एकदा तरी वारी अनुभवावी
आमची आजी अतिशय देवभोळी आणि धार्मिक होती. काशी विश्वेश्वर, राम आणि विठ्ठल ही तीन तिची विशेष आवडती दैवतं होती. तिला अनेक स्तोत्र ,आरत्या, श्लोक पाठ होते आणि तिच्याकडे पौराणिक आणि संतांच्या गोष्टींचा खूप मोठा खजिना होता. इतक्या रसाळ शब्दात ती गोष्टी सांगे की नामदेवाची गोष्ट ऐकताना मी ही पंढरपूरला जाईन आणि देवाला नेवैद्य खाऊन दाखव असं सांगेन असं मला फार वाटायचं. असो.
आजीच्या प्रभावामुळे पांडुरंग , श्रीराम आणि काशीविश्वेनाथ आमचे ही आवडते झाले होते. पुढे मोठी झाल्यावर वाचन वाढलं. तसेच अभंग आणि भक्तिगीते ऐकून त्यातली गेयता, यमक , कमालीचा भक्तिभाव,विठ्ठल चरणी संतांनी केलेले समर्पण, यांचा प्रभाव पडला. त्यावेळी माहितीचा खजिना अजिबातच खुला झाला नव्हता आजच्या सारखा. त्यामुळे मला पंढरपूरच्या वारीबद्दल मात्र तसं उशिराच समजलं. पण जेव्हा समजलं तेव्हापासून वारी अनुभवायला हवी असं फार वाटायला लागलं .
तेव्हा आषाढी जवळ आली की पेपरच्या रविवारच्या पुरवणीत वारी बद्दल लेख येत. आळंदीला वारी प्रस्थान ठेवताना होणारा द्नानोबा माऊली तुकाराम गजराने दुमदुमणारा आसमंत , सुवर्ण पिंपळाची होणारी सळसळ आणि मंदिराच्या कळसाचं जणू हात हलवून निरोप देणं, रोज एवढं पायी चालणं, चालताना ही गायली जाणारी भजन, अभंग, मिळेल ते खाणं आणि मिळेल तिथे विश्रांती घेऊन पंढरपूरला पोचणं , बरं पोचल्यावर पांडुरंगाचं दर्शन न घेता दुरूनच कळसाला नमस्कार करून माघारी फिरणं हे सगळंच अद्भुत वाटत असे. मनाला भुरळ घालत असे. दिवेघाटातला वारीचा फोटो, अनेक ठिकाणी होणाऱ्या उभ्या रिंगणाची पेपरमध्ये छापून येणारी वर्णन वाचल्यावर हे सगळं कधी याचि देही याचि डोळा अनुभवायला मिळेल असं वाटत असे. त्यात इरावतीबाई कर्व्यांसारखी विदुषी विठ्ठलाला फ्रेंड म्हणते आणि पायी चालत वारीला जाते असं काही वाचलं की मनातल्या वारीचं तेजोवलय आणखीनच वाढत असे.
बरेच वर्षापूर्वी एकदा पुण्याला जात असताना अचानकच ध्यानी मनी नसताना आळंदीहून पंढरपूरला निघालेली वारी पहायला मिळाली होती. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अनवाणी चालणाऱ्या स्त्रिया, भजन करत टाळ वाजवत असलेले वारकरी पाहून इतकी भारावून गेले की डोळ्यातून पाणीच यायला लागलं होतं घळाघळा. आत्ताच्या आता एस टी तून उतरून ह्यात सामील व्हाव असं वाटत होतं .
काळ पुढे जात होता. वारीला जाण्याचं स्वप्न काही न काही अडचणींमुळे प्रत्यक्षात उतरत नव्हतं. त्याच दरम्यान टीव्ही वर खाजगी वाहिन्या सुरू झाल्या. इंटरनेट स्वस्त आणि सामान्यांच्या आटोक्यात आलं त्यामुळे वारीबद्दल जास्तच माहिती मिळू लागली. हळू हळू वारी सामान्य लोकांच्या जवळ पोचत होती. वारीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी शेकड्यात असणारी वारकऱ्यांची संख्या आता काही लाखात पोचली आहे. परंतु ह्या प्रचंड वाढीचा ताण सगळ्या नागरी सुविधांवर पडत आहे. वारीच्या मार्गावर होणारा प्रचंड ट्रॅफिक सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होईल इतका वाढला आहे. एकदा मी ही तळेगाव ते दरी पुल एवढ्या लांब अंतरापर्यंत झालेल्या ट्रॅफिक जॅमचा अनुभव घेतला आहे.
