पाककृती स्पर्धा क्रमांक १ (जिन्नस एक, पदार्थ अनेक) – धनवन्ती – मस्त, स्वस्त आणि गुणांनी जबरदस्त ! लाल भोपळा ..

Submitted by धनवन्ती on 21 September, 2026 - 12:31

इथे संयोजकांनी ही अतरंगी स्पर्धा जाहीर केल्यापासून मनात विचार सुरूच होते. चार पाच कल्पना डोक्यात आकार घेत होत्या. तेवढ्यात सोसायटीमधील गणपती बाप्पाला एक दिवस दुपारचा नैवद्य देण्याची संधी मिळाली. तेंव्हाच पक्के केले की ताट असे करावे जे इथे पात्र (!!) ठरेल.

या साठी मी निवडला गुणी पण जास्त चकमक नसणारा आणि जरा चेष्टेचा विषय होणारा पण सात्विक प्रवृत्तीचा लाल भोपळा.

या फोटोत आहेत - लाल भोपळ्याचे पराठे, रायते, काप, सार, भाजी, भात आणि खीर.
पराठ्यावर लोणी आणि तुळशीचे पान.

भोपळा फारसा लाल नाही मिळाला. म्हणून एक एक चमचा बीट उकडून / खिसून सूप आणि खीरीमधे रंगासाठी वापरले.

१. पराठे
दोन वाटी भोपळ्याचा कीस
पाच तिखट मिरच्या, एक चमचा जिरे, एक इंच आले यांचे वाटण आणि अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.
यात दोन चमचे तांदळाचे पीठ ( ऐच्छिक ), दोन चमचे बेसन, दोन वाट्या गव्हाचे पीठ, मीठ, हळद, चमचाभर ओवा घालून कालवून घेतले. भोपळ्याचे पाणी सुटते त्यामुळे गरज असेल तरच पाणी घाला. तेलाचा हात लावून नेहमीच्या चपातीच्या पीठसारखे मळून घेतले.
पराठे लाटून तव्यावर भाजून घेतले. गरम असताना त्यावर तूप लावले.

२. रायते
भोपळ्याच्या चार मोठ्या फोडी उकडून घेतल्या.
त्यातल्या दोनचे रायते आणि दोनचे सार करायचे.
"दोन वेळा कुकर लावायचा नाही. इंधन बचतीचे पुण्य मिळते."
कुकरमध्ये पाणी घालून त्यात दुसऱ्या भांड्यात फोडी ठेवल्या. त्यात अगदी छोटा तुकडा बीट आणि एक अख्खा टोमॅटो पण ठेवला, जे सार करताना लागेल. यात पाणी घालू नका. कुकरच्या दोन शिट्टी बास होतात. हे गार होऊ द्या.
दोन फोडी त्यांची साल काढून कुस्करल्या. त्यात चार पाच चमचे दही, तीन चार चमचे शेंगदाणे कुट, एक चमचा साखर, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून मिसळून घेतले. वरून मिरची कढीपत्ता हिंग जिरे मोहरीची फोडणी दिली. फोडणी ऐच्छिक आहे.

३. काप
कच्च्या भोपळ्याचे पातळ काप चिरून त्यात हळद,लाल मिरची पूड, धने पूड, जिरे पूड, मीठ आणि थोडे कोकम आगळ किंवा लिंबू रस घालून मिसळून दहा मिनिटे मुरू दिले.
मग ते बारीक रव्यात घोळवून तव्यावर तेलात शॅलो फ्राय केले.
"पराठे झाल्यावर त्याच तव्यावर हे होतात. एक भांडे reuse केल्याचे पुण्य मिळते. "

४. सार
वर उकडून घेतलेला भोपळा, साल काढलेला टोमॅटो आणि थोडेसे बीट हे सर्व थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.
त्यात दोन ग्लास पाणी, मीठ आणि अगदी थोडा गुळ घातला. पातेल्यात एक चमचा तूप गरम करुन त्यात दोन लवंग, एक तुकडा दालचिनी घातली. त्यात हे भोपळ्याचे मिश्रण घालून पाच मिनिटे उकळू दिले.
गॅस बंद करून बारीक चिरून कोथिंबीर घातली. नुसते प्यायला छान लागते किंवा भाताबरोबर खाता येते.

