ऍडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध: सत्य आणि विपर्यास

Submitted by मार्गी on 8 September, 2026 - 12:59

✪ नाझी जर्मनी आणि युद्धासंदर्भातील वेगळी बाजू
✪ भूगोलाबरोबर इतिहासातही वेगळं स्थान असलेला देश
✪ आसुरी महत्त्वाकांक्षा असूनही एकही वसाहत नसलेला देश
✪ लोकशाहीवादी देशांनी केलेली आक्रमणं, जुलुमशाही आणि छळ
✪ महायुद्धाचा खरा सूत्रधार कोण?
✪ रशियामध्ये जर्मनीचा पराभव होण्यामागचं वेगळं कारण
✪ ब्रिटन व अमेरिकेचं नंतरच्या काळातलं वागणं

३ सप्टेंबर १९३९! दुसरं महायुद्ध नावाचं अग्नीकुंड ह्या दिवशी पेटलं. पोलंडमध्ये युद्धाला तोंड फुटल्यापासून हिरोशिमानंतर जपानने शरणागती पत्करण्यापर्यंतचे हे २१६३ दिवस! आधुनिक इतिहासातलं महाभारत आणि अतिशय नाट्यमय कालखंड. पराक्रम, क्रूरता, अमानुषता, स्वार्थ आणि जागतिक वर्चस्ववादाचा विलक्षण अविष्कार. दुसरं महायुद्ध हा माझ्यासाठी अतिशय जवळचा विषय. गेल्या ३ सप्टेंबरलाच युद्ध आणि हिटलरबद्दल एक वेगळा दृष्टीकोन सांगणारं हे पुस्तक वाचण्यात आलं. पराग वैद्य ह्यांची शैली आणि विषय मांडणी अशी‌ आहे की एकदा सुरू केल्यावर थांबवता आलं नाही. त्या पुस्तकाबद्दलची ही प्रतिक्रिया.

(माझा ब्लॉग. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, आकाश दर्शन, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.

प्रचलित- रूढ इतिहास सांगतो की, नाझी जर्मनीच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे हे युद्ध सुरू झालं. जर्मनी व जपान ह्यांचा साम्राज्यवाद, त्यांनी जगावर लादलेलं युद्ध व ब्रिटन- अमेरिका अशा लोकशाही देशांनी त्यांच्यापासून जगाचं केलेलं रक्षण. रूढ इतिहास हा आहे. ह्या इतिहासाची एक वेगळी फार समोर न येणारी बाजू हे पुस्तक सांगतं. जर्मनी देश म्हणून कसा होता, त्याचं वेगळेपण काय आहे, त्याचं सामर्थ्य काय होतं आणि ब्रिटीश- अमेरिकन व रशियाचा खरा चेहरा काय होतं ह्याची खूप वेगळी चर्चा ह्या पुस्तकात आहे. जर्मनीचा तो आक्रमक साम्राज्यवाद आणि स्टॅलिनच्या रशियाने ओरबाडलेले पोलंड, लिथुआनिया, फिनलंड, लॅटव्हिया, युगोस्लाव्हिया व युद्धोत्तर काळात ग्रीस असे देश; नाझी हे मानवता विरोधी आणि साम्राज्यवादी; पण जगभर नाझींपेक्षा प्रचंड मोठ्या जुलुमी वसाहती असलेले देश मात्र शांतताप्रेमी ह्या प्रचलित रूढ इतिहासाची मोडतोड करणारी मांडणी पुस्तकामध्ये आहे. आणि त्यासाठी पुस्तकामध्ये अक्षरश: शंभरहून अधिक पानं भरतील इतकी संदर्भ सूची आहे. लेखक पराग वैद्य ह्यांनी हे पुस्तक प्रचंड अभ्यास करून लिहीलं आहे. आणि त्यांनी मांडलेली भुमिका व वेगळ्या दृष्टीकोनातून सांगितलेली तथ्यं खूप रोमांचक आहेत.

