भस्मबीज – भाग ९

Submitted by नितनवे on 30 July, 2026 - 13:37

भस्मबीज - भाग ८
पूर्वभाग
याना येथून परतताना अभिजितला देवप्पा कल्लेश्वर बाबाच्या धोक्याचा इशारा देतो. परतीच्या प्रवासात रहस्यमय धूर, राखेचा वास आणि एका अदृश्य शक्तीमुळे त्यांचा भीषण अपघात टळतो. घरी परतल्यावर अभिजित स्वातीसमोर संपूर्ण सत्य उघड करतो आणि ती त्याला एकट्याने हा संघर्ष न करण्याचा शब्द देते. मात्र शांततेचा क्षण फार काळ टिकत नाही; दुपारच्या उजेडात पुन्हा राखेचा वास आणि आरशात दिसणारी गूढ सावली नव्या संकटाची चाहूल देतात.
************************************************************************************************************************
भस्मबीज – भाग ९ - कुळाच्या शोधाची निकड आणि सुरुवात

अभिजित जागच्या जागी थिजला. त्याने आरशाकडे रोखून बघितलं. त्या डोळ्यांची जोडी अजूनही तिथेच होती, स्थिर, त्याच्याकडेच वळलेली. त्या नजरेत जणू एक अनामिक ओढ होती, जिच्यापासून सुटका करणं त्याच्या हातात नव्हतं. त्याचे स्वतःचे डोळे त्या आरशातल्या नजरेला खिळून राहिले, भोवतालचं भान हरपत गेलं. खोलीतल्या भिंती दूर गेल्यासारख्या वाटल्या. दुपारचा उजेड मंदावला. स्वतःच्या श्वासाचा आवाजही कुठेतरी बुडून गेला. फक्त ती नजर उरली आणि तिच्या मागे, आरशाच्या खोलात, काहीतरी हळूहळू आकार घेत असल्यासारखं...एक अंधुक आकृती. राखेच्या रंगाची. त्याच्याच दिशेने, हळू, सरकत येणारी. जवळ. अजून जवळ. आरशाच्या काचेला आतून स्पर्श होईल इतकी जवळ. अभिजितचे ओठ हलले, पण आवाज फुटला नाही. त्याचा हात नकळत आरशाच्या दिशेने उचलला गेला जणू त्या काचेला स्पर्श करायचाय, त्या आकृतीला स्पर्श करायचाय...आणि नेमक्या त्याच क्षणी, कुठूनतरी फार दूरून, एका वेगळ्याच जगातून, एक आवाज आदळला, "अभिजित!"

काच तडकल्यासारखा तो क्षण फुटला.

"अरे तो अथर्व बघ, किती वेळ बेल वाजवतोय! लक्ष कुठंय तुझं? जा लवकर दार उघड, नाहीतर तो वाजवून वाजवून बेलच जाळून टाकेल. भारी उपद्व्यापी कार्ट आहे!"

अभिजित दचकून भानावर आला, जणू कुणीतरी त्याला खोल पाण्यातून खेचून वर काढलं. त्याने पटकन आरशाकडे शेवटचं एकवार बघितलं. तिथे आता फक्त त्याचं स्वतःचं प्रतिबिंब होतं, बाकी काहीच नाही.

"हो... हो, आलोच!" तो ओरडला, आवाज अजूनही किंचित कापत, आणि दाराकडे धावला. दार उघडताच अथर्व, बॅग पाठीवर लटकवून, बोटाने सतत बेल दाबत उभा होता, चेहऱ्यावर नेहमीचं खट्याळ हसू.

"बाबा! किती वेळ लावलात?”

"सॉरी बाळा, जरा... काम करत होतो." अभिजितने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आवाज अजूनही किंचित कापत होता.

अनन्या मागोमाग आत आली, फोनमध्ये डोकं खुपसलेली. "बाबा, आज इतकं गंभीर का दिसताय? भूत बघितल्यासारखे."

अभिजितने कसनुसं हसत विषय टाळला. "काही नाही गं, जरा डोकं दुखतंय."

स्वाती स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, "अथर्व, बूट काढून ठेव आधी, आणि हात धुऊन ये. अनन्या, तूही." मुलं त्यांच्या खोलीत पांगली.

