भस्मबीज - भाग २०
पूर्वभाग
नेहाला पडलेल्या भयानक स्वप्नातील अघोरी विधी आणि गुहेतील आत्म्याने दाखवलेला रहस्यमय खडक याबद्दल ती कुटुंब आणि देवप्पाला सांगते; मात्र नेहाला देवप्पाने गुप्तपणे सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट कुणालाही सांगण्यास मनाई असते. अभिजितच्या वागण्यात आणि शरीरात झालेला बदल अधिक स्पष्ट होत जातो; मुंबईच्या प्रवासात तो गुंडांच्या टोळीचा एकट्याने सामना करतो आणि स्वतःच्या नव्या सामर्थ्याने तोही चकित होतो. घरी परतल्यानंतर अभिजित मुलांना सुरक्षिततेसाठी सुप्याला पाठवण्याचा निर्णय घेतो, पण अनन्याला त्याच्या डोळ्यांत काहीतरी मोठ्या संघर्षाची तयारी स्पष्ट जाणवते. दरम्यान, एकटा असताना अथर्वला घरात भयावह अदृश्य शक्तीचा सामना करावा लागतो आणि ती त्याच्याकडून अनन्या कुठे आहे याची चौकशी करते; स्वाती आणि अनन्या परतताच तो बचावतो, पण स्वातीच्या लक्षात येते की देवप्पाने दिलेले संरक्षणाचे गंडे मुलांना बांधायचे ती विसरली होती.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २१ - हाकिनीचं आवाहन
स्वातीला जाणवलं, तिचा हलगर्जीपणा नडला होता. ते गंडे मुलांना बांधलेच नव्हते... ती ते विसरली होती. त्या जाणिवेसरशी तिच्या अंगातलं सगळं त्राणच निघून गेल्यासारखं वाटलं. देवप्पाने इतक्या काळजीने, इतक्या श्रद्धेने दिलेली ती रक्षा-कवचं, सगळ्या गडबडीत, ते गंडे तिने पिशवीतच ठेवून दिले होते.
"अथर्व, शांत हो, बाळा. मी आहे इथे," ती म्हणाली. "चल आत चल."
ती धावतच बेडरूमकडे गेली, पिशवी शोधली, दोन गंडे बाहेर काढले, आणि परत हॉलमध्ये धावली. "अथर्व, हात दे," ती म्हणाली. त्याने मुकाट्याने हात पुढे केला, आणि तिने तो काळा दोरा त्याच्या मनगटावर घट्ट, तिहेरी गाठ मारून बांधला.
मग अनन्याकडे वळली. "तूही, बाळा."
अनन्याने हात पुढे केला, पण तिचा हात थरथरत होता इतका की स्वातीला गाठ मारायला दोनदा प्रयत्न करावा लागला.
गंडा बांधून झाल्यावर, स्वातीने दीर्घ श्वास सोडला. " सांग मला आता काय झालं?" स्वातीने त्याचे केस मायेने मागे सारत विचारले.
अथर्वने हुंदके देत, तुटक तुटक सांगायला सुरुवात केली. मी... मी टीव्ही बघत होतो, आणि अचानक आवाज खराब झाला. मग घड्याळ थांबलं. मग मी पाणी प्यायला गेलो, आणि ग्लासातलं पाणी आपोआप फिरायला लागलं."
"मग मला मागून श्वासाचा आवाज ऐकू आला, पण मागे कुणीच नव्हतं. मी घाबरून खोलीत पळालो, दार लावलं." अथर्वचा आवाज आता अधिकच कापत होता. "आणि मग दाराबाहेरून तो आवाज आला... माझं नाव घेतलं तिने, आई. मला माहीत नाही कोण होतं ते, पण तिने माझं नाव घेतलं."
"म्हणाली... 'तुझी ताई कुठे आहे? ती नेहमी तुझ्याजवळ का असते?'" अथर्वने डोळे मिटले, त्या आठवणीने पुन्हा थरथरत. "आणि मग म्हणाली, 'मी तिला न्यायला आले होते, पण आज ती इथे नाहीये. आज फक्त तूच आहेस.'"
