इतना ना मुझ से तू प्यार बढा
के मैं इक बादल आवारा
कैसे किसी का सहारा बनू
के मै खुद बेघर बेचारा...
हे गाणं रेडियोवर ऐकत ऐकत मोठा झालो. मग सलीलदांची स्टोरी कधी तरी कानावर पडली. त्यांच्यावर पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचा प्रभाव होता ते कळलं. पाश्चिमात्य संगीत म्हणजे.. काय की! पण त्याचं खरं गारूड झालं ते साउंड ऑफ म्युझिक बघून. त्यात मोझार्टचं गाव अशी गावाची अन् त्याची ओळख झाली होती. काय तो ओपनिंग सीन आहे भौ! आज जग हिंडून झालं तरी तो बर्फाच्छादित शिखरांचा ट्रान्स्फर सीन, ते अपार आणि अनोखं निसर्ग सौंदर्य, ती डोंगरमाथ्यावरची हिरवळ, त्यात वाहणारा चिमुकला झरा, आणि ती प्रफुल्लित ज्यूली ॲन्ड्रू्यज, आणि त्या क्रेशेंडोला पोहोचलेल्या संगीताच्या सुरात सूर मिळवून थेटर भरून रहाणारा तिचा तो स्वर.. ओहोहो व्हॉट वंडरफुल! पण काय ना, ते म्युझिक आपलं हिंदी पिक्चरची गाणी वा मराठी भावगीतांसारखंच होतं. डोरेमी वगैरे उगाच होतं. प्रश्न तो शिल्लकच होता - उगिच का कांतातला उ पेटीवर कसा वाजवायचा?!
हो, तर सांगत होतो की सलीलदांनी त्या मोझार्टच्या चौदाव्या का कुठल्याशा सिंफनीवरून ही चाल घेतली आहे. ते गाणं इतकं बेमालूम बेतलं आहे की कोणा तरी जाणत्याला त्यात भैरवी का कसलेसे सूर जाणवले होते. चौदावी सिंफनी का चाळीसावी? आयला, त्यांच्याकडे रागांनाही आकड्यांच्या लायनीत उभं करतात की काय? आपल्याकडे कशी लडिवाळ नावं देतात - कुकुभ बिलावल, वगैरे! त्या काळी वेस्टर्न क्लासिकलची एवढीच ओळख होती. आजही आठवतं की कसलंस अगम्य संगीत वाटायचं ते. म्हणजे आपल्या उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताशीही तशी काय तर तोंडओळख होती एवढंच. (आणि कर्नाटक संगीतवाले उगा कै तरी बद्द आवाजात दळण घालतात ही समजूत). पण तरीही एक ओळख होती ना! पुण्यात काय तर ते पेटी दर दोन चार वाड्यांमागे एक निघायची. इथे मात्र भारदस्त पियानो असायचा. जो आयुष्यात पहिल्यांदा पाहिला तो माझ्या पहिल्या विमान प्रवासात ( ती पण गोष्ट लिहावी म्हणतोय!) गॅटविकवर.
तर सांगत काय होतो, की पाश्चिमात्य संगीत. त्यांचं दुसरं रूप परिचित होतं. तो मायकेल जॅक्सन, ते काय थ्रिलरबिलर, वॉक लाईक इजिप्शिअन. अन् काय काय. पण तो ढणढणाट, ते इंग्लिश असावे असं वाटणारे शब्द, त्यांचा न कळणारा अर्थ. ते काही मनाला भावलं नाही. तिथेही जुम्मा चुम्मा दे दे वगैरे तद्दन कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये मैदानात नाचण्याच्या गाण्यांमध्ये एखादं फंकीऽऽटाऊन खपून जायचं. त्यातही एखादा मित्र एरिक क्लॅप्टन वगैरे शाईन मारायचा.पण ते तेवढ्यापुरतं. त्यापेक्षा आपला किशोर-आरडी बरा...
तर या सगळ्याचा मथितार्थ काय तर मोझार्ट, बीथोवन, वगैरे दोन चार नावं, हा सिंफनी वगैरे एखाद-दुसरा शब्द सोडला ना तर मी जेव्हा अमेरिकेत पोचलो तेव्हा पूर्णतः अनभिज्ञ होतो. थांबा थांबा, मधल्या काळात तो झुबिन मेहता नामक कंडक्टर भारतात येऊन गेला होता. लोकांकडे पाठ करून (खरं तर बूड नाचवत!) हातात एक काठी घेऊन उगा काही तरी हातवारे करत पाचपन्नास लोकांकडून वेगवेगळ्या वाद्यांची कसरत करत क्वचित कर्णमधुर, पण बरचसं अनाकलनीय संगीत वाजवून घेणारा इसम! फिलहार्मोनिक हा आणखी एक उच्चभ्रू शब्द त्या भेटीत गाठीला लागला होता!
