भस्मबीज - भाग १२
पूर्वभाग
अभिजित सिरसीला जाण्यापूर्वी नेहाच्या मामामार्फत सन्कन्ना नाईकच्या वंशाची माहिती मिळवतो आणि त्यातून मधुकेश्वर मंदिराचा नवा धागा समोर येतो. दरम्यान कल्लेश्वर तेराव्या बळीची तयारी करत असून, अभिजितला त्याचे कुळ, कुलदैवत आणि कवच सापडल्यास त्याला संपवण्याचा कट आखतो. देवप्पाही मल्लीला थांबवण्याचा पर्यायी मार्ग आखतो, तर त्याचे रक्षक जंगलात मल्लीचा शोध घेताना अघोरी शक्तींमुळे माघार घेतात. दरम्यान भस्मबीजाची छाया सिरसी परिसरात पसरू लागते आणि लोकांचा विवेक ढळत स्त्रियांविरुद्धच्या अत्याचारांत वाढ होऊ लागते, त्यामुळे संकट आता यानापुरते मर्यादित राहिलेले नसते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १३ - ईश्वरी हस्तक्षेप
२६ जानेवारीची सकाळ होती. सुट्टी असल्यामुळे अभिजित नेहमीपेक्षा उशिरा उठला होता. स्वाती स्वयंपाकघरात होती आणि अथर्व-अनन्या आपापल्या कामात गुंतले होते. अभिजितने चहा घेतला आणि नेहमीच्या सवयीने दूरदर्शनवर बातम्यांचं चॅनेल लावलं.
देशभरातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांच्या बातम्या सुरू होत्या. काही वेळाने एका बातमीच्या पट्टीवर त्याची नजर स्थिरावली.
National Commission for Women च्या अहवालानुसार महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ.
खाली आकडे झळकत होते.
नोव्हेंबर २०२५ - १६६३
डिसेंबर २०२५ - २१७६
जानेवारी २०२६ - ३५०३
अभिजित काही क्षण स्क्रीनकडे पाहतच राहिला. दोन महिन्यात आकडा जवळजवळ दुप्पट झाला होता.
बखरीत लिहिलंय ते खरं ठरतंय, त्याच्या मनात विचार चमकून गेला. आणि हे थांबवायला अजून आपल्याला काहीच सापडलेलं नाही.
नोव्हेंबरपासून आकडा वाढत होता, पण जानेवारीचा आकडा पाहून त्याच्या मनात धडकीच भरली. इतकी मोठी वाढ केवळ योगायोग असू शकते का, हा प्रश्न त्याच्या मनात आला.
त्याने मोबाईल उचलला आणि देवप्पाचा नंबर लावला. दोन-तीन रिंगनंतर फोन उचलला गेला. "देवप्पा, बातम्यांमध्ये दाखवतायत. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे आकडे अचानक वाढले आहेत."
"हो अभिजित, हे आता पसरत जाईल. मला आधी वाटलं होतं कि भस्मबीजाचा प्रभाव फक्त गुहेपर्यंतच राहील, पण माझा अंदाज खोटा ठरतोय. आपल्याला आता लवकर काहीतरी करायला हवं."
"मला माहीत आहे. पण..." अभिजित काही क्षण थांबला. "नागप्पांनी सांगितलेल्या मधुकेश्वर मंदिरानंतर काहीच हातात लागत नाहीये. आपण कुठून पुढे जायचं, हेच कळत नाही. नेहाच्या मामांनी सगळीकडे शोधलं, पण काहीच सापडलं नाही. आपण अडकलोय असं वाटतंय."
"प्रयत्न सोडू नकोस, अभिजित. श्रद्धा ठेव. जे शोधायचंय, ते नक्की सापडेल; योग्य वेळी, योग्य मार्गाने. सन्कन्नाने मुद्दामच हे इतकं सोपं ठेवलं नाही."
अभिजितने दीर्घ श्वास घेतला. "बरं. बघूया काय होतंय."
फोन ठेवल्यावर तो पुन्हा खिडकीजवळ गेला, विचारमग्न. आणि नेमक्या त्याच क्षणी त्याची नजर बाल्कनीच्या कठड्याकडे गेली. तिथे तो कावळा बसला होता.
दुसऱ्या दिवशी, ऑफिसमध्ये असताना, अभिजितने सहज केबिनच्या खिडकीबाहेर बघितलं आणि तिथेही त्याला तोच कावळा दिसला, शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर स्थिर बसलेला, त्याच्याकडेच नजर रोखून बघत असलेला.
************************************************************************************************************************
देवप्पाने फोन ठेवला आणि बराच वेळ तो तसाच बसून राहिला. अभिजितचे शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते,"मधुकेश्वर मंदिरानंतर काहीच पुढे सरकत नाहीये."