स्वातीचा श्वास अडकला. तिने अनन्याकडे बघितलं, ती शेजारीच बसून, ओठ घट्ट आवळून, हे सगळं ऐकत होती.
"आणि मग दाराची कडी हलू लागली," अथर्व पुढे म्हणाला, "स्वतःहूनच, फिरू लागली. आणि मला वाटलं आता दार उघडणार, आणि..." तो पुन्हा रडू लागला, शब्द फुटेनासे झाले. स्वाती त्याला जवळ घेऊन थोपटू लागली.
अभिजित त्या दिवशी ऑफिसला जरा लवकरच गेला होता. काही महत्त्वाची कामं निपटवायची होती , आणि बॉसला आपल्या पुढच्या रजेबद्दल कल्पना द्यायची होती.
केबिनमध्ये एकटा बसून, समोरच्या फाईल्सकडे बघत असताना, त्याचं मन मात्र त्या कागदपत्रांत रमेना. त्याचे विचार वारंवार दोन प्रश्नांभोवती घुटमळत राहिले, जे त्याला कुमठ्याहून निघाल्यापासून सतावत होते, पण त्यांची उत्तरं त्याला अजूनही मिळाली नव्हती.
नेहालाच ते स्वप्न का पडलं?
त्याने खिडकीबाहेर बघत विचार केला. बारा बळींपैकी लीला ही एकच होती जिचं नेहाशी रक्ताचं नातं होतं...तिची मामी. पण मग बाकीच्या अकरा जणींबद्दल का नाही पडलं तसलं स्वप्न कुणाला? आणि जर हे रक्ताच्या नात्यामुळेच असेल, तर त्या आत्म्याने ते नेमकं आत्ताच, याच वेळी, नेहालाच का दाखवलं, त्याआधीच्या इतक्या वर्षांत का नाही?
कदाचित, त्याच्या मनात एक विचार चमकला, त्या आत्म्यांना कळलं असेल, आता खरंच काहीतरी बदलतंय, आता खरंच आशा आहे मुक्तीची. आणि तेच त्यांना नेहापर्यंत पोहोचायला पुरेसं बळ देत असेल.
पण हे नुसतं अनुमान होतं, आणि त्याला ते पुरेसं समाधानकारक वाटत नव्हतं.
आणि दुसरा प्रश्न, जो त्याहूनही जास्त त्याच्या मनाला बोचत होता; देवप्पा नेहाला काय म्हणाले असतील, त्या कन्नडमधल्या संभाषणात?
त्याने ते दृश्य पुन्हा आठवलं नेहाचा तो गोंधळलेला, घाबरलेला चेहरा, देवप्पाचा तो गंभीर आवाज, आणि शेवटी तो स्पष्ट नकार, "तिला गंडा देण्याची गरज नाही."
तिला गरज नाही, याचा अर्थ काय? त्याने स्वतःशीच विचार केला. ती आधीच सुरक्षित आहे म्हणून? की तिचं या सगळ्याशी असं काही वेगळंच नातं आहे, जे गंड्याने बदलणार नाही?
त्याच्या मनात, नकळत, एक अस्वस्थ शक्यताही डोकावली की देवप्पांना नेहाबद्दल असं काहीतरी माहीत आहे, जे तिलाही पूर्णपणे माहीत नाही?
त्याने विचार केला, नेहालाच थेट विचारावं का, पुन्हा एकदा. पण मग आठवलं, तिने आधीच स्पष्ट सांगितलं होतं, "देवप्पांनी सांगितलंय, कुणालाच सांगायचं नाही." आणि तो शब्द मोडायला तिला भाग पाडणं, अभिजितला योग्य वाटेना.
कदाचित देवप्पांचं म्हणणं खरं असेल, त्याने स्वतःला समजावायचा प्रयत्न केला, फाईलकडे परत वळत. योग्य वेळ आली की आपोआप कळेल.
पण त्या दिवशी संध्याकाळपर्यंत, ते दोन प्रश्न त्याच्या मनातून पूर्णपणे गेलेच नाहीत जणू ते दोन्ही एकाच मोठ्या, अजून न दिसलेल्या चित्राचे तुकडे होते, जे कधीतरी, अनपेक्षितपणे, एकत्र जुळणार होते.
