प्लॅटफॉर्म क्र. पावणेदहा, तानाजीराव आणि बुद्धीबळाची गोष्ट, भाई!

Submitted by मार्गी on 18 September, 2026 - 10:39

दि. १७ सप्टेंबर २०२६

✪ टॅन झिरो- Tan 0
✪ एक्स्पेक्टो पेट्रोनस
✪ मनाली ट्रेक आणि तिलगुण मेडोज
✪ "अरे हा असा कसा डान्स आहे!"
✪ गोल्डन ट्रिओ आणि किंचाळणारी ती
✪ "तू गणित शिकवायला ये ना!"
✪ पिस्तौल जेल में आ चुका है!
✪ नेहमी लक्षात राहील अशी भेट
✪ नवीन मित्र- मैत्रिणी
✪ मॅक्सवेलसारखी थरारक मॅच!
✪ हॉगवर्डसमधली वाक्यं
✪ सायकल दौर्‍यानंतरचं स्वागत- "Best father"

1°+1°+1°+1°+1°+1°+1°+1°+1°+1°+1°+1°
2^3 + 2^2
3^2 + 3^1
4^2 - 4^1
5+5 + 5/5 +5/5
6+6^1
7^1+7^1 - 7/7 -7/7
8+ ∛8 + ∛8
9+√9
10+ 10°+ 10°
11+ 11°
12+ 2° - 1°

प्रिय अदू...

आज तुझा बारावा वाढदिवस!!! १२!!! चक्क चक्क १२!!! १२ म्हणजे किती हे मलाच कळावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लिहून बघितलं! बारा वर्षं!!! आणि म्हणून हे पत्रसुद्धा बारावं! नाही, १२ वर्षं म्हणजे किती दिवस होतात हे काही मी तुला विचारणार नाहीय. पण जितके किती दिवस असतील तितक्या आपल्या आठवणी आहेत! मागचं वर्ष तुझ्या बुद्धीबळाने गाजवलं. आपण अक्षरश: शेकडो बुद्धीबळाचे डाव खेळलो. म्हणजे मी बुद्धीबळाचे डाव खेळत होतो आणि तू जास्त (कराटेच्या) बळाचे डाव खेळत होती! तुझं बळ खूप वाढलंय. आणि आता बुद्धीबळसुद्धा छान झालं आहे. गेल्या २० डावांमध्ये तू मला ८ वेळा तरी हरवलं आहेस.

माझा ब्लॉग.

तर गेल्या वर्षातला परफॉर्मर ऑफ द यीअर कोण असेल? नाही, पिकाचू नाही! तो एकशिंगी तर नाहीच नाही. बिच्चारा ऍलेक्सही नाही. आणि तो ओरडत कॉमेंटरी करणाराही नाही! तो तसा सायकलिस्ट आणि कँपर आहे, त्यामुळे मी म्हणेन की, तो परफॉर्मर आहे पण खूप मिनी मिनी भूभ्भू परफॉर्मर आहे. ह्या वर्षाचा खरा परफॉर्मर वेगळाच आहे. तसे दोन मुख्य परफॉर्मर्स आहेत. वर्षाचे पहिले सहा महिने आणि नंतरचे सहा महिने. पहिला परफॉर्मर म्हणजे तुझा तो टॅन झिरो- Tan 0 किंवा तांजिरो किंवा तानाजीराव! बाप रे! केवढा शक्तीमान होता तो! केवढं तुला त्याने वेड लावलं! मांगा से ना लेना पंगा अशी माझी अवस्था त्याने केली! तुझ्या काळातली ही कॉमिक्स! आणि नंतरचे सहा महिने मात्र तो बिननाकाचा कणकेचा गोंडूला गोळा ज्या गोष्टीत आहे ती गोष्ट! जिथे शिक्षिका मांजर होते, जिथे झाडू आणि खराटे जादूचे असतात! ट्युब पेटली ना? की "विझली?" किती त्या गोष्टीची मजा! त्यातून तुला मिळणारा आनंद! आणि ते निरनिराळे स्पेल्स! एक्स्पेक्टो पेट्रोनस! आणि कोण कोण आहे, कोणती गोष्ट काय आहे हे मला सांगण्याचा तुझा उत्साह! मला आधी फक्त बुमराहचा स्पेल माहिती होता!