पण तरीही कुठे तरी ते सूर, ते संगीत, त्याचा तो नखरा मनाला धक्का देऊन गेला होता. आपलंस वाटत नव्हतं पण एक आकर्षण होतं, कुतुहल वाटत होतं. (चुकून) एकदा कॅंपातल्या त्या दुकानात गेलो होतो. एम्पायर म्युझिक नाव होतं का त्याचं? नक्की आठवतं नाही आता. तर तिथे मोझार्टच्या त्या सिंफनी ची कॅसेट सापडली. ती चक्क घेतली मी! त्या काळी कॅसेट घेणं परवडू लागलं होतं. पण उगाचच पैसे खर्च केल्याबद्दल घरी ओरडा बसलाच होता! एक गम्मत आठवतेय. मी माझ्या नागपूरच्या चुलत भावाला ती कॅसेट घेतल्याचं पत्रातून कळवलं होतं. होय, त्या काळी एकमेकांना - आम्ही सारख्याच वयाचे होतो - पत्र वगैरे लिहायचो! त्याच्या उत्तरात त्यानं तुम्ही काय बोवा पुणेकर, उच्च अभिरुचीची माणसं, आम्ही आपले मॅडोन्ना वाले - पापा डोन्ट प्रीच वगैरे लिहून हेटाई केल्याचं आठवतंय!
खरं तर अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी कॅरिबियन बेटांवर मुक्काम झाला होता. चांगला भरभक्कम! त्यामुळे सोबत्यांकडून ॲबा, बीजीज वगैरे ग्रुपांची हवा लागली होती. त्या काळी मला वाटतं एम टीव्ही वगैरे जोरात होतं. आता तिथे काय ऐकत/बघत होतो आठवतं नाही, पण माझा फ्लॅटसोबती सतत त्याचं दळण घालत असायचा. मग फॅंटम ऑफ ऑपेरा वगैरे आडवे गेले होते. त्याच काळात मला वाटतं थ्री टेनॉर नावाचा एक कार्यक्रम कुठे तरी घडला होता. माझा रुम पार्टनर त्याची फार म्हणजे फारच वरवर करत होता. पण तो अगम्य भाषेत अतिरेकी ओरडाआरडीचा प्रकार शास्त्रीय मला तरी वाटला नै ब्वा. पण त्या काळात सनशाईन ऑन माय शोल्डर्स वगैरे दोन चार बरे दागिने पोतडीत जमा झाले होते. आणि बापरे ते ओ माकारेना.. ऐकून डोकं फुटायची वेळ आली होती!
पण त्या काळात तिथे ऐकायला मिळालं ते चुटनी सॉंग्स, रेगे, कॅलिप्सो आणि डान्स हॉल म्युझिक. रेग्गेचा तो एक विविक्षित ठेका... डान्सहॉलचा थरथराट. सुट्ट्यांना म्हणा, हॉटेलमध्ये म्हणा पण लाईव्ह म्युझिक ऐकायला मिळालं. या भरात वेस्टर्न म्युझिकशी जवळीक वाढली. पण खासगत नाही झाली. स्वकुलतारकसुताच्या पगड्यातून बाहेर पडावं असं काही कानी पडलं नाही म्हणा वा भावलं नाही म्हणा. तसंच वेस्टर्न क्लासिकलचा म्हणावा तसा माहौल मिळत नव्हता.
तिथे माझा एक सहकारी होता. कसंय या कॅरिबियन लोकांना अमेरिकेची वा इंग्लंडाची लई ओढ. तर हा गडी दर दोन चार महिन्यांनी मायामीला जायचा आणि काहीबाही वस्तू आणून इथे विकायचा. त्याला सांगून ठेवलं होतं, ते मोझार्ट एक थोडं मिळतं का ते बघ म्हणून. आणली की त्यानं एक सीडी पुढच्या टैमाला! मग काय? लेट नाईट कामाला बसावं लागलं की ऑफिसमधल्या मशीनच्या सीडी ड्राइव्हवर कधी कधी ती सीडी वाजायला लागली. त्यात फक्त मोझार्ट नव्हता. होता बाख, बीथोवन, हांडेल, हा आणि तो. मग ते रशियन नावाची लोकं. बरं ऐकायला मिळालं.
(बरं का, विषय गेले करायचे राहून असा आहे...)