त्या विचाराच्या तंद्रीतच तो घरी आला तर घरी हा सगळा प्रकार. स्वातीने त्याला बाजूला घेऊन घडलेला प्रसंग सांगितला.
"बाबा, ते काय होतं?" अथर्वने विचारलं, त्याचे डोळे अजूनही भीतीने भरलेले.
अभिजितने दीर्घ श्वास घेतला, पूर्ण सत्य सांगायची वेळ अजून आली नव्हती, पण त्याला खोटंही बोलायचं नव्हतं.
"काही वाईट शक्ती आहेत जगात, मुलांनो," तो म्हणाला. "ज्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. मी सध्या एका खास साधनेत आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबाला या शक्तींपासून कायमचं वाचवता येईल. पण तोवर, आपल्याला थोडं जास्त सावध राहावं लागेल."
"आपण त्यांना मात देऊ शकतो ?" अनन्याने विचारलं.
"नक्कीच बेटा ," अभिजित म्हणाला, आवाजात शक्य तितका ठामपणा आणत. "कारण आपण एकटे नाहीयोत यात."
अभिजितने त्यांना धीर देत, त्यांना बळ देत आणखी घट्ट मिठीत घेतलं.
पण त्या रात्री, मुलं झोपल्यावर, स्वातीच्या शेजारी अंथरुणावर पडून असताना, अभिजितच्या मनातली ती शांतता, तो ठामपणा, हळूहळू विरू लागला.
त्याने स्वतःशीच विचार केला, मी मुलांना धीर दिला, पण खरं सांगायचं तर, मलाच कळत नाहीये, अशा अमानवी शक्तीशी नक्की कसं लढायचं. तलवार, मंत्र, कवच हे सगळं कल्लेश्वरशी, त्याच्या भुतावळींशी लढण्यासाठी आहे. पण जर तो थेट माझ्या मुलांपर्यंत पोहोचू शकतो तर मी यानाला राहून, इथे त्यांना सुरक्षित कसं ठेवणार?
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी उशिरापर्यंत झोपून राहायचा बेत असतानाच, अभिजितला बिल्डिंगच्या गेटजवळून येणारा गोंधळाचा आवाज ऐकू आला; कुणीतरी बोलण्याचा, वादाचा आवाज.
काही मिनिटांतच इंटरकॉम वाजला. अभिजितने उचलला.
"हॅलो साबजी, दो आदमी है," वॉचमन म्हणाला, "काला कपड़ा और काला धोती भी पहिन्या है। आपको पूछ रहा साबजी।"
अभिजित गोंधळला. "कोण आहेत ते? मी कुणालाच बोलावलेलं नाहीये."
"सर, नहीं आने देऊं?" वॉचमनने विचारलं, आवाजात अनिश्चितता.
अभिजित "नाही" म्हणणार, इतक्यात, इंटरकॉमवरून पलीकडे, त्या दोघांतल्या एकाचा आवाज ऐकू आला, जो कदाचित वॉचमनच्या शेजारीच उभा असावा.
"यल्लाप्पा! यल्लाप्पा भेजा हमको." तो ओरडून म्हणाला.
अभिजितला धक्का बसला. "यल्लाप्पा?" तो पटकन म्हणाला. "हो, हो, त्यांना वर पाठव, लगेच."
काही मिनिटांतच दारावर टकटक झाली. अभिजितने दार उघडलं; समोर दोन माणसं उभी होती, दोघेही काळे कपडे, काळं धोतर नेसलेले, कपाळावर पांढऱ्या राखेचा तिळक, आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा.
"नमस्कार, इनामदार साहेब," त्यांच्यातला मोठा म्हणाला, हात जोडत. "आम्हाला यल्लाप्पांनी पाठवलंय. शास्त अनुयायी आहोत आम्ही."
स्वातीही मागून आली, गोंधळून, पण अभिजितने तिला शांत राहायची खूण केली.
"आत या," अभिजित म्हणाला, दार पूर्ण उघडत.
आत आल्यावर, त्या दोघांनी घराचं बारकाईने निरीक्षण केलं प्रत्येक दार, खिडकी, कोपरे. मग त्यांच्यातल्या मोठ्याने आपल्या पिशवीतून काही सामान काढलं. राख, हळद, काही जुनी, तांब्याची भांडी, आणि एक छोटी घंटा.
