भस्मबीज - भाग १२

Submitted by नितनवे on 9 August, 2026 - 13:10

भस्मबीज - भाग ११
पूर्वभाग
अभिजितला बखरीतील "बीजासुर" आणि भस्मबीजाचा धक्कादायक संबंध समजतो; सन्कन्नाने त्याच्या पुनरागमनाचा इशारा दिलेला असतो. अंतिम सहा महिन्यांत भस्मबीजाची छाया माणसांच्या विवेकावर आणि वासनांवर परिणाम करू लागते, आणि त्याचा काळ आता सुरू झाल्याचे स्पष्ट होते. देवप्पा अभिजितचे खरे कुलदैवत वीर शास्त असल्याचे सांगून, त्याचा मंत्र, कवच आणि विस्मृतीत गेलेले कुळाचार पुन्हा मिळवण्यासाठी सिरसीला जाण्याचा मार्ग दाखवतो. मात्र सिरसीकडे जाण्याचा निर्णय होताच, त्यांच्यावर कुणाचीतरी नजर पडल्याचे सूचित करणारा रहस्यमय कावळ्यांचा प्रसंग घडतो.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १२ - छाया
"स्वाती, मला वाटतं आपण आधी सिरसीला जाऊ नये," अभिजित अचानक म्हणाला.

स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. "म्हणजे?"

"नेहाच्या मामांना विनंती करूया. सन्कन्ना नाईकचं नाव सांगून काही ठोस माहिती मिळते का ते पाहूया."

ठरल्याप्रमाणे नेहाने तिच्या मामाला फोन करून विनंती केली, "मामा, जरा खोलात जाऊन चौकशी करा. फक्त नाईक घराणी नाही, त्यांच्यापैकी कुणाला सन्कन्ना नाईकचं नाव, जुन्या आख्यायिका, जुन्या कथा माहीत आहेत का, तेही विचारा."

मामाने कामाला सुरुवात केली, आणि आठवडाभरातच त्याचा फोन आला.

"नेहा, एक महत्त्वाची गोष्ट कळलीये," तो उत्साहात म्हणाला. "एक नाईक घराणं सापडलंय, सिरसीजवळचं... नागप्पा नाईक. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तो अभिजितच्या कुळाच्या दुसऱ्या शाखेचा आहे, आणि त्या शाखेतला शेवटचा पुरुष आहे."

"शेवटचा पुरुष? म्हणजे?" नेहाने विचारलं, फोन स्पीकरवर टाकत, अभिजित आणि नेहा ऐकत होते.

"त्याला फक्त एक मुलगी आहे, दुसरं कुणी नाही. त्याच्यानंतर त्या शाखेत हे नाव पुढे नेणारं कुणीच उरणार नाही."

"मामा, तुम्ही त्यांना भेटलात का प्रत्यक्ष?" अभिजितने विचारलं.

"हो, भेटलो. चांगला बोलका माणूस आहे, वयस्कर असला तरी स्मरणशक्ती तल्लख. मी सहज विषय काढला, जुन्या आख्यायिकांबद्दल विचारलं. आणि त्यांनी एक कथा सांगितली, जी त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते."

"कसली कथा?"

"त्यांच्या म्हणण्यानुसार, फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांच्या काळात, एका अत्यंत पराक्रमी माणसाने एका असुराला रोखलं होतं. मोठी लढाई झाली म्हणे. आणि ती लढाई जिंकल्यावर तो माणूस इथून निघून गेला महाराष्ट्रात, कायमचा."

"आणि आणखी काही सांगितलं का?" अभिजितने विचारलं, आवाज कापरा.

"हो, " मामा म्हणाला. "नागप्पा म्हणाले, त्याच पराक्रमी माणसाने जाण्यापूर्वी काहीतरी एका गुप्त जागी लपवून ठेवलं होतं. आणि त्या जागेचं उत्तर बनवासीतल्या मधुकेश्वर मंदिरात मिळेल, अशी आख्यायिका आहे."

