदा अचानक मित्रांच्या ग्रुप बरोबर नाशिक-मुंबई-गोवा ट्रिप ठरली. म्हणजे त्या सगळ्यांची आधीच ठरली होती, आम्ही शेवटी जॉइन झालो. मुंबई-गोवा विमानाने जायचं यायचं होतं. मित्रानेच तिकिटे वगैरे काढली. त्यामुळे प्रत्यक्ष तिकीट वेळेपर्यंत बघितलंच नव्हतं.
तो माझा पहिला विमानप्रवास! कशाचीच काही माहिती नव्हती. केबिन लगेज वगैरे प्रकार माहीत नव्हते पण चारच दिवसांची ट्रिप असल्यामुळे ज्या काय बॅगा नेल्या, त्या चालल्या.
बॅगा कुठे.. कशा ठेवल्या.. वगैरे काहीच आता आठवत नाही. आमचा दहा-बारा जणांचा ग्रुप होता. आम्ही सोडून बाकी जवळपास सगळे अनुभवी प्रवासी होते. मग ती मंडळी जे करत होती ते आपण करायच!
तरी एकदा माझ्या पुढच्या रांगेतल्या बऱ्याच लोकांच्या हातात पासपोर्ट बघितल्यावर मी खूप घाबरले. मला पण मागितला तर? माझ्याजवळ तर फक्त आधारकार्ड होतं!
डोमेस्टिकला आधार कार्ड चालतं असा नवऱ्याने धिर दिला, पण तो तरी कधी कुठे डोमेस्टिकने गेला होता? त्याच्या खात्यावर कंपनी तर्फे झाला म्हणून एक परदेश प्रवास झाला होता. त्याच्यावर विश्वास ठेवायला मी काय वेडी होते का? आत जाईपर्यंत घाबरलेलीच होते मी. आधारकार्ड वरचा बुद्रुक फोटो माझ्या चेहऱ्याशी जुळत नसल्यामुळे किंवा एवढ्या गरीब रडक्या चेहऱ्याची खात्री पटल्यामुळे असेल मी आत पोहोचले व्यवस्थित!
विमानात आत गेल्यावर (विमानात चढायच्या पायऱ्या नाहीच..!) गार गार हवा.. इतरांकडे बघत बांधलेला सिटबेल्ट.. विमान उडतांना पोटात आलेला गोळा.. कानात बसलेले दडे.. एवढंच आता लक्षात आहे. जेमतेम एक तासाचा प्रवास तो!
तेव्हा किंग फिशर छोट्या प्रवासात पण खाणं पिणं द्यायची. एयरहॉस्टेस ने दिलेलं खाणं पिणं घेतांना खूपच अवघडल्या सारखं झालं होतं. हॉटेल मधे वेटर कुठे एवढी हसतमुख सेवा देतात? त्यामुळे एयरहॉस्टेसचं खूपच दडपण आलं होतं. तो एक तास तर कसा संपला कळलच नाही.
त्यानंतर बरेच विमानप्रवास झालेत. अमेरिकेत पहिल्यांदा गेले, तेव्हा तर एकटीच गेले होते. आता बरोबर कार्ड असतं.., पैसे/डॉलर.. असतात.. पण माझी अजूनही हिम्मत होत नाही, एयरपोर्ट वर काही खाण्या-पिण्याची. एवढे प्रवास करूनही मी एकदाही बटन दाबून एयरहॉस्टेसला बोलावलं नाही. विमानात शेजाऱ्याला पाणी आल्याशिवाय मला तहान लागत नाही.
कुणाला विश्वास बसणं अवघड जाईल कदाचित पण, आणखी एका गोष्टीचं मला खूप दडपण येतं.. ते म्हणजे इंधनाचं! वाटतं मला कुठून तरी कुठेतरी जायचं आहे म्हणून केवढं लाखों रुपायांच इंधन वापरल्या जातंय!
माहीत असतं ‘मी’ म्हणजे एक दिसेल नं दिसेल असा एक बिंदू आहे ह्या प्रवासात! पण तरीही..!
