भस्मबीज - भाग १७

Submitted by नितनवे on 24 August, 2026 - 08:04

भस्मबीज - भाग १६
पूर्वभाग
देवप्पा अभिजितला सांगतो की मागील सहा रात्रींचे हल्ले ही कल्लेश्वरच्या खऱ्या शक्तीची केवळ चाचणी होती; मोहिनीच्या संरक्षणामुळे तो वाचला, पण आता प्रत्यक्ष संघर्षासाठी त्याला तयार व्हावं लागणार आहे. अभिजित देवप्पाला भेटण्यासाठी सिरसीला जाण्याचा निर्णय घेतो आणि सुप्याहून सन्कन्नाची तलवार घेऊन स्वाती आणि नेहासह कर्नाटककडे रवाना होतो. दरम्यान अनन्याला घरात राखेचे ठसे, कुजबुज आणि अदृश्य शक्तीचा भयावह अनुभव येतो, तर कल्लेश्वर तिच्यावर मोहिनी घालण्याचा प्रयत्न करतो; मात्र तिच्याभोवती असलेल्या अदृश्य कवचामुळे त्याचा प्रयत्न अपयशी ठरतो. दुसरीकडे आजी आणि मामा नेहाच्या जन्माशी आणि तिची मामी लीलाच्या रहस्यमय बेपत्ता होण्याशी जोडलेलं सत्य उघड करण्याच्या उंबरठ्यावर येतात, कारण त्यांना वाटतं की या रहस्याचं उत्तर भस्मबीजाच्या शोधातच दडलं असू शकतं.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १७ - भस्मशैल
गाडीने सातारा मागे सोडलं आणि घाटाच्या दिशेने वळताच आजूबाजूचं दृश्य हळूहळू बदलू लागलं. रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा होत गेला. दोन्ही बाजूंना दाट जंगल पसरलं होतं आणि उंच झाडांच्या फांद्यांनी आकाशाचा बराचसा भाग झाकून टाकला होता. अधूनमधून धुक्याचा एखादा पातळ पडदा झाडांच्या फांद्यांमधून खाली उतरायचा आणि वाऱ्याबरोबर रस्ता ओलांडून पुन्हा जंगलात विरून जायचा.
अभिजित, स्वाती आणि नेहा तिघेही आपापल्या विचारांत गढलेले होते. इंजिनाचा एकसुरी आवाज आणि टायरखाली घासला जाणारा डांबरी रस्ता एवढेच आवाज त्या शांततेत ऐकू येत होते. अधूनमधून दूरवरून एखाद्या पक्ष्याची अस्पष्ट शीळ ऐकू यायची आणि पुन्हा सगळं शांत व्हायचं.

एका वळण घेताच अभिजितने सहज बाहेर पाहिलं आणि त्याची नजर अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर स्थिरावली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांवर, एक-दोन नाही, तर डझनभर कावळे बसलेले होते, सगळ्यांचे लाल डोळे गाडीकडेच रोखलेले.
"सर..." नेहाचा घाबरलेला आवाज मागून आला.

अभिजितने आरशातून तिच्याकडे पाहिलं. नेहा खिडकीबाहेर पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती उमटली होती. तिने नकळत स्वातीचा हात घट्ट पकडला होता.

"तुम्हालाही तेच दिसतंय ना?" तिने कुजबुजत विचारलं.

स्वातीने बाहेर पाहिलं आणि तिच्याही चेहऱ्यावर काळजी उमटली.

गाडी त्या कावळ्यांच्या रांगेखालून जात असताना, एकाही पक्ष्याने हालचाल केली नाही. उलट, गाडी पुढे सरकत असताना त्यांच्या माना हळूहळू तिच्या दिशेने वळत गेल्या. काही क्षणांसाठी अभिजितला असं वाटलं की गाडी पुढे जात नसून त्या नजरा तिच्या बरोबरीने सरकत आहेत.

काही अंतर गेल्यावर ते झाड मागे पडलं. अभिजितने सुटकेचा नि:श्वास सोडला; पण पुढच्याच वळणावर त्याला पुन्हा झाडांच्या फांद्यांवर कावळ्यांची रांग दिसली.
यावेळीही ते तसेच निश्चल बसले होते. जणू एक अखंड, जिवंत साखळी त्यांच्या मागोमाग सरकत होती.
"त्याला कळलंय," अभिजित शेवटी म्हणाला. "आपण कुठे चाललोय आणि का चाललोय, हे त्याला कळलंय."
************************************************************************************************************************
गाडी भागवत निवासाच्या अंगणात थांबली, तेव्हा संध्याकाळचा प्रकाश हळूहळू मंदावत चालला होता. दारात आजी आणि मामा आधीच वाट बघत उभे होते.
गाडीचं दार उघडताच नेहा पहिली उतरली, आणि आजींनी तिला बघताच हात पसरले. नेहाला जवळ घेतलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला, जणू प्रत्यक्ष स्पर्शानेच खात्री करून घेत होत्या; पोरगी सुखरूप आहे ना. मग त्यांची नजर गाडीतून उतरणाऱ्या स्वातीकडे वळली.

"या, या," त्या म्हणाल्या, पण त्यांच्या डोळ्यांतली ती चिंता लपत नव्हती. "प्रवास कसा झाला?"

"ठीक झाला," अभिजित म्हणाला.

नेहाने पुढे होत स्वातीची ओळख करून दिली. "आजी, ही स्वाती. अभिजित सरांची पत्नी."