"मधुकेश्वर मंदिर?" नेहाने विचारलं.

"हो. बनवासी हे इथून फार लांब नाही, जुनं ऐतिहासिक गाव आहे. तिथलं मधुकेश्वर मंदिर फार प्राचीन आहे, कदंब राजांच्या काळातलं."

"मामा, तुम्ही तिथे गेलात का?" अभिजितने उत्सुकतेने विचारलं.

"गेलो. काल पूर्ण दिवस तिथेच होतो." मामाच्या आवाजातला उत्साह आता किंचित ओसरला. "मंदिराचा कोपरा न् कोपरा बघितला. पूर्ण परिसरात फिरलो, तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं, जुन्या नोंदी शोधल्या. पण काहीच सापडलं नाही."

अभिजितच्या मनात आशा आणि निराशा दोन्ही एकाच वेळी दाटून आल्या.

"कदाचित," नेहा म्हणाली, "मंदिरात काही नाहीच. कदाचित मंदिर हे फक्त एक सुरुवातीचा बिंदू असेल. पुढचा धागा तिथूनच कुठेतरी सुरू होत असेल."

"मामा, नागप्पांना आणखी काही आठवत असेल का?" नेहाने विचारलं. "कुठली खूण, कुठलं वाक्य, जे तुम्ही दुर्लक्ष केलं असेल?"

"विचारेन पुन्हा," मामा म्हणाला. "पण ही कथा नागप्पांनाही त्यांच्या वडिलांकडून तुटकच मिळाली आहे. संपूर्ण तपशील त्यांनाही माहीत नाही."

फोन ठेवल्यावर अभिजित बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. मधुकेश्वर मंदिर... एक धागा, जो कुठेतरी नेत होता, पण नेमकं कुठे, हे अजून अंधारातच होतं.
************************************************************************************************************************
यानाच्या घनदाट जंगलात, गुहेपासून थोडं आत, जिथे सूर्याचा प्रकाशही झाडांच्या दाट छताला भेदून जमिनीपर्यंत पोहोचत नसे, तिथे एक जुनं, पडकं देऊळ उभं होतं.
त्या देवळाभोवतीच्या परिसरातील झाडं वेडीवाकडी वाढलेली होती आणि त्यांच्या फांद्या एकमेकींत गुरफटलेल्या होत्या. पक्ष्यांचा किलबिलाट इथे कधीच ऐकू येत नसे. फक्त एक भयाण, जड शांतता, जी कानात दडपल्यासारखी वाटायची. अंधार दाटू लागला की त्या पडक्या देवळाच्या छतावर शेकडो वटवाघळं घिरट्या घालू लागत. काळ्याकुट्ट पंखांचा तो थवा चंद्राचा फिकट प्रकाश झाकून टाकत असे आणि एका अखंड, फिरत्या ढगासारखा देवळाभोवती घोंगावत राही. त्यांचा तो बारीक, तीक्ष्ण चित्कार रात्रभर घुमत राहायचा जणू ते देऊळ स्वतःच श्वास घेत होतं, आणि तो श्वास त्या वटवाघळांच्या पंखांतून बाहेर पडत होता.

देवळाच्या आत मशालींचा तांबडा, धुरकट उजेड कोसळलेल्या भिंतींवर थरथरत होता. त्या उजेडात आठ-दहा आकृत्या बसल्या होत्या. ते हांडी जोगी होते. त्यांच्या अंगावर स्मशानातील राख फासलेली होती, केस जटांमध्ये बांधलेले होते आणि गळ्यात मानवी हाडांच्या माळा होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. नजरा इतक्या रिकाम्या आणि थंड होत्या की त्यांच्यात माणुसकीचा शेवटचा अंशही शिल्लक आहे की नाही, अशी शंका यावी.