वारकऱ्यांबद्धल मनात असलेले प्रेम आणि आदर ह्यामुळे वारीत होणाऱ्या अन्नदानाचे प्रमाण खूप वाढले आहे. परंतु त्यात समन्वयाचा अभाव असल्याने होणारी अन्नाची नासाडी वाढत चालली आहे. आणि त्याची विल्हेवाट नीट न झाल्याने वारीमार्गावर जिकडे तिकडे फेकलेले खरकटे, प्लास्टिकच्या बशा, ताटल्या , कप इत्यादी कचरा, कधी कधी त्यात पाय घसरून पडल्यामुळे होणारे वारकऱ्यांचे अपघात, वारीचा मुक्काम उठला की मुक्कामाच्या छोट्या गावावर पडणारा सफाईचा प्रचंड ताण, वारी काळात गावात राहण अशक्य असल्याने खुद्द पंढरपुरातून बाहेरगावी जाणारे स्थानिक, भाव भक्तीचा अभाव असलेले फुकटे आणि संधीसाधू वारकरी, उभं रिंगण बघताना माऊलींचा असला तरी शेवट तो एक अश्व आहे, काही कारणाने तो उधळला तर काय होईल ह्या विचाराने छातीत भरणारी धडकी अश्या अनेक गोष्टींमुळे गेल्या काही वर्षात वारीपासून मी कणाकणाने दूर जाऊन आता तर मी वारीला जाऊन ह्या सगळ्याला हातभार लावणार नाही इथपर्यंत पोचले आहे.
त्यामुळे आता यापुढे माझी वारी माझ्या घरात आणि माझा पांडुरंग ही माझ्या मनातच. काळ बदलत असतो , आपले विचार बदलत असतात. वारीची आत्यंतिक ओढ ते वारी नको इथपर्यंतचा असा हा माझा मानसिक प्रवास. वारी अनुभवण्याचे माझे स्वप्न आता अधुरेच राहणार आहे पण त्याचा मला जरा ही खेद नाही. दरवर्षी मी माझ्या घरातच मानस वारी अनुभवते आणि त्याचा ही मला तेवढाच आनंद मिळतो.
(इतके लोक प्रचंड संख्येने वारीला जातात त्या अर्थी त्यात आज ही काहीतरी मनाला ओढ लावणारे, आनंद देणारे असेल हे ही पटत. हा माझा वैयक्तिक / वैचारिक मानसिक प्रवास आहे . त्यामुळे वारीला जाऊन ज्यांना आनंद मिळतो त्यांनी वारीला जाऊन तो अवश्य मिळवावा. )
हेमा वेलणकर
इतके लोक प्रचंड संख्येने
छान लिहिलंय.
इतके लोक प्रचंड संख्येने वारीला जातात त्या अर्थी त्यात आज ही काहीतरी मनाला ओढ लावणारे, आनंद देणारे असेल हे ही पटत. >> असंच माझं नर्मदा परिक्रमेबद्दल झालं. जाणाऱ्यांबद्दल आदर. पण मी कधी जाईन असं वाटत नाही.
शर्मिला.. धन्यवाद.
शर्मिला.. धन्यवाद.
बरोबर नर्मदा परिक्रमा, गिरनार परिक्रमा वगैरे बद्दल मला ही हल्ली हेच वाटत.
अगदी मनातले लिहिले आहे.
अगदी मनातले लिहिले आहे. माझीही खूप इच्छा होती. पण एकूण गर्दी आणि अस्वच्छता बघून नको वाटते. माझ्या मनाची तयारी तितकी झाली नाही की या सगळ्याकडे दुर्लक्ष करता येईल. असेही वाटते.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
<<<< बरं पोचल्यावर पांडुरंगाचं दर्शन न घेता दुरूनच कळसाला नमस्कार करून माघारी फिरणं >>> अच्छा, हे माहीत नव्हते. इंटरेस्टिंग आहे.
अगदी मनातले
अगदी मनातले
वारी माझ्या घरात आणि माझा पांडुरंग ही माझ्या मनातच… डिट्टो.
आता गर्दी नको वाटते. अस्वच्छता त्याहून नको वाटते.
ममो
ममो
पुण्यातून सासवड
किंवा।आळंदी ते पुणे
असा तेवढाच 1 दिवसीय टप्पा करता येईल की.
किंवा 5 किमी असे ठरवून.
अनुभव मिळेल.
तुम्ही लिहिले आहे त्याला सहमत आहे.
गर्दीचे व्यवस्थापन आणि येणारा ताण ह्या 2 गोष्टी आहेतच.
छान लिहिलंय ममो. मनातली वारी
छान लिहिलंय ममो. मनातली वारी सगळ्यात भारी.
छान लिहिलंय - प्रांजळ!
छान लिहिलंय - प्रांजळ!
हेमा ताई, पुढच्या वर्षी आपण
हेमा ताई, पुढच्या वर्षी आपण एक टप्पा करूया. तुमच्या बरोबर माझाही होईल.
राम कृष्ण हरी
फार फार प्रॅक्टिकल लिहीलेले
फार फार प्रॅक्टिकल लिहीलेले आहे. वारीचे उदात्तीकरण टाळलेले आहे. मी वाचणार नव्हते आधी म्हट्ले, ज्याची त्याची श्रद्धा. पण लिहीलेले पटले आणि आवडले.
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
वारीविषयी ह्या सगळ्या भावनिक
वारीविषयी ह्या सगळ्या भावनिक अवस्थांचा अनुभव घेतल्यानं लेख भावला.
तरीही मी वारी केली! जरा कॉर्पोरेट थाटात केली. सांगतो.