"आम्हाला घर अभिमंत्रित करायचंय," तो म्हणाला. "यल्लाप्पांनी सांगितलं, इथे धोका वाढलाय म्हणून."
अभिजितने मान हलवली, "चालेल, सुरु करा."
हळुवारपणे मंत्र म्हणत, घंटा वाजवत एक जण पुढे चालू लागला, दुसरा मागून हळद-कुंकवाची रेघ उंबरठ्यावर, प्रत्येक खिडकीच्या चौकटीवर ओढत त्याच्या मागे जाऊ लागला.
अनन्या आणि अथर्व दुरून हे बघत होते, कुतूहलाने आणि किंचित भीतीनेही.
अभिमंत्रणाचा तो विधी संपल्यावर, त्यांच्यातला मोठा अभिजितकडे वळला. "आता हे घर एका संरक्षक कवचाखाली आहे, इनामदार साहेब. कुठलीही अशुभ शक्ती, याआधी जितक्या सहज आत शिरत होती, तितकी आता शिरू शकणार नाही. पण " तो थांबला, "हे कायमचं नाही. दर पौर्णिमेला, आम्ही परत येऊन हा विधी पुन्हा करू."
अभिजितने त्यांचे मनापासून आभार मानले, आणि ते जसे शांतपणे आले होते तसेच शांतपणे निघून गेले.
************************************************************************************************************************
कल्लेश्वरला ही बातमी कळली, त्याचा चेहरा रागाने विद्रूप झाला. "पुन्हा एक अडथळा!" तो गुरगुरला. त्याने क्षणभर विचार केला, मग त्याचे डोळे एका नव्या निर्धाराने चमकले. कल्लेश्वरने आणखी एक, अधिक धोकादायक पाऊल उचलायचं ठरवलं. वेळ खूप कमी आहे आता , त्याने विचार केला; मला आणखी शक्ती हवी, वेगळी, आणखी क्रूर शक्ती.
त्या रात्री जोगींनाही त्याने देवळाबाहेर काढलं; हा विधी इतका धोकादायक होता, की त्याला त्यांची गरज नव्हती, उलट भीतीच होती.
कल्लेश्वरने त्या पडक्या गाभाऱ्याच्या मध्यभागी लाल वाळलेल्या रक्ताने एक त्रिकोणी यंत्र काढलं. त्याच्या तीन कोपऱ्यांवर तीन दिवे लावले, आणि मध्यभागी एक कवटी ठेवली, ज्यात रक्त भरलेलं होतं.
त्याने डोळे मिटले, आणि आवाहन सुरू केलं, पण यावेळी त्याचा आवाज नेहमीसारखा ठाम नव्हता. त्यात एक सूक्ष्म कंप होता, जो त्याने स्वतःपासूनही लपवायचा प्रयत्न केला, "ॐ हाकिनी वामरूपे, मांसभक्षणतत्परे। रक्तपानप्रिये देवि, आगच्छ मम सन्निधौ॥"
पहिल्या काही उच्चारासरशी, त्या तीन दिव्यांच्या ज्योती एकदम उंच भडकल्या, आणि देवळातलं तापमान इतक्या वेगाने खाली आलं की उन्हाळ्याच्या त्या उकाड्याच्या रात्रीतही कल्लेश्वरच्या श्वासाची वाफ स्पष्ट दिसू लागली. हवेत एक विचित्र, तीव्र गंध पसरला कच्च्या मांसाचा, गोठलेल्या रक्ताचा, आणि त्यासोबतच काहीतरी गोडसर, कुजट, जे नाकाला असह्य वाटत होतं.
त्या त्रिकोणी यंत्राच्या मध्यभागी एक आकृती बाहेर येऊ लागली. प्रथम फक्त एक हात; मानवी, पण नखं लांब, काळी, धारदार. मग दुसरा हात पूर्णपणे वेगळा, पशूसारखा, केसाळ, पंजायुक्त, नखं तशीच लांब, काळी, धारदार.