त्या सर्वांच्या मध्यभागी, एका उंच दगडी चौथऱ्यावर कल्लेश्वर बाबा बसला होता. अंगावर राखेचा जाड थर, त्यातून उभे राहिलेले केस जटांसारखे मानेपर्यंत रुळले होते. कपाळावर रक्ताने काढलेला त्रिशूल अजूनही ओलसर दिसत होता. डोळे खोल गेलेले होते आणि बुबुळं जवळजवळ काळीकुट्ट दिसत होती. त्या डोळ्यांत एक अशी भूक होती, जी कितीही मिळालं तरी शमणार नाही, अशी भासत होती. त्याच्या हातात एक मानवी कवटी होती आणि त्यातून तो अधूनमधून काळसर, चिकट द्रव पीत होता.

त्याच्या अवतीभवती हवाच वेगळी वाटत होती; जड, कुजट, जणू तिथे मृत्यूचा वास कायमचा साचून राहिला होता.

"आणखी काही दिवस," कल्लेश्वर म्हणाला, त्याचा आवाज त्या पडक्या भिंतींवर आदळून विचित्र प्रतिध्वनीत परत येत राहिला जणू अनेक आवाज एकाच वेळी बोलत होते. "फक्त आणखी काही दिवस, आणि माझी शतकांची तपश्चर्या फळाला येणार."

वर, छताच्या फटीतून, वटवाघळांचा तो थवा अधिकच खवळला, त्यांचा चित्कार तीव्र झाला जणू त्यांनाही त्याच्या शब्दांतली भूक जाणवली.

“एकदा तेरावा बळी पडला, की भस्मबीज पूर्ण जागृत होईल." कल्लेश्वरच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं.

"आणि आम्हाला, बाबा?" एका जोग्याने कापऱ्या आवाजात विचारलं.

"तुम्हाला?" कल्लेश्वर तुच्छतेने हसला.

त्या हास्यासोबत त्याच्या तोंडातून काळसर धुराचा एक बारीक लोट बाहेर पडला आणि हवेत विरून गेला.

"या डोंगरात, मोठा खजिना दडलेला आहे. भस्मबीज जागृत झाला की तो सगळा तुमचा."

जोग्यांनी समाधानाने माना डोलावल्या; पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली भीती मात्र पूर्णपणे लपली नाही.

कल्लेश्वरचं मन आता वेगळीकडेच भरकटलं. त्याने डोळे मिटले, आणि हातातली ती कवटी बाजूला ठेवली.

बारा अधिक मास अमावस्या. बारा वेळा, त्या गुहेत, त्या राखेच्या वर्तुळात विधी मल्ली करत असला, तरी त्या विधीसाठी भस्मबीजाला आमंत्रित करण्याचे काम कल्लेश्वरने केले होते, बारा स्त्रियांचं शरीरसुख भस्मबीजाने भोगलं होतं आणि ते भोगण्यासाठी त्याने वापरलं होतं कल्लेश्वरचंच शरीर आणि याचा मल्लीला काहीच पत्ता नव्हता.
दर वेळी, त्या क्षणी, कल्लेश्वरचं भान हरपायचं, त्याचे डोळे मागे फिरायचे, त्याचं शरीर त्याचं स्वतःचं उरायचं नाही. भस्मबीज त्याच्या शरीरात आत शिरून, त्याच्या स्नायूंतून, त्याच्या श्वासांतून, ती भूक भागवायचं.

बारा वेळा त्याने ते सोसलं होतं. बारा वेळा तो फक्त एक साधन होता ज्यातून दुसऱ्या कुणाची भूक भागवली गेली.

पण आता नाही. कल्लेश्वरचे मिटलेले डोळे उघडले, आणि त्यात यावेळी एक थंड, क्रूर चमक चमकली.

"बारा वेळा तू माझ्या देहातून भोगलंस," तो अंधाराशी, त्या दूरच्या गुहेतल्या शक्तीशी बोलल्यासारखा पुटपुटला, "बारा वेळा मी फक्त तुझं साधन होतो. आता फक्त आणखी एकदा. एकदा तू मुक्त झालास, की मग मी मागेन. आणि तू देशील. कारण तेव्हा तू माझा दास असशील."