"नमस्कार आजी," स्वाती म्हणाली. स्वातीने त्यांचे पाय स्पर्श करायला वाकण्याचा प्रयत्न केला, पण आजींनी तिला मध्येच अडवून घट्ट जवळ घेतलं.

मामाही पुढे आला, स्वातीकडे बघत हलकंसं हसला. "नमस्कार. या, या आत. वाटेत काही त्रास नाही ना झाला?"

अभिजितने क्षणभर विचार केला, मग म्हणाला, "मामा, वाटेत आम्हाला काहीतरी दिसलं. सांगतो आत गेल्यावर, नीट."

मामांचा चेहरा किंचित गंभीर झाला, पण त्यांनी आत्ता काही विचारलं नाही; फक्त सगळ्यांना आत घेऊन जायची घाई केली.

आत, ओसरीवर सामान ठेवत असताना, आजींनी स्वातीचा हात हातात घेतला, तिला जवळच्या खुर्चीत बसवत. "बस, बाळा. थकली असशील. चहा आणते आधी, मग निवांत बोलू."

"आजी, तुम्ही उगीच त्रास घेऊ नका," स्वाती संकोचून म्हणाली.

"त्रास कसला त्यात?" आजींनी हसत तिच्या गालावर हात ठेवला. "इतक्या वेळा नेहाच्या तोंडून तुझं आणि अभिजितचं इतकं कौतुक ऐकलंय, आज प्रत्यक्ष बघून बरं वाटतंय."

मामांनी अभिजितच्या खांद्यावर हात ठेवला. "बस अभिजित. आणि आता सांग, रस्त्यात काय दिसलं तुम्हाला?"

अभिजितने त्या कावळ्यांच्या रांगेबद्दल सांगितलं. आजींचा चेहरा गंभीर झाला, आणि मामांनीही एकमेकांकडे बघितलं, दोघांच्याही मनात तीच अस्वस्थता.

आत, ओसरीवर, सगळे बसले. संध्याकाळ होत आली होती, आणि जेवणाची तयारी होत असतानाच, मामांनी विषय काढला.

"आज सकाळीच मी सिरसीमध्ये राहणाऱ्या मित्राला फोन केला," ते म्हणाले, चहाचा कप हातात घेत. "तो जाऊन बघून आलाय सहस्रलिंगला; पाणी अजून पूर्ण ओसरलेलं नाही, पण गेल्या आठवड्यापेक्षा बरंच खाली गेलंय. गुडघाभर, पाण्यात नक्कीच शोध घेता येईल असं वाटतंय."

अभिजितने पुढे झुकत विचारलं, "म्हणजे उद्याच सुरुवात करता येईल?"

"हो, माझ्या मते तरी." मामांनी मान हलवली. "पूर्ण उघडं व्हायला अजून आठवडाभर लागेल कदाचित, पण आपण उद्या जाऊन बघायला हरकत नाही"
************************************************************************************************************************

बखरीची पानं, शिलालेखाचं भाषांतर, डॉ. हेगडेंचा तो संदेश, आणि तो जुना कागद, ज्यावर अभिजितने बारा स्त्रियांची नावं-तारखा उतरवल्या होत्या; हे सगळं घेऊन नेहा आणि स्वाती बाजूलाच ओसरीवर बसल्या होत्या. नेहा सहजच तो जुना कागद चाळत होती, हा कागद सुरुवातीला स्वातीला अभिजितच्या खिश्यात सापडल्यानंतर कुणीच परत वाचला नव्हता.

अचानक नेहाची नजर एका ओळीवर थबकली १५ जुलै १९९६. लीला शेखर भागवत. गायब, याना आणि कुमठा यामधील जंगलात.

तिचा श्वास एकदम अडकला. "हे... हे नाव..."

पुढच्या काही मिनिटांत, त्या ओसरीवर एक भावनिक वादळ उठलं.

"नेहा?" स्वातीने तिच्याकडे बघितलं, तिच्या चेहऱ्यावरचा तो अचानक बदल जाणवून. "काय झालं?"

नेहा काहीच बोलू शकली नाही. तिचे डोळे त्या नावावरच खिळून राहिले. तिचे हात आता स्पष्टपणे थरथरत होते, इतके की तो कागद हातातच फडफडत होता.

"नेहा, सांगा ना," अभिजितनेही विचारलं, आवाजात आता खरी काळजी.

नेहाने अखेर मान वर केली, तिची नजर सरळ आजींकडे आणि मामाकडे वळली.

"तुम्हाला माहीत होतं का?" ती अखेर म्हणाली, आवाज कापत होता, पण त्यात आता एक धारदार, थेट सूर होता. "मामीबद्दल... तिच्याबद्दल तुम्हाला आधीपासून माहीत होतं का?"
आजींचा चेहरा क्षणार्धात पांढराफटक पडला. मामांनी नजर खाली वळवली, त्यांचे हातही थरथरू लागले.

"नेहा, बाळा..." आजींचा आवाज कापरा झाला. "कोणी सांगितलं तुला हे?"

नेहाने तो कागद त्यांच्यासमोर धरला, बोट त्या ओळीवर ठेवत, हात अजूनही थरथरत होते. "इथे. अभिजित सरांच्या यादीत. बारा स्त्रियांची नावं. आणि त्यात... त्यात मामीचं नाव आहे. माझ्याच जन्मदिवशी."