५. भाजी
कच्चा भोपळा साल काढून चिरून घेतला.
साधारण दोन वाटी फोडी घेतल्या.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, तीन चार हिरव्या मिरच्या चिरून परतून घेतले. त्यात चिरलेल्या फोडी, मीठ घालून मिसळून घेतले. झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेतले. पाणी घालण्याची गरज नाही. पाच सात मिनिटांत भाजी शिजली.
यात साल काढून चिरणे यालाच वेळ आणि जोर लागतो.
भाजी लगेच शिजते.
" इंधन बचतीचे पुण्य मिळते आणि फोडी करताना थोड्या कॅलरी कमी करण्याचे पण थोडे पुण्य मिळते"
आवडत असेल तर दाण्याचे कूट घालू शकतो.

६. भात
भोपळ्याचा भात कसा करावा हे काही सुचेना. पण नैवेद्यात भात तर पाहिजेच.
मग नेहमीचा हिरव्या वाटणाचा भात केला. त्यात भोपळ्याचे तळलेले काप तुकडे करून घातले.
एक वाटी बासमती तांदूळ धुवून निथळून घेतला.
एक मिरची, एक इंच आले, अर्धी वाटी कोथिंबीर मिक्सरवर वाटून घेतली.
हे वाटण तांदळाला चोळून लावले.
कुकर मध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घालून त्यात एक इंच दालचिनी घातली.
त्यावर तांदूळ घातले. दोन वाटी गरम पाणी आणि मीठ घालून दोन शिट्ट्या केल्या.
त्यावर वरचे काप तुकडे करून घातले ( reuse चे पुण्य , यू नो Wink )आणि हलक्या हाताने मिसळले. भातात मधेच थोडी गोडसर चव छान लागते.

७. खीर
कच्च्या भोपळ्याचे साल काढून बारीक खिसून घेतला. साधारण दोन वाटी कीस घेतला. रंगासाठी त्यात दोन चमचे कच्च्या बीटचा कीस घातला. जाड बुडाच्या भांड्यात दोन चमचे तूप घातले. त्यात दोन लवंग आणि एक छोटा तुकडा दालचिनी घातली. त्यात हे कीस घालून चांगले परतले. झाकण ठेवून वाफेवर चांगले शिजवून घेतले. त्यात दोन वाटी दूध, अर्धी वाटी बदाम काजू पूड आणि अर्धी वाटी साय घालून एकजीव केले. अर्धी वाटी साखर घालून चांगले शिजवून घेतले. जायफळ घालून खीर तयार.

या सर्व पदार्थांमध्ये घटक आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करू शकतो.
लिहायला आणि वाचायला जितका वेळ लागतो त्या मानाने पदार्थ कमी वेळात करून होतात. भोपळा पटकन शिजतो.
माझ्या आवडत्या या सद्गुणी, स्वस्त, मस्त, पौष्टिक, सात्विक भोपळ्याला इथे प्रेझेंट करू शकले.
ही थीम दिल्याबद्दल संयोजकांचे खूप आभार !!IMG-20260921-WA0066.jpgIMG-20260921-WA0066.jpgIMG-20260921-WA0068.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Innovative 👍

भरपूर पदार्थ केलेत की भोपळा वापरून.

लाल भोपळा स्वत:च गोडसर असल्याने त्याचे तिखट / savoury पदार्थ करणे challenging आहे.

भोपळा सार करून बघणेत येईल.

धन्यवाद अनिंद्य, तिखट मधे पराठे आणि भाजी छान होते, ती पण करून बघा.

धन्यवाद मनीमोहोर, तुमच्यासारख्या सुगरणीची दाद खूप छान वाटली.

बापरे भोपळ्याचे एवढे प्रकार.. हॅट्स ऑफ!
आणि त्यातही भोपळ्याचा जो एकच प्रकार मी आवडीने खातो तो म्हणजे वडे यात दिसत नाहीत Happy

सगळे पदार्थ छान.... माझ्या मुलासाठी खीर करून पाहीन.. आजच लाल भोपाळ उरलेला सांभारात घालून संपवला.. भाजी खात नाहीत. हिरवे वाटणाची पण करून पहिली. घाऱ्या तळावे लागतात म्हणून नको.

सुंदर ताट.
मी करते हे सगळे पदार्थ पण एका वेळी एकच.

खूपच छान
भोपळा मला आवडतोच
मस्त होणार हे पदार्थ

धन्यवाद स्वाती आंबोळे, मनी माऊ मृण्मयी, अभिषेक ( तुझे इथले नाव काही मला टाईप होईना) sparkle, मी_अनु, मैत्रेयी ( माऊइ ची मॉम ), ध नि, शीतल कृष्ण, सा मो, अंजू, शर्मिला, किल्ली..

सर्वांचे प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला..

जबरदस्त.
सगळेच पदार्थ मस्त.
मला भोपळा गोडूस असल्याने आवडत नाही. तरीही सार आणि रायते करून पाहीन.

Pages