त्याचं हास्य अधिकच विकृत, अधिकच रुंद झालं. वर, छतावर, वटवाघळांचा तो थवा अजूनच खवळला जणू त्याच्या या अघोरी आनंदाला ती प्रतिसाद देत होती.
नेमक्या त्याच वेळी देवळाच्या पडक्या छतातून एक कावळा आत शिरला. त्याने वटवाघळांच्या थव्यातून वाट काढली आणि कर्कश आवाज करत कल्लेश्वरच्या समोरच्या दगडावर येऊन बसला. मशालीच्या उजेडात त्याचे डोळे लाल निखाऱ्यांसारखे चमकले.
कल्लेश्वरने त्याच्याकडे बघितलं, डोळे अर्धवट मिटले जणू तो त्या कावळ्याच्या डोळ्यांतून, दूरवरून, काहीतरी बघत होता.

काही क्षणांनी त्याचे डोळे पूर्ण उघडले, आणि तो हसला, यावेळी दात दाखवत, ते दात असामान्यपणे तीक्ष्ण, जवळजवळ श्वापदासारखे.
"त्याला त्याचं कुळ कळलंय. कुलदैवताही कळलंय. आणि आता तो सिरसीत येतोय. कवच शोधायला."

.जोगी अस्वस्थ झाले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. "मग आता, बाबा? तो कवच शोधणार."

"शोधू दे," कल्लेश्वर शांतपणे म्हणाला.

तो उठून उभा राहिला. मशालीच्या उजेडात त्याची सावली पडक्या भिंतीवर अस्वाभाविकपणे लांब पसरली आणि वाकडी झाली.

"ते कवच शोधणं सोपं नाही. ते शोधून नष्ट करण्यासाठी इतक्या शतकांपासून प्रयत्न सुरु आहेत. पण अजून तरी ते कोणालाच सापडले नाही"

"मग?"

कल्लेश्वरने काही क्षण त्या कावळ्याकडे पाहिलं. "जर देवाप्पाच्या मदतीने त्याने कवच शोधलेच तर..." त्याने हळूहळू आपली मूठ आवळली. त्याच्या नखांखालून काळसर रक्ताचे थेंब खाली पडले. "आपण ते कवच आणि तो रक्षक, दोघांनाही संपवायचं. यावेळी भस्मबीजाला कोणीच रोखू शकणार नाही."

तो कावळ्याकडे वळला आणि त्याच्या लाल डोळ्यांत पाहत म्हणाला, "जा. त्याच्यावर नजर ठेव."

कावळ्याने कर्कश आवाज केला आणि पडक्या छतातून पुन्हा वटवाघळांच्या थव्यात शिरत काळ्या आकाशात उड्डाण केलं.

कल्लेश्वर त्या अंधाऱ्या गाभाऱ्यात एकटाच उभा राहिला. त्याच्या डोक्यावर वटवाघळांचा थवा अजूनही घिरट्या घालत होता आणि त्यांच्या पंखांनी चंद्राचा प्रकाश पुन्हा पुन्हा झाकला जात होता. त्यांच्या फडफडाटात कल्लेश्वरचं विकृत हास्य हळूहळू विरत गेलं.

त्याला खात्री होती. यावेळी तो हरणार नव्हता.

पण त्या पडक्या देवळाबाहेर, दाट झाडीत लपलेल्या एका उंच फांदीवर, आणखी एक पक्षी हे सगळं टिपत होता.

एक गरुड; मोठा, तपकिरी-सोनेरी पंखांचा, अंधारात स्थिर, शांत बसलेला.

कल्लेश्वरचा कावळा जेव्हा पडक्या छतातून बाहेर पडून काळ्या आकाशात उडाला, तेव्हा तो गरुडही हलला. त्याने पंख पसरले, फांदीवरून झेप घेतली, आणि कावळ्याच्या अगदी विरुद्ध दिशेने यानाच्या दिशेने देवाप्पाच्या घराकडे शांतपणे उडत निघून गेला.
************************************************************************************************************************
देवप्पा त्या रात्री उशिरापर्यंत अंधारात बसून विचार करत जागा होता. धर्म-शास्त कुळाचा यल्लाप्पा त्याच्याजवळ येऊन बसला. "देवप्पा, आता पुढे काय?"