आजींचे डोळे भरून आले, अश्रू गालावरून ओघळू लागले, दाबून ठेवायचा प्रयत्न व्यर्थ ठरला. "आम्हाला माहीत नव्हतं, नेहा. देवाशपथ, आजपर्यंत आम्हाला हे माहीत नव्हतं की मामी नेमकी कशी गायब झाली. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ ठरलं."

नेहाचा आवाज आता चढला, त्यात राग मिसळू लागला. "मला का सांगितलं गेलं नाही कधी, की मामी अपघातात नाही गेली? मी जन्माला आले आणि त्याच दिवशी माझ्या बाबांचा मृत्यू झाला, माझी मामी गायब झाली; किती अपशकुनी आहे मी!"

"असं नको बोलूस, बाळा" आजी उठून तिच्याजवळ आली, तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. "आम्हाला हीच भीती वाटायची. आम्हाला तुला त्या ओझ्यापासून वाचवायचं होतं."

नेहाचा राग हळूहळू विरघळू लागला, त्या जागी आता एक खोल, गोंधळलेलं दुःख उमटलं. तिने डोळे मिटले, दोन थेंब गालांवरून ओघळले.
"मला रागवायचं नाहीये तुमच्यावर," ती हुंदके देत म्हणाली, आवाज आता मऊ झाला होता. "मला कळतंय, तुम्ही जे केलंत, ते प्रेमापोटीच केलंत."
आजींनी तिला जवळ ओढलं, घट्ट मिठी मारली. नेहा त्या मिठीत मोडून पडली, हुंदके देत रडू लागली. मामाही जवळ येऊन तिच्या पाठीवर हात ठेवून उभे राहिले, त्यांनाही स्वतःचे अश्रू लपवता येत नव्हते.

नेहाच्या हुंदक्यांचा वेग हळूहळू कमी झाल्यावर, तिने आजींकडे बघून विचारलं, "आजी, मला सगळं सांग. नेमकं काय झालं होतं त्या दिवशी?"

आजींनी दीर्घ श्वास घेतला, डोळे पुसले, आणि सगळ्यांकडे एकवार बघितलं; जणू पुढचे शब्द उच्चारायला तिला धाडस गोळा करावं लागत होतं.

ती हळू आवाजात सुरुवात करत म्हणाली, "तुझ्या आईला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या, त्या दिवशी पहाटे. आम्ही घाईघाईने तिला दवाखान्यात घेऊन गेलो...मी, तुझे मामा, आणि तुझे आजोबा."
"आणि मामी?" नेहाने विचारलं.

"लीला तेव्हा घरी नव्हती," मामा नेहाकडे बघत म्हणाले, त्यांच्या डोळ्यांत जुन्या आठवणींची एक सावली. "आमचं लग्न होऊन जेमतेम वर्षभर झालं होतं तेव्हा. त्या वर्षी अधिक आषाढ होता, आणि लीलाने तो महिना तिच्या माहेरी, धारवाडला जाऊन तिथल्या रीतीरिवाजाप्रमाणे साजरा करायचं ठरवलं होतं."

"राजेशही मूळचा धारवाडचाच मुंबईला नोकरीला होता पण त्यावेळी तोही धारवाडला आला होता." आजी म्हणाली. "तुझ्या जन्माची बातमी कळताच आम्ही त्याला फोन केला. त्याला मुलगी झाल्याची आनंदाची बातमी सांगितली आणि येताना लीलाला घेऊन येण्यास सांगितले."

नेहा श्वास रोखून ऐकत होती.

"राजेश लगेच धारवाडहून लीलाला घेऊन इकडे यायला निघाला." आजी पुढे म्हणाली. "दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते दोघे पोहोचले नाहीत, तेव्हा आम्हाला काळजी वाटू लागली. तुझे मामा शोधायला निघाले, आणि याना आणि कुमठ्याच्या मध्ये जंगलात, रस्त्याच्या बाजूला त्यांची गाडी सापडली."

मामांचे डोळे पुन्हा भरून आले. "राजेशचा मृतदेह गाडीतच होता, नेहा. पण गाडीत, आजूबाजूला, कुठेच लीला नव्हती. जणू ती हवेतच विरून गेली होती."

खोलीत एक भयाण शांतता पसरली.

"आणि तेव्हापासून," आजी हळू आवाजात म्हणाल्या, "आम्ही खूप शोध घेतला. पोलिसांकडे गेलो, तांत्रिकांकडे गेलो, वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या. पण लीलाचा कधीच कुठलाच मागमूस लागला नाही."

"तुझ्या आजोबांनी तुझ्यावर काही धोका असला तर तो टळावा म्हणून तुझी शांती केली" मामा म्हणाले. "तू पाच वर्षांची असतानाच ते गेले, आणि जाताना त्यांना तोच एक प्रश्न छळत होता, 'त्या दिवशी नेमकं काय झालं?’"

“तुझे आजोबा गेले आणि नंतर सुमित्राने…तुझ्या आईने कुमठ्याला येणंच सोडून दिलं. आम्हीच वर्ष सहा महिन्यातून कधीतरी गाठ घ्यायला यायचो आणि त्यानिमित्ताने तुझीही भेट व्हायची.”

स्वाती हळूच पुढे झाली, नेहाच्या शेजारी बसत, तिचा हात धरत. "नेहा, हे ऐकून तुला खूप जड वाटत असेल, माहितीये मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटी नाहीयेस. तुझ्या बाबांना कोणी मारलं, आणि मामीचं काय झालं याचं उत्तर आपण नक्की शोधून काढू.”