स्वाती अभिजितजवळ आली, आवाज खाली करत विचारलं, "काय झालं होतं? इतका वेळ आरशासमोर काय करत होतास?"

अभिजितने तिच्याकडे बघितलं, शब्द जुळवत म्हणाला, "स्वाती, मला ते डोळे परत दिसले, आरशात... अजूनही तिथेच होते जेव्हा तू ओरडलीस तेव्हाही."

स्वातीचा चेहरा एका क्षणात गंभीर झाला. तिने त्याचा हात घट्ट धरला.

"मी देवप्पाला फोन करतो, तो म्हणाला होता काहीही घडलं तर फोन करून म्हणून." असे म्हणत अभिजितने देवप्पाला फोन लावला.

दोन-तीन रिंग वाजल्यावर पलीकडून आवाज आला. "अभिजित?"

अभिजितने घाईघाईत कालचा महामार्गावरचा प्रसंग आणि आताचा प्रसंग सांगितला.

"देवप्पा आरशात... ते डोळे परत दिसले. आणि यावेळी बराच वेळ, स्वाती ओरडली तेव्हाही ते तिथेच होते."

"अभिजित... नीट ऐक. ही गोष्ट अजिबात चांगली नाही. याचा अर्थ ते तुझ्या मनात शिरण्याचा प्रयत्न करतंय."
"ते आता तुझ्या भोवतीचं आवरण भेदू लागलं आहे."
"आता वेळ दवडून चालणार नाही. जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर तुझं कुलदैवत शोधायला हवं. नाहीतर हा त्रास वाढत जाईल."

फोन ठेवल्यावर स्वाती आणि अभिजित बराच वेळ हॉलमध्ये शांत बसून राहिले. मुलं आपापल्या खोलीत गृहपाठात गुंतलेली.

"देवप्पा म्हणाले तसं, वेळ दवडून चालणार नाही," अभिजित म्हणाला.

स्वातीने मान हलवली. "मग आता वाट कशाला बघायची? याच वीकेंडला सुप्याला जाऊया. बाबांना काय सांगायचं?"

"खरं काहीच सांगायला नको अजून. सांगूया काहीतरी आयत्यावेळी सुचेल ते.”

"ठीक आहे.”

"मग शनिवारी निघूया. मी बाबांना फोन करून सांगतो"

अभिजितने बाबांना फोन लावला. पलीकडून जोरदार आवाज आला.

"हॅलो? बोल बाळा, लवकर आठवन झाली म्हनायची.?"

अभिजितला अपेक्षा होतीच. "बाबा, कामात होतो जरा "

"आरं तुझं काम कवा संपलंय का?" वडिलांचा आवाज तसाच शांत, पण त्यात एक बोच होती. "मागच्या येळंला म्हनला हुतास दर आठवड्याला फोन करीन बाबा.' सव्वा म्हैना झाला. आज फोन आलाय तुझा."

"बाबा…"

"तुझी आई रोज इचारते. 'फोन आला का?' मी म्हनतो, 'गडी मोठ्या कंपनीत हाय, बिझी आसंल.' पन तिला काय ते पटत न्हाई."

अभिजितच्या घशात आवंढा आला. "चुकलंच माझं."

"आरं चुकलं-बिकलं काय न्हाई." बाबा जरा मऊ झाले. "आमी म्हातारी माणसं. दिवसातनं दोन मिन्टं आवाज ऐकू आला की झालं. एवढंबी जमत न्हाई का रं तुला?"

"जमेल बाबा. यापुढं नक्की."

"आन सूनबाईला बी सांग की जरा." त्यांचा सूर आता थोडा थट्टेकडं झुकला. "तिचा तर आठवड्यातनं येक तरी फोन येत हुता आदी. आता तिनं बी सोडून दिलं वाटतं आमास्नी. तिला सांग म्हणावं आता तुमी बी नवऱ्याच्या वाटंनं चाललाय.'"

"बाबा, ती पण पोरांमागे आणि घरच्या कामात असते "

"हां. आता बोल, काय म्हनत व्हतास?"

"शनिवारी येतोय आम्ही गावाकडं."

वडिलांचा आवाज पूर्ण बदलला, "खरं का काय? आरं मग हे आदी नाय का सांगायचं लेका!"