हो ना. यथावकाश अमेरिकेत आगमन झालं ते विंटरात आणि उत्तरेकडच्या एका बर्फाळ शहरात. मरणाची थंडी. बरोबर होता तो पुण्यातून आणलेला एक कुकर, एचवनबी वाल्यांचं घड्याळ आणि तो उभा दिवा. आजही थंडी वाजली की डोळ्यासमोर येतात रात्रीच्या अंधारात चमकणारे त्या घड्याळाचे लाल आकडे! एअरबेडवर पडून काचेपलिकडे, रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात गॅलरीत पडणारं बर्फ बघत वा शेजारच्या डोंगरावर अंधारात शेंडे नाचवणारी सूचीपर्णी वृक्षराजी बघत कंफर्टरमध्ये गुरफटून झोपेची आराधना करायची. आणि इथेच एक जादुचा दिवाच म्हणाना तो मला मिळाला. ते घड्याळ, फक्त घड्याळ नव्हतं. त्यात रेडिओ पण होता! आणि रेडिओ वर सापडलं चोवीस तास वेस्टर्न क्लासिकलचा रतीब घालणारं स्टेशन! दिवसा काही संबंध नव्हता. पण गादीवर पडलं की सोबतीला यायचं WGBH (चूभूद्याघ्या) त्या रिकाम्या खोलीत वाद्यमेळाचे सूर घुमू लागायचे. कधी एखादा चेंबर ऑर्केस्ट्रा असायचा तर कधी आख्खा फिलहार्मोनिक संच. कधी वरच्या पट्टीत, तापलेली व्हायोलिनं आक्रंदायची तर कधी मंद मंद पियानोचे स्वर ओघळायचे. सुरावट कधी रस्त्यावरच्या पिवळ्या हेलियम दिव्यांच्या पखरणात खुलणारी चाल-ताल तर कधी त्या अंधाऱ्या जंगलाच्या बिकट गर्दीत रूतणारी. कधी वॉल्ट्झच्या थिरकत-थबकत गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. खरं तर दिवसभराच्या उस्तवारीनंतर झोप लागायला वेळ लागायचा नाही. पण ती दोनपाच मिंटं स्वरांच्या हिंदोळ्यावर कशी अलवार जायची! कधी पहाटेच जाग यायची. मग पुन्हा सुरांचा स्रोत झरू लागायचा. उगवतीच्या लालिम्याला चेलो वा ओबोचे स्वर कुरवाळायचे. पण आपल्या सकाळच्या भटियार वा केदारची तोड यांच्या संगीतात? काय माहिती?
रच्याकने, मला सा आणि ढ यांच्यातला फरक शष्प कळत नाही. उगाच काही नावं जनरल नॉलेज म्हणून माहिती असतात, म्हणून डिंग मारायची, वाचणारा इंप्रेस होतो! नाही तर अडाजिओ असो वा तराणा, शेवटी आंब्याची साल आणि कागद एकाच चवीनं खाणारे प्राणी आम्ही..
असू गदर्भयोनीतले. पण चांगलं मूजिक हे कानाला गोड लागतं याची पूर्ण जाणीव आहे. आणि आपल्या कानातून जे मनात उतरतं ते उत्तम असलंच पाहिजे अशी (पक्की पुणेरी) समजूत आहे. एक गंमत सांगतो. मी आपलं शास्त्रीय संगीतही खूप ऐकतो. गायन आणि वादन दोन्ही. पण वेस्टर्न क्लासिकल चे पीसेस जसे डोक्यात घोळतात ते आपल्या संगीताचे होतं नाही. याचं कारणही मला माहीत आहे. हिंदी पिच्चरची गाणी कशी डोक्यात बसतात? नुसतं पहिले दोन बार वाजले की गाणं आठवतं, समोर उभं राहातं. का? शेकडो वेळा ऐकलेलं असतं ना! तसंच या सिंफनींचं आहे. अपवाद सोडता त्या कायम तशाच वाजतात! आणि आपल्याकडे? आकृतीबंध रागाचा असतो. पण सादरीकरण प्रत्येकाचं वेगळंच असतं. मग त्या फ्रेजेस कशा डोक्यात बसणार?
(अहो महाराज, हजारो शब्द झाले पण करायचं राहून काय गेलंय?)