अभिजितही तिच्याजवळ आला, गुडघ्यावर बसत, तिच्या नजरेला नजर भिडवत. "नेहा, कधीकधी असं घडतं; आपली वैयक्तिक दुःखं, आपल्या नकळत एका मोठ्या सत्याशी जोडलेली असतात. तुम्हाला हे आत्ता समजलं, हेही एक प्रकारे बरं झालं कारण आता तुम्ही एकट्या नाही आहात."
नेहाने मान हलवली, आणि एक थकलेलं, पण कृतज्ञ हसू तिच्या ओठांवर उमटलं.
************************************************************************************************************************
रात्री जेवण झाल्यावर, अभिजित आणि स्वाती घराच्या मागच्या नारळीच्या बागेत लाकडी बाकावर बसून शांतपणे गप्पा मारत बसले होते. चांदण्यांच्या फिकट प्रकाशात, रातकिड्यांच्या आवाजात, दोघांनाही तो एक निवांत क्षण हवाहवासा वाटत होता.

स्वातीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. "आजचा दिवस किती जड गेला, नाही?"

"हो." अभिजितने तिचा हात हातात घेतला, बोटांची हलकीशी गुंफण करत. "नेहासाठी तर विशेषच. इतकं मोठं सत्य, इतक्या अचानक."

"पण तिने किती धीराने घेतलं शेवटी," स्वाती म्हणाली. "रडली, पण मोडून पडली नाही."

अभिजितने मान हलवली. "ती खरंच खूप कणखर आहे. सुरुवातीपासून बघतोय मी."

दोघे काही वेळ शांत बसून राहिले, फक्त एकमेकांच्या सोबतीचा तो निवांत आधार अनुभवत. स्वातीने डोळे मिटले, त्या रातकिड्यांच्या आवाजातही एक विचित्र शांती जाणवत होती तिला; इतक्या दिवसांच्या भीती, प्रवास, धक्क्यांनंतर आलेली ही एक निवांत रात्र.

काही अंतरावर, ओसरीतून, नेहा त्यांच्याकडे बघत उभी राहिली. अंधारात अभिजित आणि स्वाती, एकमेकांच्या इतक्या जवळ, इतक्या सहज विसावलेली बघताना तिच्या मनात दोन भावना एकाच वेळी उचंबळून आल्या. त्यांचं ते नातं बघून तिला आनंद वाटत होता, जणू या दोघांचं सुख बघूनच तिलाही थोडं बरं वाटत होतं. आणि त्याचबरोबर एक तितकीच खोल, अनामिक हुरहूर आणि रिकामेपणाची जाणीव, जी तिला स्वतःलाही नीट समजावता येत नव्हती.

ती किती वेळ तिथे उभी राहिली, तिलाही नीट कळलं नाही. मध्येच अभिजित काहीतरी बोलला आणि स्वाती हसली, तो आवाज इथवर अस्पष्ट पोहोचला, आणि नेहाच्या ओठांवरही नकळत एक हसू उमटलं. पण ते हसू काही क्षणांपेक्षा जास्त टिकले नाही.
तिच्या डोळ्यांत अलगद पाणी तरळलं. तिने लगेच नजर वळवली आणि डोळे पुसण्याचा प्रयत्न केला; पण त्या क्षणी तिच्या मनात उठलेली वेदना तिला लपवता आली नाही.

स्वयंपाकघरात आवराआवर करत असलेल्या आजींची नजर खिडकीतून तिच्यावर पडली. त्यांनी काही क्षण नेहाकडे पाहिलं आणि मग अभिजित-स्वातीकडे. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीची छटा उमटली.
त्यांनी दीर्घ श्वास घेतला, "बिचारी पोर," आजी पुटपुटल्या, जवळजवळ स्वतःशीच.

"काय झालं आई?" मामा म्हणाला.

आजी आवाज खाली आणत म्हणाली, "शेखर, मला वाटतंय नेहा अभिजितमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या नात्यांचा आधार शोधतेय."
मामाने आश्चर्याने आजीकडे पाहिलं.

आजी पुढे म्हणाल्या, "तिला त्याच्यात वडिलांचा आधारही जाणवतोय आणि...त्याच्याबद्दलची एक वेगळीच ओढही तिच्या मनात जाणवतेय."

मामा काही क्षण गप्प राहिला. त्याची नजर पुन्हा नेहाकडे गेली. "मलाही तिच्या वागण्यातून त्याच्याबद्दलची ओढ जाणवते," तो हळू आवाजात म्हणाला

"बिचारी पोरगी या क्षणी मनात काय काय झेलत असेल, देव जाणे." आजी काळजीयुक्त स्वरात म्हणाली.
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी पहाटेच अभिजित, स्वाती आणि नेहा शाल्मला नदीच्या दिशेने निघाले. ते पोहोचले तेव्हा सकाळच्या धुक्याचा पातळ थर अजूनही नदीपात्रावर अलगद तरंगत होता. सभोवतालच्या झाडांवरून दवबिंदू टपटपत होते आणि त्या शांत वातावरणात दूरवरून येणारा पक्ष्यांचा मंद किलबिलाटही एखाद्या प्रार्थनेसारखा वाटत होता.

अभिजितने गाडी पार्किंगमध्ये उभी केली, आणि ते सगळे घाटाच्या पायऱ्या उतरून खाली नदी काठी जाऊ लागले. काही पायऱ्या उतरताच समोरचे दृश्य बघून सगळ्यांचे डोळे विस्फारले. स्वातीच्या तोंडून नकळत एक हलकासा उद्गार निघाला. नेहा जागच्या जागी थबकली, तिच्या हातातली बॅग खांद्यावरून खाली घसरली.