वेळ हातातून निसटत चालला होता आणि शोध मात्र तिथेच थांबला होता. त्याने यल्लाप्पाला बोलावलं, "आपल्याला पुन्हा प्रयत्न करायला हवा. मल्लीपर्यंत पोहोचायलाच हवं."
यल्लाप्पाने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. "मागच्या वेळी आपली माणसं परत आली, देवप्पा. त्या राखणदारांना ओलांडणं शक्य नव्हतं."
“आपल्याला काहीतरी करावंच लागेल यल्लाप्पा, गोष्टी हाताबाहेर चालल्यात. आपण आपली जबाबदारी टाळून चालणार नाही.” देवप्पा म्हणाला.
त्याच्या आवाजातला निर्धार यल्लाप्पाच्या लक्षात आला.
"अभिजितचा शोध थांबलाय. आपल्याकडे दुसरा पर्याय संपत चाललाय, यल्लाप्पा. आजच रात्री जायला हवं."
रात्र गडद झाली होती. चंद्र ढगांआड लपला होता आणि यानाच्या जंगलावर काजळीसारखा मिट्ट काळोख दाटून आला होता.
सहा धर्म-शास्त रक्षक तलवारी आणि भाले घेऊन सावधपणे जंगलात शिरले. यावेळी त्यांचा निर्धार अटळ होता.
"आज मागे फिरायचं नाही. जे व्हायचं ते होऊ दे." नेता आपल्या माणसांकडे पाहत कुजबुजला.
काही वेळाने ते त्याच झुडपांपाशी आले. तोच अरुंद मार्ग, जिथून मागच्या रात्री त्यांना माघार घ्यावी लागली होती. पण यावेळी कुणाचंही पाऊल थांबलं नाही. ते पुढे जात राहिले. राखेचा वास हळूहळू तीव्र होत गेला. हवेतली थंडी वाढत गेली, इतकी की उच्छवासाची वाफ स्पष्ट दिसू लागली.
आणि मग, अंधारातून, ते डोळे उमटले; पिवळसर, चमकणारे, एक-दोन नाहीत, तर डझनभर, चारही बाजूंनी.
"तयार राहा!" नेता ओरडला.
त्याच क्षणी त्या आकृत्या झुडपांतून, फांद्यांतून, अगदी जमिनीतूनही जणू उगवल्यासारख्या बाहेर आल्या…विद्रूप, वाकडेतिकडे शरीर, नखं वाढलेली, तोंडं आ वासलेली.
भयाण लढाई सुरू झाली. तलवारींचा खणखणाट, भाल्यांचा वार, आणि त्या आकृत्यांच्या अमानवी किंकाळ्या; सगळं एकाच वेळी घुमू लागलं. मशालींचा तांबडा उजेड त्या गोंधळात सावल्यांना अजूनच भेसूर बनवत होता.
एका रक्षकाने समोरच्या आकृतीवर तलवारीचा घाव घातला. ती आकृती खांद्यापासून खाली चिरली गेली आणि पुढच्याच क्षणी काळ्या धुरासारखी हवेत विरून गेली. पण तिच्या जागी दुसरी आकृती उभी राहिली."किती आहेत या?" एका तरुण रक्षकाने चारही बाजूंनी होणारे वार परतवत ओरडून विचारलं.
"मोजू नकोस! लढत राहा!" नेता गरजला.
पण जंगल आज स्वतःच त्यांच्याविरुद्ध लढत होतं. मुळं पायांत अडकत होती, काटेरी फांद्या अंगावर ओरखडे काढत होत्या, आणि जमीन स्वतःच जणू निसरडी, फसवी होत चालली होती.
गोंधळात बसाप्पाचा पाय एका जाड मुळात अडकला आणि तो जोरात खाली कोसळला. आणि त्याच क्षणी तीन आकृत्या त्याच्यावर तुटून पडल्या.
"बसाप्पा!" शेजारच्या रक्षकाने ओरडत धाव घेतली, तलवार फिरवत एका आकृतीला दूर केलं.
बसाप्पानेही हार मानली नाही. त्याने एका आकृतीच्या डोळ्यात बोटं खुपसली, दुसरीला लाथ मारली. पण पुढच्याच क्षणी आणखी आकृत्या त्याच्यावर येऊन पडल्या. क्षणात पाच-सहा आकृत्यांनी त्याला जमिनीवर दाबून टाकलं.
"मागे व्हा!" नेत्याचा आवाज अचानक बदलला. "सगळे मागे या!"
काही क्षण तो स्वतःही तिथेच उभा राहिला. बसाप्पाकडे जाण्याचा प्रयत्न करावा की उरलेल्या माणसांना वाचवावं, या द्विधेत त्याची नजर इकडून तिकडे फिरत राहिली.