हां, तर आठवतेय एक संध्याकाळ. उत्तर अमेरिकेल्या एका प्रख्यात शहरातली शनिवार संध्याकाळ. ग्रे स्काईज हेच ज्याचं चपखल वर्णन आहे ते आकाश. बर्फाची भुरभूर. साताठ किलोमीटर चालून आलोय पण घामाचा थेंब नाही. उलट त्या मरणाच्या थंडीत उल्हास जाणवेल अशी ऊब शरीरात साठलेली. अमेरिकेत नव्या आलेल्या मुशाफिराची औत्सुक्यपूर्ण भिरभिरती नजर. त्या संधिप्रकाशात एका इमारतीसमोर उंची कपडे घातलेली गोरी जोडपी भारी कार मधून उतरून त्या भारदस्त इमारतीत जात होती. त्या अशर्सची लगबग, त्या जोडप्यांची सहजसाध्य ऐट, त्या पिवळ्या दिव्यांत त्यांचे झळकणारे काळे, डार्क किंवा स्त्रियांचे रंगीत पण घरंदाज ओव्हरकोट... पाचसात मिंटं मी खिळून तिथे उभा होतो. ते समृद्धीचं दर्शन खचितच आल्हाददायक होतं. काय चाललंय इथे? मग हातातल्या मॅपमध्ये पाहिलं तर सिंफनी हॉल! अरे, म्हणजे आपण ते रेडूवर ऐकतो ते हेच कार्यक्रम! आत्ता मोझार्ट वाजणार असेल!! माझे डोळे लकाकले. आत कोणी वेणूत फुंकर घालून तयारी करत असेल तर कुणी घट्टे पिळून स्वरात साज लावत असेल. कंडक्टर डोळे मिटून डोक्यात उजळणी करत असेल - वाद्यवृंदाला कळसाध्यायापर्यंत कसं न्यायचं आणि कुठे स्वरगंगेचा पोत बदलायचा. थोड्याच वेळात श्रोते स्थिरस्थावर झाल्यानंतर स्वरांचा बांध फुटेल आणि धबाबा तोय वाहे अशी अवस्था येईल. इकडे बाहेर मी नुसत्या कल्पनेनेच महिरलो होतो. (कुणी नवोढा नव्हती हो बरोबर!)
असं सरस रंगरसगंधयुक्त एक नातं या वेस्टर्न क्लासिकलशी जुळत होतं. सीड्यांची संख्या वाढत होती. नवनव्या (म्हणजे माझ्यासाठी नव्या) कॉंपोझरची ओळख होत होती. त्यातला शास्त्रीय भाग काही उमजत नव्हता. किंवा तसा प्रयत्नही मी फारसा केला नाही. पण ओबो सारखं नवं वेगळं वाद्य आवडायला लागलं. पियानोपेक्षा या सुशिर वाद्यांच्या सिंफनी मला जास्त भावल्या. पियानोत काय आहे नं, वैचित्र्य फार आहे. विविधता आहे पण फारच क्लिष्ट पीसेस आहेत. मग आनंद मालवतो. असो.
(महाशय, मग करायचं राहिलं काऽऽय?)
कालांतरानं अमेरिकेच्या उत्तरेकडल्या दुसऱ्या एका शहरात वास्तव्य झालं. ते पर्यंत इंटरनेटनं बऱ्यापैकी जम बसवला होता. त्यामुळे सीड्यांची जागा आता स्ट्रीमिंगनं घेतली होती (पण तेंव्हा हा शब्द नव्हता). मग WCPE सापडलं. आता काम करतानाही कानात सिंफनी किंवा ऑर्केस्ट्रल म्युझिक चालू असायचं. बरं, या गावात मी बसनं कामावर ये जा करत होतो. आणि त्याचा रूट इथल्या सिंफनी हॉल समोरून जायचा! कधी जाता येईल का असं वाटायचं. तो पर्यंत फेसबुक वगैरे मार्गे त्या कॉन्सर्ट, त्यांचा उचभ्रूपणा, ते वेषभूषेचे नियम, सगळे मॅनर्स आणि एटिकेट्स.. तिथे साधी मान डोलवायची बोंब, आणि इथे निम्मं आयुष्य गेलेलं ते समेला मान डोलली नाही तर फाऊल मानण्यात! एखादी जोरदार तान, किंवा तडफदार तबल्याचा तुकडा, दिलखुलास दाद घेऊन जाणारच! सिंफनीच जग आगळं होतं, कठीण वाटायचं. पण कोण जाणे आकर्षकही वाटायचं. त्याच कालावधीत एकदा एका उत्तम दर्जाच्या साऊंड सिस्टीम, म्हणजे अगदी लाखो रुपयांचे स्पीकर आणि ॲम्प्लिफायर वगैरे, अशा सेटअप मध्ये एक दिवस मोझार्ट ते स्ट्रॉस सगळे ऐकले. जळून राख झालो. एक तर असा रेकॉर्डेड आवाज, अशी स्टिरिओफोनिक सिस्टीम आणि ते संगीत! जर एका खोलीत ते एवढं भावतो, तर... तर त्या भल्या थोरल्या अकॉस्टिक साठी नावाजलेल्या सभागृहात कसा जाणवेल? आणि तेही लाईव्ह? तारेची थरथर, श्वासांची शक्ती, सरावलेल्या बोटांचा कौशल्यपूर्ण नाच, आणि त्यामागची मानवी आसक्ती...