पण अदू, मला फार फार आनंद झाला जेव्हा तू ती पुस्तकं गटागटा वाचून टाकलीस! अगदी मोठी मोठी पुस्तकं सहजपणे वाचलीस. शाळेत जाताना व येताना बसमध्येही पुस्तकं वाचलीस! हॅरी पाठातली तुझी अडीच पुस्तकं पूर्ण झाली आहेत! उरलेली पुस्तकंसुद्धा लवकरच होतील! मला एक पुस्तक पाहा कसं जुन्या पुस्तकांच्या दुकानात भेटलं! एवढी मनापासून इच्छा असेल तर आपोआप गोष्टी मिळत जातातच. तेवढी इच्छा मात्र असावी लागते. बुद्धीबळामध्ये पाहा कशी तू वेगाने शिकते आहेस. इतके डाव हरूनही खेळत राहिलीस- खेळत राहिलीस आणि आता मस्त खेळायला लागली आहेस.

पाबई! नव्हे भाई! अरे भाई! मी तुला बोललोय पाहा खूप वेळेस की, जितके नियमित आपण प्रयत्न करत जातो, तितक्या गोष्टी सोप्या होत जातात. आता बुद्धीबळामध्ये माझे आधीचे डावेपच चालतच नाहीत! तू ते सगळे शिकून त्यांना उलटून टाकतेस. माझी अवस्था तर तू अशा बॉलरसारखी केलीस ज्याची बॉलिंग बॅटसमन डिकोड करतात आणि त्याला ठोकतात! किती तरी डाव मी आक्रमक खेळण्यात हरवून बसलो! वैभव सूर्यवंशीसारखा खेळायला जाऊन हरायचो! मला माझा नवा बचावात्मक खेळ आता शिकावा लागतोय! गेल्या वर्षभरात आपण जवळ जवळ रोजच खेळलोय. आणि किती तरी दिवस कमीत कमी तीन डाव खेळलोय. त्यामुळे त्याचा तुला खूप उपयोग होतोय. तुला बोललो होतो पाहा एका मॅचमध्ये राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने कसा खेळ केला होता. ते बॅटिंग करतच राहिले करतच राहिले. तास गेले, सत्रं गेली आणि दिवसही संपला. तरी ते आउटच झाले नाहीत आणि त्यांनी मॅच फिरवली. तशा जादूसारख्या गोष्टी मग होतात. तू प्रयत्न करत राहिलीस, करत राहिलीस तर एक दिवस जे अवघड आहे तेही सोपं होतं. तेवढी इच्छा हवी.

जसं तुला आता हॅरी पॉटरचं पुस्तक वाचणं खूप आनंददायक होतं आहे पाहा. अगदी तेवढाच आनंद तुला गणितातही येऊ शकतो! १ तारखेला वाढदिवस असेल तर १ चॉकलेट, २ ला २, ३ ला ४, ४ ला ८, ५ ला १० असं करत तुझ्या १७ तारखेपर्यंत जितके चॉकलेटस होतील, तितके टक्के हे खरं आहे! मला स्वत:लाही अशा अनेक गोष्टी कठिण होत्या. त्या कधी जमतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण त्या आता जमत आहेत! त्या करत मात्र राहिलो. जसं लहानपणीही आकाश दर्शनाची आणि गणिताची मैत्री होती आणि आताही आहे. आणि म्हणूनच तू म्हणतेस, तुझ्या शाळेमध्ये गणित शिकवायला ये! आणि ह्या पत्रांचं सातत्य १२ वर्षं सुरू आहे! एक सोप्प कोडं! तुला पहिलं पत्र लिहून आज किती वर्षं होतील सांग बरं.

गेल्या वर्षामध्ये टॅन झिरो- तानाजीराव किंवा तांजिरो- पाजिरो मुख्य परफॉर्मर ठरला! पण त्यात तुला नक्की काय काय गंमत वाटली, मांगाची आणि तिझेकू का कोण- त्यांची गोष्ट काय होती, काय तुला आवडलं हे तू मला अजूनही सांगितलेलं नाहीस. त्या मुंज्यावर तू एक तासभर गोष्ट सांगितलीस. मग तानाजीराव आणि गोल्डन ट्रिओवरसुद्धा सांग ना. तुझ्या मित्र- मैत्रिणींनाही कळू दे त्यातली गंमत. किंवा ती किंचाळणारी पण गोड आवाजाची भूतनी! मोअनिंग मिर्टल! तिचा आवाज किती मधुर! आणि हॅरी- हरमायोनी- रॉन- गोल्डन ट्रिओ! गोल्डन ट्रिओवरून गोल्डन रिट्रीव्हर आठवला! काय काय प्राणी असतात! त्या दिवशी तो रुसून रस्त्यात बसलेला होता पाहा!