दुसर्‍या महायुद्धाच्या सुरूवातीला जर्मनीचं सैन्य अतिशय तुटपुंजं होतं. आर्थिक मंदी होती आणि अनेक समस्या होत्या. त्यांचे असंख्य पुरावे त्यांनी दिले आहेत. त्यामुळे नाझी जर्मनी युद्धखोर देश होता आणि त्यांच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे युद्ध सुरू झालं हा प्रचलित इतिहास केवळ सांगितलेला इतिहास आहे हे लक्षात येतं. आणि तेव्हा लोकशाही देशांच्या वसाहती जगभर होत्याच की. एका देशाने अनेक खंडांमध्ये ढिगाने देशांवर राज्य केलं तरी तो लोकशाही देश आणि दुसर्‍या एका देशाने व्हर्सायच्या तहात गमावलेले स्वत:चेच भाग- प्रदेश, शहरं किंवा अगदी जमिनीचा तुकडा परत घेतला तरी तो देश मानवताविरोधी अशी ही लोकशाही देशांनी उभी केलेली धारणा होती.

पुस्तक पुराव्यानुसार दाखवून देतं की, इंग्लंड- अमेरिका व त्यांच्या गटातील राष्ट्रांमुळे १९३९ मध्ये युद्धाला सुरूवात झाली. आणि तेव्हा तुटपुंजी सैनिकी क्षमता असलेला जर्मनी वस्तुत: युद्ध सुरू करू शकतच नव्हता. कारण असंख्य समस्या होत्या. शक्ती कमी होती. पुस्तक सांगतं की, जर्मनीवर युद्ध लादलं गेलं आणि मग तो देश जिद्दीने उभा राहिला आणि पुढे मोठ्या मोठ्या देशांना युद्धात जर्मनीने पाणी पाजलं. पण जगभर पसरलेली साम्राज्य- जागतिक अर्थसत्ता व रशियातलं मनुष्यबळ ह्यामुळे जर्मनीचा पराभव झाला. तो अपरिहार्यच होता पण तरीही जर्मनीने युद्धात दाखवलेला पराक्रम किती वेगळा होता ह्याचं सैनिकी विश्लेषण पुस्तक सांगतं. जर्मनी रशियाविरुद्ध हरण्यामागे असलेलं एक अज्ञात कारणसुद्धा त्यात येतं.

ऍडॉल्फ हिटलर राष्ट्रप्रमुख म्हणून ह्या पुस्तकात समोर येतो. त्याचं पूर्वायुष्य व व्यक्तिगत जडण घडणीची संक्षिप्त चर्चा आलेली आहे. पुस्तकामध्ये अनेक उल्लेख आहेत जे दर्शवतात की, ३ सप्टेंबर १९३९ नाही तर हिटलर जर्मनीत सत्ताधीश झाला तेव्हापासूनच शत्रूंनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. हे शत्रू आणि युद्धाचे खरे सूत्रधार कोण हे पुस्तकातच वाचायला हवं. हिटलर व नाझींबद्दल अनेक धक्कादायक मतं पुस्तकात आहेत जी मला पटली नाहीत. पण ब्रिटन व अमेरिकेबद्दल लेखकाची मतं पटण्यासारखी आहेत. भारताला ह्या लोकशाही देशांनी दिलेली वागणूक कोण विसरेल? युद्धासाठी सगळा जोर लावत असताना १९४३ च्या दुष्काळात लाखो बंगाली लोकांना चर्चिल सरकारने मदत न करता मरू दिलं. जर्मनी व रशियाने एकमेकांची शक्ती कमी करावी व नंतर आम्ही त्याचा फायदा उठवू असं अमेरिकेचं गणित होतं. शिवाय स्टॅलिनने केलेली रशियन लोकांची दडपशाही, हत्याकांडं व छोट्या देशांवरचा वरवंटा लोकशाही देशांनी नजरेआड ठेवला. अशा अनेक विसंगतीवर हे पुस्तक बोट ठेवतं.