तिचं संपूर्ण रूप हळूहळू स्पष्ट झालं. तिचे स्तन उघडे होते, त्वचा राखेसारखी करडी होती आणि अंगावर मानवी हाडांपासून केलेले विचित्र अलंकार लटकत होते. तिचे केस जमिनीवर सर्पांसारखे पसरले होते. एका हाताची बोटं मानवी होती, पण दुसऱ्या हाताचा पंजा एखाद्या हिंस्त्र पशूसारखा दिसत होता; लांब, काळी नखं चंद्रप्रकाशात चमकत होती.
तिचं तोंड हळूहळू उघडलं. ओठांच्या आत दोन लांब सुळे दिसले आणि त्यांच्यावर सुकलेल्या रक्ताचा काळपट थर होता. ते रूप पाहून कल्लेश्वरलाही एक क्षण डोळे मिटावेसे वाटले.
"कोणी साद घातली मला?" ती गरजली, आणि तो आवाज देवळाच्या भिंतींतून, जमिनीतून, कल्लेश्वरच्याच हाडांतून घुमल्यासारखा वाटला. स्त्री आणि श्वापद यांचा एक विकृत मिलाफ.
कल्लेश्वरने प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरलं, आणि नतमस्तक झाला, पण नजर तिच्यावरच रोखून ठेवली कारण त्याला माहीत होतं, नजर हटवणं म्हणजे कमजोरी दाखवणं, आणि हाकिनीसमोर कमजोरी दाखवणं म्हणजे स्वतःचंच मांस अर्पण करणं.
"मी," तो म्हणाला, आवाज स्थिर ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत. "हाकिनी देवी, मला तुझी मदत हवीये."
हाकिनीने हवेतच तरंगत त्याच्याभोवती एक फेरी मारली , तिचे पाय जमिनीला स्पर्शही करत नव्हते आणि तिचे डोळे, तांबडे, आगीसारखे चमकणारे, त्याच्या संपूर्ण शरीराचा वेध घेत राहिले, जणू ती त्याच्या मांसापैकी कुठला भाग सर्वांत रुचकर असेल याचा अंदाज घेत होती.
"मदत फुकट मिळत नाही, तांत्रिका," ती म्हणाली, तिचा श्वास त्याच्या मानेजवळ आला, कुजलेल्या मांसासारखा. "काय अर्पण करशील मला?"
कल्लेश्वरने थरथरत्या हातांनी एक पात्र पुढे केलं त्यात त्याने स्वतः शिकार केलेल्या एका रानडुकराचं ताजं मांस होतं, अजूनही रक्त ठिबकणारं.
हाकिनीने ते नाकपुड्या फुगवत हुंगलं, आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर, भुकेली तृप्ती उमटली. तिने ते पात्र आपल्या पंजायुक्त हाताने हिसकावून घेतलं, आणि दात मांसात खोलवर रुतवत, हाडं चावून चुरा करत ते कच्चंच खायला सुरुवात केली, तिच्या तोंडातून रक्त तिच्या हनुवटीवरून, छातीवरून, जमिनीवर ठिबकत होतं.
तो मांस चावण्याचा, हाडं फोडण्याचा आवाज इतका भयाण होता की कल्लेश्वरचेही पाय थरथरू लागले.
खाणं संपल्यावर तिने कल्लेश्वरकडे बघितलं, तिच्या दातांत अजूनही मांसाचे तुकडे लटकत होते. "बोल आता. काय हवंय तुला?"
"एक माणूस आहे," कल्लेश्वर म्हणाला, "जो माझ्या मार्गात अडथळा बनतोय. त्याच्या मनात भीती, संशय, अस्थिरता पेरायला हवीये मला; असं काहीतरी जे त्याची एकाग्रता तोडेल, जे त्याला आतूनच पोखरून काढेल."
हाकिनीने तिची लांब, काळी जीभ ओठांवरून, दातांवरून फिरवत, उरलेलं रक्त चाटत विचार केला. "मन तोडणं हे माझं खरं कौशल्य नाही, तांत्रिका. मी रक्तामांसाची भुकेली, विचारांची नाही."
"पण तुला हे माहीत असेल," कल्लेश्वर धीराने म्हणाला, जरी त्याचे स्वतःचे गुडघे किंचित थरथरत होते, "चौसष्ट योगिनींपैकी कुणाला हे शक्य आहे. मला त्यांचं नाव हवंय, त्यांना बोलवायचा मार्ग हवाय."