गेल्या वर्षातली एक मुख्य आठवण म्हणजे मॅक्सवेलसारखी थरारक मॅच! ३०१ करायचे असताना ९१/७ झालेली स्थिती! तिथून मॅक्सवेलसारखी हत्तीने जिंकून दिलेली मॅच. मराठीत एक म्हण आहे- तोंडातला घास हिरावून नेला. तसा तुझा विजय मॅक्सवेलने हिरावून नेला होता. कधीही न हरण्याचं कौशल्य बुद्धीबळ शिकवतं. तो डाव तू हरलीस तरी आता खूप सहज जिंकते आहेस. पुढच्या पत्रापर्यंत तर तू ५०- ५० जिंकायला लागशील किंवा मला ओव्हरटेक करशील! तेही रिव्हर्स करायची‌ गरज न पडता! आणि मॅक्सवेलच्या खेळीची गंमत अशीपण आहे की ती नेहमी होत नाही! मॅक्सवेल एकदाच खेळतो आणि पुढे १९ वेळेस खेळत नाही! त्यामुळे मॅक्सवेलच्या आधीच्या खेळाडूंनी सातत्य ठेवलं पाहिजे.

गेल्या वर्षात आपण बरेच पिक्चरही पाहिले. एकटीने महासागरामध्ये निघालेल्या जेसिका वॉटसनवरचा "ट्रू स्पिरिट" बघितला. सेव्हन यीअर्स इन तिबेट पाहिला. नंतर स्वदेस, लक्ष्य, भाग मिल्खा भाग, नेताजी द फरगॉटन हिरो आणि बर्फी! "ये तारा वो तारा" गाण्यात तुला किती हसू येत होतं- हा असा कसा डान्स! लक्ष्यच्या एका सीनमध्ये सांगताना सहा जण पण प्रत्यक्षात पाचच आहेत हेसुद्धा तू सांगितलं! अगदी बारीक लक्ष आहे तुझं! माझ्यापण ट्रेकिंग आणि सायकलिंगच्या आठवणी मी तुला सांगितल्या. ह्या वर्षात आपण मोठं सायकलिंग आणि ट्रेक केला नाही. छोटे छोटेच केले. तुझा मनालीचा तिलगुण मेडोजचा कँप मात्र मस्त झाला. किती किती तुम्ही तो एंजॉय केला. सुरूवातच १२ तास उशीरा आलेल्या ट्रेनने झाली होती पाहा. "Enjoy the discomfort" पासूनच तुमची सुरूवात झाली. ट्रेनमधली गंमत- मस्ती, ताई- दादा, प्रसाद दादा, साहील दादा, अर्चना ताई, शीतल ताई! खूप मजा व मस्ती करून आलीस. आणि मनाली मार्केटमधून फोन करून मला उल्लू बनवलंस की पैसे हरवले आहेत! पण मला गिफ्ट मात्र फारच सुंदर आणलंस- बुद्ध किचेन.

गेली काही‌ वर्षं तू आवाजाच्या गमती जमती जास्त करत नाही आहेस. पण जेव्हा करतेस तेव्हा मस्त करतेस. तुला जन्मजात ही कला मिळाली आहे! त्या मोअनिंग मिर्टलचा आवाज किंवा "पिस्तौल जेल में आ चुका है!" किंवा सूरमा भोपालीचा आवाज "मैने उन दोनों को ऐसे पकड़ा!" छान काढतेस. पण फार कमी वेळेस काढतेस. आपण त्या जेलरचे सीन बघताना काय हसतो! लड़कियों! कान खोल कर सुनलो! तुला शोलेमुळे टांगा शब्द कळला!