देवप्पाने दीर्घ श्वास घेतला. "अभिजित त्याच्या मार्गावर आहे, यल्लाप्पा. पण एकाच मार्गावर विसंबून राहणं शहाणपणाचं नाही. जर तो अपयशी ठरला, किंवा जर कवच वेळेत सापडलं नाही, तर..."

"तर?"

देवप्पाने त्याच्याकडे बघितलं, आणि त्याच्या डोळ्यांत एक कठोर, जड निर्धार होता. जो त्याला स्वतःलाही आवडत नव्हता, पण जो टाळताही येत नव्हता. "तर आपल्याला वेगळा मार्ग वापरावा लागेल. मल्लीला थांबवायचा."

यल्लाप्पा गंभीर झाला. "थांबवायचा म्हणजे... संपवायचा?"

देवप्पाने मान हलवली, "विधी फक्त मल्लीच पूर्ण करू शकतो. जर मल्ली नसेल, तर तेरावा विधी होऊच शकणार नाही. भस्मबीज कधीच पूर्ण जागृत होणार नाही. आणि कल्लेश्वर आपल्या मरणाने मरेल"

"मी आधीच काही माणसं पाठवलीयेत," देवप्पा शेवटी म्हणाला. "यानाच्या आतल्या जंगलात. मल्लीचा माग काढायला. निदान त्याचं ठिकाण तरी माहीत असावं, वेळ आलीच तर."

"आणि सापडला त्यांना?"

देवप्पाने नकारार्थी मान हलवली. "कल्लेश्वरने मल्लीभोवती अशी कडेकोट व्यवस्था उभी केलीये की त्याच्यापर्यंत कुणालाही सहज पोहोचता येऊ नये.मल्ली त्या पडक्या देवळाच्याही खोलवर, कुठल्यातरी गुहेत किंवा दाट झुडपांत लपवलाय आणि त्याच्याभोवती अघोरी संरक्षण आहे, जे आपल्या माणसांना जवळही फिरकू देत नाही."

आणि त्याच्या मनात, एक अनामिक भीतीही दाटून आली...जर दोन्ही मार्ग बंद झाले, कवचही न मिळालं आणि मल्लीही न सापडला, तर भस्मबीजाला रोखणं खरंच शक्य होईल का?
************************************************************************************************************************
तिकडे, त्याच रात्री, यानाच्या घनदाट जंगलात, काही अंतरावर.

चार धर्म-शास्त रक्षक, अंधारात सावधपणे पावलं टाकत, झाडाझुडपांतून वाट काढत होते. त्यांच्या हातात मशाली नव्हत्या. प्रकाश म्हणजे कल्लेश्वरच्या नजरेला स्वतःहून दिलेलं आमंत्रण, हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे ते फक्त अंधुक चांदण्याच्या उजेडात आणि समोरच्या अंधाराची सवय झालेल्या आपल्या डोळ्यांवर विसंबून पुढे जात होते.

"इथून पुढे वास बदलतो," एकाने कुजबुजत सांगितलं, हवेत नाक फुलवत. "राखेचा वास. आपण जवळ आलोय."

ते आणखी पुढे सरकले. आणि मग, अचानक, समोरच्या झुडपांतून एक अशी थंडी उसळली, की चौघांचेही पाय जागच्या जागी थिजले.

"थांबा," नेता कुजबुजला, हात उंचावत. "हे... हे नैसर्गिक नाही."

समोरच्या अंधारात, झाडांच्या फांद्यांमध्ये, काहीतरी हललं; डोळ्यांची एक जोडी, पिवळसर, त्यांच्याकडेच रोखलेली. आणि मग आणखी एक जोडी. आणि आणखी एक.

"कल्लेश्वरचे राखणदार," दुसरा रक्षक पुटपुटला, तलवारीच्या मुठीवर हात घट्ट करत. "आपल्याला बघितलंय त्यांनी."