"पोरं बी येत्यात नव्हं?"

"हो, अथर्व-अनन्या आणि स्वातीपण."

"वा वा वा." त्यांचा आवाज दाटल्यासारखा वाटला. "थांब, तुझ्या आईला सांगतो. ती लई खूश हुईल."

"आसं अचानक... काय खास काम आलं म्हणायचं?"

अभिजित क्षणभर थांबला. खरं सांगायची ही वेळ नव्हती.

"नाही बाबा, तसं काही नाही, सहजच. जरा मोडी लिपी शिकायची आवड वाटतेय, जुनी कागदपत्रं बघायची होती थोडी आणि थोडा घराण्याचा इतिहास पण जाणून घ्यायचा होता, कुठून आलो आपण वैगेरे जरा उत्सुकता वाटली."

"आस्सं व्हय." वडील हसले. "तुझी खटपट करायची सवय जायचीच न्हाय म्हण कि."

अभिजित ओशाळवाणे हसला.

"बरं, या. निवांत या. आन शनिवारी लौकर निघा, दुपारच्या जेवनाला पोचा."

"नक्की बाबा."

"आन गाडी जपून चालव. घाटात लई गर्दी आसतीय हल्ली."

"हो."

"बरं ठिवतो आता. हिला सांगतो जाऊन."

"बरं, बाबा."
************************************************************************************************************************
मंगळवारी अकराच्या सुमारास नेहा फाईल घेऊन केबिनमध्ये आली.

"नेहा, दार लावून घ्या जरा."

ती क्षणभर थांबली. मग दार ओढून घेऊन समोर बसली.

"मला असं वाटतं कि तुम्ही या सगळ्या पासून लांब राहावं ." अभिजित म्हणाला.

नेहाने त्याच्याकडे रोखून बघितलं, तिच्या डोळ्यांत एक ठाम, न डगमगणारा भाव होता. "आणि जर मी दूर राहिले, तर काय बदलेल सर? माझी तारीख तशीच राहील. आणि माझ्याखेरीज, या इतक्या वर्षांत, याच तारखेला अजून किती जणी जन्मल्या असतील, कुणास ठाऊक फक्त आपल्याला त्यांची नावं माहीत नाहीत इतकंच. लांब राहून प्रश्न सुटत नाही, तो फक्त डोळ्यांआड होतो."

अभिजित निरुत्तर झाला.

"आणि खरं सांगू?" ती पुढे म्हणाली, आवाज मऊ झाला. "मला भीती वाटते, मान्य आहे. पण त्याहून जास्त भीती वाटते तुम्हाला एकट्याने हे सगळं सोसताना बघायची. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही यानाला जाल, मी सोबत असेन. हा माझा निर्णय आहे, तुमचा नाही."

अभिजितने काही क्षण तिच्याकडे बघितलं, वाद घालायचा प्रयत्न त्याच्या ओठांवर आला आणि विरूनही गेला. तिच्या नजरेतला तो निर्धार बघून त्याला जाणवलं, हा वाद तो जिंकणार नव्हता.
************************************************************************************************************************
पुढचे चार दिवस अभिजित अक्षरशः कामात बुडून गेला. ऑफिसमध्ये एका मोठ्या क्लायंटचं प्रेझेंटेशन ठरलं होतं. त्यासाठीची तयारी, वरिष्ठांबरोबरच्या चर्चा, मीटिंग्जमागून मीटिंग्ज आणि सतत वाजणारा फोन यांत दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा, हे त्यालाही कळत नव्हतं. शरीर ऑफिसमध्ये असलं, तरी मन मात्र वारंवार सुप्याकडे धावत होतं.

यादरम्यान नेहा दोन-तीन वेळा त्याच्या केबिनमध्ये आली. कधी फाईलवर सही घ्यायला, तर कधी एखाद्या क्लायंटच्या मुद्द्यावर चर्चा करायला. गुरुवारी दुपारी ती काही कागदपत्रं घेऊन आली असताना सहजच म्हणाली,

"सर, शोध कुठपर्यंत आला?

"या वीकेंडला सुप्याला जातोय, स्वाती आणि मुलंही बरोबर येणार आहेत."

अभिजितने फाईलमधून नजर वर केली.