सोसायटीतले मित्र- मैत्रिणी आणि कराटेच्या क्लासमधले मित्र- मैत्रिणींसोबत तुझी छान मैत्री झाली. आयुष किती मस्त बुद्धीबळ खेळतो! पण वैभव सूर्यवंशीसारखी चूक करून हरतोसुद्धा. अर्जुनने तुला ओव्हरटेक केलं! तू आता १२ पूर्ण, पण तो २१ पूर्ण आहे! आणि गेल्या वर्षात तुला अजून एक भाऊ - भार्गव मिळाला. त्याचं नाव तू व आत्मजाने चि. चि. भा. चि. भा. ठेवलं! श्रीखंडाचा गोळा आहे तो! भेटतो तेव्हा माझ्याकडे एकटक बघतो आणि कडेवर येतो. एका भेटीत हिमानी काकूने तिच्या ऍनिमल कम्युनिकेशन व टेलिपॅथीबद्दलही मस्त सांगितलं होतं पाहा.

तुझ्या सुट्ट्यांमध्ये मी तुला मुद्दाम माझ्या काही फ्रेंडसना भेटायला नेलं. जवळ जवळ प्रत्येक वेळी तू "अरे यार, नको!" म्हणत होतीस पण नंतर एंजॉयही करत होतीस! आपण त्या स्नेहलताईंना भेटलो आणि म्हणूनच तुला तो वेडा टॅन झिरो किंवा मांगा मिळाला पाहा! आणि चैताली आत्यासोबतची भेट तर केवळ अविस्मरणीय! तिने मिताली राजला आउट केल्याचा प्रसंग, तिचे इतर अनुभव आणि तिची मेहनत ऐकताना तू अवाक झाली होतीस! अद्विका नावाचीच १० वर्षांची बुद्धीबळपटू तुला भेटणार होती. पण भेट नाही झाली. शिवाय आपण अवनी- श्रीविद्याला भेटलो. O V! आणि अनुश्रीसुद्धा. आणि ईशान किशनलाही भेटलो. आलाप- स्वरदासोबत तर खेळलोसुद्धा. शिवाय अयान- वाणीसुद्धा घरी येऊन गेले पाहा. आपण सोबत फिरायला गेलो तेव्हासुद्धा मजा आली. वॉक करताना तुझ्या आवडीचे प्राणी दिसायचे. दुर्गा टेकडीवर आपण गिरीशकाकासोबत ट्रेक केला तेव्हा पाहा किती मोर दिसले होते!

गेल्या वर्षामध्ये मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे तू आणि तुझ्या त्या लाडक्या मैत्रिणींनी मिळून छान अभ्यास केला दिवसभर. तो प्रोजेक्ट होता कोणता तरी. तू आणि तुझ्या त्या तिघी- एक वेगळंच गोल्डन ट्रिओ! त्या घरीही एकदा आल्या होत्या. आणि मागच्या वर्षीचा वाढदिवस त्यांनी काय जोरदार केला तुझा! तू आता थोडी मेन रोडवरही सायकल चालवतेस. आणि एकदा मला काय फसवलंस "निनू, मी बसने घरी आले!" मला तर खूप भारी वाटलं. किती छान हिंमत केली म्हणून. किती तू मला सांगत होतीस की, कशी तुझी शाळेची बस चुकली, कशी तू पब्लिक बस घेतलीस आणि उतरून कशी पळत आलीस! पण अरे रे, तू मला फसवलंस! तरी नंतर मला तुझ्या त्या ऍक्टिंगचं कौतुक वाटलं. हिमतीच्या ऐवजी अभिनय! हा किस्सा तू लवकरच खरा करशील अशी मला आशा आहे.

अदू, कराटेमुळे तुझं बळ चांगलंच वाढलं आहे. तिथे तुला बरेच मेडल्सही मिळाले पाहा. तुझा यलो बेल्टही लवकरच रंग बदलणार आहे. पण ह्या बळाचा फटका मात्र मला बसतो, त्याचं काय! आणि माझ्यावर प्रचंड असा हल्ला सुरू होतो! तू मला पेट्रीफाय किंवा स्पॉटीफाय नाही स्टुपीफाय करतेस! तेव्हा मला गाणं आठवतं- या रे या सारे या! मग मी तो व्हॉल्डेमॉर्ट, तमपिशाच्च (डिमेंटर्स), तमराज किलविश, बेलाट्रिक्स अशा लोकांना टेलिपॅथीने बोलावतो! पण कोणीच येत नाहीत! मलाच लढावं लागतं. किंवा एखादी ट्रिक करावी लागते! अशी गंमत!