लेखकांनी अभ्यासाने दिलेले पुरावे व संदर्भ वाचनीय आहेत. हिटलर आणि नाझी ह्यांना छळछावण्या, दडपशाही व जुलुमशाहीच्या ज्या अपराधांसाठी ओळखलं जातं, त्या गोष्टीही लोकशाहीवादी देशांनी व सूत्रधारांनी पसरवलेल्या आहेत असं पुस्तक सांगतं. पण त्याबद्दलचे पुरावे त्यात अजून हवे होते. लेखक ज्या गोष्टींना असत्य म्हणतात, त्या त्यांनी सिद्ध करायला हव्या होत्या. ज्याला दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास महत्त्वाचा वाटतो आणि ब्रिटन- अमेरिकेचं खरं चरित्र आणि चारित्र्य ज्यांना माहिती आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं! भारताच्या स्वातंत्र्यामध्ये दुसर्‍या महायुद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातूनही हे पुस्तक वाचनीय आहे. हे पुस्तक बूकगंगा व इतर ठिकाणी उपलब्ध आहे. लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 8 सप्टेंबर 2026.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे देवा
यापलीकडे दुसरे शब्द नाहीत बोलायला

इंग्लंड- अमेरिका व त्यांच्या गटातील राष्ट्रांमुळे १९३९ मध्ये युद्धाला सुरूवात झाली. आणि तेव्हा तुटपुंजी सैनिकी क्षमता असलेला जर्मनी वस्तुत: युद्ध सुरू करू शकतच नव्हता. कारण असंख्य समस्या होत्या. शक्ती कमी होती. पुस्तक सांगतं की, जर्मनीवर युद्ध लादलं गेलं

इथं हरलोच पार Happy Happy Happy

क्षमस्व. लेख चुकून दुस-यांदा पोस्ट झाला आहे. कृपया हा डुप्लिकेट धागा डिलीट करावा ही मान्यवर संपादकांना विनंती. धन्यवाद.

आशूचॅम्प >> Lol

काही इतर बाजू असू शकतात पण या पुस्तकाची ओळख वाचूनच ते एक उत्तर समोर ठेवून त्यानुसार बाकी शोध लावत गेलेला प्रयत्न वाटतो.

नक्कीच इतर बाजूही असणारच
पण जर्मन नेत्यांनी, नाझी लोकांनी नुरेनबर्ग खटल्यात या सगळ्याची स्पष्ट कबुली दिलेली आहे
पोलंड वरच्या हल्ल्यासाठी काय करायचं, मारायला आणलेले कैदी आणि बाकी सगळे डीटेल्स
पोलंड वर हल्ला कोणी आणि कसा केला याचे रेकॉर्ड व्यवस्थित उपलब्ध असताना जर्मनीवर युद्ध लादलं गेलं याइतके अजून काही विनोदी असेल असं वाटत नाही

मी या पुस्तकाबद्दल किंवा याच लेखकाचा अशाच प्रकारचा लेख एका दिवाळी अंकात वाचला होता. त्याबद्दल मायबोलीवर लिहिलं होतं. मायबोली सर्च काही सांगत नाही.

मार्गी, You have such an impressionable mind. तुम्ही काही वाचून / पाहून तेच सत्य असं समजणं आधीही झालं आहे. पण इतर माहिती कळल्यावर आपलं आधीचं मत चुकीचं होतं, हेही तुम्ही प्रांजळपणे लिहिलं होतं.

मार्गी इथे म्हणत आहेत की त्यांना पूर्णपणे पटले आहे असे नाही. त्यामुळे ते त्यांच्या ठिकाणी बरोबर वाटतात. कदाचित मी जितके संशयाने अशा पुस्तकांकडे बघेन तितके ते बघत नसतील.

मला तर हा इतिहासाची मोडतोड करणारा केविलवाणा प्रयत्न वाटतो

ते आजकाल 'खरा इतिहास' या नावाने काहीही घुसडतात त्या थाटाचे

लेखक ज्या गोष्टींना असत्य म्हणतात, त्या त्यांनी सिद्ध करायला हव्या होत्या >>>> !!!

इतके मोठे गुपित उघड करणार असेल तर निर्विवाद पुराव्यांची जबाबदारी ते करणार्‍यावर असायला हवी ना?

ब्रिटन वगैरे संतमहात्मे आहेत असे तेव्हाही लोक समजत नव्हते. पण बिरबलाच्या रेषेप्रमाणे त्यांची रेष लहान करण्याचे काम हिटलरने केले.