"छान आहे." ती क्षणभर थांबली. "काही मदत लागली, किंवा तिकडे काही नवीन सापडलं तर मला कळवा."

अभिजित हसला.

"नक्की. आणि ऑफिसची काळजी करू नका. सोमवारपर्यंत काही तातडीचं असेल, तर मला फोन करा."

नेहा बाहेर गेली; पण तिच्या चेहऱ्यावरची काळजी अभिजितच्या नजरेतून सुटली नाही.
************************************************************************************************************************
त्या रात्री घरी स्वातीने प्रवासाची तयारी सुरू केली. कपड्यांबरोबरच तिने एक टॉर्च, काही अतिरिक्त बॅटऱ्या, एक मोठं भिंग, कापडी हातमोजे आणि एक जाड वही बॅगेत ठेवली.

अभिजित तिच्याकडे पाहत हसला.

"हे सगळं काय आहे?"

स्वातीने बॅगेची चैन ओढत त्याच्याकडे पाहिलं.

"जुनी कागदपत्रं मिळाली तर वाचायला भिंग लागेल, अंधारात टॉर्च लागेल, आणि जे काही महत्त्वाचं सापडेल ते लगेच लिहून ठेवायचं. परत आल्यावर आठवत बसायचं नाही."

तिच्या आवाजात आत्मविश्वास होता. अभिजितने तिच्याकडे पाहिलं आणि नकळत हसला. काही दिवसांपूर्वीपर्यंत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जरी केला असता, तरी स्वातीने त्याला वेड्यात काढलं असतं. आज मात्र ती स्वतः या शोधाची साथीदार झाली होती.

शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना अभिजितने एक दीर्घ श्वास घेतला. गेले चार दिवस कामाच्या धावपळीत गेले होते; पण त्याचं मन एकदाही पूर्णपणे ऑफिसमध्ये नव्हतं. प्रत्येक दिवस संपताना त्याला फक्त एकच गोष्ट जवळ येताना जाणवत होती...सुप्याचा प्रवास.

घरी पोहोचल्यावर मुलांची लगबग सुरू होती. अथर्वने आपली छोटी बॅग आधीच भरून ठेवली होती आणि तो वाटेत कोणकोणत्या ठिकाणी थांबायचं याची योजना करत होता. अनन्या नेहमीप्रमाणे शांत होती. कानात इअरफोन, हातात मोबाईल; पण आईने एकदा हाक मारताच तिने फोन बाजूला ठेवला.

रात्रीच्या जेवणानंतर सगळं सामान गाडीत ठेवलं गेलं.

"उद्या पहाटे सहा वाजता निघायचं आहे. उशीर झाला, तर पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकू." स्वाती म्हणाली.

सगळे झोपायला गेले. पण अभिजितला झोप काही लगेच लागली नाही. तो बराच वेळ छताकडे पाहत पडून राहिला.

पहाटे पाचला गजर वाजण्याआधीच अभिजितला जाग आली. खोलीत अजून अंधार होता, स्वाती शेजारी शांत झोपलेली. त्याने काही क्षण तिच्याकडे बघितलं, मग हलकेच उठून अंघोळीसाठी गेला.
सव्वासहाला सगळे तयार होते. अथर्व अजून झोपाळलेल्या डोळ्यांनी गाडीत चढला, बॅकसीटवर बसताच त्याचं डोकं खिडकीला टेकलं. अनन्या मात्र आधीच जागी, कानात इयरफोन्स घालून, बाहेरचं काहीच लक्षपूर्वक बघत नव्हती.

पुण्याकडे जाणारा रस्ता तसा शांत होता, फार वाहतूक नव्हती. सूर्य उगवत असताना गाडी घाटातून जात होती, डोंगरांवर सकाळचा कोवळा प्रकाश हळूहळू पसरत चालला होता.

"किती वेळ लागेल पोहोचायला?" अनन्याने मध्येच विचारलं, इयरफोन्स एका कानातून काढत.

"साधारण चार तास," अभिजित म्हणाला, नजर रस्त्यावरच ठेवत. रविवारी घडलेल्या प्रकारापासून तो जास्तच सावध राहत होता.

"आणि तिथे काय करायचंय आपल्याला?"