पण पुढचा हल्ला इतका तीव्र होता की त्याला निर्णय घ्यावाच लागला.
"मागे या!"
उरलेले पाच रक्षक जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत मागे सरकू लागले. तलवारी फिरवत ते अंधारातून वाट काढत होते. प्रत्येक पावलागणिक त्यांना वाटत होतं की त्या आकृत्या त्यांच्या अगदी मागे आहेत.
बसाप्पाने फोडलेली ती प्राणांतिक किंकाळी त्यांच्या कानात घुमत राहिली आणि मग अचानक सगळं शांत झालं.
जंगलाच्या कडेपर्यंत पोहोचल्यावर नेता थांबला. तो धापा टाकत होता. अंगावर रक्त होतं आणि हातातील तलवार अजूनही थरथरत होती. त्याने हळूहळू मागे वळून जंगलाकडे पाहिलं. आता तिथून कुठलाच आवाज येत नव्हता. फक्त एक भयाण तृप्त? शांतता.
नेत्याने डोळे मिटले, आणि त्याच्या तोंडून एक हुंदका फुटला. "आपण त्याला मागे सोडलं..."
पाच जण त्या जंगलाच्या काठावर उभे राहिले, थकलेले, हरलेले, आणि त्यांच्यातल्या एकाच्या अनुपस्थितीने आता ती रात्र कायमची भेसूर झाली होती.
पहाटेच्या धूसर प्रकाशात, पाच रक्षक लंगडत, एकमेकांना आधार देत, यानाच्या वेशीजवळच्या देवप्पाच्या घराकडे पोहोचले. नेत्याचा हात रक्ताने माखलेला होता, दुसऱ्या एकाच्या मांडीवर खोल जखम, आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर तीच भकास, हरलेली शांतता. देवप्पा दारातच वाट बघत उभा होता; रात्रभर झोपला नव्हता, प्रत्येक तासागणिक बाहेर येऊन अंधाराकडे बघत राहिला होता.
त्यांना बघताच त्याचा श्वास अडकला. देवप्पा दारातच खिळून उभा राहिला.
"बसाप्पा?"
कुणीच उत्तर दिलं नाही. त्या शांततेतच उत्तर होतं.
देवप्पाचे गुडघे क्षणभर लटपटले. त्याने भिंतीचा आधार घेतला आणि डोळे मिटले.
"काय झालं?"
नेत्याने थरथरत्या आवाजात सगळं सांगायला सुरुवात केली. त्या आकृत्यांची वाढलेली संख्या, त्यांचा चवताळलेला प्रतिकार आणि शेवटी बसाप्पाभोवती घोंघावणाऱ्या त्या सावल्या, ज्यांच्यापासून त्याला सोडवणं अशक्य झालं होतं.
"आम्ही मागे फिरलो," नेता म्हणाला. त्याचा आवाज तुटत होता. "आम्हाला वाटलं, बाकीच्यांना तरी वाचवावं. पण देवप्पा... त्याला तिथेच सोडून येणं..."
देवप्पाने डोळे उघडले.
"तुम्ही योग्य तेच केलंत," तो म्हणाला. त्याचा आवाज स्थिर ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता; पण त्यातला दुःखाचा भार लपला नाही.
"सहा जणांऐवजी एकच गेला, हेच नशीब समजा." पण हे शब्द उच्चारतानाच त्याला स्वतःलाच त्यांचा पोकळपणा जाणवत होता.
तो आत गेला आणि एकटाच देवघरात जाऊन बसला. बसाप्पाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून काही केल्या हटत नव्हता. जंगलात जाण्याचा निर्णय त्यानेच घेतला होता. मल्लीपर्यंत पोहोचवण्याची घाईही त्याचीच होती. माझ्याच निर्णयाने, देवप्पाच्या मनात विचार घुमत राहिला. माझ्याच घाईने.
काही वेळ तो डोळे मिटून तसाच बसून राहिला. पण मनातला अपराधबोध त्याला शांत बसू देत नव्हता. त्याच वेळी त्याच्या मनात एक कठोर सत्य उभं राहिलं. मल्ली अजूनही त्या जंगलात होता. कल्लेश्वरच्या माणसांच्या ताब्यात होता. आणि जर तो तिथेच राहिला, तर बसाप्पाचा त्याग व्यर्थ जाणार होता.
देवप्पाने डोळे उघडले. खिडकीबाहेर त्याचा गरुड नुकताच येऊन बसला होता. त्याचे पंख अस्ताव्यस्त झाले होते आणि तो अस्वस्थपणे इकडे-तिकडे पाहत होता. जणू त्यानेही त्या रात्री जंगलात काहीतरी असं पाहिलं होतं, जे त्याला शांत बसू देत नव्हतं.