छान लिहिलंय!
एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना हिटलर पहिल्यापासूनच आवडत आलाय. त्याचे वर्णश्रेष्ठत्वाचे विचार या मंडळींना खूप भावतात. 'आर्य धर्मासाठी तन, मन, धन अर्पण करणाऱ्या सर्व जर्मनांना अर्पण', ही पुस्तकाची अर्पणपत्रिका बरंच काही सांगून जाते.
या लेखकूच्या 'गांधीहत्या : एक ऐतिहासिक मीमांसा' या दुसऱ्या पुस्तकाबद्दलही लिहाल ना? ते तर अफलातूनच वाटतंय. मी बुकगंगावर नुसती अनुक्रमणिका वाचूनच भारावून गेलोय.

व्हर्सायचा तह हा जर्मन जनतेला अपमानास्पद वाटत होता. त्या तहाच्या अनुषंगाने जर्मनीवर लादलेल्या अटी या जर्मनीचे आर्थिक कंबरडे मोडणाऱ्या होत्या त्यामुळे जर्मनीत प्रचंड चलनवाढ झाली सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले हे सत्य आहे. त्या अस्वस्थतेतून हिटलरचा उदय होऊन त्याला पाठिंबा मिळत गेला हे ही सत्य आहे.
ब्रिटन या तत्कालीन महासत्तेचा किंवा त्या सत्तेवर बसलेल्या चेंबर्लेन वगैरेंना हिटलरच्या महत्वाकांक्षेचा अंदाज आला नाही हे ही सत्य आहे.
व्हर्सायचा तह थोडा बॅलन्स्ड ठेवून जर्मनीला ब्रीदिंग स्पेस दिली असती तरी ब्रिटन, अमेरिका, फ्रांस या इतर ३ आर्थिक सत्ता ऑलरेडी गोल्ड स्टँडर्ड्स झुगारून देत असताना युद्धातील नुकसानामुळे जर्मनीची चलनव्यवस्था कोसळणे साहजिक होते.
फ्रान्स व ब्रिटनकडे त्यांच्या अर्थव्यवस्थेला पडलेले खिंडार भरून काढण्यासाठी वसाहती होत्या.
थोडक्यात जर्मनीकडे असे काहीही उरले नव्हते की ज्यासाठी यूरोप किंवा अमेरिका जर्मनीवर पुन्हा युद्ध लादतील.

ब्रिटिशांनी भारतावर केलेले अत्याचार, अमेरिकेने नागासाकी किंवा हिरोशिमामध्ये घडवलेला संहार किंवा स्टालिनच्या कम्युनिस्ट रशियाने स्वतःच्याच ज्यू आणि इतर नागरिकांवर केलेले अत्याचार जर्मनीने घडवून आणलेल्या अत्याचाराला झाकून टाकू शकत नाहीत.

आणि अगदी आत्ता आत्तापर्यंत बोटावर मोजण्याइतके का होईना नाझी व हॉलोकॉस्ट सर्वायव्हर त्यांच्या हातावर गोंदलेल्या नंबरांसकट जिवंत असताना या गोष्टी खोट्या आहेत हे सांगणे हे तर ढळढळीत असत्य आहे.

तुटपुंजी सैनिकी क्षमता असलेला जर्मनी पोलंड जिंकतो, बेल्जियम हॉलंड नॉर्वे जिंकतो, फ्रांस ला शरण आणतो, ब्रिटनची नाकेबंदी करतो, उत्तर आफ्रिका, ग्रीस, युगोस्लाव्हिया जिंकतो
त्याआधी दबाव टाकून ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक गिळतो

हे इतकं महान आहे की बोलता सोय नाही Happy

>>जर्मनी व रशियाने एकमेकांची शक्ती कमी करावी व नंतर आम्ही त्याचा फायदा उठवू असं अमेरिकेचं गणित होतं<<
हे थोडं फारफेच्ड वाटतंय. पहिल्या महायुद्धात रश्या हा अलाय्ड देश असल्याने हा मुद्दा फोल ठरतो. शिवाय, अमेरिकेने तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतला नसता तर हे दोन देश दुसरं महायुद्ध सुरुवाती पासुनच खांद्याला खांदा देउन लढले असते..

भारताच्या दृष्टिने देखील दुसरं महायुद्ध महत्वाचं आहे कारण त्या दरम्यान ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अ‍ॅटलँटिक चार्टर मुळे पुढे ब्रिटिश साम्राज्य संपुष्टात आलं. याचं श्रेय रोझवेल्टला द्यायला हवं. या पुस्तकात तसा उल्लेख आहे का हि उत्सुकता लगाली आहे...