अभिजित आणि स्वातीने एकमेकांकडे बघितलं, तो प्रश्न टाळायला दोघांनीही आधीच ठरवलेलं उत्तर तयार ठेवलं होतं.

"आजोबांच्या जुन्या वाड्यात काही जुनी कागदपत्रं, फोटो शोधायचेत," स्वाती सहजपणे म्हणाली. "घराण्याचा इतिहास जाणून घ्यायचाय जरा."

"बोअरिंग," अनन्या पुटपुटली आणि पुन्हा इयरफोन्स लावले.
************************************************************************************************************************
गाडी सुप्याच्या हद्दीत शिरताच दोन्ही बाजूंना उसाची, मक्याची आणि ज्वारीची शेतं, अधूनमधून दिसणाऱ्या विहिरी, पिंपळ-उंबराच्या सावलीत विसावलेले म्हातारे बघून अभिजितच्या मनात नकळत एक वेगळीच शांतता उतरली.

मुख्य रस्ता सोडून गाडी गावातल्या जुन्या पेठेकडे वळली. रस्ता हळूहळू अरुंद होत गेला. दोन्ही बाजूंना शंभर-दोनशे वर्षं जुनी घरं दिसू लागली.
थोडं पुढे जाताच गावाचं जुनं ग्रामदैवताचं मंदिर दिसलं, घंटांचा मंद आवाज सकाळच्या हवेत तरंगत होता. समोरच्या विशाल वडाच्या पारावर नेहमीप्रमाणे गावकऱ्यांच्या गप्पांचा फड रंगला होता.

चौकातून उजवीकडे वळताच काही अंतरावर इनामदारांचा वाडा दिसला. उंच दगडी जोत्यावर बांधलेला. लाल कौलांनी मढलेलं विस्तीर्ण छप्पर. काळवंडलेल्या सागवानी लाकडाची गॅलरी. आणि समोरचं प्रचंड महाद्वार.
महाद्वार इतकं उंच होतं, की पूर्वी घोड्यावर बसलेला सरदारही सहज आत शिरू शकला असता आणि बाजूला एक लहानशी दिंडी.
महाद्वाराच्या वर लाकडी जाळीची गॅलरी होती. पूर्वी घरातल्या स्त्रिया तिथून सण-उत्सव, मिरवणुका आणि गावची वर्दळ पाहत असत, असं आजी सांगायची.

वाड्याच्या महाद्वाराशी गाडी थांबली, तेव्हा आई आधीच दारात उभी होती. हातातल्या ताटात भाकरीचा तुकडा, थोडं मीठ, आणि दोन सुकलेल्या मिरच्या.

"थांबा तिथंच," ती म्हणाली. "उंबरा वलांडू नगा."

अथर्व गाडीतून उतरून धावतच पुढं आला होता, तो जागच्या जागी थांबला. "आजी, काय गं हे?"

"गप बस." तिने त्याला पुढं ओढलं. "तिकडून एवढ्या लांबनं आलाय. वाटंत काय बी नजर लागती."

तिने ताट उचलले आणि चौघांवरून तीनदा ओवाळले. मग बाजूला होऊन तो भाकरीचा तुकडा उंबऱ्याबाहेर, रस्त्याच्या दिशेला भिरकावून दिला. मिरच्या तिने चुलीत टाकायला बाजूला ठेवल्या.

"आता या."

अनन्याने हळूच स्वातीकडे बघून विचारलं, "आई, हे काय आहे?"

"दृष्ट काढतायत आजी."

आई हसली, अनन्याचा गाल ओढत. "तुझी आय बी पहिल्यांदा आली तवा असंच म्हनली हुती."

स्वाती ओशाळून हसली.

अभिजितने उंबऱ्यात पाऊल टाकलं आणि थांबला. मागं वळून त्याने बघितलं तो भाकरीचा तुकडा रस्त्याच्या धुळीत पडला होता आणि त्याच्या भोवती एक कुत्रं घुटमळत होतं. सोडून जात नव्हतं, पण जवळही जात नव्हतं. नुसतं वास घेत, मागं सरकत, पुन्हा पुढं येत.

आई दारातच उभ्या राहून ते बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरत गेलं.

अभिजितने विचारलं, "काय झालं आई?"

