शब्द झाले मोती : ३
जवळजवळ १८ वर्षांनंतर मायबोलीवरती पुन्हा लिहायला आलो आहे...
मधल्या काळात लिहीत नव्हतो, असं नाही...
पण इथे नव्हतो.
“शब्द झाले मोती” लिहायला घेतलं, त्यालाही आता १०-११ वर्षे झाली.
“शब्द झाले मोती” म्हणजे मला जे वाटतं, तेव्हा जसं वाटतं, तसंच माझं मन मी लिहितो...
कुठलाही आडपडदा नाही.
डायरी जणू माझी...
आता मागे वळून पाहताना वाटतं,
माणूस तिशीतून चाळिशीकडे येताना किती स्थित्यंतरांतून जातो...
या भागात मात्र मला चाळिशीतल्या माझ्या मनाला उमटणारे भाव शब्दांत उतरवायचे आहेत.
जसं वाटेल, तसं लिहिणार आहे...
आधी वाटलं होतं, FIRE, Finance, Health, चाळीशी... अशा माझ्या आत्ताच्या विचारांवर लिहावं.
पण इतक्या वर्षांनी पुन्हा लिहायला घेतलं आणि आठवणींचे दरवाजे आपोआप उघडू लागले...
मग म्हटलं,
“शब्द झाले मोती” म्हणजे मनात येईल ते.
त्याला कसला बांध नाही...
कसल्या मर्यादा नाहीत...
ते म्हणजे माझं
मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन.
म्हणून विषयाला वर दिल्यासारखं बांधणार नाही...
जे वाटेल ते लिहिणार.
बरेचसे माझ्या खऱ्या आयुष्यातले...
खरी कहाणी सांगणारे...
खरं तर रोज १२-१५ तास कामात व्यस्त असल्याने कसलाच वेळ मिळत नाही.
पण आता ठरवलं आहे...
बस, रोज १५ मिनिटं तरी लिहिणार.
फक्त माझ्यासाठी.
मायबोलीवर आधीचे दोन भाग नाहीयेत.
म्हणून मागचं जे काही चांगलं आहे, तेही या धाग्यात पुन्हा रिपीट करेन...
कारण काही आठवणी पुन्हा जगाव्याशा वाटतात,
आणि काही शब्द...
पुन्हा एकदा मोती व्हावेत असं वाटतं.
आणि शेवटी एक विनंती...
कृपया रिप्लायमध्ये
“छान... सुंदर...” असे रिप्लाय नकोच.
मला प्रतिसादांची संख्या वाढवायची नाही.
यावेळी ही माझी डायरी आहे...
आणि हे लिखाण माझ्याचसाठी असणार आहे.
कारण यावेळी
मलाच माझं लिहायचं आहे...
जे वाटेल तसं.
— शब्दमेघ... मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन
(गणेशा)
मेघ - १
मेघ - १
प्रिय वसुंधरे,
तू म्हणशील,
“हे ‘प्रिय’ काय रे बेफिकीर, टुकार ढगा?
एकतर तुझा स्वभावच मुळात कुठेही भरकटणारा… तुला पाहिजे तसा… स्वैर!”
पण असूदे… मी असाच.
आज मला तुझी आठवण आली.
का नाही येणार?
आषाढ सुरू होऊन दोन-तीन दिवस होऊन गेलेत…
आषाढ माझा आवडता महिना.
तू नाही का म्हणत असतेस मला—
“काळा काळा कापूस पिंजला रे…”
मी असाच अवखळ… भारदस्त…
आणि तू - हळवी.
मी कोसळलो की तू माझ्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहतेस… मनापासून.
आणि मग तुझा तो अबोल मृद्गंध सगळीकडे पसरतो
हवा हवासा… मनात भिनणारा.
तूही नटतेस, हिरवा शालू परिधान करून…
आणि पुन्हा असा वेंधळा मी दिसलो,
की माझ्यावरती तू डोळे वटारून पाहतेस.
मग मीच ओशाळतो…
माझा काळा रंग तुझ्या हिरव्या शालूला शोभत नाही, असं समजून मी पांढऱ्या शुभ्र रंगाची दुलई घेऊन येतो तुझ्याकडे.
तेव्हा मात्र माझी एकच इच्छा असते,
मी सोडून तुला कोणीच पाहू नये…
तू फक्त माझीच असावी.
आपलं हे असंच असतं…
मग एखादा उनाड वारा मध्येच घोंगावतो,
विजेच्या तारा तुटतात…
तू चिंब ओली…
आणि मी धूसर, अस्पष्टसा…
मी मग दूर जाताना,
तुझ्या पानाफुलांत माझे श्वास अडकतात - अध्ये-मध्ये.
मला भास होतो…
तू आवाज देते आहेस असा.
मागे वळून पाहतो…
तर दिसते फक्त क्षितिजरेघ.
तुझ्या-माझ्यामधली…
कदाचित तुझ्याही हातात
ही क्षितिजरेघच सापडते…
माझ्या ऐवजी.