पण त्यापूर्वी एक सांगणं भाग आहे. वारीत चार पावलं चालल्यानंतर जो विठ्ठल गवसला तो अपूर्व, अनुभवज्ञेय आणि शब्दातीत आहे!
तर कार्यबाहुल्यामुळे(!) आम्ही सोयिस्कररित्या 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाईच माझी ' अशी पळवाट काढत आलो. अनेक वर्षं. पण मग एका सुहृदानं एक पर्याय काढला. दर वर्षी एक, पुढचा टप्पा! पुण्याहून भल्या पहाटे निघून, वारीच्या मुक्कामी पोहोचायचं. आणि जमलं तर दर्शन घेऊन, नाही तर नुसताच रथाच्या दिशेने नमस्कार करून चालू लागायचं. असं करत करत, दरसाल एक टप्पा वारीबरोबर तर कधी दोन, आणि एकदा तर तीन टप्पे एकदम (वारीच्या पुढे) चालत करून आळंदी ते पंढरपूर चालत सलग नाही तरी तुटक वारी, बारा वर्षांत पूर्ण केली. याला मी वारी मार्गी चाललो एवढंच म्हणतो.
हा पर्याय विचाराधीन ठेवावा अशी माझी विनंती! वारीमधल्या उणीवांचा (राम कृष्ण हरी!) कमीत कमी त्रास या योगे होतो, आणि अनेक फायदे हाती लागतात असा माझा अनुभव.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
अनया आणि झकासराव छान सजेशन आहे, विचार करते.
वारीत चार पावलं चालल्यानंतर जो विठ्ठल गवसला तो अपूर्व, अनुभवज्ञेय आणि शब्दातीत आहे! >> खूप छान.. एका वेळी ताण येणार नाही , तुम्ही म्हणताय तसं जमत का ते ..
ममो खूप छान लिहिलं आहे.
ममो खूप छान लिहिलं आहे. वारीमधले फोटो लहानपणापासून बघत आलो आहे. बराच विचार करून झाला आणि सध्या वारीमधल्या फोटो आणि सोमी पोस्टींचा इतका अतिरेक झाला की मग खरंच तिथे जाऊन जे समाधान मिळते ते मिळेल का असा प्रश्न पडायला लागला. लहानपणापासून माळकरी लोकांच्या सहवासात असल्याने त्यांची ओढ माहिती आहे पण सध्या तरी तुमच्यासारखेच तिकडे न जाणे हेच बरोबर वाटते.
पटलं.
पटलं.
वारी / परिक्रमा यांविषयी उत्सुकता वाटते.
पण खूप जवळून अनुभवणे जमेल, आवडेल की त्यातील वाईट गोष्टी (?) निदर्शनास येऊन आहे त्यापेक्षा पण मनातून दूर जाऊ.. असं बरंच काही वाटत राहतं. या लेखा निमित्ताने ते वर आले.
धनि, धन्यवाद मी स्वच्छंदी
धनि, धन्यवाद मी स्वच्छंदी
आवडलं हे. खूप खूप आवडलं आणि
आवडलं हे. खूप खूप आवडलं आणि भिडलं. कारण हे स्थित्यंतर काही प्रमाणात मी सुद्धा अनुभवलं आहे.
>> वारीला जाऊन ह्या सगळ्याला हातभार लावणार नाही
+१ १ १ १ १
मला वारीबद्दल खूप वाटतं,
मला वारीबद्दल खूप वाटतं, श्रद्धा आहे, पण स्वतः वारी करावी असं वाटत नाही याला हीच सगळी वर आलेली कारणं आहेत. माझा नवरा मात्र आळंदी-पुणे एक दिवस करतो आणि मग पुणे सासवड एक दिवस. म्हणजे सलग २-३ वर्षं जमलंय त्याला. पुढचे टप्पे जमतील तसे होतील कदाचित. मी इतकी ध्यास घेऊन नाही जाऊ शकत चालत वगैरे.
अतुल प्रद्न्या धन्यवाद..
अतुल प्रद्न्या धन्यवाद..
रिअॅलिटी चेक आहे! खरं तेच
रिअॅलिटी चेक आहे! खरं तेच लिहिलं तुम्ही
वारी, कैलास यात्रा, परिक्रमा, तिरुपती दर्शन, गिरनार, पुण्यातली विसर्जन मिरवणूक, लालबाग राजाचे दर्शन, नर्मदा परिक्रमा जे करतात, ज्यांना यातून आनंद मिळतो चांगलंच आहे. पण सिव्हिक सेन्स दिवसेंदिवस जो कमी होतोय त्याची जास्त भिती वाटतेय.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
वाढलेली लोकसंख्या त्यामुळे क्षमतेपलीकडे फुगलेली शहरे आणि गावे, त्यामुळे होणारा ट्रॅफिक जॅम, सार्वजनिक जागी शांतता कशी ठेवावी, स्वच्छता कशी राखावी ह्याचा सर्वच स्तरावर असणारा अभाव ह्यामुळे सणाचं उत्सवाच सार्वजनिकीकरण नकोच वाटत हल्ली मला. असो.