गरुडाच्या डोळ्यांतून जे देवप्पाला दिसलं, ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. त्या पडक्या देवळात कल्लेश्वर उभा होता. तो रागाने बेभान झाला होता आणि त्याच्या भोवती काळा धूर उसळत होता. त्याचे ओठ सतत हलत होते आणि त्यातून एकच नाव पुन्हा पुन्हा बाहेर पडत होतं…देवप्पा.
देवप्पाने दीर्घ श्वास घेतला. मल्ली अजूनही कल्लेश्वरच्या ताब्यात होता. उलट, त्या रात्रीच्या हल्ल्याने कल्लेश्वरच्या आत काहीतरी अधिकच जागं केलं होतं, जे आतापर्यंत दडून राहिलं होतं.
त्याने यल्लाप्पाला बोलावलं. "आजपासून घराभोवतीचा पहारा दुप्पट करा. कुणीही एकटं बाहेर पडणार नाही. आणि मोहिनी मंत्राचा जप चालू ठेवा."
यल्लाप्पाने देवप्पाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. "काय झालं, देवप्पा?"
देवप्पाने खिडकीबाहेर पाहिलं. दूरवर यानाचं जंगल अजूनही अंधारात बुडालेलं होतं. "आपण त्याला जागं केलंय."
यल्लाप्पाच्या चेहऱ्यावर चिंता उमटली.
देवप्पाची नजर अजूनही त्या अंधाऱ्या जंगलावरच होती. "आता तो शांत बसणार नाही."
************************************************************************************************************************
संध्याकाळी, घरी परतल्यावर, अभिजितचा फोन वाजला. वडिलांचा नंबर. "हां बाबा, बोला."
"आरं अभ्या, एक इचारायचं व्हतं." वडिलांचा आवाज नेहमीपेक्षा जरा हळू, जरा आशाळभूत होता. "ह्या रविवारी माह्य पुनवं हाय. तुम्ही येतायं नव्हं."
अभिजित क्षणभर गप्प राहिला, डोक्यात सिरसी, कवच, ती वाढती आकडेवारी सगळं एकदम गर्दी करून आलं.
"बाबा, सध्या जरा..."
"आरं आइक तर खरं," वडील पुढे म्हणाले, आवाजात एक हलकीशी घाई. "जर तू येनार आसशील, तर जत्रंच्या दुसऱ्या दिशी दोन बोकड ठिवू पावन्यारावळ्यांसाठी. वलखीपाळखीच्यांना आवताण दिवू. आन जर तुला जमनार नसंल, तर मंग उगा बोकड कशाला, चार पावनी बोलवून थोडक्यात आटपून घीन."
अभिजित गलबलला. वडिलांच्या आवाजातली ती अपेक्षा आणि आपला मुलगा यावा म्हणून त्यांची चालू असलेली धडपड त्याच्या मनाला भिडली. त्याला जाणवलं, हा आग्रह केवळ सण साजरा करण्यासाठी नव्हता; त्यांना मुलगा त्या दिवशी आपल्याजवळ असावा, त्यांच्यासोबत काही वेळ घालवावा, चार माणसांत मुलाचं कुटुंब मिरवावं एवढीच इच्छा होती.
"बाबा," तो म्हणाला, "मी येतो. शनिवारी, ३१ तारखेला निघतो."
पलीकडे वडिलांचा आवाज एकदम उजळला. "खरंच? मंग बोकड ठिवतो हां, दोन्ही! आन आईला सांगतो; बरं वाटंल तिला.""
फोन ठेवल्यावर अभिजित बराच वेळ तसाच बसून राहिला. सिरसीचा शोध थांबलेला, ती वाढती आकडेवारी, तो पाठलाग करणारा कावळा हे सगळं डोक्यात घोंगावत असतानाही, वडिलांच्या त्या साध्या, आर्जवी आवाजाने त्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण केली होती.
************************************************************************************************************************
शनिवार, ३१ जानेवारी.
पहाटेच अभिजित, स्वाती, अथर्व आणि अनन्या मुंबईहून सुप्याच्या दिशेने निघाले.
घाटातला रस्ता नागमोडी वळणं घेत डोंगरांतून वर चढत होता. अभिजित गाडी चालवत होता, स्वाती शेजारी डोळे मिटून थोडी विश्रांती घेत होती, आणि मागे अथर्व-अनन्या हेडफोन लावून आपापल्या जगात रमलेले. रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला उंच कातळ. मध्येच धुक्याचा एक पातळ पडदा वाऱ्यावर तरंगत रस्ता ओलांडून जात होता. अभिजितने एक तीव्र वळण घेतलं, आणि समोरच्या आरशात सहज नजर टाकली मागच्या सीटवरचं दृश्य बघायला.
आणि त्याच क्षणी, आरशात, त्याला अनन्याच्या शेजारी कुणीतरी तिसरं बसलेलं दिसलं.