******
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
विमानात शेजाऱ्याला पाणी आल्याशिवाय मला तहान लागत नाही. >> LOL
पहिल्या प्रतिसादाबद्दल
पहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मीस्वच्छंदी.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
मस्त लिहिले आहे.. मजा आली
मस्त लिहिले आहे.. मजा आली वाचायला
मस्त आठवणी..!
मस्त आठवणी..!
छान लिहिलायं लेख..!
Chhan लिहिलंय.
Chhan लिहिलंय.
काय मस्त खुसखुशीत लेख आहे
काय मस्त खुसखुशीत लेख आहे शर्मिला.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय. खुसखुशीत!
छान लिहिलंय. खुसखुशीत!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
धन्यवाद ममो, ऋन्मेष, रुपाली
धन्यवाद ममो, ऋन्मेष, रुपाली,देवकी, सामो, सिमरन,अनामिका, देवकी, भरत.
छान लिहिलंय, खुसखुशीत! आवडलं
छान लिहिलंय, खुसखुशीत! आवडलं वाचायला.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.
विमानात शेजाऱ्याला पाणी आल्याशिवाय मला तहान लागत नाही >>
असे पण होत असेल हे कधी डोक्यात आले नाही. कधी कधी लांबच्या प्रवासात आईल वाला उठला की आपण पण उठून जाऊन येणे हा प्रकार केलेला आहे. 
मस्त खुसखुशीत लिहिलंय
मस्त खुसखुशीत लिहिलंय
हाहा.. छान लिहिलंय.
हाहा.. छान लिहिलंय.
धनी सारखेच. शेजारी उठला कीच मी पण जाऊन येतो ते आठवलं.
तहान लागली तरी पाणी मागण्याचा
तहान लागली तरी पाणी मागण्याचा संकोच असतो. आणि मी सांगितलं तसं मी एकदाही ते वरचं बटण दाबून हवाईसुंदरीला बोलावलं नाही.
ह्या वर मग उपाय म्हणून अगदी विमानात शिरायचा आधी मी माझी लहान पाण्याची बाटली भरून घेते आणि पुरवून पुरवून वापरते ते पाणी.
काय मस्त लिहिलंय! बरेचसे
काय मस्त लिहिलंय! बरेचसे कोरिलेट झाले.
>> त्यांनी मागवलेल्या काळ्या कॉफीचं त्या काळी आलेलं १७५/- बिल
हे! हेच अगदी! शाळा कॉलेजच्या वयात एकदा म्हैसूरला गेलो होतो तेंव्हा म्हैसूर पॅलेस मध्ये चहाची किंमत पन्नास रुपये असते असे ऐकले तेंव्हा आम्हा मुलांच्यात कितीक वर्षे तो चर्चेचा विषय होता. आज कोणास ती अपूर्वाई राहिली नाही. पण अजूनही एखाद्या मोठ्या स्टार हॉटेलमध्ये कधी गेलो की बिल देताना ही प्राचीन आठवण बारीकशी का असेना पण मनात जागी होतेच
काळाचे एक खूप मोठे स्थित्यंतर आपल्या एक दोन पिढ्यांनी पाहिले आहे. पहिल्या विमान प्रवासाचे अनुभव वाचताना ते वारंवार जाणवते.
अगदी अतुल!
अगदी अतुल!
प्रत्येकाचे पहिले अनुभव वाचताना 'अरे हे आपल पण केलेले आहे' . किंंवा हे अगदी असंच घडलेलं आणि पार विस्मरणात गेलेलं काही आठवतंय.
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
खूप सुरेख आणि खुसखुशीत
खूप सुरेख आणि खुसखुशीत लिहिलंय, मजा आली वाचताना.
तहान लागली तरी पाणी मागण्याचा
तहान लागली तरी पाणी मागण्याचा संकोच असतो. आणि मी सांगितलं तसं मी एकदाही ते वरचं बटण दाबून हवाईसुंदरीला बोलावलं नाही.>> खरंय!! कोणी तरी आपली सेवा करत आहे ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे. आणि पहिल्या प्रवासात तर आपण फारच दडपणाखाली असतो.
छान लिहीलंय!
धन्यवाद अतुल, अमितव, अस्मिता,
धन्यवाद अतुल, अमितव, अस्मिता, अन्जु, Abuva.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.