हाकिनी काही क्षण गप्प राहिली, तिचे तांबडे डोळे त्याच्यावर रोखलेले, आणि मग तिच्या ओठांवर एक धूर्त, विषारी स्मित उमटलं. "असं ज्ञान फुकट देत नाही मी, तांत्रिका. आणखी एक अर्पण हवंय आणि यावेळी, फक्त डुकराचं मांस नाही."
कल्लेश्वर आता मनातून हादरून गेला "काय हवंय तुला?"
हाकिनीने त्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं, तिची नखं त्याच्या हनुवटीजवळ आली, जेमतेम स्पर्श न करता. "तुझं स्वतःचं रक्त, तांत्रिका आणि त्यासोबत तुझ्या शक्तीचा एक थेंब."
कल्लेश्वरने क्षणभर संकोच केला स्वतःची शक्ती अर्पण करणं, हे नुसतं रक्त देण्यापेक्षा खूप जास्त धोकादायक होतं. पण त्याने दात आवळले, आणि चाकू उचलला, मनगटावर एक खोल चीर दिली. रक्त वाहू लागलं, आणि त्यासोबतच, त्याने स्वतःच्या इच्छाशक्तीचा एक भाग त्या रक्तात ओतला; त्याला जाणवलं, तो भाग कायमचा त्याच्यापासून वेगळा होतोय, कधीच परत न मिळणारा.
हाकिनीने ते पात्र घेतलं, प्यायली आणि यावेळी तिचे डोळे आनंदाने मिटले, जणू ही मेजवानी अगदी दुर्मिळ होती.
"शोधशील, तर 'भूतडामरी' नावाची योगिनी, मनोविकारांची, भ्रमाची स्वामिनी मिळेल," ती म्हणाली, "तिला बोलवायचा मंत्र... तो मी आणखी एका अर्पणानंतरच सांगेन, पण पुढच्या अमावस्येला."
आणि तितकं बोलून, हाकिनी त्याच त्रिकोणी यंत्रातच, धुरासारखी, विरून गेली पण जाताना, तिचा शेवटचा आवाज कल्लेश्वरच्या कानांत खोलवर रुतून राहिला, जवळजवळ हसल्यासारखा. "पुढच्या वेळी, तांत्रिका, अर्पण आणखी मोठं असेल हे लक्षात ठेव."
कल्लेश्वर बराच वेळ त्या रिकाम्या यंत्राकडे बघत राहिला, त्याच्या मनगटातून अजूनही रक्त ठिबकत होतं, आणि त्याच्या आत, कुठेतरी खोलवर, त्याला स्वतःचाच एक तुकडा हरवल्यासारखा जाणवत होता.
"भूतडामरी," तो स्वतःशीच पुटपुटला.
वर, पडक्या छतावर, वटवाघळांचा तो थवा एकदम खवळून उठला, त्यांचा चित्कार त्या अंधाऱ्या गाभाऱ्यात घुमत राहिला जणू त्यांनाही त्या नव्या, अधिक भयाण योजनेची चाहूल लागली होती.
आणि त्या पडक्या देवळाबाहेर, दाट झाडीत लपलेल्या एका उंच फांदीवर, देवप्पाचा गरुड निश्चल बसून, हे सगळं डोळ्यांत साठवत होता. गरुडाने हळूच पंख हलवले, आणि त्या क्षणार्धातच, यानाच्या घरी, ध्यानस्थ बसलेल्या देवप्पाच्या मनात, ते संपूर्ण दृश्य उमटलं जणू तो स्वतःच तिथे, त्या पडक्या देवळात उभा होता.
देवप्पाचे डोळे ताडकन उघडले, आणि त्याचा श्वास एका क्षणात कोंडल्यासारखा झाला. त्याचा चेहरा पांढराफटक पडला, हात थरथरू लागले.
"हे... हे शक्यच नाही," तो पुटपुटला, स्वतःशीच, आवाजात एक खोल भीती जी त्याच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातही क्वचितच उमटली होती. "हाकिनीला आवाहन? आणि भूतडामरी?"