त्याचा श्वास अडकला. त्याने पुन्हा आरशात रोखून बघितलं एक अंधुक, राखाडी आकृती, अनन्याच्याच उंचीची, तिच्या खांद्याला खांदा लावून बसलेली, तिच्याचकडे बघत. त्याने घाईघाईने मागे वळून प्रत्यक्ष बघितलं. मागच्या सीटवर फक्त अथर्व आणि अनन्या होते, नेहमीसारखे, कुणीच तिसरं नव्हतं.
"अभिजित!" स्वाती दचकून जागी झाली, गाडी किंचित रस्त्याच्या कडेला गेल्याने. "समोर बघ, काय करतोयस!"
"सॉरी," तो कसाबसा स्टिअरिंग सावरत म्हणाला, हृदय धडधडत होतं.
त्याने पुन्हा आरशाकडे बघितलं. आता तिथे नेहमीचं दृश्य होतं अनन्या फोनमध्ये डोकं खुपसून, अथर्व खिडकीबाहेर बघत गाणं गुणगुणत. काहीच विचित्र नाही. पण अभिजितच्या तळहातांना घाम फुटला होता, आणि त्याच्या नाकात, क्षणभरासाठी का होईना, तो ओळखीचा राखेचा वास दरवळून गेला होता; इतका हलका की त्याला स्वतःलाही शंका आली, आपल्याला भास झाला की खरंच जाणवलं.
"काय झालं?" स्वातीने विचारलं, अजूनही झोपेच्या धुंदीत.
"काही नाही," अभिजित म्हणाला, नजर रस्त्यावर स्थिर ठेवत, पण मनातली ती प्रतिमा...अनन्याच्या शेजारी बसलेली ती राखाडी आकृती त्याच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हती. जे त्याने बघितलं, ते कुणालाही, अगदी स्वातीलाही, सांगण्याची त्याची हिंमत होत नव्हती.
पुढचा अर्धा तास तो सतत मागच्या आरशाकडे बघत राहिला पण ती आकृती परत दिसली नाही. फक्त एक अनामिक, थंड भीती त्याच्या छातीत घर करून राहिली.
शहर मागे पडत गेलं तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोकळी शेती, डोंगरांच्या रांगा आणि अधूनमधून दिसणारी गावं सुरू झाली.
मुलं मागच्या सीटवर गप्पांमध्ये रंगली होती. स्वाती अधूनमधून त्यांच्याकडे पाहत होती. अभिजित मात्र गाडी चालवत असतानाही सतत विचार करत होता.
दुपारनंतर सुप्याला पोहोचले तेव्हा वाड्यात एक वेगळाच उत्साह होता. वडील अंगणातच वाट बघत उभे, चेहऱ्यावर एरवीपेक्षा कितीतरी जास्त हसू.
"आलास! बरं झालं, बरं झालं." त्यांनी अथर्वला जवळ ओढलं, अनन्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
अभिजितच्या आईने त्यांच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला.
शनिवारची रात्र. वाडा पाहुण्यांनी भरून गेला होता. सगळे रात्रीच्या जेवणानंतर गप्पांत रंगलेले. अंगणात, पडवीत, सतरंज्या टाकून लहान-मोठे सगळे मिळून गप्पा मारत बसले होते.
अथर्वला या गर्दीत एक वेगळाच उत्साह वाटत होता. मुंबईतल्या शांत, चौकोनी फ्लॅटपेक्षा हे सगळं किती वेगळं होतं... इतकी माणसं, इतक्या गप्पा, इतका दंगा.
पाहुण्यांच्या मुलांबरोबर दूरच्या काकांची, मामांची पोरं. तो पडवीतच बसला होता, गप्पा मारत, हसत-खिदळत. रात्र जशी वाढत गेली, तसं एकेक करून मुलं झोपेच्या अधीन झाली. अथर्वही, बोलता बोलता, कधीतरी त्या सतरंजीवरच आडवा झाला. डोकं एका उशीवर, पाय दुसऱ्या मुलाच्या अंगावर. झोप केव्हा लागली हे त्याचं त्यालाही कळलं नाही.
त्याच्या स्वप्नात, अस्पष्टपणे, आजोबांचा आवाज घुमत राहिला तोच खास, घाटी हेल असलेला आवाज, ज्यात प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक विशिष्ट वळण असायचं. "आरं पोरा," "बगू दे की," "हाय का न्हाई" हे शब्द, ही ठेवण, अथर्वला विलक्षण आवडायची. मुंबईत कुणीच असं बोलत नसे.
स्वप्नात तो कुठल्यातरी शेतात होता, आजोबांच्या हाताला धरून, आणि आजोबा त्याला काहीतरी सांगत होते, त्याच त्या लयीत, त्याच त्या हेलात पण शब्द नीट कळत नव्हते, फक्त तो आवाज, ती उब जाणवत होती.