आई जवळजवळ स्वतःशीच म्हणाली, "जित्राबं माणसापेक्षा जास्त बघत्यात, बाळा."

"म्हणजे?"

"दृष्ट काढली की तुकडा खाल्ला जातू . नेहमी. कारण त्या तुकड्यात फकस्त नजर उतरती. जित्राबं ती खात्यात, आन इसारत्यात."

"पण आज ते कुत्रं तुकड्याला तोंड लावत न्हाई. म्हणजे त्या तुकड्यात नुसती नजर उतरली न्हाई."

तिने अभिजितकडे वळून बघितलं. "आणखी काहीतरी उतरलंय. आणि ते जित्राबालाबी कळतंय म्हणून ते जवळ जात न्हाई."

रस्त्यावर तो भाकरीचा तुकडा तसाच पडून राहिला. आणि दुपार होईपर्यंत, गावातलं एकही कुत्रं, एकही कावळा त्याच्या जवळ फिरकला नाही. .
************************************************************************************************************************
जेवण झाल्यावर घरात एक निवांत सुस्ती पसरली. वडील नेहमीच्या सवयीने ओसरीवरच्या झोपाळ्यावर जाऊन पडले, पेपर वाचता वाचता डोळे मिटू लागले. आई स्वयंपाकघरात आवराआवर करत होती, अथर्व आणि अनन्या मागच्या परसात, जुन्या आंब्याच्या झाडाखाली खेळण्यात रमले होते.

अभिजित आणि स्वाती वरच्या मजल्यावर देवघरात गेले. आत पाऊल टाकताच कापूर आणि विझलेल्या उदबत्तीचा तो ओळखीचा वास दाटून आला. समोरच्या देवघरातल्या छोट्या पितळी मूर्ती, त्यांच्यामागे लावलेले जुने फोटो, आणि उजव्या कोपऱ्यात ते मोठं, काळंकुट्ट झालेलं लाकडी कपाट; बालपणी ज्याची अभिजितला उगीचच भीती वाटायची.

त्याने कपाटाचं जुनं दार उघडलं. आतल्या शेल्फांवर वर्षानुवर्षं साचलेल्या पोथ्या, पंचांगं, स्तोत्रांची जीर्ण पुस्तकं शिस्तीत रचलेली होती.
पुढचा तासभर दोघांनी संपूर्ण देवघर पालथं घातलं; कपाटातली प्रत्येक पोथी उघडून बघितली, प्रत्येक शेल्फ चाचपून बघितलं, अगदी देवांच्या मूर्तींखालीही डोकावून बघितलं. काहीच सापडलं नाही.

"इथे काहीच नाहीये, अभिजित," स्वाती अखेर दमून म्हणाली, कपाळावरचा घाम पुसत. "आपण चुकीच्या जागी शोधतोय बहुतेक."

खाली आल्यावर वडील नुकतेच झोपेतून उठले होते, चहाचा कप हातात घेऊन ओसरीवर बसले होते. अभिजित त्यांच्याजवळ गेला.

"बाबा, आपल्याकडे जुनी कागदपत्रं, जुने दस्तऐवज कुठे ठेवलेत? देवघरात तर काही सापडलं नाही."

वडिलांनी चहाचा घोट घेत विचार केला. "आरं देवघरात कशाला असत्याल?" ते म्हणाले. "ती समदी कागदं माळ्यावर हायेत. एक जुनी नक्षीची पेटी हाय तिथं, आजोबांच्या येळची. जमिनीच्या नोंदी, खरेदीखतं, आसलं समदं कोंबलंय त्यात."

अभिजित आणि स्वातीने एकमेकांकडे बघितलं.

"माळ्यावर जायचा रस्ता कुठून?" अभिजितने विचारलं, आवाजात लपवता न आलेली उत्सुकता.

"मागल्या ओसरीतनं शिडी हाय." वडिलांनी कप खाली ठेवला. "जपून जा हां. लई वर्सं कुनी वर गेलं न्हाई. धूळ आन जळमटं असत्याल. आन ती शिडी बी जुनी झालीया, हात घट्ट धरून चढ."