उन्हाळा सुरू झाला. आणि जाहिराती यायला लागल्या. त्या वर्षी नूतनीकरण झालेला त्या शहरातला सिंफनी हॉल, त्याचं उद्घाटन होतं. त्यानिमित्ताने बारा तास ओपन हाऊस होतं. कुणीही या, कुठेही हिंडा, कितीही वेळ बसा! विनाशुल्क आणि विना गणवेश!! आणि वेस्टर्न क्लासिकल बरोबरच जाझ, हिपहॉप आणि इतर संगीताचे प्रकार. तोच जगप्रसिद्ध कंडक्टर, तोच कसलेला वाद्यवृंद.. आणि तेच पण नवा साज ल्यालेलं सूरमंदिर! मनाशी खूणगाठ बांधली, जायचं. नक्की जायचं.
जायचं???
त्या सगळ्या वातावरणात मी उपरा तर ठरणार नाही? आपल्याला काय कळतं त्यातलं? कशाला आगाऊपणा करून तिथे जायचं? हं...
मनाची तयारी करत होतो. कुठे तरी दडपण होतं. एकाच मनाचं द्वंद्व चाललं होतं.
दिवस जवळ यायला लागला. समर संपून ऑटम अवतरला. झाडांची पानं झपाट्यानं रंग बदलू लागली. त्या सिंफनी हॉल जवळ तयारी दिसू लागली. नवे बॅनर लागले. शहरात ठिकठिकाणी फलक लागले. वर्तमानपत्रांत जाहिराती झळकू लागल्या, स्तंभलेखक लेखण्या झिजवू लागले. मात्र माझ्या मनाची तगमग वाढू लागली. मी त्या शंकेखोर मनाला गप्प करू लागलो होतो. पण तो कोलाहल वाढत होता.
तो वीकेंड आला. शुक्रवारी परतताना तिथे उत्सवी, उत्साही वातावरण दिसत होते. पण माझ्यावर दुर्धरावस्था ओढावली होती. एकच मन असतं ना आपल्याला? का अनेक? दुभंगमनस्क नव्हतो ना मी? मग हे मन भांडत कोणाशी होतं? गेली पाच-सात वर्षं ज्या संगीतावर वाढत्या चंद्रकलेसम वर्धिष्णू प्रेम केलं होतं, ते मनानं का बुद्धीनं? जर मनानं असेल तर तेच मन काचकुचत का होतं? आणि ती बुद्धी कुठे शेण खात होती? जे मन एका क्षणी त्या कॉन्सर्टला जाण्याच्या विचारानं उचंबळून येत होतं, तेच जणु त्याच क्षणी फाटे का फोडत होतं?
माझ्याकडे कुचेष्टेनं तर बघितलं जाणार नाही? मी काही तरी गर्हणीय चूक तर करून बसणार नाही? विचारांचं वादळ घोंघावत होतं.
हॅं, कशाला जायचं? उगाच नखरा मिरवण्यासाठी का? लोकांना सांगण्यासाठी की बघा मी कसा उच्च अभिरुचीचा रसिक आहे?
गप रे, असलं काही नाही, तुलाही माहितेय. इतक्या वर्षांत एकाला तरी मी आपणहून सांगितलं का की मी या संगीतप्रकारात गुंतलोय?
नाही ना, मग कशाला तिथे जाऊन अवलक्षण करून घ्यायचं? आपला काही संबंध आहे का?
या द्वंद्वाकडे मी तिर्हाईत नजरेनं ही बघत होतो. आयला, तुला दहा-बारा हजार फुटांवरून टॅंडम पॅरॅशूट जम्प मारताना काही वाटलं नाही. तुझा फेन्सिंगचा प्रशिक्षक तुला सुपर अग्रेसिव्ह म्हणतो. कालच तू कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंटला त्याच्या केबिनमध्ये जाऊन वाजवून आलास - तुझ्या व्हिसा स्टेटसचा विचारही न करता. मग हा.. हे मन तुझा पाय का खेचतंय? कळतंय ना किती इर्रॅशनल आहे हे?
गाढव आहेस. ज्या म्युझिक मधलं तुला शाटमारी काही कळत नाही. तुला सा म्हणजे काय आणि यांचे ए, बी, सी आणि डी कळत नाही, टेनॉर काय अन् सोप्रानो काय! व्हायोलिन आणि व्हायोला यांच्यातला फरक कळतो का? आणि नाही तर मग डायरेक्ट सिंफनी हॉलमध्ये जायचं? आपली पायरी काय, आपली पत काय? काही विचार, आं?
अरे तेच तर बघायला जायचंय...