त्या अंधारातल्या डोळ्यांच्या जोड्या जमिनीलगत, पालींसारख्या, आवाज न करता हळूहळू पुढे सरकू लागल्या.

"मागे फिरा," नेता सावधपणे म्हणाला. "आज नको. मल्ली इथेच कुठेतरी आहे हे नक्की, पण आज त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही."

चौघेही सावधपणे मागे सरकले, जोपर्यंत ते जंगलाच्या कडेपर्यंत पोहोचले नाहीत तोपर्यंत त्या पिवळसर डोळ्यांच्या जोड्या अंधारातून त्यांचा पाठलाग करत राहिल्या.
************************************************************************************************************************
जसजसे दिवस जात होते... भस्मबीजाची छाया आधीच कमकुवत असलेल्या लोकांचा विवेक नष्ट करू लागली होती.

उत्तर कन्नड परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून एक सूक्ष्म, पण अस्वस्थ करणारा बदल जाणवत होता. सुरुवातीला तो कुणाच्या लक्षात आला नाही. पण घटना वाढत गेल्या तसं त्यांच्यातला एक समान धागा लक्षात येऊ लागला होता.

उत्तर कन्नड पोलीस ठाणे, सिरसी

इन्स्पेक्टर गुरुनाथ हेगडे यांच्या टेबलावर तक्रारींच्या फाईलींचा ढीग दिवसेंदिवस वाढत होता.

"साहेब, हे बघा," हवालदाराने एक फाईल त्यांच्यासमोर ठेवली. "गेल्या महिन्यात बारा तक्रारी आल्या आहेत. आणि जवळजवळ सगळ्या तक्रारींमागे तेच जुने चेहरे आहेत. गावातले दारुडे, आधी दोन-तीनदा तंबी मिळालेले लोक आणि ज्यांच्यावर यापूर्वीही किरकोळ प्रकरणं नोंदली गेली आहेत."

हेगडेंनी फाईल चाळत कपाळावर हात ठेवला.

"म्हणजे नवीन कुणी नाही?"

"नाही, साहेब. नवीन लोक नाहीत. पण जुनी माणसंही आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. आधी एखादा दारुड्या दारूच्या नशेत एखाद्या बाईला शिवीगाळ करून निघून जायचा. आता तेच लोक थेट हात घालायला बघतायत. जणू त्यांच्या मनात उरलेला शेवटचा अंकुशही निघून गेलाय."

हेगडेंनी काही क्षण फाईलकडे पाहिलं आणि मग खिडकीबाहेर नजर लावली.

"म्हणजे वाईट माणसं आणखी वाईट होतायत."

"तेच तर कळत नाही, साहेब. सगळ्यांमध्ये एकदम असा बदल का झाला?"

हेगडे काही बोलले नाहीत. त्यांच्या नजरेसमोर बाहेरचं नेहमीचं शहर होतं, पण त्या परिचित दृश्यातही त्यांना काहीतरी अस्वस्थ करणारं जाणवत होतं.
************************************************************************************************************************
सिरसीजवळचं एक गाव

रात्री उशिरा दारूच्या गुत्त्याबाहेर तीन-चार जण उभे होते. गावात त्यांची नावं आधीपासूनच चांगली नव्हती. छेडछाड, मारामारी आणि दारू पिऊन केलेल्या उपद्रवासाठी त्यांच्यावर यापूर्वीही तक्रारी झाल्या होत्या.

त्या रात्री मात्र त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळं होतं. त्यांच्यापैकी एकाने बराच वेळ रस्त्याकडे पाहिलं आणि अचानक पुटपुटला, "आजकाल डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. आधी थांबावंसं वाटायचं. आता थांबावंसं वाटतच नाही."

दुसऱ्याने त्याच्याकडे पाहून हसत खांदे उडवले. "जास्त दारू झालीय तुझी."