मध्यरात्री कधीतरी अभिजितचे बाबा पडवीतून जाता जाता थांबले. त्यांनी अथर्वला असा आडवा, उघडा पडलेला बघितला, आणि हळूच त्याच्यावर एक चादर टाकली.
अथर्व झोपेतच किंचित हलला, पुटपुटला, "आजोबा..." आणि पुन्हा गाढ झोपी गेला, ओठांवर एक हलकंसं, समाधानी हसू घेऊन.
आजोबानी त्याच्याकडे बघत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, हळुवारपणे. "झोप, बाळा."
सकाळी उठल्यावर अथर्व अंगावर पांघरलेली ती चादर बघून थोडा गोंधळला, "आजी, ही चादर कुणी घातली मला?" त्याने विचारलं, जांभई देत.
आजी हसली. "आजोबांनी, बाळा. रातच्याला बघितलं तुला आसं उघडं झोपलेलं, म्हणून घातली."
अथर्वच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद उमटला. "मला वाटलं स्वप्नच होतं ते. आजोबा माझ्याशी बोलत होते. त्यांच्या त्या खास पद्धतीने 'आरं पोरा' असं." अथर्व हसला, थोडा लाजत. "मला खूप आवडतं त्यांचं असं बोलणं. मुंबईत कुणीच असं बोलत नाही ना."
आजींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, डोळ्यांत एक मायाळू चमक. "मग वरचेवर यत जा इकडं, आन पोटभर गप्पा मारत जा आजोबाबरं."
************************************************************************************************************************
रविवारी दुपार होताच गावातून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गर्दी वाढू लागली. घराघरांतून माणसं बाहेर पडत होती. कुणाच्या हातात नारळ होते, कुणाच्या भंडारा-खोबरे भरलेली पिशवी होती, तर काही जण देवाच्या छबिन्याबरोबर चालण्यासाठी आधीच मंदिराकडे निघाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकाने, प्रसादाचे ठेले आणि यात्रेसाठी आलेल्या लोकांची लगबग सुरू होती.
मंदिराजवळ पोहोचताच ढोल-ताशांचा आवाज अधिकच मोठा झाला. नगाऱ्यांचा गडगडाट, वाजंत्रीचा आवाज आणि त्यावरून अधूनमधून उठणारा एकच जयघोष सगळ्या परिसरात घुमत होता.
"यळकोट यळकोट जय मल्हार!"
गाभाऱ्यातील पूजा आटोपल्यानंतर देवाचा छबिना बाहेर पडला. पालखी पुढे आली आणि तिच्या दर्शनासाठी दोन्ही बाजूंनी गर्दी उसळली. लोकांनी हात जोडले, काहींनी पालखीसमोर डोकी टेकवली, तर काही भक्तांनी हातातील भंडारा उंच उडवला. पालखी पुढे सरकत होती आणि तिच्यामागे भक्तांचा लोंढा हळूहळू पुढे चालला होता.
अभिजित, स्वाती आणि त्याचे वडीलही त्या गर्दीत सामील झाले.
जत्रेचा तो गोंधळ अभिजितला काही वेळ वेगळ्याच जगात घेऊन गेला. ढोलाचा प्रत्येक ठोका हृदयाची स्पंदन वाढवत होता. आजूबाजूला सतत "यळकोट यळकोट जय मल्हार"चा गजर होत होता. भंडारा उडत होता आणि हवेत अबीराचा वास आधीच भरून राहिला होता.
छबिना मंदिराच्या आवारात पोहोचला आणि अचानक गर्दीत एकच हालचाल झाली.
भंडाऱ्याच्या मूठी हवेत उडू लागल्या. पिवळ्या भंडाऱ्याचा आणि खोबऱ्याचा वर्षाव देवावर, पालखीवर आणि एकमेकांवर होऊ लागला. कुणी दोन्ही हातांनी भंडारा उधळत होतं, कुणी कपाळाला लावत होतं, तर कुणी हातात घेऊन देवाच्या दिशेने फेकत होतं. काही क्षणांतच हवेत इतका भंडारा भरला की समोरची माणसं धूसर दिसू लागली.
"यळकोट! यळकोट! जय मल्हार!"
"सदानंदाचा येळकोट"
गजर आणखी वाढला. पिवळ्या भंडाऱ्याचा एक मोठा ढग त्यांच्या दिशेने आला. अभिजितने क्षणभर डोळे मिटले.
पुढच्याच क्षणी त्याला काहीतरी जाणवलं. ढोलांचा आवाज दूर जाऊ लागला. जयघोष मंद होत गेला. गर्दीचा स्पर्श नाहीसा झाला.