समोर, नजर जाईल तिथवर, शाल्मलेचं संपूर्ण पात्र शिवलिंगांनी व्यापलेलं होतं. सकाळचं कोवळं ऊन त्या हजारो दगडी पृष्ठभागांवर पडून एक विचित्र, चंदेरी-सोनेरी चमक निर्माण करत होतं. पाण्याचा प्रवाह त्या लिंगांमधून वाट काढत हळुवार खळखळत होता, आणि त्या आवाजातही एक विचित्र, प्राचीन लय जाणवत होती जणू ती नदीच अनके शतकांपासून एक मंत्र गुणगुणत होती.

नेहा हळूहळू पाण्याच्या दिशेने चालत गेली, तिची नजर त्या अंतहीन दगडी शिवलिंग आणि नंदींवरून फिरत राहिली. "इतक्या सगळ्यातून... आपल्याला तो नंदी शोधायचाय?" तिचा आवाज जवळजवळ अविश्वासाने भरलेला.

" हो," अभिजित म्हणाला, तोही त्या दृश्यासमोर स्तब्ध झालेला. "ज्याने हे लपवलं, त्यालाही माहीत होतं, हजारोंत एक शोधणं किती कठीण आहे. आणि म्हणूनच त्याने ही जागा निवडली."

अभिजितने दीर्घ श्वास घेतला, त्या अफाट दृश्यासमोर त्याला स्वतःला अगदीच लहान, अगदीच असहाय्य वाटत होतं.

"चला, सुरुवात करूया,"हातात एक काठी घेऊन पाण्यात उतरत अभिजित म्हणाला.

आजी किनाऱ्यावरच उभी राहिली, बाकी सगळे हळूहळू पाण्यात उतरू लागले.

तासन्‌तास त्यांचा शोध सुरू होता. सकाळचं कोवळं ऊन कधीच मागे पडलं होतं आणि आता डोक्यावरचं ऊन अधिकाधिक प्रखर होत चाललं होतं. त्यामुळे पाण्यात उभं राहून काम करणंही कठीण होत होतं.

दोन-तीन वेळा त्यांना आपला शोध संपल्यासारखा वाटला; पण प्रत्येक वेळी तो केवळ भास ठरला. एखादा नंदी झीजेमुळे तिरका झालेला असे, तर एखाद्याची बैठक दगडाच्या नैसर्गिक झीजेमुळे बदलल्यासारखी दिसत असे. मात्र नीट पाहिल्यावर त्याचा चेहरा अजूनही समोरच्या शिवलिंगाकडेच वळलेला असल्याचं स्पष्ट होत होतं.

एकदा नेहाने अचानक उत्साहाने हाक मारली, "हा बघा! मला वाटतं हा वेगळा आहे!"
अभिजित आणि स्वाती घाईघाईने तिच्याजवळ गेले. पाण्यातून वाट काढत ते त्या नंदीपाशी पोहोचले; पण जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांची आशा पुन्हा मावळली. नंदीचा पुढचा भागच बराचसा तुटलेला होता. चेहऱ्याचा काही भाग काळाच्या ओघात झिजून गेला होता आणि त्यामुळे तो नेमका कुठल्या दिशेला पाहत होता, हे ठरवणं अशक्य होतं.

"हा नाही," अभिजितने निराशपणे म्हटलं.

दुपार सरत गेली. उन्हाची तीव्रता कमी होऊ लागली, पण त्यांच्या अंगातला उत्साहही त्याच वेगाने ओसरत होता. शेवटी तिघेही थकून नदीकाठावर येऊन बसले. दिवसभर पाण्यात राहिल्यामुळे हातापायांची त्वचा सुरकुतली होती, कपडे अंगाला चिकटले होते आणि उन्हामुळे तिघांचेही चेहरे रापले होते.

स्वातीने थकलेल्या आवाजात विचारलं, "असं किती वेळ चालणार आहे? आपल्याला नेमकं किती शोधायचं आहे, याचाच आता अंदाज राहिलेला नाही."

"मलाही माहीत नाही," अभिजित म्हणाला. त्याच्या आवाजात थकव्याबरोबर निराशाही होती. नेहाने नदीपात्राकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरही निराशा स्पष्ट होती.

काही क्षण तिघेही शांत बसून राहिले.

समोर हजारो नंदी होते. आणि त्यांच्यापैकी फक्त एक नंदी शिवलिंगाच्या विरुद्ध दिशेने पाहत असणार होता. पण तो नेमका कुठे होता, हे अजूनही त्यांना माहीत नव्हतं.

नेमक्या त्याच वेळी, दूरवरून एक मोटरसायकलचा आवाज आला. देवप्पा आणि यल्लाप्पा दोघेही घाईघाईने नदीकाठी पोहोचले, चेहऱ्यावर घामाच्या धारा.

"देवप्पा, तुम्ही इथे कसे?" नेहाने कानडीत विचारले.

"ते सगळं सांगतो नंतर, आधी सांगा तुमचा शोध कुठवर आलाय." देवाप्पाने अभिजितकडे पाहत मराठीत विचारले.

"देवप्पा, आम्ही सकाळपासून शोधतोय, काहीच सापडत नाहीये," अभिजित म्हणाला, आवाजात हताशपणा उघड दिसत होता. "हजारो नंदी आहेत इथे."