तो काही उत्तर न देता रस्त्याकडे पाहत राहिला.
दूरवरून एक तरुण मुलगी एकटी चालत येत होती. क्षणभर त्या तिघांमध्ये शांतता पसरली. मग त्यांच्यापैकी एकाने बाटली खाली ठेवली आणि तिच्या दिशेने पाऊल टाकलं.
************************************************************************************************************************
सिरसीजवळची एक शाळा

मुख्याध्यापिका सुनंदा भट यांनी तातडीची बैठक बोलावली होती. शिक्षकांसमोर त्या काही कागद ठेवत म्हणाल्या, "गेल्या आठवड्यात तीन मुलींचे पालक शाळेत येऊन तक्रार करून गेले आहेत. शाळेतून घरी जाताना मुलींची छेड काढली जातेय आणि त्रास देणारी मुलं बाहेरची नाहीत. गावातलीच आहेत. त्यांना आपण सगळे ओळखतो. यापूर्वीही त्यांच्या किरकोळ तक्रारी झाल्या आहेत. पण आता त्यांचं वागणं खूपच आक्रमक झालं आहे."

एका वृद्ध शिक्षकाने अस्वस्थपणे मान हलवली.

"पूर्वी अशी पोरं नुसती शीळ घालायची, दूरून चिडवायची आणि पळून जायची. आता रस्ता अडवतात, धमकावतात. इतकं धाडस अचानक कुठून आलं, हेच कळत नाही."

त्या रात्री देवप्पाला सिरसी-कुमठ्याच्या परिसरातून येणाऱ्या बातम्या कळल्या, तेव्हा त्याच्या मनात एक जुनी आठवण पुन्हा जागी झाली. गेल्या दोन महिन्यांत स्त्रियांविरुद्ध वाढलेल्या तक्रारी, गावोगावी अचानक बदललेली माणसांची वागणूक आणि विवेक हरवल्यासारखे होत चाललेले पुरुषांचे वर्तन, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घटना नव्हत्या, हे त्याला आता स्पष्ट दिसत होते.

त्याला बखरीत असलेले वाक्य आठवले. सहा महिन्यांपूर्वी भस्मबीजाची छाया गुहेबाहेर पसरेल, माणसाच्या अंतःकरणातील विवेक आधी गिळंकृत करेल आणि दडपलेली वासना अनावर होईल, असं त्यात लिहिलं होतं.

देवप्पाने खोल श्वास घेतला. "ही छाया जागेपुरती बांधलेली नाही, सिरसीत जे सुरू झालंय, ते जर तिथेच थांबलं नाही, तर पुढची सीमा कर्नाटक नाही... भारतही नाही. जिथपर्यंत माणसाच्या मनात न शमणारी वासना आहे... तिथपर्यंत हे पसरत जाईल" तो स्वतःशीच पुटपुटला.

भस्मबीज - भाग १३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग सुद्धा जबरदस्त झाला आहे.
वातावरण निर्मिती मस्तच.
मधुकेश्वर मंदिराबाबत वाचले आहे. तुमचे संदर्भ अगदी खरे असल्याने कथा अधिक भिडते.
यावर खरच एखादी मालिका निघू शकते.
लवकर टाका पुढचा भाग....

गरुडाचा उल्लेख वाचेपर्यंत श्वास न कळत रोखला गेला होता. गरुड वाचल्यावर हुश्श झाले.
इतकी ही कथा गुंगवून ठेवते आहे.
तुमच्या सर्व कथांवर 4-5 भागांच्या वेब सीरिज बनू शकतात. खरेच त्या दृष्टीने प्रयत्न करून बघा.

>>>>इतकी ही कथा गुंगवून ठेवते आहे.
तुमच्या सर्व कथांवर 4-5 भागांच्या वेब सीरिज बनू शकतात. खरेच त्या दृष्टीने प्रयत्न करून बघा.>>>>
अगदी सहमत
इथल्या थोरा मोठ्यांनी जरा मनावर घेऊन शिफारस करावी
बऱ्याच कथा इथे त्या योग्यतेच्या वाचण्यात आल्यात.