वेडा आहेस का? कधी नोटेशन वाचलंय का? उगाच काय तरी टुंयटुंय वाजतोय म्हणून जायचं. का रे, हे असं केलं तर इथल्या लोकांच्यात पटकन सामावला जाशील का? काय रे?
मनाला झटका बसला. नाही, कदापि नाही..
शनिवार. दैनिक आन्हिकं आटोपली. जायचं.
कपडे चढवले. रोजच्या ऑफिस कपड्यांतले जरा बरे निवडून घातले. गाडी काढली. डोक्यात तेच ते घमासान चाललं होतं. पुन्हा पुन्हा तेच मुद्दे. तेच गुद्दे. या एका गोष्टीनं माझ्या मी च्या ओळखीचाच जणू प्रश्न ऐरणीवर आला होता.
सिंफनी हॉलला पोहोचलो. जत्रेचं वातावरण होतं. कन्सेशन स्टॉल लागले होते. बाल, तरूण, वृद्ध, पुरूष, स्त्रिया, काळे, गोरे, उंची कपडे घातलेले, जीन्स आणि लेदर जॅकेट, सगळे दिसत होते. पण... पण माझ्यासारखं कुणीच नव्हतं!
आणि माझ्या मनानं कच खाल्ली. नांगी टाकली. हार मानली.
न्यूनगंड दशांगुळं वरचढ ठरला. न थांबता तसंच मी पुढे जात राहीलो. सीबीडी रिकामा होता. एके ठिकाणी गाडी लावली. चालत नदी तीरावर गेलो. एकटाच. थैमान विरलं होतं. उरलो होतो हताश, हतबल, क्लांत. एका दिव्याच्या खांबाला टेकून बसलो होतो नदीतल्या बोटी बघत भरल्या डोळ्यांनी. स्वतःची कीव करत.
नदीवरच्या ग्रे स्काय मध्ये ढग दाटून आले होते. थंड बोचरं वारं वाहात होतं. ढगांना लोटत, निरुद्देश, दिशाहीन...
घरी येताना रस्ता बदलून इंटरस्टेटनं परत आलो.
राहूनच गेलं ते...
छान लिहिता. लिहीत रहा.
छान लिहिता. लिहीत रहा.
खूप सुंदर लिहिलंय! लेखनशैली
खूप सुंदर लिहिलंय! लेखनशैली आणि मांडणी दोन्ही मनापासून आवडली.
👌
👌
काय लिहिलंय!
काय लिहिलंय!
अगदी काळजाचा ठोका चुकेल अशी मर्मबंधातली ठेव आमच्यासमोर उघडी केलीत! तो आवेग, ती ओढ, गाभाऱ्यात प्रवेश आहे पण जावं का नको ती घालमेल... मजा आली वाचताना!
तुम्ही उत्तर अमेरिकेत म्हणजे नक्की कुठे असता ते बघावं असा भोचकपणा करून तुमच्या प्रोफाइल मध्ये गेलो, आणि आवडतं वाक्य दिसलं. अगदी तंतोतंत लागू आहे या लेखाला!
मला हेवा वाटला हा लेख वाचताना
मला हेवा वाटला हा लेख वाचताना. तुमच्याकडे सांगण्यासारखं किती काय आहे आणि ते सांगायची शैली आहे. गदर्भवरून चोहीकडे लक्ष आहे , हे कळलं . आठवतेय एक संध्याकाळने सुरू होणारा आणि पुढचा असे दोन्ही परिच्छेद तीनदा वाचून मगच पुढे गेलो.
शेवट काय असणार ते कळलं होतं, पण तरीही दुसराच काही असू दे असं वाटत होतं. ती शनिवारची संध्याकाळ हॅरी पॉटरला डंबलडोरच्या पेन्सिव्ह मधल्या आठवणी दिसतात तशी दिसली मला.
च्च्च अबुवा का का गेला नाहीत?
च्च्च अबुवा का का गेला नाहीत?
पण भारतात असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
NCPA मध्ये Symphony of India चे आणि इतरही ऑर्केस्ट्राचे प्रोग्रॅम होतात. उत्तमोत्तम कंडक्टर्स येतात.
आजूबाजूला बहुतांशी पारशी वृद्ध आणि छान सजलेल्या पारशी वृद्धा असतात. आपल्याला सवयीने कॉम्प्लेक्स येतो. पण जायचं बिनधास्त आणि दीड-दोन तास स्वर्गात विहारायचं. मग त्याच धुंदीत मरीन ड्राईव्हवर फिरायचं आणि मन भरलं की घरी परतायचं.