देवप्पाने काही क्षण नदीच्या विस्तीर्ण पात्राकडे पाहत विचार केला. समोर पसरलेल्या असंख्य शिवलिंगांमध्ये तोही काही क्षण नजर फिरवत राहिला; पण इतक्या मोठ्या परिसरात नेमका कोणता नंदी शोधायचा, याचा मार्ग त्यालाही स्पष्ट दिसत नव्हता. अखेर त्याने आकाशाकडे नजर वळवली आणि ओठांवर बोटं ठेवून तीक्ष्ण शीळ वाजवली...दोन लहान आणि त्यानंतर एक लांब. अनेक वर्षांपासून तो आपल्या गरुडाला बोलावण्यासाठी हीच खूण वापरत होता.

शीळेचा आवाज नदीच्या पात्रावरून दूरवर पसरला. आणि काही क्षणात आकाशाच्या निळ्या विस्तारात एक काळी ठिपक्यासारखी आकृती दिसू लागली. ती क्षणाक्षणाला मोठी होत गेली आणि काही वेळातच देवप्पाचा गरुड नदीवरून घिरट्या घालत खाली उतरू लागला. त्याने एक फेरी नदीच्या पात्रावर मारली, मग दुसरी. त्यानंतर अचानक त्याने दिशा बदलली आणि प्रवाहाच्या पुढच्या, निर्जन भागाकडे झेप घेतली.

देवप्पाची नजर त्याच्यावर खिळली. गरुड पुन्हा एकदा खाली झेपावला, काही क्षण घिरट्या घातल्या आणि मग पुढे सरकला.
"तो काहीतरी पाहतोय," तो म्हणाला. त्याचा आवाज आता उत्साहाने भरला होता. "त्याला काहीतरी जाणवतंय."

त्याने अभिजित आणि इतरांकडे पाहिलं. "चला. त्याच्या मागे जाऊया. कदाचित आपल्याला हवा असलेला नंदी तिथेच असेल."

सगळे नदीच्या खालच्या, अधिक दुर्गम भागाकडे निघाले. तिथे झाडी अधिक दाट होती आणि नदीचं पात्रही खोल होतं. पाण्याचा प्रवाह वरच्या भागापेक्षा शांत दिसत असला, तरी त्याखालील दगड निसरडे आणि असमान होते. मध्येच काटेरी झुडपं वाट अडवत होती आणि खडकांवरून पाय ठेवताना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं.

वर आकाशात गरुड अजूनही त्यांच्यावर घिरट्या घालत होता. तो अधूनमधून खाली झेपावत होता आणि पुन्हा वर जात होता. काही अंतर पुढे गेल्यावर त्याने एका ठरावीक जागेवर आपली घिरट्यांची वर्तुळं लहान करायला सुरुवात केली. प्रत्येक फेरीत तो आणखी खाली येत होता. शेवटी त्याचे पंख पाण्याच्या पृष्ठभागाला जवळजवळ स्पर्श करतील इतका तो खाली आला आणि त्याच जागेवर पुन्हा पुन्हा घिरट्या घालू लागला.

देवप्पाने वर पाहिलं. "तो इथेच काहीतरी दाखवतोय," तो म्हणाला.

यल्लाप्पा त्या दिशेने पाण्यात उतरला. पाणी त्याच्या गुडघ्यापर्यंत होतं. त्याने आजूबाजूला बारकाईने नजर फिरवली आणि अचानक तो जागच्या जागी थांबला. त्याचा उत्साहाने भरलेला आवाज नदीच्या पात्रावर घुमला. “इल्लिगे बन्नि! बेगा!”
“इकडे या! लवकर!"

अभिजित, स्वाती आणि देवप्पा पाण्यातून वाट काढत त्याच्याकडे धावले. काही क्षणांत ते यल्लाप्पाजवळ पोहोचले आणि त्यांची नजर त्याने दाखवलेल्या दिशेने गेली. समोर एक नंदी शिवलिंगाकडे पाठ करून उभा होता.

त्याचे पूर्णपणे विरुद्ध दिशेला वळवलेले तोंड केविलवाणे वाटत होते. जणू तो कित्येक शतकं कुणीतरी आपले तोंड परत आपल्या स्वामींकडे वळवेल याची अतिशय तळमळीने वाट बघत होता.

अभिजितचं हृदय धडधडू लागलं. "हाच असायला हवा..." तो अगदी हळू आवाजात म्हणाला.

तो पाण्यातून पुढे गेला आणि त्या प्राचीन दगडी मूर्तीवर त्याने थरथरत्या हाताने स्पर्श केला. बोटांखाली त्याला पाण्याची थंड ओल जाणवली. त्याने नंदीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्याच्या डोळ्यांत अविश्वास, आनंद आणि आतापर्यंतच्या सगळ्या शोधाचा ताण एकाच वेळी दाटून आला होता.

"देवप्पा!" तो जवळजवळ ओरडलाच. "सापडलं वाटतं!"

इकडे कल्लेश्वरने जलाकर्षण सिद्धीचा जप सुरू केला. शाल्मलेच्या पात्रातलं पाणी जणू अदृश्य शक्तीने खेचलं जाऊ लागलं आणि काही क्षणांत नदीचं पात्र भयावह वेगाने फुगू लागलं.

देवप्पाचा चेहरा एकदम बदलला; त्याचे डोळे विस्फारले, नजर नदीच्या वरच्या प्रवाहाकडे वळवून त्याने डोळे मिटून ध्यान लावले , आणि त्याचा चेहरा एका क्षणार्धात पांढराफटक पडला.