अदू! अजून एक आठवण म्हणजे माझ्या सायकल दौर्‍याच्या वेळी तू लक्ष ठेवून होतीस की मी कुठे कुठे फिरतोय. तिथून आल्यावर गमती तुला सांगितल्या. आणि घरी आल्यावर तू दरवाज्यावर "बेस्ट फादर" लिहून स्वागत केलंस! शाळेच्या बाबतीत तुला संस्कृतमध्ये मस्त मार्क्स मिळाले होते. ते "फलम् फले फलानि प्रथमा" तू पाठ करताना रेकॉर्ड केलं होतंस. तुझ्या त्या खास मैत्रिणी आणि मी ज्यांची आठवण काढतो ते तुझे मित्र- मैत्रिणी! कधी कधी तुझ्या शिक्षकांची तुला वाटणारी भिती- अरे निनू, हे तुझ्या ओळखीचे आहेत का? किंवा त्यांना तुम्ही मुलांनी ठेवलेली नावं! आणि इतर मुलांची नावं!

मला ते छोटं बाळ आठवतं जे माझ्या शर्टच्या बटनाशी खेळायचं आणि पक्ष्याला बघून हसायचं! आताही तू तितकीच आनंदित होतेस. फक्त कधी कधी त्याचं कारण कळायला वेळ लागतो! रस्त्याने जाताना तू अचानक "डॅम भाई!" म्हणतेस. आणि त्याचं कारण असतं तुझ्या आवडत्या गाड्यांपैकी एखादी तुला दिसलेली असते.

अदू, तुला एक गंमत सांगतो. मराठीमध्ये म्हण आहे- थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे थोडं थोडं करून गोष्टी मोठ्या होत जातात. तशीच अजून एक ओळ आहे- केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. म्हणजे do, do and do till it is done. करत करत राहिलो तर सोपं होतं आणि मोठं होतं. मी आकाशातले फोटो घेत असतो पाहा. त्याला "स्टॅकिंग" म्हणतात. म्हणजे एकच फोटो घेण्याच्या ऐवजी सलग असे तीस- चाळीस फोटो घ्यायचे. आणि मग ते सॉफ्टवेअरने एकत्र करायचे. एकावर एक ठेवायचे. म्हणजे मग खूप जास्त सुंदर दृश्य दिसतं. पण हे "स्टॅकिंग" फक्त फोटोसाठी नाही तर सगळ्याच बाबतीत आहे. तुम्ही रोज थोडं थोडं करत राहिलात तर हळु हळु ते काम- ती गोष्ट मोठी होते. आणि मग अगदी जादूसारखे परिणाम मिळतात. एक प्रसिद्ध गायक होता. तो म्हणायचा, मी एक दिवस रियाज (सराव) केला नाही तर मला दुसर्‍या दिवशी फरक कळतो. दोन दिवस सराव नाही केला तर माझ्या चेल्यांना फरक कळतो. आणि तीन दिवस नाही केला तर श्रोत्यांनाही फरक कळतो. त्यामुळे रोज ते करणं- सतत त्या अनुभवामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. किंवा तुला क्रिकेटचं सांगतो तसं. केवळ जन्मजात प्रतिभा- टॅलंट आहे म्हणून खेळाडू "यशस्वी" होईलच असं नाही. त्याला सतत मेहनत करावी लागते, फोकस ठेवावा लागतो आणि मन शांतही ठेवावं लागतं. तेव्हा कुठे एखादा सचिन किंवा विराट होतो.

अदू, कराटेच्या एका स्पर्धेत पाहा तू चिडलीस आणि तुझा फोकस गेला. मग तुला कमी पॉईंटस मिळाले. म्हणून पहिले डोकं खूप शांत पाहिजे. तर गोष्टी नीट करता येतात. तुमच्या ज्युडोमध्येही तेच सांगतात. आणि कराटे काय किंवा बुद्धीबळ काय- जे लोक वरच्या लेव्हलला खेळतात, तिथे "बचाव" हेच मुख्य शस्त्र आहे. आपण काही जणांचे डाव पाहिले बघ. ते बचावच इतका भक्कम करतात की, शत्रू हल्ला करूच शकत नाही आणि हल्ला करेपर्यंत त्याची शक्ती कमी होऊन जाते. आणि ज्युडोचा तर उगमच ध्यानाशी संबंधित आहे. 'कराटे किड' मध्ये छान दाखवलंय पाहा.