येत्या १३ ऑकटोबरला आहे प्रोग्रॅम. बघा जमतंय का?
https://www.ncpamumbai.com/event/soi-chamber-orchestra-28/
काय सुंदर लिहिलंय! मजा आली
काय सुंदर लिहिलंय! मजा आली वाचायला.
पण हे स्वप्न अधुरं ठेऊ नका, लवकरच तुम्हाला असा एक कॉन्सर्ट लाभू दे.
ओहुरहूर लागली ना राव
ओह
हुरहूर लागली ना राव
सगळ्या प्रतिक्रिया,
सगळ्या प्रतिक्रिया, प्रतिसादांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
हे विसरता न येणारं शल्य आहे. इतके दिवस मनात जपलं होतं, आज शब्दांत उतरलं. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तेव्हा अनाकलनीय होतं. पण इतर कुठल्याही शल्याप्रमाणे तो सलही आता कमी झाला आहे. म्हणून तर लिहू शकलो!
@माझेमन, हो मी Symphony of India फॉलो करतो. या कॉन्सर्टची कल्पना आहे. पण... विथ ड्यू रिस्पेक्ट, दुधाची तहान ताकावर भागवावी असं वाटत नाही.
मस्त लिहिला आहे कानसेनाचा
मस्त लिहिला आहे कानसेनाचा प्रवास! रिलेटेबल आणि रंजक!
पण मला 'क्लायमॅक्स' काही पटलेला नाही.
>>> बाल, तरूण, वृद्ध, पुरूष, स्त्रिया, काळे, गोरे, उंची कपडे घातलेले, जीन्स आणि लेदर जॅकेट, सगळे दिसत होते. पण... पण माझ्यासारखं कुणीच नव्हतं!
'माझ्यासारखं' म्हणजे नक्की काय वाटलं तुम्हाला त्या क्षणी याचं कुतुहल वाटलं. लहान मुलंही होती म्हणताहात तर संगीताचा बर्यापैकी कान असलेल्या तुम्हाला जायला काय हरकत आडवी आली असेल?
असो, वाचणार्यालाही चुटपुट वाटली हे लेखनाचं यशच!
का कोण जाणे, पण प्रकाश
का कोण जाणे, पण प्रकाश घाटपांडे यांच्या गेले ऐकायचे राहून या लेखाची आठवण झाली. त्यांच्या बाबतीत, ते ऐकणे आता त्यांना आयुष्यात शक्य नाही. तुम्हाला सिंफनी ऐकणे शक्य आहे, जमले तर जरूर ऐकून या.
मृत्युशय्येवर असलेल्या लोकांचा अनुभव असा आहे की आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा, आपण गमावलेल्या संधींची जास्त खंत वाटते.
I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
The Road Not Taken by Robert Frost
>>अपयशांपेक्षा, आपण
>>अपयशांपेक्षा, आपण गमावलेल्या संधींची जास्त खंत वाटते. >> मृत्युशय्येवर गमावलेल्या संधी आठवणार असतील तर त्या गोष्टी आठवणार नाहीत यासाठी ट्रेन करणे आवश्यक आहे. अर्थात तसे शक्य असेल तर, नसेल तर आपल्या हातात नाही, भोग आहेत मानवाचे.
ही एक गमावलेली संधी मिळविली तरी आयुष्यातील असे असंख्य गिले-शिकवे हे असे सुधारणे आणि सुधारल्याने न आठवणे हे शक्य नाही, स्केलेबल तर त्याहून नाही. त्यापेक्षा ते मान्य करून, 'राहिलंच ते आपलं', 'चुकलंच त्यावेळी' हे ॲक्सेप्ट करणे इतपतच शक्य आहे.
ती राहिलेली मैफल, ती चुकलेली कॉन्सर्ट अशीही पुन्हा जरी अनुभवायला मिळाली तरी रुखरुख ही जाणार नसतेच.
इथे लेखक कॉन्सर्टला गेले नाहीत म्हणून हा लेख आपल्याला वाचायला मिळाला, त्यांच्या अनुभवांच्या पोतडीत ही न जाण्याची आठवण कदाचित जाण्याच्या आठवणीपेक्षा चिरकाल घर करून राहिली. क्लिशे म्हणायचं तर गोडी अपूर्णतेची वगैरे वगैरे ...