"सगळे ताबडतोब नदीच्या बाहेर व्हा." त्याच्या आवाजातली तीव्र भीती सगळ्यांच्या अंगावर काटा आणून गेली.

"काय झालं?" स्वातीने घाबरून विचारलं, तिचा आवाज कापत होता.

"कल्लेश्वर! त्याने जलाकर्षण सिद्धीच्या जोरावर नदीच्या प्रवाहात पूर आणलाय! वरच्या भागातून पाण्याचा प्रचंड लोंढा येतोय, आपल्याकडे!", त्याचे डोळे नदीच्या वळणापलीकडे खिळलेले, जिथून एक अस्पष्ट, खळखळाट ऐकू येऊ लागला होता. "तुम्ही सगळे ताबडतोब प्रवाहाच्या बाहेर व्हा."

अभिजित, तुला थांबावे लागेल. ही संधी आपल्याला परत मिळणार नाही!"

सगळे गोंधळून, घाईघाईने मागे सरकू लागले पण अभिजित तिथेच थांबला, त्या उलट्या नंदीजवळ, गुडघाभर पाण्यात. त्याचं हृदय आता वेगाने धडधडत होतं.
************************************************************************************************************************

अभिजितने नंदी हलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू ठेवला पण तो दगडी नंदी तसूभरही हलत नव्हता. देवप्पा किनाऱ्यावरून त्याच्याकडे पाहत होता; पाण्यात उतरण्याचं धाडस त्यालाही होत नव्हतं. वरच्या प्रवाहाकडून येणारा गडगडाट आता इतका वाढला होता, की बोलताना स्वतःचा आवाजही ऐकू येत नव्हता.

"अभिजित, ऐक माझं!" देवप्पा शक्य तितक्या मोठ्याने ओरडला. नंदीच्या आजूबाजूला बघ काहीतरी नक्कीच असणार."

अभिजितने उत्तर दिलं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष नंदीच्या मागच्या उजव्या पायाच्या बाजूला होतं, जिथे शेपटीचं शेवटचं टोक विसावलं होतं. तिथे त्याला एक अस्पष्ट भोक दिसले नदीच्या मातीने पूर्णपणे बुजलेलं, गाळाने घट्ट झालेलं.

त्याने प्राणपणाने ती माती उपसायला सुरुवात केली, थंड पाण्यात बोटं बधिर होत होती; पण त्याने हात थांबवला नाही. काही क्षणांत त्याच्या नखांखालून रक्त झिरपू लागलं.

दूरवरून येणारा पाण्याचा आवाज आता भयाण गर्जनेत बदलला होता.

"अभिजित! लवकर!" स्वातीचा किंचाळणारा आवाज किनाऱ्यावरून आला, तिचा चेहरा भीतीने विद्रूप झालेला.

गाळाचा आणखी एक थर बाजूला करताच भोक थोडं मोठं झालं. अभिजितने बाजूला ठेवलेली हातातली काठी त्यात सरकवली आणि ती घट्ट पकडून पूर्ण शरीराचं वजन तिच्यावर टाकलं आणि त्याला फिरवायचा प्रयत्न केला. पण दगडी नंदी हलला नाही.

त्याने पुन्हा जोर लावला. त्याच्या स्नायूंवर ताण आला. दात घट्ट आवळले गेले. पाय पाण्याखाली घसरत होते; तरी त्याने काठीवरील पकड सोडली नाही.

"चल..." तो दातओठ खात पुटपुटला. "हल..."
पुन्हा त्याने सर्व शक्तीनिशी काठी खाली दाबली आणि उजवीकडून फिरवायला सुरुवात केली. आणि अचानक एक कर्कश, अंगावर काटा आणणारा दगड घासल्याचा आवाज झाला. कित्येक शतके जमिनीत स्थिर असलेला नंदी प्रथम किंचित थरथरला.

अभिजितचा श्वास रोखला गेला. त्याने आणखी जोर लावला. या वेळी नंदीचा दगडी देह स्पष्टपणे हलला. तो अतिशय हळू इंचाइंचाने फिरत होता.

अभिजितने काठीवरचा जोर वाढवला. नंदी आणखी थोडा फिरला. आणि त्याच क्षणी वरच्या प्रवाहाकडून आलेल्या प्रचंड लाटेचा पहिला धक्का नदीच्या वळणावर आदळला. पाण्याची फेसाळ भिंत त्याच्या दिशेने झेपावत होती.

देवप्पाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. "अभिजित!"

पण अभिजितची नजर नंदीच्या पायाशी खिळली होती. नंदी आता जवळजवळ योग्य दिशेला वळला होता. नंदीचं तोंड शिवलिंगाकडे वळताच त्याच्या पुढच्या उजव्या पायाजवळचं पाणी अचानक वेगाने फिरू लागलं. काही क्षणांत तिथे एक भोवरा तयार झाला आणि तो क्षणाक्षणाला अधिक खोल होत गेला. जणू नदीच्या तळाशी अचानक एखादी अदृश्य पोकळी निर्माण झाली होती आणि तिच्यातून पाणी आत खेचलं जात होतं.

अभिजितने पटकन त्या भोवऱ्यात हात घातला. बोटांना आधी वाळूने भरलेला नदीचा तळ जाणवला. त्याने हात आणखी खोल नेला आणि अचानक त्याच्या बोटांना एका गुळगुळीत, सपाट वस्तूचा स्पर्श झाला. त्या वस्तूतून एक विचित्र उबदार स्पंदन त्याच्या बोटांपर्यंत पोहोचत होतं.