इतक्या प्रतिक्रिया! सर्वांना धन्यवाद.

मी केवळ पुस्तकावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पुस्तकाने वेगळी बाजू सागितली इतकंच. त्यातल्या काही गोष्टी मला पटल्या. काही नाही पटल्या हेसुद्धा म्हणालो आहे. वेगळा परस्पेक्टीव्ह समोर आला तर आपण तो "कन्सिडर" करायचा असतो. आपण तो "कन्सिडर" करतो म्हणजे आपण आपली समजबुद्धी सोडून देतो असं होत नाही.

वेगळा परस्पेक्टीव्ह समोर आला तर आपण तो "कन्सिडर" करायचा असतो.>>
तद्दन खोटं असलं तरी कन्सिडर करणार का??

म्हणजे यांनी त्या दुसऱ्या पुस्तकात गोडसे दर्शनाला गेला होता पण बापूंच्या लोकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी हल्ला केला आणि स्वसंरक्षणासाठी गोडसेला गोळी चालवावी लागली असे लिहिलं तर तेही कन्सिडर करणार का?

थोडं गुगल केलं तरी अक्षरशः तपशीलवार आकडेवारी उपलब्ध आहे, किती सैन्य होते, किती लढले, किती मेले, किती जखमी, किती बेपत्ता, मालमत्ता हानी सगळं काही
तरीही काहीही रेटून न्यायचे म्हणजे कमाल आहे

कन्सिडर म्हणजे नक्की काय करायचे ? आपण स्वतः सत्यशोधन करायचे, की उगाच "दुसरी बाजू" देखील आहे असे आंधळेपणाने मानायचे ?

मेनस्ट्रीम इतिहास आपण त्यांच्या संशोधन आणि पियर रिव्ह्यू पध्दतीसाठी मानतो. ह्या महोदयांनी कोणते स्रोत वापरले आहेत हे तपासणे आपल्याला जमणार आहे का ? नसेल तर ह्यांचे म्हणणेही एक "व्हॅलिड दुसरी बाजू" आहे असे मानणे अयोग्य ठरेल.

वेगळा परस्पेक्टीव्ह समोर आला तर आपण तो "कन्सिडर" करायचा असतो.>>> नक्कीच, पण ते कन्सिडर करताना पहिली कसोटी ही असायला हवी की आपल्याला दूध म्हणून, दुधात पाणी मिसळून दिलं जातंय? की पाण्यात दूध मिसळून?. हा विचार करणं गरजेचं आहे.

'नाझी भस्मासूराचा उदयास्त' लहानपणी वाचलं होतं. तेव्हा दर वेळी, 'अरेरे, ही अमुकतमुक झालं नसतं तर कदाचित चित्र बदललं असतं' असं बरेच वेळा वाटलं. मग पुढे लक्षात आलं कि तो त्या पुस्तकाचा अंडरटोनच होता. वर फारएण्डाने म्हटल्याप्रमाणे वसाहतवादी देशांच्या रेषा लहान करण्याचं काम हिटलर आणि नाझी जर्मनीने दुसर्या महायुद्धामुळे केलं. हे संत्र कसंही सोललं तरिही हिटलर च्या अमानुष कृत्यांविषयी सहानुभूती वाटू शकत नाही.

अगदी अगदी माझेही सेम झालेलं
कानिटकर यांनी रंगवलेला हिटलर इतका सोज्वळ आणि त्यात त्व लिहितात होलोकोस्ट सोडून बाकी आयुष्य तसे हिटलरने दुष्टपणा केला नाहीये
नंतर मग बाकी लेखक, इतिहासकार यांचे लेखन वाचत गेलो तसे तसे भ्रमाचा पडदा फाटत गेला

अनेक गोष्टी त्या पुस्तकातही दडपून दिल्या आहेत पण एक काळ होता की त्या पुस्तकाची मोहिनी होती
दुसऱ्या महायुद्धाविषयक वाचण्याची गोडी त्याच पुस्तकाने लावली

जगातल्या सर्व देशात माझा भारत देश हा अनोखा देश आहे.
येथील बहुसाब्ख्य लोकाना इस्रायल आणि हिटलर ह्या दोघांबद्दल एकाच वेळी लौतुक मिश्रित आदर वाटतो.