त्याने डोळे उघडले. आजूबाजूला अजूनही पिवळा भंडारा हवेत तरंगत होता. पण सगळं शांत झालं होतं . त्या पिवळ्या धुक्याच्या पलीकडे आता जत्रा दिसत नव्हती. त्याच्या समोर दगडांनी बांधलेलं एक अतिशय प्राचीन मंदिर उभं होतं. अभिजितची नजर त्या मंदिरावर खिळली. त्याला ते ठिकाण ओळखीचं वाटलं. कुठेतरी पाहिलेलं.
आणि मग त्याला आठवलं, इंटरनेटवर पाहिलेलं...त्याच्या मनात एकच नाव उमटलं - मधुकेश्वर.
अभिजितचा श्वास अडकला. त्याने मंदिराकडे पाहिलं. समोरचं मुख्य मंदिर नव्हतं. तो त्याच्या मागच्या बाजूला उभा होता.
मुख्य मंदिराच्या मागे एक जुनं उपमंदिर होतं. त्याच्या बाहेरील भिंतीलगत नंतरच्या काळात बसवलेली दगडी फरशी आणि आधारभिंत दिसत होती. त्या भिंतीलगत, एक उभा दगड होता, साधारण पाच-सहा फूट उंच. अभिजीतने नीट लक्ष देऊन बघितलं...तो दगड नुसता बांधकामाचा नव्हता. त्याचा पुढचा भाग, ज्यावर कोरीव काम असावं, तो भिंतीच्या दिशेने वळवलेला होता जणू कुणीतरी मुद्दाम तो उलटा रोवला होता, बाहेरून बघणाऱ्याला तो साधा दगड वाटावा म्हणून.
अभिजितच्या छातीत एकदम धडधड सुरू झाली. हा वीरगळ आहे का? त्याने भिंतीच्या फटीतून हात घालून त्या दगडाच्या मागच्या बाजूला स्पर्श केला. बोटांना कोरीव रेषा जाणवल्या...आकृत्या, अक्षरं.
आणि तेवढ्यात, त्या वीरगळाच्या अगदी मागे, भिंतीच्या तळाशी, आडवा बसवलेला एक सपाट दगडी फलक त्याला दिसला. इतका सामान्य, इतका दुर्लक्षणीय, की शंभर वेळा तिथून जाणाऱ्यालाही तो कधी जाणवला नसता.
अभिजित गुडघ्यावर बसला, त्या फलकावरची धूळ हाताने पुसली. त्यावर काय लिहिलंय ते वाचणार इतक्यात अचानक आजूबाजूचा गोंधळ परत सुरु झाला. तो पुन्हा सुप्याच्या खंडोबा मंदिरासमोर उभा होता.
लोकांचा जयघोष कानावर आदळत होता. ढोल-ताशांचा आवाज सुरू होता. हवेत भंडारा खोबरे उडत होते. स्वाती त्याच्या अगदी शेजारी उभी होती.
"अभिजित!" ती त्याचा हात धरत म्हणाली, "कुठे गेला होतास? मी दोन मिनिटांपासून तुला हाक मारतेय."
अभिजित तिच्याकडे पाहत राहिला. "दोन मिनिटं?"
"हो. काय झालं?"
अभिजित काही क्षण तसाच उभा राहिला. काही वेळापूर्वी त्याच्या डोळ्यांसमोर उमटलेलं ते दृश्य पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होतं. धूसर पिवळ्या धुक्यात दिसलेलं ते प्राचीन मधुकेश्वर मंदिर, मंदिराच्या मागे उभा असलेला वीरगळ, त्याच्या पाठीमागे दडलेला दगडी फलक आणि त्या सगळ्यातून जणू कुणीतरी त्याला दाखवलेला मार्ग... हे स्वप्न नव्हतं, याची त्याच्या मनाला आता पूर्ण खात्री होती.
कित्येक दिवसांपासून तो भीती, संशय आणि एका अदृश्य शक्तीच्या सावटाखाली जगत होता. कितीही शोध घेतला तरी पुढचा मार्ग सापडत नव्हता. प्रत्येक उत्तरामागे आणखी एक प्रश्न उभा राहत होता आणि प्रत्येक पावलागणिक धोका वाढत होता. पण आज, या गर्दीत, या देवाच्या समोर, त्याला पहिल्यांदा असं जाणवलं की तो एकटा नाही.
त्याच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.
त्याला त्या क्षणी काही मागायचं नव्हतं. स्वतःसाठी सुख, संपत्ती किंवा संकटातून सुटका काहीच नको होती. त्याला फक्त एवढंच जाणवत होतं की, इतके दिवस अंधारात हातपाय मारत असताना कुणीतरी त्याच्या हाताला धरून त्याला एका दिशेने वळवलं होतं.