त्याने पकड घट्ट केली आणि ती वस्तू पाण्याबाहेर ओढून काढली. तळहाताएवढा, गडद लाल रंगाचा, गारगोटीसारखा चकाकणारा चपटा दगड होता – भस्मशैल.
साडेचारशे वर्षांपासून शाल्मलेच्या पाण्याखाली लपलेला आणि त्यांचीच वाट पाहत असलेला.

पण त्या क्षणी त्या शोधाचं समाधान अनुभवायलाही अभिजितला वेळ मिळाला नाही. नदीच्या वळणापलीकडे, अचानक प्रचंड हालचाल झाली. अभिजितने मान वर केली. नदीच्या पात्रातून एक प्रचंड तपकिरी-काळा लोंढा वेगाने त्याच्या दिशेने येत होता.
फेसाळलेलं पाणी वाटेतले दगड-गोटे, गाळ आणि झाडांचे ओंडके घेऊन पुढे सरकत होतं. त्याचा गडगडाट इतका भयंकर होता, की काही क्षणांसाठी आजूबाजूचा सगळा आवाज त्यात गडप झाला.

अभिजित! बाहेर ये! लवकर !" स्वाती किंचाळली. वाढत्या गडगडाटातही तिचा आवाज त्याच्या कानावर पडला.

अभिजितने पुन्हा नदीच्या वरच्या प्रवाहाकडे पाहिलं. पाण्याची फेसाळलेली भिंत वेगाने त्याच्याकडे झेपावत होती. तिच्यासमोरून उठणारे तुषार हवेत उडत होते आणि नदीच्या पात्रातले दगड तिच्या प्रचंड वेगाने एकमेकांवर आदळत होते. त्या गर्जनेत अभिजितला स्वतःचा श्वासही ऐकू येईना.
फेसाळलेल्या पाण्याची उंच कडा काही हातांवरच होती. तिच्या गर्जनेने संपूर्ण नदीपात्र हादरत होतं. त्याला जाणवलं की पुढच्या क्षणी ते पाणी त्याच्यावर आदळणार आहे. अभिजितची मुठ भस्मशैलाभोवती आणखी आवळली. त्याने डोळे घट्ट मिटले.

समोरचं भयाण दृश्य सहन न झाल्याने स्वाती चक्कर येऊन बेशुद्ध पडली होती. आजी तिच्या शेजारी गुडघ्यावर बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. मामा असहायपणे त्यांच्या जवळ उभे होते. आणि नेहा किनाऱ्यावर अभिजितच्या दिशेने पाहून जोरजोरात रडत होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज ब र द स्त.....
अगदी उत्कंठावर्धक.
दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे कथा.
शेवटचा नदीतील भस्मशैल शोध परिच्छेद अगदी थरारक... वाचताना श्वास रोखला गेला.
आता पुढचा भाग लगेच टाका...

पु भा प्र
खतरनाक
बाहेर काढा लवकर अभिजित ला पाण्याच्या

खूपच मस्त आहे हा भाग. मामीच, आई नाही ते कळले.
कथा तर छान चालू आहेच , पण तुमच्या इतर गोष्टीही छान आहेत. प्रत्येक भागात जुन्या भागाची लिंक, पूर्वभाग, शुद्धलेखन, शेवटचा क्लिफहँगर बोल्डमधे, इत्यादी.

पुढचा भाग ?
लवकर टाका.. वाट बघतोय

पुढचा भाग ?
लवकर टाका.. वाट बघतोय
+१
अभिजीत वाचणार नक्की पण तो कसा वाचतो आणि पुढची आव्हाने कशी पार पाडतो याची खूप उत्सुकता लागली आहे.

खतरनाक सुरुय

त्या बिचाऱ्या नेहाला मारू नका हो
हवे तर kallesh चा बळी घ्या

मला पण नेहाची काळजी आहे, अभिजितला काही होणार नाही याची खात्री आहे. नेहाला वाचवायचे असेल तर Time Is Of The Essence! म्हणून पुढील भाग लवकर टाका.

सगळ्या प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद!
आज रात्री प्रयत्न करतो पुढचा भाग टाकण्याचा, नाहीच जमले तर उद्या सुप्यात आहे तिथून नक्की टाकेन.

धन्यवाद.
सुप्यात.....म्हणजे अभिजीतच्या गावात.
भारी.

नितिन
तुम्ही आतापर्यंत कथा अतिशय सुंदर लिहिली आहे.
आम्ही वाचक अधिर आहोत पण घाई करू नका, तुम्ही नेहमीच पुढचे भाग ठराविक अंतराने (जास्तीत जास्त आठवडा) पोस्ट करता. प्रत्येक भाग विचारपूर्वक लिहिला आहे. कथा आता शेवटच्या टप्प्यात येतेय अस वाटत. ह्या कथेचा शेवटही तसाच थरारक आणि खिळवून ठेवणारा आणि ही कथा वाचकांच्या लक्षात राहील असा असेल ह्यात शंका नाही.

ह्या भागाचा शेवट वाचताना National Treasure मधली काही दृश्य आठवली, काल नेपाळ मधली दुर्घटना बातम्या मधे बघताना पुन्हा ह्या भागातली वाक्य आठवली, तुम्ही प्रसंग डोळ्यासमोर आणता तुमच्या लेखनातून.

धन्यवाद manya!
हो आबा, ता.बारामती. आताच पोहोचलोय.