पोहणंसुद्धा तुला खूप आवडतं. खूप छान येतं. पण तिथेही सातत्य हवं. आणि तुला पोहायला सहज मिळतं. लोकांना तर सहज संधी मिळत नाही. त्यामुळे कराटे, पोहणं, थोडं सायकलिंग आणि योग असं तू केलंस तर तुझे सगळेच स्पोर्टस एकदम पक्के होतील. कारण जरी हे खेळ किंवा व्यायाम वेगवेगळे असले तरी त्या गाण्यासारखे ते जोडलेले आहेत- "सब ये रूप है मेहनत के कुछ करने की चाहत के किसी का किसी से कोई बैर नही!" आणि आपल्या ट्रेनिंगमध्ये जितकी विविधता असेल- जितकं क्रॉस ट्रेनिंग असेल तितकी क्षमता वाढते. आणि तितकीच जास्त मजासुद्धा येते.

ह्या वर्षी तू गे नेकचं पुस्तकही वाचलंस आणि संपवलंस. मला दोन वर्षं तुला आठवण करावी लागली! त्यातल्या गमतीही तुला आवडल्या. त्या लामांनी कसा त्या कबूतरावर उपचार केला, त्यांचं ध्यान आणि हिमालयातलं वर्णन. मराठी नाही पण तू इंग्लिश पुस्तकं आता छान वाचते आहेस. त्यातली गंमत तुला कळते आहे. माझेही काही अनुभव मी तुला सांगितले बघ. हिमालयातलं फिरणं, भटकंती आणि लहानपणच्या- कॉलेजच्या काही गमती. आणि हो, ह्या वर्षी तुझ्या कराटे क्लासमध्ये झालेला तो किस्सा कोण विसरणार! सगळा वर्ग एका मुलाने थांबवला होता पाहा.

ह्या वर्षाचे दोन परफॉर्मर्स असले तरी खरा परफॉर्मर हॉगवर्डसच आहे. कारण तू त्याच्याच गमती सारख्या सांगतेस आणि गिरीशकाका व इतरांना हॅरी पॉटरचेच प्रश्न विचारतेस. हॅरी पॉटर आहेच खूप सुंदर. आणि ते आपल्या जगाशी खूप रिलेटेबलसुद्धा आहे. अर्थात् आपल्या जगामध्ये जादूगार नसलेले मगल्स कोणीच नसतात, हा एक फरक आहे बरं! आणि आपल्याही जगामध्ये जर आपण हॅरी झालो तर आपल्याला हॅग्रिड आणि डंबलडोअर भेटतातच!

अदू, हॅरी पॉटरमधली काही वाक्यं मला फार आवडतात. त्या लेखिकेचं- जे के रोलिंगचं कौतुक आहे. तिनी कशी कल्पना केली असेल, कसं एक एक पात्र रचलं असेल- एक एक गोष्ट रचली असेल! तूसुद्धा अशा छोट्या गोष्टी लिहू शकतेस. आपल्याकडे जे कला कौशल्य- क्षमता आहे ते आपण वापरत राहिलो तर आपोआप त्या गोष्टी वाढत जातात. हॅरी पॉटरमधली ही वाक्यं पाहा-

"The happiest man on earth would be able to use the Mirror of Erised like a normal mirror, that is, he would look into it and see himself exactly as he is."

"It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities."

"We’ve all got both light and dark inside us. What matters is the part we choose to act on. That’s who we really are."

"The ones that love us never really leave us."

“Perhaps those who are best suited to power are those who have never sought it.”

तर टमकडी, ब्याऊ, पाबई, स्वरा, छकुली, अदू! अशी तुझी सहा नावं आठवतात! आज तुझा बारावा वाढदिवस! टाईमलॅप्ससारखे जुने दिवस सर्रकन डोळ्यांपुढे येऊन जातात! ते छान शेंड्या असलेलं छोटं बाळ आणि आजची माझ्यावर दादागिरी करणारी कराटे प्लेयर! आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ब्लेक!

-तुझा (तुझ्याकडून बुली आणि स्टुपीफाय केला जाणारा बिच्चारा) निनू

-निरंजन वेलणकर दि. १७ सप्टेंबर २०२६.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users