भूतडामरी. हे नाव त्याने आयुष्यात फार कमी वेळा ऐकलं होतं. गुरूंच्या आश्रमात असताना एका रात्री त्याच्या गुरूंनी त्याला या शक्तीबद्दल सांगितलं होतं. तेव्हा देवप्पा तरुण होता आणि तांत्रिक विद्येतील अनेक गोष्टी त्याला अद्भुत वाटत होत्या. पण भूतडामरीचा उल्लेख होताच त्याच्या गुरूंच्या चेहऱ्यावर आलेली गंभीर छाया त्याला आजही आठवत होती.
“काही शक्तींना बोलावता येतं, देवप्पा,” गुरूंनी तेव्हा सांगितलं होतं, “पण त्या आल्या की त्या तुझ्या आज्ञेत राहतीलच, असं समजू नकोस.”
देवप्पाने डोळे मिटले. समोरचं दृश्य त्याच्या मनात पुन्हा उभं राहिलं. हाकिनी. आणि तिच्यामागे... भूतडामरी.
पटकन हा भाग टाकल्याबद्दल आभार
पटकन हा भाग टाकल्याबद्दल आभार..
पण मी आज आता रात्री नाही बा वाचणार...
उद्या दिवसा वाचेन.....
हाकिनी आली, भूतडामरी येऊ
हाकिनी आली, भूतडामरी येऊ घातलीय …मजा येणार 👍
वाचतोय.
हाकिनीने तिची लांब, काळी जीभ
हाकिनीने तिची लांब, काळी जीभ ओठांवरून, दातांवरून फिरवत, उरलेलं रक्त चाटत विचार केला. "मन तोडणं हे माझं खरं कौशल्य नाही, तांत्रिका. मी रक्तामांसाची भुकेली, विचारांची नाही>>>> हे भीति दायक आहे.
बेक्कार भारी झालाय भाग
बेक्कार भारी झालाय भाग
विशेषणं संपलीत आता
प्रतिसाद वाचून वाटले की बरे
प्रतिसाद वाचून वाटले की बरे झाले काल रात्री नाही वाचला .....
हा भाग सुद्धा जबरदस्तच.
हा भाग सुद्धा जबरदस्तच. हाकिनीचे वर्णन तर खत्तर्नाकच. ती इच्छाशक्ती नेमकी कशी दिली कल्लेश्वराने असा प्रश्न पडला. मस्त चालू आहे कथा. हि कथा संपल्यावर ती कशी सुचली, ती लिहितानाची तुमची विचारप्रक्रिया, माहिती (मंत्र, ठिकाणे, भाषा) कशी मिळविली इत्यादींवर शक्य झाल्यास एक लेख लिहा. मला वाचायला आवडेल. आणि या कथेला मिळणारा प्रतिसाद पाहता इतरांनाही वाचायला आवडेल असे वाटते. धन्यवाद.
वाचत आहे.
वाचत आहे.
तुमचे references आणि अभ्यास
तुमचे references आणि अभ्यास जबरदस्त आहे.
Peak detailing
हाकीनी वर्णन तर बाबओ !!!!!!
हाकीनी वर्णन तर बाबओ !!!!!!
उत्तरोत्तर रंगत चाललीय कथा.
बापरे s हाकिनी, भूतदामरि..
बापरे s हाकिनी, भूतदामरि..
जबरदस्त लिहीत आहात..
हाकिनी असं काही पात्र कथा कादंबरी मध्ये वाचलेले पुसट आठवतंय.. हाका मारणारे भूत टाईप ss ही हाकिनी वेगळीच आहे ss
धन्यवाद धनवन्ती, अनिंद्य,
धन्यवाद धनवन्ती, अनिंद्य, केशवकूल, किल्ली, माबो वाचक, जाई., झकासराव, अनघा.
<< हि कथा संपल्यावर ती कशी सुचली, ती लिहितानाची तुमची विचारप्रक्रिया, माहिती (मंत्र, ठिकाणे, भाषा) कशी मिळविली इत्यादींवर शक्य झाल्यास एक लेख लिहा>> @माबो वाचक प्रयत्न करीन.
<<हाका मारणारे भूत टाईप ss ही हाकिनी वेगळीच आहे ss>> @अनघा. ती हाकामारी. हाकिनी, डाकिनी, शाकिनी, योगिनी या तांत्रिक शक्ती आहेत.