अभिजित गर्दीतून हळूहळू पुढे गेला. देवासमोर पोहोचताच त्याने हात जोडले आणि काही क्षण मूर्तीकडे पाहत राहिला. मग त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आणि तो खाली वाकला.
त्याने देवाच्या चरणांपुढे साष्टांग दंडवत घातला. कपाळ जमिनीला टेकलं आणि डोळे मिटले. त्याच्या मनात इतके दिवस साचलेली भीती, असहायता आणि थकवा त्या क्षणी जणू विरघळून गेला. "मला मार्ग दाखवलात," तो मनात म्हणाला. "आता तो मार्ग पूर्ण करण्याचं सामर्थ्यही द्या."
स्वाती थोड्या अंतरावर उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. तिलाही अभिजितच्या या भावनेची तीव्रता जाणवत होती.
पण अभिजितचे वडील मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांनी आपल्या मुलाला देवासमोर इतक्या मनापासून नतमस्तक होताना कधीच पाहिलं नव्हतं. अभिजित देवळात येत असे, नमस्कार करत असे, पण त्याची श्रद्धा नेहमी शांत आणि औपचारिक असायची.
वडील काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि शेवटी स्वातीच्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाले, "ह्यांनी कधीपासनं भीड मोडली, चार माणसात हात जोडाय लाज वाटायची आन आज एकदम दंडवत?"
थोड्यावेळाने गर्दीपासून बाजूला होत अभिजितने नेहाला फोन लावला. "नेहा, मामांना लगेच सांगा परत जायला हवं मधुकेश्वर मंदिरात. यावेळी नेमकं कुठे बघायचं, ते मला कळलंय."
पलीकडे नेहाचा गोंधळलेला आवाज आला. "सर, तुम्हाला कसं कळलं?"
"नंतर सांगतो सविस्तर. आत्ता ऐका मुख्य मंदिराच्या..." अभिजित बोलता बोलता अचानक थांबला.
त्याची नजर, न कळत, देवळाबाहेरच्या त्या उंच कडुनिंबाच्या झाडाकडे गेली होती आणि तिथे तो बसला होता. तोच कावळा. फांदीवर स्थिर, त्याचे लाल डोळे थेट अभिजितवर रोखलेले, जणू आत्तापर्यंतचा प्रत्येक शब्द त्याने टिपला होता.
जे ब्बात! लय भारी..
जे ब्बात! लय भारी..
जबरदस्त झालाय हा भाग...
जबरदस्त झालाय हा भाग...
उत्कंठावर्धक...
पुढचा भाग टाका लगेच...
अगदी श्वास रोखूनच आता हे भाग
अगदी श्वास रोखूनच आता हे भाग वाचले जातात.
तो कावळा, तो राखेचा वास, ती आकृती,हे सगळे फार परिणामकारक उतरते आहे लिखाणातून.
जबरदस्त झालाय हा भाग. पुढचा
जबरदस्त झालाय हा भाग. पुढचा भाग लवकर टाका ....
खूप सुंदर झालाय हा भाग सुद्धा
खूप सुंदर झालाय हा भाग सुद्धा. लढाईचे वर्णन पण मस्तच. जर बसाप्पाने स्वतःच इतरांना मागे फिरण्यास सांगितले असते, तर त्याचे बलिदान अजून प्रभावशाली वाटले असते. तसेच आजोबा आणि अथर्व यांचा प्रसंग, जर कथेशी थेट संबंध नसेल तर कथेच्या या वळणावर नकोत असे मला वाटते. म्हणजे कथेने आता वेग पकडला आहे. सुरुवातीच्या वातावरण निर्मितीच्या काळात असे प्रसंग असावेत. तो तोच कावळा आहे हे कसे कळले? मलातर सगळे कावळे सारखेच दिसतात.
खूप छान लिहिताय. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
थरारक सुरू आहे!!
थरारक सुरू आहे!!
खरच कावळा आहे का drone आहे...
खरच कावळा आहे का drone आहे...
असो गमतीचा भाग सोडूया ...
हा भाग पण छान आहे, पण कथेचा वेग थोडासा मंदावल्या सारखा वाटला का मीच आता अधिर झालोय, काहितरी अजून थरारक रहस्यमय वाचण्यासाठी.
पण कथेचा वेग थोडासा मंदावल्या
पण कथेचा वेग थोडासा मंदावल्या सारखा वाटला का मीच आता अधिर झालोय, >कथेचा वेग बरोबर आहे आपलीच उत्सुकता वाढत चालली आहे.
मला वाटलं सन्कन्नाच अथर्वच्या
मला वाटलं सन्कन्नाच अथर्वच्या स्वप्नात आले ज्यांना तो आजोबा समजत होता आणि पुढील काही संकेत त्याच्याकडून अभिजीतला कळतील.
कथेचा वेग छान आहे पण अजून थोडे मोठे भाग हवेत