"येथील बहुसाब्ख्य लोकाना इस्रायल आणि हिटलर ह्या दोघांबद्दल एकाच वेळी लौतुक मिश्रित आदर वाटतो." - मला वाटतं ह्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे दोन्ही महायुद्धांविषयी फारशी माहिती नसणं. माझ्या आठवणीप्रमाणे शाळेत सुद्धा इतिहासात दुसर्या महायुद्दाविषयी फार थोडा भाग होता. त्याचवेळी भारताचं स्वातंत्र्ययुद्ध सुरू असल्यामुळे असेल किंवा भारताचा प्रत्यक्ष सहभाग कमी असल्यामुळे असेल (टिळक-गांधी ह्यांचे ब्रिटिशांना सशर्त / विनाशर्त सहाय्य करण्याविषयीचे मतभेद - पहिले महायुद्धा आणि आझाद हिंद सेना, अफ्रिकेत लढलेले हिंदी सैनिक - दुसरे महायुद्ध) ह्याव्यतिरिक्त महायुद्धाचे भारताशी संबंधित फारसे ठळक उल्लेख शालेय इतिहासात मी तरी वाचले नव्हते. अवांतर वाचनाची आवड (जी त्यावेळी बर्यापैकी कॉमन होती - बर्याचजणांच्या छंदात 'वाचन' असायचे), किंवा इतिहासाची विशेष आवड असलेले एखादे शिक्षक असतील तरच पाठ्यपुस्त्काबाहेरचा इतिहास वाचला जायचा.

फेरफटका
अगदी बरोबर.
नाझी तत्वज्ञान म्हणजे नेमके काय? ह्याची कल्पनाही बऱ्याच लोकाना नसते.

जगातल्या सर्व देशात माझा भारत देश हा अनोखा देश आहे.
येथील बहुसाब्ख्य लोकाना इस्रायल आणि हिटलर ह्या दोघांबद्दल एकाच वेळी लौतुक मिश्रित आदर वाटतो.>>>

कारण इस्रायल हे मुस्लिम राष्ट्रांना झोडून मारून काढतात असा तो आनंद आहे
आणि हिटलर ने ब्रिटिशाची हाडे खिळखिळी केली हा आनंद

माझ्या आठवणीप्रमाणे शाळेत सुद्धा इतिहासात दुसर्या महायुद्दाविषयी फार थोडा भाग होता. >> त्यातही होलोकास्ट्बद्दल अगदीच तुटपुंजे आहे. निव्वळ त्यावर एक धडा असता तरी बरीच टाळाकी जागेवर राहिली असती.

हो! युद्ध्याची कारणे आणि तहाची कलमे यावर प्रश्न विचारता येतात, त्यामुळे असावे. शिवाय कुठल्या दिवशी विमी रिजला आले? पहिल्या महयुद्धाच्या तहात दुसर्‍या महायुद्धाची बीजे रोवली होती अशी चमकदार वाक्ये लिहिता येतात, कधी कुणाचा पाडाव झाला आणि कोण कधी पादाक्रांत झाला त्यात परत सहावे आरमार वगैरे लिहीलं की भारी वाटतं.
परत कुणाच्या भावना वगैरे दुखवायला नको. त्यामुळे होलोकॉस्टची भयानकता ना कोणी शिकवली ना ती समजली.

Holocaust मधून वाचलेल्या लोकांची आत्मचरित्रे आहेत. ती वाचवत सुद्धा नाहीत. नाझी मंडळींची दुसरी बाजू असेल असे वाटत नाही.
व्हिएतनाम मधील war museum तर मी पूर्ण बघू सुद्धा शकलो नव्हतो. .
आता उध्वस्त गाझा पट्टी. कसे जगत असतील तिथले लोक.
सगळे सारखेच. काय मिळते यांना

नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचल्यामुळे शालेय पुस्तकाच्या बाहेर काहीतरी वाचायची सवय लागली. ते वाचलेल्यांना बहुतेकदा डायरी ऑफ ऍन फ्रॅंकही ठाऊक असतं. हॉलोकास्टच भयाण वास्तव समजायला तेवढं पुरेसं असावं. प
ण शालेय इतिहास मात्र सनावळ्या, पहिल्या महायुद्धातला तो ड्यूक, सुडेटनलँड, दग्धभू धोरण, तहाची कलमं यात जास्त गुरफटवतो. मानवी आयुष्यावर झालेला परिणाम फार तर अमुक मृत आणि तमुक जखमी यात गुंडाळला जातो.