जबरदस्त.... लवकर लवकर पुढचा
जबरदस्त.... लवकर लवकर पुढचा भाग येऊंदे .....
<< हि कथा संपल्यावर ती कशी सुचली, ती लिहितानाची तुमची विचारप्रक्रिया, माहिती (मंत्र, ठिकाणे, भाषा) कशी मिळविली इत्यादींवर शक्य झाल्यास एक लेख लिहा>> शक्य झाल्यास एक गटग ठेवूया .मेकिंग ऑफ भस्मबीज....:-)
खरच विशेषण नाहीत आता उरली
खरच विशेषण नाहीत आता उरली काही तुमच्या लेखनकौशल्याला दाद द्यायला.
शक्य झाल्यास एक गटग ठेवूया .मेकिंग ऑफ भस्मबीज
>>>> छान कल्पना, सामो.
लेखकांना चालेल का
सामो नाही सामी आहेत त्या. आबा
सामो नाही सामी आहेत त्या. आबा!
सामो नाही सामी आहेत त्या. आबा
सामो नाही सामी आहेत त्या. आबा! >
सामी आणि सामो confusion होते न ?
छान कल्पना, सामो.> आबा इकडचे
छान कल्पना, सामो.> आबा इकडचे खूपसे लेखक एवढे छान लिहितात कि त्यांना प्रत्यक्ष भेटावेसे वाटते.
सामो नाही सामी आहेत त्या. आबा
सामो नाही सामी आहेत त्या. आबा!
>>> अरेच्चा, खरंच की. My Bad!
तरी विचारच करत होतो प्रतिसाद देताना की सामो अमेरिकेहून गटगला येणारं का?
इकडचे खूपसे लेखक एवढे छान लिहितात कि त्यांना प्रत्यक्ष भेटावेसे वाटते. >>>>
खरच छान कल्पना आहे सामी. बघू लेखक काय उत्तर देतात
ठेवूया की गटग… तुमच्याशी
ठेवूया की गटग… तुमच्याशी भेटायला कशाला हवंय निमित्त!
समव्यसनेषु सख्यम्!
Excellent insights! AG
Excellent insights! AG Organica supplies bulk essential oils, carrier oils, botanical extracts, and private label skincare manufacturing services with competitive pricing and customized formulations. Contact Us Today: https://www.pureoilsindia.com/
मधेच हा Pure Oil वाला
मधेच हा Pure Oil वाला प्रतिसाद आल्याने आपल्या भूतडामरी आणि शाकिनी अंगाला सुगंधी तेल फासून सर्वांना घाबरवायला येत आहेत असे imagine झाले 😁
हाकिनी. आणि तिच्यामागे...
हाकिनी. आणि तिच्यामागे... भूतडामरी.
बापरे. जबरदस्त झाला आहे हा भाग...
उत्सुकता वाढली.
लवकर टाका पुढचा भाग.
अजून तलवार पूजली नाही ना?
गटग?
कब है गटग?
शक्य झाल्यास एक गटग ठेवूया .मेकिंग ऑफ भस्मबीज...
मी नक्की येईन या गटग ला
भस्मबीज थीम गटग...
गटग?
तरी विचारच करत होतो प्रतिसाद देताना की सामो अमेरिकेहून गटगला येणारं का?> सामो आल्या कि गटग करू ....हा का ना का
गटग?
कब है गटग? > जहाँ ऋतुराज वहा गटग ...और जहाँ गटग वहा ऋतुराज
>>>>>> जहाँ ऋतुराज वहा गटग ..
>>>>>> जहाँ ऋतुराज वहा गटग ...और जहाँ गटग वहा ऋतुराज

करेक्ट
>>>>सामो आल्या कि गटग करू ....हा का ना का Happy
होय
पुढचा भाग शोधायला सारखे इकडे
पुढचा भाग शोधायला सारखे इकडे येते आहे..
भूतडामरी आणि शाकिनी अंगाला
भूतडामरी आणि शाकिनी अंगाला सुगंधी तेल फासून सर्वांना घाबरवायला येत आहेत असे imagine झाले >>