तुझाच मेघ…
-शब्दमेघ.. एक मुक्त स्वैर स्वछंदी जीवन.. (गणेशा)
मेघ २
मेघ २
प्रिय वसुंधरे,
आज वाटतंय… तुझ्यापाशी यावं… मनमोकळं.
तुझा हात घट्ट पकडावा,
तुझ्या मिठीत शिरावं…
शेवटच्या श्वासापर्यंत.
अस्तित्वच संपवून घ्यावं… तुझ्या मिठीत.
तुला जाणवतील माझ्या हृदयाची अनियमित स्पंदने…
मध्येच तुला तिथे चिमण्यांची किलबिल ऐकू येईल,
काही रंगीत रंगांच्या छटा मध्येच दिसतीलही…
मी मात्र डोळे बंद करून घेतलेले असतील.
बंद डोळ्यांत पाणी लगेचच साठत जातं…
आणि त्या डबडबलेल्या डोळ्यांत
किती आठवणी तरंगत असतात…
काय सांगू?
शाप आहे माझ्या डोळ्यांना…
ते उघडले की पाणी उडून जातं.
म्हणूनच कदाचित
तू हवेचं कुंपण घातलं आहेस माझ्याभोवती…माझ्याचसाठी.
पण आवडीच्या गोष्टींना
अशी कुंपणं का घालावी लागतात गं?
माहीत नाही…
पण तुझ्या वाऱ्याचे हात
तू माझ्याभोवती गुंफून ठेवलेले असतात…
मी मात्र तरीही पाझरतो…
आणि निघून जातो.
मागे उरतात फक्त
तुझ्या हिरव्याकंच गवताच्या भाळी माझ्या पाऊलखुणा…
कधी कधी…
दवबिंदू ल्यालेल्या.
तुझाच मेघ…
-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वच्छंदी जीवन (गणेशा)
शब्द झाले मोती: मेघ - ३
शब्द झाले मोती: मेघ - ३
___________________
प्रिय वसुंधरे..
मी एक ढग… साधा ढग.
तुझा ढगोबा.
कधी कधी तुझा वाऱ्याचा हात माझ्या गालावरून अलगद फिरू लागला की,
मध्येच मला आईची आठवण येते…
ती पण मला ढगोबाच म्हणायची.
तू मात्र माझी सखी… मैत्रीण.. प्रिय.
एकदा आठवतंय?
आपल्यात खूप भांडणं झाली होती… त्या समुद्रावरून.
तो अजूनही तुझ्या पायाशी लोळण घेतो बघ…
आपल्याला तसं जमत नाही.
आपला स्वभावच असा-
हट्टी.
तू म्हणतेस, मी खूप कठोर बोलतो… कधी कधी.
खरंय.
“तुझ्या-माझ्यात नातं असलं,
तरी त्यात एक व्यवहार आहे…
साधा वाटलो तरी माझ्याकडे तलवार आहे,
माझ्या तरल शब्दांनाही धार आहे…”
असंच काहीतरी मी बोलत गेलो होतो… आणि मग निघून गेलो, दूर… डोंगरापलीकडे.
मग मात्र तू रडत बसलीस.
मी पाहिलं होतं तुला…
हलकेच.
पण मी रागावलो की
माझा हि मी राहत नाही.
नंतर मात्र…
हृदयात हलकेच एक कोवळी वीज चमकते, तुझ्या ओढीची.
मग भांडणं विसरून
मी पुन्हा तुला पाहायला येतो.
तू मात्र अजूनही तशीच…
रागावलेली.
मग हलकेच
मी एखाद्या झाडावर चढून बसतो.
तू बोलत नाहीसच.
मग मी पालखी बनून येतो
तुझ्या दारी…
तुला मनवायला.
तू माझ्याकडे पाहतही नाहीस.
मग पानाफुलांत जाऊन
तुझ्यासाठी गाणं गातो…
तरी तू माझ्याकडे दुर्लक्षच करतेस.
मग वेगवेगळे आकार घेतो,
तुला हसवायला.
तू मात्र चिडलेलीच असतेस.
तुला रंगांचं खूप अप्रूप आहे,
पहिल्यापासूनच.
मग मी सूर्याकडे जातो…
त्याची मदत घेतो.
तो माझ्यावर
रंगांचा वर्षाव करू लागतो-
संध्याकाळी.
मी काळा असलो तरी मला मरून लाल रंग आवडतो…आणि तुला हिरवा.
म्हणून मी लाल रंगाचीच उधळण करतो.
तुला काय वाटतं, काय माहीत…
तू तुझ्या हिरव्या साडीत
गाल फुगवून उभी असतेस.
पण तुला माहीत आहे ना-
मला हिरवी साडी खूप आवडते, पहिल्यापासून.
मग अलगद
मी तुझ्याभोवती पिंगा घालतो…
आणि तुझे हात
माझ्या हातात घेत,
ताऱ्यांचं रूपडं बघत
तिथेच बसतो…
काहीही न बोलता.
तुझ्याचसाठी.
तुझाच मेघ…
-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन.. (गणेशा)