भारतीयांना नाझींचे आकर्षण वाटण्याचं एक कारण म्हणजे सुभाषबाबूंनी हिटलरचे सहाय्य घेऊन ब्रिटिशांची सत्ता उलटवण्याचे स्वप्न बघितले हे ही असतं. काहींना प्युअर आर्यन रेस वगैरेचं सुप्त किंवा जाहिर आकर्षण असतं. त्यांना जोसेफ मेंगेलचे प्रयोग ठाऊक नसतात किंवा त्या आर्यन रेसमध्ये भारतीयांची गणना केली गेली नसती हे ठाऊक नसतं.

अर्थात इतिहास नेहमी जेते लिहितात त्यामुळे हिरोशिमाचा विध्वंस पाहिल्यावरही नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला गेला हे सत्य, रशियन्सनी ज्यूंवर किंवा युद्धकैद्यांवर केलेले अत्याचार, चर्चिलने बंगालमध्ये घडवून आणलेले भूकबळी अलाइजच्या विजयाच्या गालिच्याखाली सारले जातात.

नाझी भस्मासुराचा उदयास्त >> हे वाचलेल्या अनेकांना हिटलर नायक होता असं वाटतं. माझी पण अवस्था तीच झालेली. पूर्वी युट्यूबवर डिस्कहरी, बीबीसी च्या डॉक्युमेंटरीजचं प्रस्थ होतं तेव्हां हळूहळू हिटलरची काळी बाजू समोर येत गेली.

दोस्त राष्ट्र साधू संत होती किंवा आहेत असं अजिबात नाही. ती ही तेव्हढीच नालायक आहेत. म्हणून हिटलरचं पाप समर्थनीय नको ठरायला.
हिटलरचे उद्दिष्ट केवळ व्हर्सायचा तह रद्द करणे एवढेच नव्हते, तर लेबेन्स्राउम या नाझी धोरणांतर्गत संपूर्ण पूर्व युरोप जिंकून तेथील मूळ स्लाव्हिक लोकांना गुलाम बनवणे किंवा संपवणे हे होते.

ऑस्ट्रिया आणि चेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केल्यानंतरही हिटलर थांबला नाही आणि त्याने पोलंडवर आक्रमण केले. हा केवळ हक्क सांगण्याचा भाग नसून थेट साम्राज्यवादी विस्तारवाद होता. ज्यूं च्या बाबतीतलं त्याचं धोरण तर समर्थनीय नाही. जर त्याने ज्यूंचा द्वेष केला नसता तर ज्यू शास्त्रज्ञांनी अमेरिकेऐवजी जर्मनीसाठी अणूबाँब बनवला असता. त्याचेही समर्थन नाही.

दोन वर्चस्ववादी टोळ्यात चांगले कोण याचा न्याय करण्याची आपल्याला गरज नाही. हिटलर ज्यांना आवडतो, त्याची कारणे वेगळी आहेत.

मी नाझी भस्मासुर... नाही वाचलं, पण अ‍ॅन फ्रँक पूर्ण वाचूचशकले नव्हते. मला ताईने भेट दिलं होतं आणि सुरूवातीला उत्साहाने घेतलं वाचायला पण नंतर असह्य झालं सगळं आणि अर्ध्यावरच बंद केलं. कधीच कुठल्याच कारणासाठी, कोणत्याही बाजूने मला हिटलरबद्दल "असेल ना त्याचीही काहीतरी बाजू..." असं वाटलं नाही. सुभाषबाबूंना त्याची मदत घ्यावीशी वाटली वगैरे गोष्टी कधीतरी "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" वगैरे तात्पुरतं राजकारण, ज्यातून मोठं काहीतरी साध्य करायचं असेल- असं असेल असा समज झाला (किंवा सोयीचा म्हणून करून घेतला) आणि मग मी इतिहास फक्त परीक्षेपुरता ठेवला.

Pages