दुभंगमनस्क >>
दुभंगमनस्क >>
वरच्या पट्टीत, तापलेली व्हायोलिनं आक्रंदायची तर कधी मंद मंद पियानोचे स्वर ओघळायचे. सुरावट कधी रस्त्यावरच्या पिवळ्या हेलियम दिव्यांच्या पखरणात खुलणारी चाल-ताल तर कधी त्या अंधाऱ्या जंगलाच्या बिकट गर्दीत रूतणारी. कधी वॉल्ट्झच्या थिरकत-थबकत गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या.>>
न्यूनगंड दशांगुळं वरचढ ठरला. न थांबता तसंच मी पुढे जात राहीलो. सीबीडी रिकामा होता. एके ठिकाणी गाडी लावली. चालत नदी तीरावर गेलो. एकटाच. थैमान विरलं होतं. उरलो होतो हताश, हतबल, क्लांत. एका दिव्याच्या खांबाला टेकून बसलो होतो नदीतल्या बोटी बघत भरल्या डोळ्यांनी. स्वतःची कीव करत.>>>
भुरळ पडणारी शैली आहे लिखाणाची.
रोज थोडं थोडं करून वाचल्याने आज इतक्या उशीराने दिला प्रतिसाद.
जे राहून गेलं त्यातून तुमचं लिखाण गवसलं !!
@उबो एवढं काही नाही हो. अनेक
@उबो एवढं काही नाही हो. अनेक पराभव, अपश्रेय पचवून साठीच्या उंबरठ्यावर उभा आहे. ते बोथटलेले सल म्हणजे आता जखमांचे व्रण आहेत. आणि ते सगळं विसरण्याची कला चांगली अवगत झाली आहे!
वेस्टर्न क्लासिकल कॉन्सर्ट शी संबंधित आणखी एक, जास्त बोचरा, सल आहे. आता मनातलं एवढं मांडलं आहे तर आणखी एक पदर मोकळा करतो:
अत्यंत वेगळ्या मार्गांनी जीवनक्रमणा करणारे आम्ही दोघे एका वळणावर भेटलो आणि एका टेक्नोलॉजी स्टार्टअपचे फाऊंडर झालो. स्टार्टअप म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग... अशीच एक लढाई लढून उशीरा परत येत असताना माझ्या कारमध्ये कुठलीशी सिंफनी वाजत होती. तो सहसंस्थापक अचानक खुलला. तो ही या मार्गावरचा माझ्यासारखाच आनंदप्रवासी निघाला! आणि तिथेच आम्ही ठरवलं की जेंव्हा आपला स्टार्टअप सक्सेसफुल होईल तेंव्हा सगळ्या जामानिम्यासह सिंफनी कॉन्सर्ट अटेंडायचा!!
कालांतराने तो स्टार्टअप बुडाला. त्या अपयशाचं शल्य खूपच मोठं आहे. माझेमन यांना दिलेल्या प्रतिसादात मी लिहू शकलो नाही, पण आता कॉन्सर्टची ओढ न रहाण्याचं कारण हे आहे. एक ध्येय ठरवलं होतं. त्या ध्येयाचे फळ ही अशी कॉन्सर्ट होती. आता हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् अशी परिस्थिती असल्याने महीवरचे ते भोग आपल्या प्राक्तनात नाहीत असं म्हणायचं.
जरा जास्त फिलॉसॉफिकल झालं, पण वर म्हटल्याप्रमाणे मला विसरण्याची कला उत्तम अवगत आहे!
खूप सुंदर लिहिलंय. शेवट मन
खूप सुंदर लिहिलंय. शेवट मन हेलावून गेला, पण तुम्हाला ते करायला मिळो यासाठी कोटी शुभेच्छा. आपण घाबरायचं नै अजाबात. नै कळ्ळं तर्नै कळ्ळं. आस्वाद घेणं म्हत्त्वाचं. आस्वाद घेणारे आहेत म्हणून कला सादर करणारे आहेत.
ह्यात जाता जाता “माझा पहिला
ह्यात जाता जाता “माझा पहिला विमानप्रवास“ हा विषयही येऊन गेला. त्या उपक्रमात कदाचित तुमची एकमेव प्रवेशिका असावी.
ओह्ह! ओह्ह!! एकूणच लेख आणि
ओह्ह! ओह्ह!! एकूणच लेख आणि विशेषतः "ती" संध्याकाळ तुम्ही इतक्या सुंदर रित्या शब्दबद्ध केली आहे कि तुमच्यासोबत वाचकांना सुद्धा "सिंफनी हॉल" ऐवजी "नदीवरच्या ग्रे स्काय मध्ये ढग दाटून आले होते" मधले शल्य पोहोचते. पण त्यापुढेही जाऊन "त्या ध्येयाचे फळ ही अशी कॉन्सर्ट होती" हे वाचल्यावर हि एक फक्त राहून गेलेली नव्हे तर 'परिपूर्णरित्या राहून गेलेली गोष्ट' याची आर्त जाणीव होते.
पण हा एक संग्राह्य लेख आहे, किमान माझ्यासारख्यासाठी तरी. जे राहून गेलेय त्यापेक्षा जे तुम्ही अनुभवले आहे ते भरभरून आहे यात