मागच्या ओसरीतल्या अरुंद, लाकडी शिडीवरून दोघे वर चढले. माळ्यावर अंधार होता, फक्त एका लहानशा झरोक्यातून येणारा प्रकाश आणि हातातल्या टॉर्चचा उजेड.

जुनं टाकून दिलेलं फर्निचर, तुटक्या वस्तू, जळमटांनी भरलेली कोपरे असं बराच वेळ शोधल्यावर, माळ्याच्या एका कोपऱ्यात, जुन्या घोंगड्यांखाली अर्धवट झाकलेली, त्यांना ती पेटी सापडली; लाकडी, नक्षीदार, पण धुळीने आणि वयाने रंग गमावलेली.

अभिजितने ती ओढून उघडली. आत खरंच जमिनीच्या नोंदी, जुनी खरेदीखतं, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या जाडीची कित्येक कागदपत्रं दाटीवाटीने भरलेली होती.

दोघांनी एकेक कागद बाहेर काढत, बाजूला ठेवत तळाशी जायला सुरुवात केली. वेळ जात होती, धूळ हवेत उडत होती, आणि आशा हळूहळू विरत चालली होती.

शेवटी, अगदी तळाशी, बाकीच्या कागदांहून वेगळं काहीतरी हाताला लागलं. कापडात गुंडाळलेलं. अभिजितने ते बाहेर काढलं. कापड सोडलं. आत सुटी, लांबट जाड पानं होती, हाताने बनवलेला कागद, काळपट-पिवळा पडलेला. वर मोडी लिपीतली दाटीवाटीची अक्षरं.

अभिजितचा श्वास अडकला.

खाली उतरताना जिन्यावरच वडिलांशी गाठ पडली, ते वर काय चाललंय हे बघायला येत होते.

"घावलं का काय?" त्यांनी विचारलं, आवाजात सहज कुतूहल.

अभिजितने क्षणभर संकोच केला, मग म्हणाला, "हो बाबा. एक बाड सापडलयं कपड्यात गुंडाळलेलं, काय आहे माहित नाही पण जुनी बखर असावी असं वाटतंय."

"बखर? कसली बखर?"

"मलाही नीट माहीत नाही अजून. मोडीत आहे, वाचता येत नाहीये."

"आयला, जुनीजानती माणसं म्हणायची ती खरंचय का काय?

"काय म्हणायचे, बाबा?" अभिजित कुतूहलाने म्हणाला.

"लहानपनी घरातली जुनी मानसं बोलता बोलता म्हनायची, आपल्या लई जुन्या पूर्वजाची खुद्द मालोजीराजांशी दोस्ती हुती म्हनं. शहाजीराजांचं वडील."

"पन खरं-खोटं देव जानं. अशा गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगत्यात, त्यात किती खरं आन किती फुगावल्यालं, कुनास ठाव. मी बी कधी लई मनावर घेतलं न्हाई."

अभिजित आणि स्वातीने एकमेकांकडे बघितलं.

"आणखी काय आठवतंय का त्याबद्दल?" अभिजितने विचारलं, आवाजातली उत्सुकता लपवत.

वडिलांनी कपाळाला आठ्या घालून आठवायचा प्रयत्न केला, "येवढंच... की त्या दोस्तीमुळंच आपल्याला ही सुप्याची जमीन इनाम मिळाली, आन तिथनंच इनामदार हे नाव पडलं."

भस्मबीज - भाग १०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फुलवताय कथा. मजा येतेय वाचायला.
पुढच्या भागात त्याला त्याचे कुळाचार कळू देत.
पुढचा भाग लवकर टाका.

मस्त आहे हा भाग सुद्धा. मला वाटले कि कुलदैवत कोण आहे हे आई-वडिलांना विचारून भागेल, पण येथे अभिजित जुनी कागदपत्रे शोधत आहे. बघूया आता काय होतय ते.

प्रत्येक भाग एवढा विस्तृत असतो, प्रसंग समोर उभे राहतात.
वाचकांना प्रश्न पडतात कथेतील पत्रांविषयी हे लेखकाच यश आहे.
एक वेबसीरीज होईल अस कथानक आहे.
मायबोली वर काही लोकांची खूप वर पर्यंत ओळख असण्याची शक्यता आहे, त्याचं अशा गुणी लेखकांकडे लक्ष असू दे.